आपण आपल्या मनाप्रमाणे राहू शकतो अशी हक्काची जागा म्हणजे आपले घर. त्यामुळे आपलं घर सुरक्षित, शांत असावं या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील असतो. परंतु कित्येकदा असं आढळून येतं की, घरात शिरताक्षणीच आपल्याला अस्वस्थता, डोकेदुखी जाणवू लागते आणि याला घरातील प्रदूषित हवा कारणीभूत ठरू शकते. याचा आपण कधी गांभीर्याने विचार केला आहे का?
आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? आपल्या घरातील हवा प्रदूषित कशी असू शकते. पण ही हवा प्रदूषित होण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कारण घरात स्वच्छतेसाठी अथवा आरामदायी वातावरणासाठी अनेक गोष्टींचा आपण सातत्याने वापर करीत असतो. वरवर छोटय़ा वाटणाऱ्या या गोष्टींची जर योग्य तऱ्हेने काळजी घेतली तर घरातील हवा प्रदूषित होण्यापासून निश्चितपणे रोखू शकू, त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे.
हल्ली बदलत्या काळानुसार घराची रचना ही अत्याधुनिक स्वरूपाची होऊ लागली आहे. त्यामुळे अशा घरात कित्येकदा मोठमोठाल्या खिडक्या असल्या तरी हवा खेळती (व्हेन्टिलेशन) राहण्याच्या दृष्टीने योग्य ती सोय नसते. परिणामी घरातील हवा कोंदट होते. त्यामुळे नवीन घर घेताना अथवा नव्याने घराची पुनर्रचना करताना तेथील हवा खेळती राहील याकडे नीट लक्ष द्यावे.
बाथरूम, शौचालयातदेखील हवा येण्याजाण्याची योग्य सोय असावी. वेळोवेळी तेथील पाइप, सांडपाण्याच्या पाइपांची सफाई करावी. असे न केल्यास तिथे कचरा साचून विशिष्ट स्वरूपाचा घातक गॅस तयार होऊ लागतो. असा गॅस घरातील हवेत मिसळल्यास घरातील हवा तर प्रदूषित होतेच; शिवाय अनेक प्रकारचे विकारदेखील उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे या जागांसह घरातील इतर गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी रसायनं किंवा कीटकनाशके वापरली जातात. ती योग्य तऱ्हेने तपासून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यामार्फत घातक स्वरूपाचे गॅस बाहेर पडत नाही ना, याची शहानिशा करून घ्यावी. कारण हे गॅस घरातील हवा प्रदूषित करायला पुरेसे असतात.
घरात कारपेट असल्यास त्याची व्हॅक्युम क्लीनरच्या साहाय्याने आठवडय़ातून एकदा तरी स्वच्छता करावी. कारण वरवर ते स्वच्छ वाटत असले तरी त्यातील धाग्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर धूळीचे कण अडकलेले असतात. तसेच खिडक्यांवरील जाळ्या, पडदे यांचीदेखील नियमितपणे स्वच्छता करावी. त्यासाठी आवश्यक त्या साधनांचा वापर करावा. उगाच जोरजोराने ब्रश घासून ते स्वच्छ करू नयेत.
अनेकजण बाहेरून घरात येताना थेट चपला घालूनच आपण घरात प्रवेश करतो. या चपलांमार्फत रस्त्यावरच्या धुळीसकट अनेक सूक्ष्म जीवजंतू सहजपणे आपल्या घरात शिरतात. त्यामुळेच घराच्या प्रवेशदाराजवळ अशी काही सोय अथवा जागा करावी, जेणेकरून चपलांमधील धूळ त्यावर झटकून मगच आपण घरात प्रवेश करू शकू. अन्यथ चपला बाहेर ठेवण्याची सोय करावी.
आपण आपल्या घरी अनेक प्रकारच्या यंत्रांचा वापर करीत असतो- जसे एक्झॉस्ट फॅन, ए.सी, हीटर, कॉम्प्युटर आदी. तेव्हा या यंत्रांची वरचेवर स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. अन्यथा त्यावर धूळ तर साठलेली असतेच, शिवाय या उपकरणांमधून बाहेर पडणारी हवा अथवा धूर हादेखील घरातील हवा प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरत असतो. याचबरोबर घरातील उशा, त्यांचे आभ्रे, सोफा कव्हर यांचीदेखील नियमितपणे स्वच्छता करावी. कारण या ठिकाणी नुसतीच धूळ अडकून राहात नाही तर तिथे सूक्ष्म जंतू मोठय़ा प्रमाणावर अडकून राहतात.
तुम्हाला धूम्रपानाची सवय असल्यास घरात धूम्रपान करण्याचे टाळावे. शक्यतो घराबाहेर जाऊन धूम्रपान करावे. कारण तंबाखूचा धूर घरातील हवेला नुसताच प्रदूषित करीत नाही तर तिला अधिक घातक बनवितो.
थोडक्यात काय, जर घरातील जागा धुळीचे आगार बनल्यास, स्वाभाविकपणे घरातील प्रदूषणाची पातळीदेखील वाढते. याचा थेट परिणाम होतो तो आपली फुप्फुसं आणि श्वसनसंस्थेवर. मग हळूहळू यासंबंधित एकेक तक्रारी सुरू होऊ लागतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे पर्यवसान गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये होऊ शकते.
या प्रदूषित हवेवर उपाय म्हणून एअर कंडिशनर्स बसविणे हा कित्येकांना उत्तम पर्याय वाटत असतो. कारण ए.सी.मुळे घरातील हवा शुद्ध होते, असा एक समज आहे. पण सातत्याने ए.सी.युक्त वातावरणात राहणे, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तितकेसे चांगले नाही. कारण एसीतून निघणाऱ्या थंड व कोरडय़ा हवेमुळे सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी यांसारखे त्रास सुरू होतात.
घरातील हवेचे प्रदूषण रोखायचे असल्यास आपल्या खिडकीत किंवा बाल्कनीत झाडे लावावीत. हल्ली बाजारात अशी काही शोभिवंत झाडे मिळतात, ज्यामुळे धूळ थेटपणे घरात शिरत नाही. या व्यतिरिक्त बाजारात अशी काही प्युरिफायर्स उपलब्ध आहेत, जी घरातील प्रदूषित हवेपासून तुमचे रक्षण करूशकतात. यामुळे हवेमार्फत पसरल्या जाणाऱ्या रोगजंतू, धूळ आदींचा नाश होऊन चांगली हवा घरात येते.
घरातील हवा शुद्ध राखण्यासाठी उपाय जरी सोपे असले तरी ते नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे आहेत. जर वेळीच योग्य ती काळजी घेतली तर अनेक आजार गंभीर रूप धारण करण्यापूर्वीच आपण टाळू शकू. म्हणूनच आपल्या घरातील शुद्ध हवेचा डोळसपणे विचार करा आणि आपले आरोग्य राखा.
शुद्ध हवेसाठी..
आपण आपल्या मनाप्रमाणे राहू शकतो अशी हक्काची जागा म्हणजे आपले घर. त्यामुळे आपलं घर सुरक्षित, शांत असावं या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील असतो.
आणखी वाचा
First published on: 03-05-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For fresh air