प्रसाद गांगल, दीपा जोशी
ठाण्यातील ‘घंटाळी सहनिवास सोसायटी’ यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त कार्यक्रमात इमारतींचे, पटांगणाचे सर्वांनी छान फोटो काढले. सोसायटीचा हीरक महोत्सव कदाचित नवीन इमारत असेल. लिफ्ट असेल. सोसायटीने नुकताच गुढीपाडवा साजरा केला. यावेळी कल्पकतेने शोभायात्रा काढली होती. ५०व्या वर्षाचा सांगता समारंभ उद्याच्या अक्षय्यतृतीयेला होत आहे.
१९ ७५ साली आमची घंटाळी सहनिवास सोसायटी तयार झाली. त्या वेळी २५ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींनी स्वत:च्या आर्थिक बचतीतून नव्या घराचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात साकारही झाले. त्या वेळी ज्या सभासदांनी सदनिका खरेदी केल्या त्या सर्वांच्या दूरदृष्टीला सलाम! आमच्या सोसायटीचे बिल्डर मा. य. गोखले यांनी अतिशय भक्कम आणि सुरेख इमारती बांधल्या. सोसायटीची दोन मोठी पटांगणे आणि दोन छोटी मैदाने… अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. पार्किं गला जागा नसण्याच्या सध्याच्या दिवसांतही सभासदांवर रस्त्यावर गाडी उभी करण्याची वेळ आली नाही. आमच्या सोसायटीत चार इमारती आणि ७५ ब्लॉक आहेत. ना छोटी, ना मोठी अशी आमची ही सोसायटी जस्ट परफेक्ट! या सोसायटीतील प्रत्येक जण एकमेकांना नावाने ओळखतो हाही एक विशेषच!
आमच्या सोसायटीच्या पहिल्या-वहिल्या संचालक मंडळाने २६ जानेवारीच्या स्नेहसंमेलनाला सुरुवात केली. यात सर्व जण उत्साहाने सहभागी झाले, पुढे ओळखी झाल्या. स्नेहभाव वाढला आणि गेली अनेक वर्षे आम्ही खरा ‘सहनिवास’ अनुभवत आहोत. खरं तर जानेवारी, फेब्रुवारी हा पर्यटनाचा हंगाम. पण इथले अनेक जण २६ जानेवारीच्या कार्यक्रमाची सांगता झाल्यावरच पर्यटनाचा कार्यक्रम आखतात. लहान मुलगा असो अथवा ज्येष्ठ नागरिक… सोसायटीच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा आनंद वेगळाच! विजेत्या खेळाडूंना जणू ते ऑलिम्पिक मेडल वाटते आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या कलाकारांसाठी ते फिल्मफेअर अॅवॉर्ड!
२६ जानेवारीला सत्यनारायणाची पूजा करण्याचा मान इथल्या नवदाम्पत्याला दिला जातो. त्यामुळे नवीन सुनेला सोसायटीविषयी आत्मीयता वाटते आणि सर्वांची ओळख होते. कालांतराने सोसायटीतील सून जणू सोसायटीची कन्या होते. ही सोसायटी आपलं सासर नसून माहेर वाटावं इतकी आपुलकी तिला इथे मिळते. दरवर्षी २६ जानेवारीचा सोसायटीचा ‘आनंदबझार’ म्हणजे जणू आनंदोत्सवच. आनंदबझारचा स्टॉल चालवणे म्हणजे जणू व्यवस्थापन कौशल्याचा ( Management Skills) पहिला धडा. सोसायटीतील काही मुले आज एमबीए करून मोठ्या कंपनीत मानाच्या पदावर आहेत. त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची सुरुवात आनंदबाझारसारख्या कार्यक्रमांतून झाली. सोसायटीतील खेळांच्या स्पर्धा आणि जिद्दीने भाग घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून त्यांच्या मनातील स्टेजची भीती गेली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तसंच सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा संस्कारही रुजला. सोसायटीचे पटांगण म्हणजे लहान मुलांची कार्यभूमी. धावणे, पडणे, भांडणे आणि कट्टी, बट्टी यातूनच पुढे दृढ मैत्री झाली. ५० वर्षांपूर्वीची लहान मुले आता वरिष्ठ झाली आहेत. सुवर्ण महोत्सवानिमित्त गतकाळ आठवत असेल.
पन्नास वर्षे जुनी इमारत वेळोवेळी दुरुस्ती केल्यामुळे आजही सुस्थितीत आहे. आमच्या सोसायटीला लिफ्ट नसली तरी जिने चढणे-उतरणे हा व्यायाम करून इथले ज्येष्ठ फिट आहेत. कमालीची स्वच्छता. ओला-सुका कचरा यांचे वर्गीकरण आणि सुनियोजित व्यवस्थापन यामुळे ‘घंटाळी सहनिवास’ ला यापूर्वी ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘आदर्श सोसायटी’ हा पुरस्कार मिळाला आहे. आजही आमच्या सोसायटीत कोणी पाहुणा आला की इथली १०० टक्के मराठी संस्कृती, शेजारधर्म, अनौपचारिक गप्पांचा ज्येष्ठांचा कट्टा (आम्ही त्याला लाल कट्टा म्हणतो.) हे सगळं बघून हरखून जातो आणि विचारतो, ‘‘तुमच्या सोसायटीत मला जागा मिळेल का?’’ हीच आमच्या या आदर्श सोसायटीला मिळालेली खरी पावती. या सोसायटीत राहायला आलेली बरीचशी कुटुंबे चाळीतून ब्लॉक संस्कृतीमध्ये राहायला आली. परंतु त्यांनी चाळसंस्कृतीमधला जिव्हाळा आजही जपला आहे. आपलेपणा, मनमोकळेपणा आणि अडीअडचणीच्या काळात दुसऱ्याला मदत करण्याचा चाळीचा स्थायिभाव इथल्या सभासदांमध्ये खोलवर रुजला आहे.
संकटकाळी, अडीअडचणीला मध्यरात्री जरी कोणाची बेल वाजवली तरी समोरचा माणूस रागावणार नाही. उलट मदतीला धावून येईल हा इथला शिरस्ता. सोसायटीतील अनेकांची मुले आज परदेशात वास्तव्य करीत आहेत आणि त्यांचे वयस्क आईवडील सोसायटीत राहात आहेत. परंतु त्या मुलांना विश्वास आहे की, सोसायटी हे मोठं कुटुंब आहे आणि ते त्यांच्या आईबाबांसोबत कायम आहेत. सोसायटीतील नवे सभासद आणि भाडेकरूही दुधात साखर विरघळते तसे मस्त एकजीव झाले आहेत. आता कुणी नवे नाही जुने नाही- ‘आपण आपले सगळे’ हीच भावना दृढ आहे.
घंटाळी सोसायटीमध्ये सरकारी तसेच खासगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी राहतात. कोणी मोठे कलाकार आहेत तर कोणी उद्याोजक. हे सर्व सन्माननीय सदस्य सोसायटीत शिरतात तेव्हा ते काका/काकू/दादा/ताई असतात. जणू काही ते त्यांची बाहेरच्या जगातील वलय अथवा अधिकारपद सोसायटीच्या गेटच्या बाहेर ठेवून येतात. गेल्या ५० वर्षांत सोसायटीतील कोणाही व्यक्तीला साहेब/ मॅडम म्हटलेलं पाहिलं नाही. हा या सोसायटीतील रहिवाशांचा साधेपणा, आपलेपणा आणि वेगळेपणा आहे.
आम्हा सर्वांचे मोठं घर, मोठ्ठा परिवार म्हणजेच घंटाळी सहनिवास. सोसायटीच्या संचालक मंडळाने ५०वे वर्षं थाटात साजरे करायचे ठरविले आणि दर महिन्याला एक कार्यक्रम आयोजित करून सोसायटीत छान उत्सव नव्हे तर महोत्सवच साजरा केला. सोसायटीचा आपलेपणा इतका की काही जण अमेरिकेतूनही खास सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमासाठी आले. वर्षभरात तब्बल ५० सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. भव्यदिव्य सोहळा पार पडला. एंशीप्लस वर्षांचे ज्येष्ठ जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. हाच उत्साह, आपलेपणा साधेपणा हे या सोसायटीचे वैशिष्ट्य. सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात इमारतींचे, पटांगणाचे सर्वांनी छान फोटो काढले. सोसायटीचा हीरक महोत्सव कदाचित नवीन इमारत असेल. लिफ्ट असेल. सोसायटीने नुकताच गुढीपाडवा साजरा केला. यावेळी कल्पकतेने शोभायात्रा काढली होती. ५०व्या वर्षाचा सांगता समारंभ अक्षय्यतृतीयेला हळदकुंकू आणि पूजेने होणार आहे. कुठल्याही वास्तूचा सुवर्णमहोत्सवी क्षण साजरा होणं हा दुग्धशर्करा योग आहे तो त्या वास्तूसाठी आणि त्यातील रहिवासीयांसाठी भाग्याचंच. घंटाळी सहनिवासीयांच्या आयुष्यात हा योग जुळून आला. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त आजीमाजी रहिवाशांनी एकत्र येऊन जुन्या-नव्या आठवणींना उजाळा दिला. तीन पिढ्यांचा संगम, उत्साह पाहून सर्व रहिवासी मनोमन सुखावले. ‘‘शेजीबाईचे अतूट नाते वर्णु कसे मी त्या शब्दाते सुवर्ण उत्सवी दृढतर होते जन्मजन्मीचे ते नाते.’’