कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर हा परिसर म्हणजे मध्यमवर्गाची चौथी मुंबई. अर्थात, बांधकाम व्यावसायिकांनीच या परिसराला ही बिरुदावली मिळवून दिली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या, आल्हाददायी वातावरणात अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज भव्य गृहसंकुले उभारण्यास अनेक विकासक या परिसराला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे ग्राहकही येथील गृहसंकुलांना पसंती देत आहेत.
क ल्याण, डोंबिवली ही मुंबईची महत्त्वाची उपनगरे. मुंबई परिसरातील विविध सरकारी कार्यालये, आस्थापने, कंपन्यांमध्ये सेवा देणारा बहुतांशी नोकरदार वर्ग हा याच भागातील आहे. मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेऊन तेथून बाहेर पडलेली वा पडू पाहाणारी अनेक कुटुंबे घरासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या परिसराला प्राधान्य देत आहेत. केवळ मोकळी हवा, आल्हाददायक वातावरण, डोंगर आणि खाडय़ा यांमुळे नागरिक या भागात राहण्यास येत आहेत असे नाही, तर या भागात शासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कल्याण- डोंबिवली पालिका यांच्यातर्फे विकासकामांचे कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत. देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना सन २०२० ते २०२५ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे अंदाज शासकीय संस्थांकडून वर्तविण्यात आले आहेत. या प्रस्तावांच्या अनुषंगाने  मुंबईतील अनेक विकासक कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरात अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज भव्य गृहसंकुले उभारण्यास प्राधान्य देत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या, आल्हाददायी वातावरणात राहण्याची मजा अनुभवण्यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील  गृहसंकुलांना ग्राहक सर्वाधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे.
वडदोरा, विरार ते उरण, नाहूर- ऐरोली-निळजे (डोंबिवली) ते बदलापूर, डोंबिवली पश्चिमेत ठाणे, भिवंडी शहरांना जोडणारा खाडीवरील उड्डाण पूल, बदलापूरकडून थेट नाशिक महामार्गाला मिळणारा नवीन रस्ता, बदलापूर ते उरण रस्ता, याशिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रस्ता प्रस्तावित आहे. अशा नवीन रस्त्यांच्या जाळ्यांनी ही शहरे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या मुंबई अंतरासाठी आता कल्याण, डोंबिवलीहून वाहनाने एक ते दीड तास लागतो ते अंतर येत्या काही काळात अर्धा ते पाऊण तासावर आल्यास आश्चर्य वाटायला नको. पनवेल-पुणे एक्स्प्रेस हायवे, मुंबई-नाशिक एक्स्प्रेस हायवेने कमी अंतराचे गणित सिद्ध करून दाखविले आहे. तेच प्रयोग हळूहळू या मिनी सिटीमध्ये राबविले जाणार आहेत.
कल्याण हे रेल्वे जंक्शन आहे. कल्याण, टिटवाळा परिसरातून रेल्वेने मुंबईला जाणे लोकलच्या वाढत्या फेऱ्यांमुळे सहज शक्य झाले आहे. या सगळ्या सुविधा नागरिकांना येथील गृह प्रकल्पांमध्ये भुरळ घालत आहेत. कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत. त्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे एक हजार कोटींचे विविध विकास प्रकल्प राबविले जात आहेत. येत्या काळात या शहराचे बदलणारे रूप नागरिकांना आकर्षित करीत आहे. कल्याणजवळ श्रीमलंग पट्टीत संरक्षण विभागाची विमानतळाची सोळाशे एकर जमीन आहे. नवी मुंबई, डोंबिवली ते उल्हासनगर अशा मेट्रो मार्गाचा विचार सुरू आहे. नवी मुंबई विमानतळ विकासाच्या वाटेवर आहे. कल्याणपासून रस्त्यांच्या नवीन जाळ्यांमुळे नवी मुंबई विमानतळ अवघ्या अध्र्या तासाच्या अंतरावर असणार आहे. विमानतळावर जाण्यासाठी मुंबईच्या गर्दीतून प्रवास करण्याची वेळ या भागातील रहिवाशांवर येणार नाही.
टिटवाळा गावच, पण पालिका हद्दीत असल्याने विविध नागरी सुविधा या भागालाही मिळत आहेत. हळूहळू टिटवाळा ‘मिशन सिटी’च्या दिशेने वाटचाल करीत आहे. रस्ते, वीज, पाणी आदी सुविधा पालिकेकडून देण्यात येत आहेत. पाच ते दहा हजार लोकवस्ती असणारे गाव आता पन्नास हजारांच्या पुढे कधी गेले हे ग्रामस्थांनाही कळलेले नाही; एवढी लोकवस्ती या भागात वाढत आहे. ेयेथे नागरी, आरोग्य सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. टिटवाळ्याच्या विकासात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे विकासाच्या प्रक्रियेत अग्रभागी असलेल्या संस्थांना आर्थिक सहकार्य देऊ केले जाते. त्यामुळे टिटवाळ्याचा चेहरा दिवसेंदिवस    बदलत चालला आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी हे गाव असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. वाढत्या लोकवस्तीचा, लोकांच्या राहणीमानाचा विचार करून येथे आरोग्यविषयक प्रकल्प होऊ घातले आहेत. मुंबईतील एक प्रसिद्ध रुग्णालयातर्फे टिटवाळ्यात अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्प राबविण्याचा विचार सुरू आहे. यामुळे कोणत्याही मोठय़ा उपचारांसाठी येथील रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत जाण्याची आवश्यकता भासणार नाही. येथे शिक्षणाच्या सुविधा मुबलक आहेत. शेजारील खडवलीजवळ सैनिकी शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे शिक्षणाचीही गैरसोय होण्याची सुतराम शक्यता नाही. या सर्व बाबींचा विचार करून मुंबई, ठाण्याकडील अनेक नागरिक टिटवाळ्याला पसंती देत आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने मुंबईतील कुटुंबीय, नातेवाईक यांच्याही सतत संपर्कात राहता येते. वेळप्रसंगी झटकन मुंबई गाठता येते. नवीन, जुन्या नागरिकांच्या गरजा ओळखून सुविधा नागरिकांना मिळू लागल्या आहेत. अशा सर्वागाने विकसित होणारी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा ही उननगरे नागरी सुविधांचा आधार घेत विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा