गौरव मुठे
जसजसा सणोत्सवाचा हंगाम जवळ येतो, तसतसं आपल्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण अनुभवण्यासोबतच महत्त्वाच्या खरेदीचा उत्साह वाढतो. हा उत्सवाचा प्रसंग केवळ आनंदच देत नाही, तर महत्त्वाच्या खरेदीला प्रोत्साहित करतो.
साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला आपल्याकडे सांस्कृतिक महत्त्व आहे. या काळात मालमत्ता संपादनासह नवीन व्यवसाय किंवा नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून बरेच लोक या दिवशी नवीन घर, गाडी घेण्यासाठी आधीपासूनच नियोजन करतात. हा शुभ दिवस फक्त खरेदीदारांमध्ये केवळ आत्मविश्वासच निर्माण करतो असे नाही, तर नवीन उत्पन्न वाढीसाठी बळ देतो. कारण हा दिवस यश आणि समृद्धी देतो असा जनमानस आहे.
नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी दसऱ्याला महत्त्व आहे. दसऱ्याच्या काळात नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यामागे या धारणा आहेत-
* कोणत्याही नवीन खरेदीसाठी वा कामाच्या सुरुवातीसाठी हा एक शुभ दिवस मानला जातो.
हेही वाचा >>> भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात चॅटजीपीटीची भूमिका!
* सकारात्मक ऊर्जा : दसऱ्याच्या दिवशी नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक केल्याने संबंधित उपक्रमाला सकारात्मक ऊर्जा मिळते.
* घरखरेदीसाठी विशेष सवलतीचे लाभ :
जे लोक या दरम्यान घरखरेदी करू इच्छितात त्यांच्यासाठी बँकांकडून सवलतीच्या दराने कर्ज किंवा बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील या कालावधीत अनेकदा विशेष सवलत जाहीर केली जाते, ज्यामुळे एकूणच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते.
* बँकांचे प्रत्साहन : बँकांच्या अर्थसाह्याचे बळ घेऊन घरखरेदीची उंच झेप घेणाऱ्यांची संख्या घरखरेदीदारांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे घर विकत घेण्याच्या प्रक्रियेत बँकांचा पािठबा किती आहे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. सणांच्या काळात बँका ऑफर देत असतात. तसेच कर्जाची प्रकरणं जलद निकालीदेखील लावली जातात. योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर काही दिवसांतच गृहकर्ज मंजूर होईल याची खबरदारी बँका घेतात. त्यामुळे या काळात गृहकर्जासाठी बँकांचा पािठबा अत्यंत सकारात्मक असतो.
* कर लाभ : दसऱ्यादरम्यान मालमत्ता खरेदीवर कर बचतीचे फायदेदेखील मिळतात. या काळात बांधकाम व्यावसायिकांकडून मुद्रांक शुल्क माफ केले जाते. शिवाय बँकांकडूनदेखील प्रक्रिया शुल्कात सवलत दिली जाते. बऱ्याचदा बँकांकडून या सणोत्सवाच्या काळात असे शुल्क आकारले जात नाही.
* भाडे उत्पन्न : गृहखरेदीतून घर मालकाला भाडे उत्पन्नदेखील मिळू शकते. ज्यामुळे ‘सेकंड होम’ असल्यास घसारा, देखभाल खर्चाची तरतूददेखील त्यातून होते.
* सवलतीचा काळ : दसऱ्यादरम्यान मालमत्तेचे कमी दर हे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे एक मुख्य कारण असते. कारण बांधकाम व्यावसायिक सणासुदीच्या हंगामातील खरेदीदारांची क्षमता समजून घेतात; आणि त्यानुसार अनेक आकर्षक सवलती जाहीर करतात. शिवाय जाणकार खरेदीदार किमती आणि संभाव्य वाटाघाटी करण्यासाठी या संधीचा फायदा घेऊ शकतात.
‘‘दसरा ते दिवाळीपर्यंतच्या काळात खरेदीदारांची आवड आणि खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. या काळात खरोखरच घरखरेदीस लोक उत्सुक असतात. ज्यामुळे बांधकाम व्यावसायिकदेखील अधिक सवलती देतात. मुंबईत घरांच्या मागणीत सतत वाढ होत असल्याने सर्व प्रकल्पांच्या किमतींमध्येदेखील वाढ होत आहे. त्यामुळे गृहखरेदीदारांनी आताच घरखरेदीचा मुहूर्त साधल्यास पुढील वाढत्या किंमतवाढीपासून दिलासा मिळेल, घर खरेदीच्या यंदाच्या सकारात्मक वातावरणात विक्रीचे प्रमाण वाढण्याबाबत आम्ही आशावादी आहोत,’’ असे रुणवाल समूहाच्या विक्री, विपणन प्रमुख लुसी रॉयचौधरी म्हणाल्या.
‘‘बऱ्याचदा घर आवडलेले असते, त्यासाठी आवश्यक असलेली ९० टक्क्यांहून अधिक रकमेची जुळवाजुळवदेखील झालेली असते. मात्र त्यानंतरही घर घ्यावे की नाही अशी चलबिचल अनेकांच्या मनात असते. अशी मानसिकता झालेल्या घरखरेदीदारांना या सणांच्या काळात एक सकारात्मक ऊर्जा मिळते व घरखरेदीचा अंतिम निर्णय घेण्यास मदत होते,’’ असे मत सुरतवाला बिझनेस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जतीन सुरतवाला यांनी व्यक्त केले.
महागडय़ा घरांची मागणी वाढली
२५ ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान किंमत असलेल्या सदनिकांची सप्टेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक मागणी होती. ज्यात सर्व गृहनिर्माण व्यवहाराच्या ३४.४ टक्के समावेश होता. तर ५० लाख आणि १ कोटी रुपये दरम्यान किंमत असलेल्या मालमत्तेचा वाटा ३३.६ टक्के होता. विशेष म्हणजे, १ कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या सदनिकांची मागणी यंदादेखील वाढलेली आहे. तसेच सरलेल्या सप्टेंबर महिन्यात २.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ९७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, असे महाराष्ट्र शासन नोंदणी आणि स्टॅंप्स विभागाच्या (आयजीआर) आकडेवारीवरून दिसून आले आहे.
मुंबईतील घर विक्रीचा कल कसा?
मुंबई आणि उपनगरांमध्ये विद्यमान वर्षांतील पहिल्या सहा महिन्यांत ५०,५४६ नवीन घरे विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्यापैकी आतापर्यंत ४०,७९८ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिचौरस फुटांचा दर ६ टक्क्यांनी वधारला आहे. सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये सरासरी ७,५९३ रुपये प्रतिचौरस फूट असा दर राहिला आहे. गेल्या वर्षी हा दर सुमारे सरासरी ७,३६७ रुपये होता.
(नाईट फ्रॅंक: इंडिया रिअल इस्टेट २०२३)