मोहन गद्रे

मुंबईतील पर्यावरण रक्षण हा मुंबईतील रहिवाशांच्या काळजीचा आणि म्हणून चच्रेचा विषय कायम चर्चेत असतोच. पण त्रयस्थपणे विचार केला की या विषयातील निरीक्षण थोडे कोडय़ात टाकणारे वाटते. ते मांडणारा निरीक्षणात्मक लेख.

आजच्या मुंबईचा भौगोलिक इतिहास पाहिला तर मूळ मुंबई ही सात बेटांनी बनलेली होती. त्या बेटांवर गर्द झाडीने आच्छादलेल्या लहान लहान टेकडय़ा होत्या. पूर्व किंवा पश्चिम किनाऱ्याला समुद्राला जाऊन मिळणाऱ्या लहान लहान नद्या होत्या. भरपूर वनराई होती. पूर्वेला आणि पश्चिमेला स्वच्छ लांबलचक समुद्रकिनारा होता. आता सांगून विश्वास बसणार नाही. परळची हाफकिन इन्स्टिटय़ूट हे मुंबईच्या गव्हर्नर साहेबांचे उन्हाळ्यातील राहण्याचे ठिकाण होते, इतकी गर्द झाडी आणि शांतता तेथे पूर्वी होती. उपनगराच्या भूभागावर शेती, बागायती आणि भाजीचे मळे फुलत होते. वांद्य्राची पाली हील गर्द झाडीने आच्छादलेली होती. त्यातून माउंट मेरी चर्चची टोकदार दोन पांढरी उंच शिखरे डोकावायची. आज त्या टेकडीवर सिमेंटच्या इमारतींचे जंगल फोफावलेले आहे. आणि माउंट मेरी चर्च ते दोन मनोरे त्यात झाकून गेले आहेत. अशा मुंबईतील काही टेकडय़ा सपाट करून टोलेजंग इमारती तेथे उभ्या राहिल्या आहेत. तेथे फ्लॅटमध्ये राहत असलेल्या मुंबईकरालाही मुंबईच्या पर्यावरणाची चिंता वाटतेच.

अशी किती ठिकाणे सांगावीत? आज अतोनात गजबजलेल्या टोलेजंग इमारती असलेल्या दादरसारख्या ठिकाणी पूर्वी असंख्य नारळाच्या वाडय़ा होत्या. मी आणि माझी भावंडे दादरमधील महापलिकेच्या ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या जवळ दादरसारख्या ठिकाणी एक भाजीचा मळा होता आणि त्या मळ्यात असलेल्या विहिरीवर चक्क मोट चालत असे. इतर ठिकाणीदेखील विहिरीच्या पाण्यावर पिकणारे भाजीपाल्याचे मळे होते.

या बेटावर निसर्ग वैभव होतेच, त्याचबरोबर मुंबईसारख्या महत्त्वाच्या बंदरामुळे मुंबई एक मोठी उद्यम नगरी म्हणूनही उदयाला येत होती. भारताच्या कानाकोपऱ्यातून आपला बाड बिस्तरा घेऊन लोक येऊन आपले उपजीविकेचे साधन येथे शोधत होते आणि ते त्यांना हमखास मिळत देखील होते. तेव्हापासून, मुंबई येईल त्याला आपल्यात समावून घेत आहे. मुंबईकडे येणाऱ्यांचा ओघ वाढत गेला. आजतागायत तो अखंड सुरूच आहे. यापुढेही तो थांबेल असे लक्षण नाही. अशा रोज वाढणाऱ्या मानवी वस्तीला सामावून घेण्यासाठी मुंबई बेटावरील ते सर्व निसर्ग वैभव टप्प्या टप्प्याने लोप पावले आणि त्या ठिकाणी मानवी वस्तीने हळूहळू हातपाय पसरायला सुरुवात केली, त्यातून पुढे आजची जिकडे पाहाल तिकडे गगनचुंबी इमारतीच इमारती दृष्टीला पडणारी मुंबई अवतरलेली आहे.

इतके हे सर्व होत असताना, मुंबईच्या पर्यावरणाची काळजी मात्र प्रत्येक मुंबईकराला पडलेली होतीच आणि आजही ती चिंता मुंबईकरांना सतावते आहेच. एखाद्या ठिकाणची झाडी तोडून तेथे टॉवरचे बांधकाम सुरू झाले की, त्याच्या शेजारच्याच नुकताच उभ्या राहिलेल्या टॉवरमधल्या रहिवाशांच्या मनाला त्याच्या समोर होणारी ती वृक्ष तोड वेदना देते. काही वेळा तेथील वृक्षतोड थांबावी म्हणून लहानसा आंदोलनाचा कार्यक्रमदेखील पार पाडला जातो. परंतु अगदी पन्नास एक वर्षांपूर्वीपासून तेथे राहणारा खमक्या मूळ रहिवासी मात्र त्यांना अगदी सडेतोड प्रश्न विचारून निरुत्तर करू शकतो. कारण आता जी मंडळी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षतोडीला विरोध करत असतात त्यांची आधुनिक वसाहत, पूर्वी त्या जागी असलेली वृक्षराजी तोडूनच वसवलेली असते. हाच आणि असा सिलसिला अजून पुढे सुरू राहतो.

बेसुमार वृक्षतोडीमुळे पाऊस बेभरवशी झाला आहे, हे सर्वानाच मनापसून पटते. आता मुंबईत मातीची जमीन उरली नसल्यामुळे, पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही याची त्याला चिंता वाटते, पण त्याच बरोबर धुळीची समस्या कायमची मिटावी म्हणून शक्य तेथे काँक्रीटीकरण हाच उपाय त्याला व्यवहारी म्हणून करावासा वाटतो. आणि त्याचा परिणाम म्हणून रहिवासी विभागात मातीची जमीन शोधावी लागेल अशी अवस्था आहे.

प्रत्येक शाळकरी मुलाच्या पुस्तकात पर्यावरण जपण्याचा संदेश देणारा धडा हमखास असतोच. आणि पर्यावरणाचा नाश होणे मानवजातीला किती घातक आहे याचे उतारेच्या उतारे मुलांचे तोंडपाठ असतात. पर्यावरण रक्षणासाठी बहुतेक प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांची दिंडी आयोजित करते. विद्यार्थी हातात पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक घेऊन दिंडीत सहभागीदेखील होत असतात. पूर्वी हवा बिघडली आहे असे म्हणण्याची पद्धत होती, पण आज अगदी शाळकरी मुलालादेखील हवा बिघडते म्हणजे काय होते याचे पुरेपूर ज्ञान असते. म्हणजे वातावरणात किती धुलीकण असले, कुठले वायू किती प्रमाणात असले की पर्यावरणाला धोका उत्पन्न होतो हे त्याला तोंडपाठ असते. वाहनांतून उत्सर्जति होणाऱ्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होते हे त्याला माहीत असते, पण रोज शाळेत मात्र त्याला ममी-पापांनी त्यांच्या टू-व्हीलर किंवा फोर व्हीलरनेच सोडावे, असा हट्टच असतो. ते शक्य नसेल तर शाळेच्या बसने शाळेत जावे असे त्याला किंवा त्याच्या पालकांना वाटत असते.

निसर्गात पशू-पक्ष्यांचे आणि कीटकांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येक मुंबईकर जाणून आहे. आपल्या आजूबाजूच्या चिमण्या दिसेनाशा झाल्याबद्दल त्याला काळजी वाटते आणि त्यांच्यासाठी सुबक घरकुल आपल्या टॉवरमधील आपल्या घराजवळ मुंबईकर लावून देतो. मोबाइल टॉवरमुळे रेडियेशन होते त्याचा वाईट परिणाम म्हणून चिमण्या कमी होत आहेत. शिवाय ते मानवी आरोग्याला घातक आहे, हेही मुंबईकरांनी कुठेतरी वाचलेले असते, पण त्याचबरोबर आपल्या मोबइलला अखंडित नेटवर्क मिळाले पाहिजे म्हणून आग्रही असतो. त्याच्या वृद्ध सासरेबुवांना त्यांच्या वाढदिवसाला चांगला स्मार्ट फोन भेट म्हणूनही देण्याचे त्यांनी मनाशी पक्के केलेले असते. म्हणजे मोबाइलला अविरत नेटवर्क हवे, पण जवळपास मोबाइल टॉवर मात्र असू नये.

अगदी बिबळ्यादेखील यापुढे आपल्या सोसायटीत वेळोवेळी दिसत राहणार हे जाणून, त्याच्या सोबत यापुढे आपल्याला जमवून घेणे जरूर आहे हे जाणून बिबटय़ाच्या सवयी समजून घेण्यासाठी, वनाधिकाऱ्यांना आमंत्रित करून बिबटय़ाच्या सर्व सवयी आणि इतर सर्व माहिती अगत्याने तो करून घेतो.

थोडक्यात, पर्यावरण टिकविण्याची त्याची जबाबदारी तो पुरेपूर जाणून आहे. त्यामुळेच कुठेही पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे असे दिसल्यास तो त्याठिकाणी विरोध करायला सरसावतोच.

gadre.mohan@rediffmail.com