कुंडीमध्ये आणि परसबागेमध्ये श्रावण घेवडा चांगला वाढतो. शेंगा भरपूर येण्यासाठी बी मातीत पेरण्यापासूनच काळजी घ्या.
बा जारामध्ये श्रावण घेवडा जवळजवळ वर्षभर मिळत असला तरी श्रावणात तो जास्त चविष्ट लागतो. घेवडय़ाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. त्यातल्या काही झुडपांएवढय़ा म्हणजे २० सें.मी. ते ६० सें.मी. पर्यंत उंच वाढतात, तर काही वेलीसारख्या पसरत २ ते ३ मीटपर्यंत उंच होतात. कुंडीमध्ये आणि परसबागेमध्ये हे दोन्ही प्रकार चांगले वाढतात. शेंगा भरपूर येण्यासाठी बी मातीत पेरण्यापासूनच काळजी घ्या.
घेवडय़ाच्या बियांचं टरफल थोडं टणक आणि कडक असतं. त्यामुळे ते पेरण्याअगोदर रात्रभर पाण्यात भिजत टाका, म्हणजे टरफल थोडं मऊ होईल आणि बी लवकर रुजेल. सकाळी पाणी काढून बिया थोडा वेळ निथळत ठेवा. बिया फार कोरडय़ा होऊ देऊ नका. बिया ओलपट असतानाच एका बाटलीत टाका. त्यात रायझोबियम हे जैविक खत टाका. तीस बियांना एक चमचा ‘रायझोबियम्’ पुरेसं होतं. हे खत बी-बियाणांच्या दुकानात विकत मिळतं! जीवाणू (बॅक्टेरिया) पासून हे खत तयार करतात. हे जीवाणू रोपांच्या, झाडांच्या मुळांवर गाठीच्या रुपात वाढतात. ते जमिनीतला नत्र (नायट्रोजन) शोषून घेऊन झाडांना- मुळांना देतात. त्यामुळे रोपं, झाडं जोमाने वाढतात. हे खत बिया असलेल्या बाटलीत टाकले की बाटली चांगली हलवा, म्हणजे ते खत बियांच्या बाहेरच्या आवरणाला चिकटून बसेल. रायझोबियम्ने बी पूर्ण काळी करू नका. थोडेसे खतही रोपं वाढण्यासाठी उपयोगी पडतं! बी मोठय़ा कुंडीत पेरा, कारण त्यांची मुळं खूप वाढतात. गादी वाफ्यावर बी पेरण्याअगोदर वाफ्यात लाकडी पट्टीने किंवा काठीने ओळी आखून घ्या. दोन ओळीतलं अंतर ३-४ इंच ठेवा. प्रत्येक ओळीवर दोन-तीन इंचांवर बोटाने किंवा काठीने बोटाच्या पेराऐवढी खोल छिदं्र करा. कुंडीत मध्यभागी एक आणि त्याच्या चार दिशांना एक एक अशी चार छिदं्र पाडून त्यात ‘रायझोबियम्’ चे कोटिंग असलेलं बी पेरा. एका ठिकाणी दोन दोन बिया पेरा. त्या उगवल्यानंतर जे सशक्त रोप असेल तेच ठेवा आणि बाकीची रोपं काढून दुसऱ्या पिशवीत/ कुंडीत लावा. घेवडय़ाचं खोड नाजूक, बारीक असल्यामुळे त्याला पहिल्यापासूनच आधाराची गरज असते. पानंही खूप पातळ असल्यामुळे वारा जास्त असेल अशा ठिकाणी कुंडी ठेवू नका. कुंडीत बिया पेरण्यापूर्वीच आधारासाठी बांबूच्या पातळ कामटय़ा कुंडीत रोवून ठेवा. जमिनीत बिया किंवा रोपं लावायची झाल्यास आणि जागा कमी असल्यास ‘टेपी टेक्निक’ वापरून बिया पेरा. जमिनीत गोलाकार पद्धतीत बांबूच्या कामटय़ा रोवा आणि त्याची वरची टोकं एकत्रित बांधा, म्हणजे छोटा ‘डोम’ तयार होईल. प्रत्येक काठीभोवती २-३ बिया पेरा. हे टेक्निक वेली घेवडय़ांना जास्त उपयुक्त आहे. झुडपासारख्या वाढणाऱ्या घेवडय़ाच्या प्रकारालाही थोडा आधार द्यावा लागतो. शेंगा यायला लागल्या की त्याच्या भारामुळे झाड वाकतं. कोवळ्या शेंगा मातीत टेकल्या तर लवकर कुजतात. झुडपाचे बी रुजून थोडे मोठे झाले की त्याच्या मातीजवळच्या खोडाभोवती मातीचा छोटा ढीग करा म्हणजे खोडाला आधार मिळेल. ह्य़ा मातीत थोडं सेंद्रिय खतही मिसळा. घेवडय़ाचं खोड भराभर वाढतं. नुसतेच खोड आणि पानं वाढत राहिली तर फुलं लवकर येत नाहीत. वेली घेवडय़ाला आधार दिलेला असतो. त्यावर खोडाचा शेंडा गुंडाळून ठेवा म्हणजे तो त्यावर वाढत जाईल. आधारासाठी एकच काडी रोवली तर त्यावर पानं, खोड भरपूर वाढू द्यावीत. नंतर खोडाचा शेंडा हलक्या हाताने खुडून टाकावा. तो कात्रीने शक्यतो कापू नये. घेवडय़ाच्या जातीनुसार त्याला पांढरी, गुलाबी किंवा जांभळट फुले येतात. रोपं लावल्यापासून ५० ते ६० दिवसात झाडाला शेंगा येतात.
