भगवान मंडलिक 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाढत्या नागरीकरण, औद्योगिकीकरणाचा विचार करून शासनाने गेल्या काही वर्षांपासून खोपोली, कर्जत, वांगणी, मुरबाड, शहापूर या रस्ते मार्गाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत मुंबई, अलिबागला महामार्गाने जोडणारा हा भाग मुरबाड, शहापूर परिसराला महामार्गाने जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. या रस्ते मार्गातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या रस्ते मार्गामुळे खोपोली, कर्जत, वांगणी परिसर नगर, पुणे, नाशिक शहरांना जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

मुंबई लगतचा चौथी मुंबई म्हणून नावारूपास येत असलेला बदलापूर ते वांगणी, शेलू, कर्जत, मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा हा ग्रामीण पट्टा विकासाच्या वाटेवर आहे. ग्रामीण भाग म्हणून या भागांचा प्रशासकीय कारभार ग्रामपंचायतींच्या हाती राहिला. त्यामुळे आवश्यक त्या रस्ते आणि इतर नागरी सुविधा मिळताना या परिसराला नेहमीच विकासासाठी प्रतीक्षा करावी लागली. आता वाढत्या नागरीकरणामुळे मोठे गृह प्रकल्प वांगणी, शेलू परिसरात सुरू झाल्यामुळे प्रशस्त रस्ते मार्गाची आखणी या भागात केली जात आहे. नव्याने उभ्या राहणाऱ्या भव्य गृह प्रकल्प वसाहतींमध्ये आखीवरेखीव रस्तेबांधणी केली जात आहे.

आतापर्यंत ग्रामीण म्हणून ओळखला जाणाऱ्या वांगणी, शेलू, कर्जत परिसरात नवनवीन रस्त्यांची आखणी होत असल्याने विविध व्यवसाय, उद्योग येत आहेत. हिरवाईने नटलेला वांगणी, शेलू परिसर कल्याण-शिळफाटा ते बदलापूर, अंबरनाथ, कर्जत-पुणे या महत्त्वपूर्ण रस्त्याने जोडला गेला आहे. या रस्त्याच्या पुढे माथेरान पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळ म्हणून या भागात होणाऱ्या सुधारणांचा लाभ वांगणी, शेलू परिसराला मिळत आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण, शहापूर, मुरबाड, अलिबाग या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्ते मार्गावर वांगणी, कर्जत, शेलू परिसर आहे. मुंबई, पुणे परिसरात जाण्यासाठी रेल्वेची सुविधा या भागात उपलब्ध आहे. पुणे परिसरात नोकरी, व्यवसाय करणारा नोकरदार वांगणी, शेलू परिसराला निवासासाठी प्रथम प्राधान्य देत आहे. आठवडय़ाच्या शेवटी आपल्या सेकंड होममध्ये जाऊन विसावा घ्यावा या विचारात असलेला मुंबई परिसरातील मध्यमवर्गीय वांगणी परिसरात कायम निवास, शेतघरांना प्राधान्य देत आहे.

नवी मुंबईतील उलवेचे विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या व्यापार संकुलांचा परिसर रस्ते जाळय़ांमुळे वांगणी, शेलूच्या नजीक आला आहे. हा दूरगामी विचार करून या भागात भव्य निवासी हॉटेल्सची उभारणी केली जात आहे. अंबरनाथ, डोंबिवली औद्योगिक वसाहतींच्या टप्प्यात हा परिसर येत आहे. त्यामुळे नागरीकरण, व्यावसायिकीकरण, औद्योगिकीकरण अशा टप्प्यात वांगणी, शेलू परिसर आला आहे. या नव्या नागरीकरणामुळे वांगणी परिसरावरील ग्रामीण, दुर्गम भागाचा असलेला शिक्का लवकरच दूर होऊन नवे नगर या दिशेने या परिसराची वाटचाल आता सुरू झाली आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन अशा उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था वांगणी, शेलू परिसरात आहेत. मुंबई, डोंबिवली, ठाणे, पनवेल, अलिबाग परिसरातील तरुण नियमित रेल्वे, रस्ते मार्गाने या शैक्षणिक संस्थांमध्ये येतो. राज्याच्या विविध भागातील तरुण याठिकाणी निवास करून असतो. या शैक्षणिक संकुलांमुळे, नागरीकरणामुळे यापूर्वी कर्जत, खोपोलीपर्यंत प्रवाशांच्या गर्दी अभावी लोकल खडखडाट करत धावत होत्या. याच लोकल आता मुंबईपासून वांगणी, कर्जत, शेलूूपर्यंत आता प्रवाशांनी खच्चून भरून धावत आहेत.

या वाढत्या नागरीकरण, औद्योगिकीकरणाचा विचार करून शासनाने गेल्या काही वर्षांपासून खोपोली, कर्जत, वांगणी, मुरबाड, शहापूर या रस्ते मार्गाचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत मुंबई, अलिबागला महामार्गाने जोडणारा हा भाग मुरबाड, शहापूर परिसराला महामार्गाने जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. या रस्ते मार्गातील महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. या रस्ते मार्गामुळे खोपोली, कर्जत, वांगणी परिसर नगर, पुणे, नाशिक शहरांना जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या भागातील औद्योगिक वसाहती या रस्ते मार्गाने जोडल्या जाणार आहेत. याशिवाय कल्याण-निर्मल हा आंध्र प्रदेशात जाणारा महामार्ग कर्जत-मुरबाड परिसरातून जात आहे. विरार-अलिबाग द्रुतगती मार्ग याच शहरांच्या वेशीवरून जात आहे. रस्त्यांचे एक मोठे जाळे या भागात उभारले जाऊन राज्याबरोबर देशाच्या विविध प्रांतांबरोबर वांगणी, शेलू, कर्जत परिसर थेट जोडला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले, मध्य रेल्वे मार्गाजवळील मुंबई जवळचे टिटवाळा हे ठिकाण नव्याने विकसित होत आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या या शहरात भिवंडी, पडघा, शिळफाटा रस्त्यांना जोडणारा बाह्यवळण रस्ता, टिटवाळा पूर्व-पश्चिम रेल्वेमार्गावर उड्डाणपूल ही कामे प्रगती पथावर आहेत. स्मार्ट सिटी निधीतून प्रशस्त काँक्रीट रस्ते बांधणी या शहरात करण्यात आली आहे. निसर्गरम्य मोकळय़ा हवेतील मुंबईच्या वेशीवरील टिटवाळा हे यापूर्वी दुसऱ्या घरासाठी प्रसिद्ध होते. आता या भागातील दुसरे घर ही संकल्पना मागे पडली आहे. मुंबईच्या गजबजाटाला कंटाळलेला रहिवासी टिटवाळय़ात कायमचे घर घेऊन या ठिकाणाहून नियमित रस्ते, रेल्वेने मुंबईतील आपल्या नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी जात आहे. उच्चतम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, रुग्णालये या भागात आहेत. काळू नदीच्या काठावरील टिटवाळा-मांडा शहर नागरीकरणामुळे नवे नगर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शहराच्या वेशीवरून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जात आहे. मुंबई-बडोदा महामार्ग, विरार-अलिबाग द्रुतगती महामार्ग जात आहेत. कल्याण-अहमदनगर महामार्गावर हे शहर वसले आहे. नव्या रस्ते मार्गामुळे टिटवाळा परिसर मुंबई-अहमदाबाद, रायगड, नाशिक भागाला जोडले जाणार आहे. याशिवाय कल्याण-मुरबाड, नगर रेल्वे मार्गातील पहिला टप्पा टिटवाळा भागातून सुरू होणार आहे. रेल्वे मार्गाने हे शहर थेट जुन्नर, आळेफाटा, पुणे, अहमदनगर भूभागाला जोडले जाणार आहे. सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित रस्ते मार्गामुळे चौथ्या मुंबई जवळच्या वांगणी, शेलू, कर्जत, टिटवाळा ही शहरे वेगवान  विकासाच्या टप्प्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eggplant shelu titwala towards rapid development amy