ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची सध्या झपाटय़ाने वाढ होत असून, मोठमोठी गृहसंकुले येथे उभारली जात आहेत. ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या तिन्ही शहरांची कमाल वाढ झाल्यानंतर आता मध्य रेल्वेवर नव्या गृहसंकुलांसाठी अंबरनाथ आणि बदलापूरकडे मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अगदी दहा वर्षांपूर्वी मुंबई प्रदेश परिक्षेत्रात घर घेण्याचा शेवटचा पर्याय असणारे बदलापूर आता रिअल इस्टेटमधील सर्वात हॉट डेस्टिनेशन बनले आहे. ‘तुलनेने स्वस्तात मिळणारे घर’ हे त्याचे एक कारण असले तरी ते एकमेव निश्चितच नाही. त्याला इतर अनेक घटकही कारणीभूत ठरले आहेत.
ऐंशीच्या दशकात शहरीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असणारी ‘ओपन स्पेस’ या दृष्टिकोनातून शासनाचे अंबरनाथ आणि बदलापूरकडे लक्ष गेले. त्यातूनच १९८३ मध्ये स्थापन झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत तत्कालीन अंबरनाथ पालिका तसेच बदलापूर ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. मात्र असे करताना भौगोलिक सलगता हा महापालिका स्थापनेचा महत्त्वाचा निकष डावलून उल्हासनगरला स्वतंत्र ठेवले गेल्याने सुरुवातीपासूनच ही महापालिका वादग्रस्त ठरली आणि अखेर १९९२ मध्ये अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतून वगळण्यात आले. याच काळात हा दोन्ही शहरांकडे बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष गेले. या दोन्ही शहरांच्या शेजारी असणाऱ्या उल्हासनगरचे क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असून, त्याची लोकसंख्या सात लाखांच्या घरात आहे. उल्हासनगरच्या विस्तारीकरणास शहरात जागाच शिल्लक नसल्याने येथील नागरिकांनी हळूहळू निवासासाठी आजूबाजूच्या शहाड, अंबरनाथ तसेच बदलापूर परिसरात आश्रय घेण्यास सुरुवात केली.
प्रत्येक शहराला राजकीय गॉडफादर असावा लागतो, तेव्हाच त्या शहराची प्रगती होती. दुर्दैवाने या दोन्ही शहरांमधील स्थानिक नेतृत्वाला राजकारणात सुरुवातीच्या काळात फारशी संधीच देण्यात आली नाही. त्यांना एक तर खडय़ासारखे बाजूला ठेवले गेले अथवा निव्वळ पालखीचे भोई ठरविण्यात आले. कल्याण, डोंबिवली येथील उमेदवार अंबरनाथ विधानसभेतून निवडून जायचे. त्या उपऱ्या लोकप्रतिनिधींनी या शहराविषयी फारशी आस्था कधी दाखवली नाही. त्यामुळे या शहरांच्या दृष्टीने त्यांची कारकीर्द निष्क्रिय ठरली. अपवाद फक्त चिखलोली धरणाचा. युती शासनाच्या काळात पाटबंधारे खात्याच्या ताब्यात असणारे चिखलोली धरण अंबरनाथ पालिकेने विकत घेतले आणि इथे शहरवासीयांसाठी पाणी योजना राबवली. चिखलोली धरण लहान असले तरी सध्या नव्या धरणांसमोरील अडचणी लक्षात घेता पालिकेचा हा निर्णय दूरदर्शीपणाचा होता. कारण त्यामुळे अगदी छोटा हा होईना, पालिकेच्या मालकीचा लहानसा जलस्रोत आहे. किसन कथोरेंच्या रूपाने अंबरनाथ आणि बदलापूरला पहिला स्थानिक आमदार मिळाला. दुसऱ्या टर्ममध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत आता ते मुरबाड-बदलापूरचे आमदार आहेत. शिवाय त्यांच्याकडे कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्षपद आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच बदलापूर शहरात पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला. सध्या या परिसरात बिल्डर लॉबीच्या प्रेरणेने चौथी मुंबई साकारली जात आहे. त्याला पूरक ठरणाऱ्या योजना राबवून कथोरेंनी या परिसराच्या राजकीय पालकत्वाची भूमिका बजावली आहे.
विस्तीर्ण चौपदरी रस्ते
अगदी आताही उपनगरी रेल्वे सेवा ठप्प झाली की बदलापूर हे एक बेट असते. कारण दुसरे कोणतेही सोयीस्कर दळणवळणाचे साधन उपलब्ध नाही. आता मात्र ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून ‘काटई-बदलापूर-चौक’ अशा चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. कल्याण-बदलापूर रस्त्याचेही रुंदीकरण केले जात आहे. कर्जत ते मुरबाड व्हाया म्हसा असाही एक चौपदरी मार्ग होतोय. विशेष म्हणजे हे सर्व रस्ते टोल फ्री आहेत. त्यामुळे बदलापूरहून मुंबईला आता एक तासात पोहोचता येणार आहे. मुबलक पाण्याची खात्री
मुंबई परिसरात भविष्यात वाढणाऱ्या नागरी वस्त्यांसाठी प्रस्तावित एकही जलस्रोत अद्याप मार्गी लागू शकला नाही. मुरबाड व शहापूरमधील अनुक्रमे काळू आणि शाई ही दोन्ही धरणे अद्याप कागदावर आहेत. तसेच ही धरणे होण्यातले अडथळे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर बदलापूरकर मात्र सुखी आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. एक तर बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्प जवळपास पूर्ण होत आला आहे. येत्या एप्रिलअखेर उर्वरित किरकोळ कामे मार्गी लागून पुढील पावसाळ्यात धरणात जवळपास दुपटीने अधिक जलसाठा होईल. या वाढीव जलसाठय़ात बदलापूरकरांसाठी काही पाणी आरक्षित आहे. त्याचप्रमाणे पाटबंधारे खात्याच्या ताब्यात असणारे भोज धरण पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. शिवाय इंदगाव, चिंचवली येथे नवी छोटी धरणे बांधली जाणार आहेत. वितरण व्यवस्था सदोष असल्याने बदलापूर शहरात सध्या विषम पाणीपुरवठा होतो, मात्र अलीकडेच मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे ते अडथळेही दूर होणार आहेत. विशेष म्हणजे बदलापूर वगळता सध्या ठाणे जिल्ह्य़ातील कोणत्याही शहराकडे स्वत:चे इतके जलस्रोत नाहीत. त्यामुळेच बदलापूरमधील घर घेणे केवळ स्वस्तच नव्हे, तर भविष्याच्या दृष्टीनेही शहाणपणाचे ठरणार आहे.
मध्यमवर्गीयांची चौथी मुंबई
ठाणे जिल्ह्य़ातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची सध्या झपाटय़ाने वाढ होत असून, मोठमोठी गृहसंकुले येथे उभारली जात आहेत.
First published on: 25-01-2014 at 04:13 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fourth mumbai of middle class