श्रावण घेवडय़ालाच फ्रेंच बीन्स किंवा फरस बी म्हणतात. हा ‘ग्रीन बीन्स’ ह्य़ा प्रकारात मोडतो. ह्य़ाशिवाय स्ट्रींग किंवा स्नॅप बीन्स आणि रर्न बीन्सही ग्रीन बीन्सचेच प्रकार आहेत. प्रत्येक प्रकारात बरेच संशोधन झाले असल्यामुळे विविध प्रकारचे घेवडय़ाचे बी बियाणांच्या दुकानात मिळते. आपल्याकडे श्रावण घेवडय़ाची ‘फाल्गुनी’ हा उपप्रकार खूप चांगला आणि भरघोस वाढतो. ह्य़ाच्या शेंगा बारीक, गुळगुळीत, मऊ आणि गडद हिरव्या रंगाच्या असल्यामुळे हा प्रकार खूप लोकप्रिय आहे. ह्य़ाच्या शेंगा १३ सें.मी. ते १५ सें.मी. लांबीपर्यंत वाढतात. खोड कणखर आणि झाड झुडुपासारखं वाढत असल्यामुळे शेंगांचा भार हे झाड सहजी पेलू शकते. परंतु शेंगा जमिनीला टेकल्या तर कुजतात. त्या कुजू नयेत म्हणून झुडुपाखाली बराच पालापाचोळा किंवा मका, ऊस यांचे पाचट टाकावे. ‘स्नॅप बीन्स’च्या शेंगा थोडय़ा गोलसर आणि चपटय़ा असतात. शेंगांची भाजी करताना त्याच्या शिरा काढव्या लागतात, अन्यथा भाजी चांगली होत नाही. रनर बीन्स ह्य़ा श्रावण घेवडय़ापेक्षा थोडय़ा लहान असतात. श्रावण घेवडय़ाच्या एका उपप्रकारात शेंगावर जांभळट छोटय़ा रेषा असतात. ह्य़ाच्या बिया श्रावण घेवडय़ाच्या कोवळ्या पोपटी बियांपेक्षा थोडय़ा फिकट असतात. आणि त्यावरही जांभळट रेषा असतात. ‘व्ॉक्स बीन्स’ ह्या घेवडय़ाच्या झुडूप प्रकारात शेंगा पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात. ‘बाजीराव’ किंवा ‘राणी’ घेवडय़ाच्या प्रकारात शेंगा चपटय़ा आणि जांभळ्या रंगाच्या असतात. झाड जास्त उंच होत नसलं तरी शेंगांचं प्रमाण खूप असतं! कोवळ्या शेंगा खूप वाढतात. काळा घेवडय़ाच्या शेंगा पिवळट, पांढरट आणि गुलबट, किरमिजी रंगाच्या असतात. ह्य़ाच्या शेंगाचं बाहेरचं आवरण – टरफलं भाजीसाठी वापरत नाहीत. काळ्या बियांची उसळ चांगली होते. ‘राजमा’ हा लाल किंवा किडनीच्या आकाराच्या बिया असलेला प्रकार खूप लोकप्रिय आहे. ह्य़ातही मोठय़ा दाण्याचा, गुलबट-तांबडट आणि छोटय़ा गडद तांबडा-तपकिरी रंगांच्या बियांचा राजमा प्रसिद्ध आहे. पांढऱ्या बियांचा राजमाही आता लोकप्रिय होऊ लागला आहे. ‘पी बीन्स’ ह्य़ा वेलीसारख्या घेवडय़ाच्या बिया दुरंगी रंगाच्या म्हणजे तांबडट – तपकिरी आणि पांढऱ्या रंगाच्या असतात. तर, ‘पिंटो बीन्स’ ह्य़ा प्रकारात बिया सुरकुतलेल्या दिसतात. शेंगा उकडून तशाच खातात किंवा तेलावर परतून कुरकुरीत करून खातात. श्रावण घेवडय़ाचा वेलासारखा पसरणारा ‘ब्लु कोको’ ह्य़ा उपप्रकारात शेंगा आणि बिया जांभळ्या रंगाच्या असतात. बिया शिजवल्या की त्यांचा रंग काळा होतो. श्रावण घेवडय़ाच्या ह्य़ा उपप्रकारात जवळजवळ सगळ्यांच्याच शेंगांची आणि बियांचीही भाजी किंवा उसळ करतात.
लिमा बीन्स, सोयाबीन्स, फावा बीन्स हे घेवडय़ाचेच प्रकार आहेत, पण त्यांच्या शेंगांची भाजी करत नाहीत. बियांची उसळ करतात किंवा वाळवून कडधान्यं करतात. ही अनेक दिवस टिकतात. ह्य़ांना ‘शेलींग बीन्स’ असंही म्हणतात. घेवडय़ाचे सर्वच प्रकार वाढवताना योग्य काळजी घेतली तर एकेका झाडाला खूप शेंगा लागतात. फुलं आल्यानंतर हवा कोरडी असेल तर झाडाला भरपूर पाणी घाला, पण पाणी झाडाभोवती साचू देऊ नका. ठराविक उंचीचं झाड झालं की त्याचा शेंडा खुडा म्हणजे फुलं लवकर येतील. त्या काळात झाडाला पातळ सेंद्रिय खत घाला. शेंगांची पूर्ण वाढ झाल्याशिवाय शेंगा खुडू नका. शेंगांमध्ये बी दिसायला लागल्यावर हलक्या हाताने शेंगा खुडा. शक्यतो कात्रीने शेंगा कापू नका. शेंगांचा पहिला बहार काढला की झाडाला पातळ सेंद्रिय खत आणि भरपूर पाणी घाला म्हणजे शेंगांचा दुसरा बहार मिळेल; पण ह्य़ावेळच्या शेंगा थोडय़ा लहान वाढतात.
घेवडय़ाच्या कुंडीत झेंडू किंवा नारिंगी केशरी रंगाची फुलं येणारा नेस्ट्रॅशियम लावा. परसबागेतही दोन ओळींमध्ये ही छोटी वाढणारी रोपं लावावीत, म्हणजे घेवडय़ाची मुळं कुजणार नाहीत. जमिनीत घेवडा लावला असेल तर त्यामध्ये मुळा, मका यांची दोन तीन झाडं लावा, पण त्याजवळ कांदा, लसूण लावू नका. घेवडय़ाची पानं आणि शेंगा हे गोगलगायीचं आवडतं खाद्य आहे. त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या, रोपाच्या भोवती पाण्याच्या बाटलीचा तळाचा भाग कापून ठेवा. आणि खोडावर मोठय़ा प्लॅस्टिक बाटलीचे गोल भाग कापून ठेवा. कुंडी विटांवर किंवा प्लास्टिकच्या ताटलीत घालून ठेवा, कडेने मुंग्यांची पावडर घाला.
पुढच्या वर्षीसाठी ‘बी’ तुमच्याकडे वाढलेल्या शेंगांमधूनच गोळा करा. चांगल्या वाढलेल्या पाच-दहा शेंगा झाडावर तशाच वाळून द्याव्यात. पूर्ण वाळलेल्या शेंगांतलं बी काढून सावलीत काही दिवस ठेवा. नंतर कागदी पिशवीत ठेवून त्यावर बियांचे नाव, तारीख लिहून ठेवा. आणि पुढच्या मोसमात ते बी रूजत घाला.
घेवडय़ाचं बी लावण्यापासून ते शेंगा येईतोपर्यंत योग्य कळजी घेतली की शेंगा भरपूर लागतात. शेंगा आणि बियांमध्ये प्रथिनांचं (प्रोटीन्स) प्रमाण जास्त असतं, त्याचप्रमाणे व्हिटॅमीन ‘ए’ आणि ‘सी’ हेही असतात. पण स्टार्चचं प्रमाण खूप कमी असतं. वाळलेल्या कडधान्यांमध्ये प्रथिनं, फायबर यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या आहारात ह्य़ा विविध प्रकारच्या घेवडय़ांचा समावेश अवश्य करायला पाहिजे. ह्य़ाशिवाय आयर्न, पोटॅशिअम, सेलेनियम, मॉलिबडेनियम, थायामिन, फोलेट आणि व्हिटॅमिन बी सिक्स असल्यामुळे आहारतज्ज्ञ घेवडय़ाच्या शेंगा, बिया आणि कडधान्यं सकाळच्या न्याहारीसाठी खाण्याचा सल्ला देतात. कडधान्य रात्रभर पाण्यात भिजत टाकली की त्यातली साखर पाच टक्क्य़ांनी कमी होते. शिवाय त्यातला गॅस कमी झाल्यामुळे कडधान्य पचायला हलकी होतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा