कमानकलेचा उगम इ.स. पूर्व काळातील काही प्राचीन संस्कृतींत आढळतो. पुरातन रोमन साम्राज्यासह युरोपातील लंडन, बर्लिन या शहरांतील कमानींनाही इतिहास आहे. परकीय भूमीवरील आक्रमकांनी आपल्या बाहुबळाचं प्रदर्शन घडविताना त्या भूमीवरील विजयाचं प्रतीक म्हणून ज्या कमानी उभारल्या, त्यापाठीमागे आक्रमकांचा जसा उन्माद आहे, तसाच पराभूतांच्या वेदनेचा हुंकारही आहे.
आपल्या अस्तित्वासह संस्कृतीच्या खुणा सभोवतालच्या समाजमनावर दृष्य स्वरूपात राहाण्यासाठी कायमस्वरूपी भव्यशिल्प वास्तूंची झालेली निर्मिती अनेक देशात दिसते. ही निर्मिती स्थानिकांबरोबर परकीय आक्रमकांनीही केलीय. त्यात उत्तुंग कमानी आणि स्तंभांची उभारणी हीतर बऱ्याच देशांच्या इतिहासाचे मानाचे पान ठरले आहे. या कमानी स्तंभ उभारणीला बऱ्यावाईट ऐतिहासिक प्रसंगाची पाश्र्वभूमी असेल किंवा आपल्या साम्राज्यविस्तार मोहिमेतील विजयाची कायमस्वरूपी यादगार राहाण्यासाठी केलेला तो खटोटोपही असेल.
कमानकलेच्या इतिहासाला तशी हजारोवर्षांची पाश्र्वभूमी आहे. मात्र एक निश्चित,  की कमानकलेचा उगम इ.स. पूर्वकाळात काही प्राचीन संस्कृतींतही आढळतो. पुरातन रोमन साम्राज्यासह युरोपातील लंडन, बर्लीन या गजबजल्या शहरातील कमानीनाही इतिहास आहे. त्यापाठी मागे सुखद आठवणींबरोबरच दु:खाचीही किनार आहे. परकीय भूमीवरील आक्रमकांनी आपल्या बाहुबळाचं प्रदर्शन करताना त्या भूमीवरील विजयाचं प्रतीक म्हणूनही ज्या भव्य कमानी बांधल्या, त्यापाठीमागे जसा आक्रमकांचा उन्माद आहे तसा पराभूतांच्या वेदनेचा हुंकारही आहे.
अशा कमानी उभारण्या पाठीमागे जे त्यांनी आपल्या प्रभावासह सभोवतालच्या समाजमनावर गारूड घालण्याचाही प्रयत्न केलाय. तसेच स्वत:ची संस्कृती, कलावैधिष्ठय़ाबरोबर आपल्या वास्तुकलेची मोहरही उमटवली आहे. युरोपिय देशात कमानी, तर भारत भूमीवर विजयाप्रित्यर्थ स्तंभ उभारणीचा परिपाठ नजरेत भरतो. सम्राट अशोकाच्या काळातील स्तंभ आजही आपल्या दृष्टीस पडताहेत, पण त्याला साम्राज्य विस्ताराची पाश्र्वभूमी नाही. तर स्वत: स्विकारलेल्या बौद्ध धर्माचा उपदेश आणि आज्ञा- सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याचे बांधकाम झाले आहे.
जगभर उभारलेल्या कमानी किंवा उत्तुंग स्तंभ हे तर त्या-त्या संस्कृतीच्या इतिहासाचे साक्षीदार असले तरी या वास्तुशैलीच्या बांधकामाकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून बघितल्याचे जाणवते.
कमानीवरील साकारलेल्या बांधकामाचे वजन पेलण्यासाठी त्याचा उपयोग करण्याची कला अस्तित्वात आली. याच पद्धतीचा उपयोग नदी तसेच सागरावरील सेतूच्या कमानी बांधकामामध्ये करून त्याला मजबुती दिली जातेय.
वर म्हटल्याप्रमाणे कमानी वास्तुकला इ.स. पूर्वकाळापासून अस्तित्वात आहे. बाबिलोनियन संस्कृतीच्या अवशेषातून त्याचे दर्शन घडते. तसेच सिंधु संस्कृतीच्या बांधकामातही कमानी आढळतात. अनेक वर्षांच्या स्थित्यंतरातून विकसीत झालेल्या कमानी बांधकामाला आजची बांधकाम शास्त्राची जोड मिळाल्यावर बांधकामाच्या आकारावरून त्याची वर्गवारी मान्य झाली. जसे १) अनघड कमानी २) ताशीव कमानी ३) मापीव कमानी.
गरजेनुसार बांधकामातील कमानी उभारताना पुन: त्यात तीन प्रकारांचा अंतर्भाव आहे.
* अर्धवर्तुळाकार कमानी : हा प्रकार युरोप देशात इ.स. पूर्वकाळापासून अस्तित्वात आहे. रोमन साम्राज्यकालीन अर्धवर्तुळाकार कमानी प्रकाराला ‘इट्रस्कन’ असे संबोधले जाते. तेथे इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात ‘इट्रस्कन’ वसाहतीच्या वेशीवरील बांधकामात ही कमान पद्धती असायची.
* वृत्तखंडी कमान : इमारतीचे सौंदर्यकरण साधण्यासाठी या कमान शैलीचा वापर व्हायचा. त्याला शास्त्रीय दृष्टीकोन होता. दरवाजे-खिडक्यांच्या चौकटीवर येणाऱ्या वजनाचा भार कमी करण्यासाठी या कमानी अस्तित्वात आल्या.
* सपाट कमान : घराची दारे, खिडक्या यांचेवर दगड-विटांची रचना करून कमी उंचीची ही कमान शैली आली. बांधकामाचे सौंदर्य खुलवताना सुरक्षा हा घटकही सपाट कमान प्रकारात साधला जातो.
आपल्या भारत भूमीवर कमानी वास्तुशैलीची तशी कमतरता नाही. मंदिरे, प्रार्थना स्थळं, ऐतिहासिक स्मारकातून त्यांचे मनोहारी दर्शन घडतेच. आग्रा शहरानजीकच्या फत्तेपुर सिक्री या सम्राट अकबराच्या काळातील नावाप्रमाणेच ‘बुलंद’ असलेला ‘बुलंद दरवाजा’ हा तर भव्यता आणि कलात्मकतेसह आकर्षक कमानसदृष्य दरवाजा आहे.
अनेक पुरातन किल्ल्यांच्या प्रवेशद्वारी कमानसदृष्य प्रवेशद्वारं दिसतात, पण गेल्या १०० वर्षांच्या काळात ब्रिटिशकालिन ‘इंडिया गेट’ आणि मुंबई सागर किनारीचे ‘गेट ऑफ इंडिया’ (भारताचे प्रवेशद्वार) या दोन्ही कमीनींच्या अजोड शिल्पाकृतीच्या वास्तूंना तोड नाही. या दोन्ही कमानीवास्तूंना इतिहासासह तत्कालीन प्रसंगाची पाश्र्वभूमीही आहेच.
ब्रिटिश काळातील या दोन्ही वास्तू म्हणजे कमानी वास्तुशैलीचा अलौकिक अविष्कार आहे, पण  त्यांच्या बांधकाम पद्धतीतील फरक मात्र निश्चितच जाणवतो. दिल्लीच्या इंडिया गेटच्या बांधकामावर रोमन आणि ग्रीक शैलीचा प्रभाव जाणवतो. याचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी दगडाचे आहे. इ.स. १९१४ ते १९१९ या काळातील पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांप्रमाणेच लष्करी अधिकाऱ्याची स्मृति जतन करण्यासाठी या स्मृतिकमानींचे बांधकाम झाले आहे. त्याच्या भिंतीवर शहीद वीर जवानांची नामावली कोरून त्यांचे कायमस्वरूपी स्मरण करण्याचा हेतू त्यापाठीमागे आहे.
दिल्लीतील इंडिया गेटचा आराखडा प्रख्यात ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लॉचिन्स यांनी कल्पकतेनी तयार केला आहे. आज अस्तित्वात असलेल्या राष्ट्रपती भवनाचा आराखडाही त्यांनीच तयार केला आहे.
आदर्श आणि आकर्षक कमानीवास्तुकलेचं बांधकाम म्हणून देश-परदेशात मान्यता पावलेली ‘गेट वे ऑफ इंडिया’ (भारताचे प्रवेशद्वार) ही शिल्पाकृती मुंबई महानगरीचं बोधचिन्हच झालाय.
या दोन्हींची बांधकाम शैली भिन्न आहे. ‘इंडिया गेट’वर रोमन-ग्रीक बांधकाम शैलीचा प्रभाव आहे, तर गेट वे ऑफ इंडियावर अहमदाबाद-गुजरात शैली बांधकामाचा प्रभाव आहे. या दोन्ही बांधकामासाठी राजस्थानी दगडांचा वापर केला गेला. तसेच दोन्ही कमानी इमारती ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ निर्माण झाल्या. ‘गेटवे ऑफ इंडिया’चा आराखडा आणि नकाशा ब्रिटिश वास्तुविशारद जरेर्ज विट्टेट यांनी तयार केला आहे. इ.स. १९०४ मध्ये मुंबईप्रांताचा त्यावेळचा वास्तुविशारद जरेन बेग याचा साहाय्यक म्हणून प्रारंभी काम करणारा हाच जरेर्ज विट्टेट पुढे स्वकर्तृत्वावर सरकार दरबारी वास्तुविशारद सल्लागार म्हणून त्याला बढती मिळाली. गेट वे ऑफ इंडियाच्या निर्मितीनंतर छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, कोर्ट, वाडिया प्रसुतिगृह रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, ग्रँड हॉटेल या  देखण्या इमारती उभारून याच जरेर्ज विट्टेटनी मुंबई महानगरीवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली.
असामान्य प्रतिभेच्या जरेर्ज विट्टेट या वास्तुविशारदाला फार आयुष्य लाभले नाही. वयाची पन्नाशी पार करण्याआधीच इ.स. १९२६ मध्ये अमांश विकाराने तो मुंबईतच ख्रिस्तवासी झाला. आता मुंबईतील शिवडीच्या स्मशानभूमीतील त्याची कबर हीच फक्त नावनिशाणी या अफाट महानगरीत शिल्लक आहे.

Story img Loader