घर खरेदी केल्यानंतर बिल्डरकडून येणारे शेवटचे मागणीपत्रक असते ते म्हणजे ‘घराचा ताबा घेण्यासंबंधीचे व त्या पत्रात नमूद केलेली सर्व रक्कम भरण्यासंबंधीचे.’ ते पत्र मिळाल्यावर आनंद तर होतोच, पण रक्कम जमा करण्यासाठी धावपळसुद्धा सुरू होते. पैशांची जमवाजमव करून किंवा कर्ज घेतलेल्या बँकांचा धनादेश बिल्डरला दिल्यावर तेथून ‘पझेशन लेटर’ दिले जाते व आपले घर असलेल्या इमारतीच्या साईट ऑफिसमध्ये ते पत्र संबंधितांकडे दिल्यावर खऱ्या अर्थाने ‘घराचा ताबा’ घेण्याचा प्रवास सुरू होतो.
‘घराचा ताबा’ घरमालकांच्या, फ्लॅटधारकाच्या हातात नुसत्या घराच्या चाव्या देणे असे मुळीच नाही, हे सर्वप्रथम येथे लक्षात घेतले पाहिजे.
जेथे आपण दहा रुपयांची मेथीची जुडी नीट बघून घेतो, येथे तर वस्तूच लाखाची आहे, म्हणून घराचा ताबा घेतानासुद्धा आपण नीट बघितलेच पाहिजे. सर्वसाधारणपणे घराचा ताबा देण्यापूर्वी व आपण घेण्यापूर्वी त्या इमारतीचे, त्या फ्लॅटचे सर्व काम १०० टक्के पूर्ण करण्याचे काम बिल्डरचे आहे. कायदेशीर प्रक्रिया करून मिळणारी सर्व प्रमाणपत्रे तर असलीच पाहिजे. शिवाय पाण्याचे नियोजन पूर्ण केलेले पाहिजे. फ्लॅटच्या आतील बाबी जाणण्याकरिता सर्वात प्रथम ताबा घेण्यापूर्वी फ्लॅटचे ‘Inspection’ करून बिल्डरने दिलेल्या Checklist वर कामासंदर्भात ‘Remarks’ नोंदवणे गरजेचे आहे. त्यामध्ये फ्लॅटमधील फ्लोरिंग, संडास, बाथरूम-किचन-बाल्कनीमधील लादीकाम, रंगरंगोटी, खिडक्या, दरवाजे, त्यांच्या फिटिंग्ज, त्यांचे लॉक्स, फ्लॅटमधील सर्व नळ फिटिंग्ज, गीझर, फ्लश टँक, संडासचे पॉट, किचन प्लॅटफॉर्म इ. तसेच बिल्डरने ज्या अ‍ॅमिनिटीज देण्याचे कबूल केले आहे, त्या सर्वाची पाहणी करण्याचे काम ताबा घेणाऱ्यांचे आहे. घराची साफसफाई (Acid-wash, Glass-Cleaning, Sanitary-Cleaning, Sliding Track Cleaning by Vacuum-Cleaner, Polishing) इ. गोष्टी खासकरून बघितल्या पाहिजेत.
या बरोबरीने मी असे सूचवू इच्छितो की फ्लॅटमध्ये येणारे पाणी (बोरिंग-म्युनिसिपल) कुठे दिले आहे, हे बघून घ्यावे. कारण Concealed Plumbing मुळे या गोष्टी सहजा लक्षात येत नाहीत. पाण्याच्या नळांची हाताळणी व एकंदरीत आपल्या फ्लॅटमधील होणारा पाण्याचा प्रवास जाणणे आवश्यक आहे. Plumbing  प्रमाणेच Electrical च्या बाबतीत जाणून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक रूममधील Electrical Points कुठे दिले आहेत, त्यांची बटणे, MCB, DB बोर्ड, इन्वेटर कनेक्शन चालू करून बघितले पाहिजेत.
मी या ठिकाणी नमूद करेन की, वीज व पाणी या अत्यंत गरजेच्या सुविधा असून, त्या खर्चीक व मौल्यवान आहेत. त्याचा योग्य व रीतसर वापर हा नवीन फ्लॅटधारकांकडून होणे अपेक्षित असण्याकरिता Inspection च्या वेळी त्या इमारतीचे काम केलेल्या इलेक्ट्रिक व प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाने फ्लॅटधारकाला त्याच्या वापराविषयी ‘डेमो’ दिला पाहिजे; जेणेकरून त्या नवीन जागेत राहावयास आलेल्या नवीन माणसाचा गोंधळ उडणार नाही. वरील प्रक्रिया, वरील सोपस्कार पार पाडणे म्हणजे खऱ्या अर्थाने बिल्डरने घराचा ताबा देणे होय व फ्लॅटघारकाने घराचा ताबा घेणे होय.
माझ्या निदर्शनानुसार, मुंबई, ठाणे सोडून ह्य़ा प्रक्रियेची वानवाच आहे. जेथे फक्त पैसे मिळाल्यावर बिल्डर चाव्या देऊन आपली जबाबदारी झटकतो. त्या ठिकाणी फ्लॅटधारकाला कोणी वाली राहत नाही. तुटलेले, फुटलेले सर्व काही स्वत: करावे लागते, विचारलं तर तुम्ही तुमचं बघून घ्या! असे म्हणणारे बिल्डर ‘माझी जमीन-मीच बिल्डर’ या गावातले असतात. त्यांना ‘घराचा ताबा’ देणे म्हणजे नक्की काय? हे त्यांचा फ्लॅट घेणाऱ्यांनीच शिकवले पाहिजे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा