सदनिकेस असणारी बाल्कनी अनेक वेळा दिवानखान्यास जोडून असते. दोन अथवा तीन बाल्कनी असणाऱ्या वास्तूमध्ये किचनला जोडून एक लहान बाल्कनी असेल तर गृहलक्ष्मीच्या आनंदास सीमाच नसते, पण तिचा सुयोग्य वापर कसा करायचा याबद्दल ती कायम द्विधा मन:स्थितीत असते. अशा वेळी या जागेचा थोडा कलात्मक वापर केला तर तेथे चार-पाच कुंडय़ांची लहानशी परसबाग सहज तयार होऊ शकते. या बागेतील ताजे मसाले बल्लवाचार्याच्या रूपात स्वयंपाकघरातून तुमच्या ताटात कधी येतील हे तुम्हास कळणारसुद्धा नाही.
किचनला जोडून असलेल्या बाल्कनीमध्ये फार दाटी आणि अडचण न करता ४-५ लहान कुंडय़ा गुण्यागोिवदाने राहून गृहलक्ष्मी आणि तिचे स्वयंपाकघर यांची मनोभावे सेवा करू शकतात आणि तेही चविष्ट स्वादाचे जेवण देऊनच. जेवणाची चव वाढवणारे हे वनस्पतिरूपी बल्लवाचार्य आहेत – पुदिना, कडिपत्ता, अळू, पानओवा, हळद आणि सोबत पाहुणे कलाकार कोिथबीर, मिरची आणि लसूणसुद्धा! या परसबागेतील कुंडय़ा मात्र पसरट असाव्यात. पुदिना, कडिपत्ता, अळू, पानओवा या बहुवर्षीय वनस्पती आहेत. कुंडीसाठी सेंद्रिय मातीचे मिश्रण रोपवाटिकेत मिळते. पुदिना हा रांगता असल्यामुळे शाखा पद्धतीने सहज लावता येतो आणि त्याच्या दररोज दोन फांद्या काढल्या तरी पुन्हा जोमाने वाढू शकतो.
गृहिणीसाठी अळू ही आपत्कालीन भाजी. अळू हा पसरट कुंडीत छान पसरतो, मात्र ती थोडी खोल असावी. आठवडय़ातून एकदा त्याची  दोन-तीन पाने जरूर काढावीत. कडीपत्त्याचे रोप रोपवाटिकेत सहज मिळते. कडिपत्ता हा उभ्या कुंडीत लावावा. त्याची खालच्या बाजूंची मोजकी पाने काढल्यास त्यास छान फुटवा येतो. पानओवा हा पसरट कुंडीत छान पसरतो. त्याच्या मांसल पानांचा वापर एखाद्या पदार्थात केला तर अपचनाचे विकार सहज दूर होऊन जिभेस छान चव येते.
हळद उभ्या कुंडीत छान दिसते. तिच्या पानांचा वापर पदार्थाची गुंडाळी करून त्यांना वाफवण्यासाठी करतात, यामुळे आहारमूल्य तर वाढतेच पण त्याचबरोबर पदार्थात हळदीचे औषधी गुणधर्मसुद्धा उतरतात. हळदीचे कंदासह रोप भाजी बाजारातसुद्धा सहज उपलब्ध असते.
लसूण, कोिथबीर आणि मिरची ही पाहुणे मंडळी आहेत. लसणाचा एक जुना कांदा त्याच्या पाकळ्या सुटय़ा करून पसरट कुंडीत लावला असता एक महिन्यात लसणाची छान रोपे येतात. कोिथबीरीचेसुद्धा असेच आहे. मूठभर धने चांगले रगडून पसरट कुंडीत टाकले असता तीन आठवडय़ांत कुंडी भरून जाते. मिरचीचे रोप रोपवाटिकेत मिळते, त्यास उभ्या कुंडीत वाढवून वर्षभर ताज्या मिरच्यांचा आनंद उपभोगता येतो.
बाल्कनीमधील या छोटय़ाशा परसबागेमुळे घरातील टाकावू पाण्याचे योग्य नियोजन होते. स्वयंपाकासाठी वापरलेले अथवा ग्लासमधील उरलेले पाणी टाकून न देता स्वयंपाकघरात आणून या कुंडय़ांना घालावे. पुदिना आणि अळू यांना सतत ओलावा लागतो. पूर्वी हे परसदारी सुखाने नांदत होते, पण आता परसदार ही संकल्पनाच मोडीत निघाल्यामुळे त्यांची रवानगी कुंडीमध्ये झाली आहे. मुलांना पाणीपुरी, भेळ हवी असल्यास बाल्कनीमधील ताजा स्वच्छ पुदिना आणि मिरची तुमच्यासाठी लगेच धावून येतात. अशा परसबागेच्या माध्यमातून घरातील मुलांना प्रात्यक्षिकासह पर्यावरण व आहारमूल्यांचे शिक्षण तर देता येतेच; त्याचबरोबर त्यांच्यामध्ये घरी केलेल्या पदार्थाबद्दल आकर्षण आणि गोडी वाढून कुटुंबावरील ‘जंकफुडचे’ ओझे कमी होण्यास मदत होते.
कॅनडामध्ये शाळेतील मुलांना बरोबर घेऊन जंकफुडविरोधी अभियान राबविताना एक सामाजिक संस्थेने घरच्या परसबाग संकल्पनेचा प्रभावी वापर केला होता आणि हा यशस्वी प्रयोग मी तेथे स्वत: अनुभवलाही. ठाण्याच्या आदिवासी भागात कुपोषण निर्मूलनाचे काम करताना मी तेथील मुलांना बरोबर घेऊन हीच संकल्पना यशस्वीपणे राबवली ती फक्त चवदार अन्नाचे दोन घास पोटात जास्त जावे म्हणूनच.
बाल्कनीतल्या परसबागेमुळे कुटुंबाचे आíथक गणित थोडे सोपे तर होतेच, पण त्याचबरोबर देवाणघेवाण माध्यमातून सध्या हरवत असलेला शेजारधर्म टिकवून तो वृद्धिंगत करता येतो आणि सोबत जेवणाच्या टेबलावर स्वच्छ, निरोगी पदार्थाचा आस्वादही. एकत्रित जेवण घेण्याचा कौटुंबिक आनंद हा टी.व्हीवरील विविध मालिका सातत्याने एकामागे एक बघण्यापेक्षा नक्कीच वेगळा असू शकतो, हे वेगळे सांगण्याची काय गरज?

Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Solar pumps of Sahaj and Rotosolar companies shut down in two days after installation
सहज व रोटोसोलर कंपन्याचे सौर पंप बसविल्यानंतर दोन दिवसांत बंद, शेतकऱ्यांची पिके जळाली
Speed ​​Limit, Signal Violation, Accident, Nagpur,
तुम्हीही ‘सिग्नल’ तोडता का? मग ‘हे’ वाचाच, कारण वर्षभरात तब्बल….
Kitchen Jugaad Video
Kitchen Jugaad Video: फक्त एक वाटी मिठाच्या मदतीने काळी पडलेली तांब्या-पितळेची भांडी हात न लावता करा चकाचक
Shocking Video of Kettle caught fire while boiling the water viral video on social media
तुमच्याही घरात पाणी गरम करण्यासाठी ‘हे’ इलेक्ट्रिक उपकरण वापरत असाल, तर हा VIDEO नक्की बघा; पाणी गरम करताना १०० वेळा विचार कराल
Why do kitchen sponges come in different colors and what do they indicate
स्वयंपाकघरात भांड्यांपासून ओट्यापर्यंत सर्व सफाईकरिता एकच स्पंज वापरता? कोणत्या सफाईसाठी कोणता स्पंज वापरावा?
Story img Loader