मुंबई शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे घरांच्या किमतीतही झपाटय़ाने वाढ होऊ लागली. त्यामुळे सुमारे १५ वर्षांपासून कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये तुलनेने कमी विक्री किंमत असलेल्या घरांना सर्व सामान्य नागरिकांकडून मोठी मागणी वाढू लागली. याच कारणाने या शहरांचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरिकीकरण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था आणि विकास प्रकल्प प्राधिकरणांच्या सोबतीने या भागांमध्ये वाहतूक सुविधा विकसित करण्यासाठी विविध विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. या विकास प्रकल्पांमध्ये काही रस्ते, उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पांमुळे या शहरांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात ही शहरे वाहतूक व्यवस्थेत अद्ययावत होणार असून, मुंबई शहराला अतीशय जलद गतीने जोडली जाणार आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर भागातील नागरिकांचे जगणे अधिक सुखकर होणार आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या आणि येथील सर्व सुविधांनीयुक्त नव्या बांधकामांमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना आगामी वाहतूक प्रकल्पांमुळे कशाप्रकारे सुखकर प्रवास करता येणार आहे, याचा घेतलेला हा आढावा..
कल्याण डोंबिवलीकरांना मेट्रोमुळे दिलासा-
गेल्या कित्येक वर्षांपासून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांतून कामानिमित्त मुंबई गाठण्यासाठी मध्य रेल्वे हा केवळ एकच जलद मार्गाचा पर्याय उपलब्ध होता. असे असले तरी झपाटय़ाने नागरिकरण होणाऱ्या या शहरांमध्ये जलद वाहतूक व्यवस्था उभी राहावी या उद्देशाने राज्य सरकार प्रयत्नशिल असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मेट्रो प्रकल्प या भागात आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते. त्यानंतर काही वर्षांपूर्वी कल्याण शहराला मेट्रोने कसे जोडले जाईल याचा अभ्यास राज्य सराकारतर्फे सुरू करण्यात आला होता. दरम्यान, ठाणे मेट्रोचा विस्तार करुन हा मार्ग भिवंडी आणि कल्याणला जोडण्याच्या प्रकल्पाची आखणी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून करण्यात आली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो पाचचा मार्ग सुमारे २५ किमी लांब इतका आहे. हा मेट्रो मार्ग भिवंडीतील काल्हेर, कशेळी या भागातून पुढे कल्याण शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडला जाणार आहे. कशेळी, काल्हेर या भागात अनेक मोठी गृहसंकुले गेल्या काही वर्षांत वसलेली आहेत. मात्र मेट्रोसारखी जलद वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांना याचा चांगला फायदा होणार आहे. तर पुढे या मेट्रो मार्गात कल्याण शहरातील दुर्गाडी पूल, आधारवाडी, काळातलाव, शिवाजी महाराज चौक यासारखे महत्त्वाचे भाग जोडले जाणार आहेत. हे सर्व भाग विकसित होणाऱ्या नवे कल्याण या परिसराला जोडले जाणार असल्याने या भागात उभ्या राहणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी गृह प्रकल्पांसाठी हा मेट्रो प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. त्यामुळे या भागातून नागरिकांना जलद गतीने ठाणे गाठता येणार असून त्या पुढे ठाणेमार्गे वडाळा आणि बोरिवली ही मुंबईची दोन्ही टोके कमी वेळात गाठणे शक्य होणार आहे. या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पार पडले असून भिवंडी शहरात या मेट्रो मार्गाचे कामही सुरू झाले आहे. या मेट्रो मार्गासाठी महत्त्वाचे असणारे कारशेड कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उभारले जाणार आहे. दरम्यान कल्याण डोंबिवली येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कामगारवर्गाची संख्या ही दररोज लाखोंच्या घरात आहे. मात्र कल्याण मेट्रोचा हा मार्ग डोंबिवली आणि तेथील एमआयडीसीमार्गे पुढे तळोजा भागातून नवी मुंबई मेट्रोला जोडण्यात येणार असल्याने त्याचा फायदा हा नवी मुंबईत जाणाऱ्या या लाखो प्रवाशांना होणार आहे. कल्याणसोबतच डोंबिवली, शिळफाटा आणि २७ गाव परिसरात उभ्या राहणाऱ्या बडय़ा गृह संकुलांना प्रवासाच्या दृष्टीने हा प्रकल्प तारक ठरणार असून या ठिकाणच्या नागरिकांना जलद प्रवाससेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ठाण्यासोबतच दुसऱ्या बाजूला नवी मुंबई आणि त्या भागात उभे राहणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या काही मिनिटांमध्ये गाठणे कल्याण, डोंबिवलीच्या नागरिकांना शक्य होणार आहे.
संकलन- आशीष धनगर