गोल, काटेरी इकिनो आणि फेरो कॅक्टस
हॉल किंवा दिवाणखान्यात आपण जास्तीत जास्त वेळ असतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, घरातल्या लोकांबरोबरची गप्पा मारण्याची जागा जरा ‘हटके’ असली तर सोन्याहून पिवळं! इनडोअर प्लॅन्ट्स घरात, सावलीत वाढतात. घरात सूर्यप्रकाश येत असेल तर ही झाडं कोमेजतात, पण अशा ठिकाणी कॅक्टसचे प्रकार चांगले वाढतात. शिवाय त्यांना पाणी आणि मातीही कमी लागते. जाड वाळूत कॅक्टस चांगलं वाढतं! काटेरी कॅक्टसची नजाकत वेगळीच असते. ‘इकिनोकॅक्टस’ आणि ‘फेरोकॅक्टस’ हे काटेरी कॅक्टसचे गोल प्रकार! उंचवटे आणि खोलगट भाग या गोलाकार कॅक्टसवर दिसतात आणि उंचवटय़ावर ठराविक अंतरावर पुंजक्या पुंजक्यांनी काटे उगवलेले असतात. हे काटे म्हणजेच कॅक्टसची पानं. प्रखर सूर्यप्रकाशात कॅक्टस वाढत असल्यामुळे पानांमार्फत पाणी बाहेर पडू नये म्हणूनच पानांचं काटेरी काटय़ात रूपांतर होतं.
इकिनोकॅक्टसच्या एका प्रकारात हिरव्या, गोलाकार खोडावर, छोटय़ा चामखिळीसारखे उंचवटे वाढतात. खोड जसजसं वाढतं तसतसे हे उंचवटेही वाढतात आणि खोडावर उंचवटय़ांच्या रांगा तयार होतात. दोन उंचवटय़ांमध्ये खोलगट भाग असतो. उंचवटय़ावर पुंजक्या पुंजक्यांनी मऊ केसाळ काटे येतात. खोड जसे वाढते तसे हे मऊ काटे कडक होतात आणि सोनेरी रंगाचे दिसतात म्हणूनच या प्रकाराला ‘सोनेरी चेंडू’ असंही नाव दिलं गेलंय! छोटय़ा कुंडीत हा ‘सोनेरी चेंडू’ वाढवला आणि हॉलच्या कोपऱ्यात ठेवला तर तो कोपरा ‘युनिक’ दिसतो. चेंडूच्या वरच्या बाजूला काटे खूप जवळजवळ येतात तेव्हा तो भाग सोनेरी काटय़ांमुळे अतिशय सुंदर दिसतो. ही काटेरी शोभा आपल्या नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी कॅक्टसची कुंडी कोपऱ्यात छोटय़ा टीपॉय किंवा टेबलवर ठेवावी. या कॅक्टसची वाढ अतिशय हळूहळू होते. हे कॅक्टस ‘इनडोअर’ म्हणून वाढवले तर क्वचितच फुलं येतात. याची फुलं कपासारखी आणि पिवळय़ा रंगाची असतात.
इकिनोकॅक्टसच्या दुसऱ्या प्रकारात खोड थोडं चपटं आणि राखट हिरव्या रंगाचं आहे. हा प्रकार जास्तीत जास्त १० इंचापर्यंत उंच वाढतो, या गोलाकार खोडाचा घेर १६ इंचांपर्यंत वाढतो, पण खोडाचा घेर ६ इंच झाल्यावरच गुलाबी, घंटेच्या आकाराची फुलं खोडाच्या टोकावर येतात. ही फुलं बरेच दिवस टिकतात, त्यामुळे वेगळा ‘फ्लॉवर पॉट’ ठेवण्याची गरज वाटत नाही. यावर येणारे काटेही मऊ आणि करडय़ा रंगाचे असतात. हॉलच्या भिंतीचा रंग फिकट असेल तर हा राखट करडय़ा रंगाचा इकिनोकॅक्टस हॉलची शोभा वाढवतो. जेवढा सूर्यप्रकाश या कॅक्टसला जास्त मिळेल तेवढे याचे काटे लांब वाढतात आणि त्यांचा रंगही तजेलदार दिसतो. हे कॅक्टस वाढताना सूर्यप्रकाश किंवा ऊन कमी पडलं तर खोड गोलाकार न राहता उभट होतं. इतर कॅक्टसप्रमाणे याही कॅक्टसला पाणी खूप कमी लागतं. उन्हाळय़ात पाण्याचं प्रमाण थोडं वाढवावं, पण कुंडीतली माती, वाळू थोडी ओलपट राहील एवढंच पाणी घालावं. अति पाणी घातलं की कॅक्टस खालून कुजायला लागतं. त्यामुळेच पाणी घालताना काळजी घ्यायला पाहिजे. वाढीच्या काळात कॅक्टसच्या कुंडीत थोडं खत घालावं. जर कुंडीत माती जास्त असेल तर महिन्यातून एकदा आणि मातीऐवजी ‘पिट मॉस’ किंवा बारीक वाळू असेल तर दर दोन आठवडय़ांनी खत घालावं. कॅक्टसचा बॉल पूर्णपणे वाढला की खालच्या बाजूनं त्याला छोटी पिलं फुटतात. तीही गोलाकारच असतात. तेव्हा मोठय़ा चेंडूच्या शेजारी छोटे छोटे चेंडू वाढताना दिसतात, तेव्हा या कॅक्टसची शोभा वेगळीच भासते.
चेंडूसारखा आकार असलेला ‘फेरोकॅक्टस’ हा दुसरा प्रकार! याच्यावरचे काटे ‘इकिनोकॅक्टस’पेक्षा लहान आणि अणकुचीदार असतात. काटय़ांचं प्रमाणही कमी असतं. त्यामुळे खोडावरचे उंचवटे उठावदार दिसतात. अणकुचीदार काटय़ांमुळे हे कॅक्टस थोडं उग्र दिसतं, पण हॉलमध्ये फर्निचर कमी असेल अशा ठिकाणी ‘फेरोकॅक्टस’ लावावं. सहा इंचाच्या कुंडीत हे कॅक्टस लावलं तर कुंडी भरगच्च दिसते. काटय़ांचा रंग थोडा तांबडट असल्यामुळे तांबडय़ा-हिरव्या रंगाचं मिश्रण सुरेख दिसतं.
‘फेरोकॅक्टस फॉरडी’ या प्रकारात खोडाचा रंग करडा-हिरवा आहे. त्याचा परीघ ६ इंचापर्यंत वाढतो. यावर बारीक चणीचे साधारण २० उंचवटे असतात. यावरचे काटे वैशिष्टय़पूर्ण दिसतात. एका पुंजक्यात सुईसारखे १५ काटे असतात. त्यापैकी ४ काटे मजबूत, तपकिरी-गुलबट असतात, तर बाकीचे पांढरे आणि बारीक असतात. चार काटय़ांपैकी, एका काटय़ाचं टोक जास्त अणकुचीदार असतं आणि त्यावर फिकट रेषा असतात. म्हणून ‘फॉरडी’ हा प्रकार वेगळा दिसतो, पण याला फुलं अगदी क्वचितच येतात. ‘लॅटीस्पायनस’ या फेरोकॅक्टसच्या प्रकारात खोड गोलाकार असलं तरी ते करडय़ा, फिकट रंगाचं असतं. खोडाची वाढ थोडी उभट होते. त्यावर बारा मोठे उंचवटे असतात. एक इंच लांबीचे साधारणपणे सहा ते बारा अणकुचीदार, पांढरट काटे असतात. त्यातला एक काटा मोठा आणि तांबडट रंगाचा असल्यामुळे प्राण्याच्या तोंडातून जीभ बाहेर आल्यासारखी वाटते म्हणून या प्रकाराला ‘डेव्हिल टंग’ असंही नाव आहे.
‘फिश हुक बॅरल’ या फेरोकॅक्टसच्या प्रकारामधले काटे माशाला पाण्यातून पकडण्यासाठी लावलेल्या गळासारखे असतात. त्यांची टोकं हूकसारखी वाढलेली असतात. ‘इनडोअर प्लॅन्ट’ म्हणून हा प्रकार कुंडीत लावला तर फुलं अगदी क्वचितच येतात. ‘सिलिंडर’सारख्या फेरोकॅक्टसच्या प्रकारात काटय़ांचा रंग तांबडट असतो. काटे ओले झाले की त्यांचा रंग लालभडक दिसतो. या दोन्ही प्रकारांत खोड नैर्ऋत्येकडे झुकलेलं दिसतं. म्हणून या दोन्ही प्रकाराला ‘कंपास बॅरल’ असंही नाव आहे. फेरोकॅक्टसच्या सर्वच प्रकारांना पोटॅशियम ज्यात जास्त आहे असं खत महिन्यातून एकदा दिलं तर कॅक्टसची वाढ चांगली होते. इकिनोकॅक्टससारखी याच्या गोलाकार खोडाला फारशी पिलं वाढत नाहीत.
इकिनो आणि फेरोकॅक्टसचं खोड गोलाकार वाढतं आणि त्याच्या दोन्हींवरच्या काटय़ांची रचना, आकार वेगवेगळा आहे. पहिल्या प्रकारात काटे मऊ असतात, तर दुसऱ्या प्रकारात अणकुचीदार असतात. दोन्हींचं हे असलेलं ‘वेगळेपण’ आपल्या घराचं वैशिष्टय़ ठरेल हे नक्की!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा