सोनेरी आभा फाकत पाडव्याचा दिवस उजाडला. भारतीय नववर्षांचा पहिला दिवस-चत्र शुद्ध प्रतिपदा! त्याच्या स्वागताला रातराणीचा सडा अंगणात पडला होता. मोगऱ्याची झुळुक आलीच सोनचाफ्यासोबत. अंगण झाडले. सडा टाकला. मुख्य दाराला नवे तोरण बांधले..
हो ळीच्या ज्वाळा वरती वरती उफाळल्या आणि फाल्गुनी पौर्णिमेची पुरणपोळी रसवंतीला सुखावून गेली. शिशिराची थंडी ओसरू लागली. पहाटे हवाहवासा गारवा आणि दिवसा क्रमाक्रमाने वाढत जाणारा उष्मा.. अशा ऋतुसंधीचा काळ येऊन ठेपला. ‘पानगळीच्या दिवसांनंतर.. जरूर येतो ऋतू कोवळा..’ या ऊक्तीनुसार कुठे कुठे चत्रपालवी डोकावू लागली. अंगणातल्या कडुिनबाची गुलाबी-लालसर पालवी तिच्या नाजूक पिवळसर फुलांसह चवऱ्या ढाळत होती. त्यातून कोवळा-हिरवट गंध दरवळत होता, अन् त्यावर नादावून उडत्या कीटकांचे भिरभिरणे आणि गुणगुणणे..! रंग-गंधांच्या सवे आनंद मनात नाचू लागला जणू. मित्राची सोनपिवळी तिरीप-पहाटेचे दव पिऊन- हळूहळू उग्र रूप धारण करू लागली. घरादारावर लख्ख ऊन पडू लागले. चकचकीत पृष्ठभागावरून परावíतत झालेले ऊन पंचक्रोशीत चौफेर फिरत भगभगू लागले आणि उजेडाचे साम्राज्य सर्वत्र पसरले. त्याचेच एक चित्र साकार झाले. चत्राचं चित्र. त्या मनातल्या चित्राला लगडून लयदार वळण घेत शब्दही आलेच सुंदर झोके घेत-
‘‘चित्र नवे अन् चत्र नवा
ओजस्वी हा ‘मित्र’ नवा
नवे धुमारे हरित कोवळे
साज असा सर्वत्र नवा.’’
या शब्दचित्रासोबत प्रवास म्हणजे एक एक संवेदना जागे करणारे संमोहनच. मला जाणवले- कुंडीतल्या मोगऱ्याच्या मदभऱ्या झुळकीसोबत मांडवावर चढलेल्या रातराणीचा मंद सुगंधही रुंजी घालतोय. खिडकीवर डोलणाऱ्या मधुमालतीच्या लाल-पांढऱ्या कळ्यांचे फुलण्यासाठीचे तप चालूच आहे. जणू मधुमालतीने गुलमोहराशी मोहरण्याची जुगलबंदीच लावलीये! त्यातच आंब्याच्या हिरव्या पसाऱ्यातून आर्त कोकीळकूजन कानी आले आणि सुंदर स्वप्नातून जागे झाल्यावर वाटते, तसे प्रसन्न वाटले. कोकीळ गातोय म्हणजे ही चत्राची नांदीच आहे, हे उमगले. माठात टाकलेल्या वाळ्याच्या थंड पाण्याने तरतरी यावी, तशी मस्त तरतरी आली.
चत्राचे चित्र अधिकच सुंदर दिसू लागले- तळजाई टेकडीवरल्या सृष्टिवैभवामुळे. प्रत्येक ऋतूचे विभ्रम दाखवणाऱ्या टेकडीवर फुललेल्या लालभडक पांगाऱ्याने लक्ष वेधले. त्याच्याच जाती-पोटजातीच्या वृक्षांवर फुललेल्या अग्निशिखा तळपत होत्या. पळसाने तर कहरच केला होता. रंगपंचमीला रंग उडवून झाल्यानंतरही अजून त्याचं फुलणं चालूच होतं. त्याच्या अंगाखांद्यावर केशरी फुलांच्या गुढय़ाच उभारल्या होत्या जणू. त्यातच फुलचोख्या भुंग्यांचा दंगा.! पोपटाची चोच पाहून ‘ही जणू पळसाची कळीच आहे’ असा भ्रम झालेला भुंगा मधुप्राशन करण्यासाठी पोपटाच्या चोचीतच शिरतो आणि ‘हे जणू जांभूळच आहे’ असे समजून पोपटही त्या भुंग्यास खाण्यासाठी धरू पाहतो.. अशी गंमत सांगणारा संस्कृत श्लोक आठवला-
‘‘पलाशमुकुलभ्रांत्या शुकतुंडे पतत्यलि:।
सोऽपि जंबूफलभ्रांत्या तमिल धर्तृमिच्छति?’’
चत्राचे चित्र विविध दृष्टिकोनातून पाहताना मन हरखून जात होतं. पानगळीनंतरची ही कोवळी फूट पाहून आशावादही मोहरला माझा. कुठे होते हे सारे हिरवे वैभव इतके दिवस? अशी काय जादू झाली, की सुप्त चतन्याने उसळी मारावी? एकाएकी जाग्या झालेल्या निसर्गाला पाहून अचंबित झालेल्या मला वाटलं,
‘‘कशी अचानक जागी झाली.. ताजी झाली-
निसर्गातली ही श्रीमंती..?
नवांकुरांची ओली ओली..साधी भोळी-
कुजबुज कैसी फांद्यांवरती..?
    किती मनोहर चत्र रंगतो..मत्र जोडतो
    फुलपंखांना क्षितिज देतो..
    फळाफुलांनी रसरसलेली..दहिवरलेली
    जगण्याची असोशी भरतो..!!’’
चैत्राचे चित्र नि मत्र मी घरादारात शोधू लागले, रंगवू लागले. थंडीची हूल नि ग्रीष्माची चाहूल एका नव्या पर्वाच्या दिशेने मला नेऊ लागली. काळाचे आवर्तन आयुष्याला गती देते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या त्रिवेणीचेच हे िरगण असते. एकदा वाटते, काळ म्हणजे नक्की काय? ‘काळ’ अशी काही वस्तू असते का? उत्तर मिळते-‘नाही.’ काळ अशी काही बाब नसते. पण ‘स्थित्यंतर’, ‘बदल’ मात्र असतोच असतो. त्यालाच आपण ‘काळ’ म्हणतो! त्या काळालाच आपण प्रतीकांमधून पाहतो. त्या काळालाच आपण रूपकांमधून रुजवतो. सणसमारंभांतून साजरे करतो. गुढय़ा उभारून आनंदोत्सव करतो. पुराणकथांना नवे संदर्भ देतो. रोजच्या रटाळ जगण्याला, धावण्याला जरासे थोपवून एक छानसा विश्राम घेतो.
टेकडीवरचा निसर्गरम्य चत्र अनुभवला आणि मला घरातल्या चत्राची साद ऐकू येऊ लागली. घरी पोचले आणि एका अनामिक उत्साहाने माझ्यात संचार केला. अंगणातल्या गाडीच्या आरशाचा कवडसा थेट घरातल्या दिनदíशकेवर- स्पॉटलाइट मारल्याप्रमाणे- पडला होता. जणू तो ‘हायलाइट’ करून माझे लक्ष वेधत होता. त्या दिनदíशकेत ‘चत्र शुद्ध प्रतिपदा-गुढी पाडवा’ असे ठळकपणे नमूद करून गुढीचे रंगीत चित्रही काढलेले होते. मला सणाची आठवण करून देत होता. ‘अरेच्चा! उद्याच की पाडवा!’ मी नोंदवले आणि तयारीलाच लागले.
माळ्यावरून आधी मोठी काठी शोधून काढली. पूर्वी ही काठी खालीच असायची- कपडे वाळत घालयला. हल्ली कपडय़ाचे स्टँड असल्याने काठी वर्षभर माळ्यावरच असते. काठी पाहून आजीची आठवण आली. आजी गुढी उभारण्यापूर्वी काठी ओल्या फडक्याने पुसून घ्यायला सांगत असे. तशी काठी स्वच्छ पुसून घेतली. गुढीचा मुख्य ‘कणा’ तयार झाला. आता बाकीची सामग्री एकत्र करायला हवी. गौरी-गणपती आणि एकूणच कुळाचाराचे साहित्य ज्या ट्रंकेत ठेवलेले असते, त्या अलिबाबाच्या गुहेचे दार उघडले. त्या क्षणी मला िशका आल्या. पुन्हा आजीची आठवण आली. तिने एक किस्सा सांगितला होता- तिच्या सख्ख्या शेजारणीचा. तिच्या शेजारच्या चंद्रभागाबाई प्रत्येक पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आजारी पडायच्या म्हणे. कित्येक वर्षांचा तो जणू परिपाठच होता. चार दिवसांनी त्या बऱ्या व्हायच्या. पाडव्याचे आणि त्यांच्या आजारपणाचे काहीतरी गूढच होते. कुणी म्हणे देवाचा कोप, कुणी म्हणे कुलधर्मात काही कमतरता राहतेय. आजी फार शिकलेली नव्हती, पण म्हणायची-‘चंद्रे, अगं, चांगल्या डाक्टरला दाखव.’ एके वर्षी वाडय़ात एक तरुण भाडेकरू राहायला आला होता. तो ‘डॉक्टरी’ शिकत होता. आजीने त्याला ‘चंद्रभागाबाई आणि पाडवा’ या विषयी सांगितले. डॉक्टरने पाडव्याच्या दिवशी चंद्रभागाबाईंकडे मुक्कामच केला- त्या सकाळपासून काय काय करतात याचे निरीक्षण करायला. चंद्रभागाबाईंनी वळचणीतून त्यांची ट्रंक काढली आणि त्यावरच्या धूळ-जळमटांनी त्यांना िशका येऊ लागल्या. मग त्यांनी ट्रंक उघडली. त्यातली पठणी काढली. ती त्यांच्या आजेसासूबाईंची ६०-७० वर्षांपूर्वीची खानदानी पठणी होती. पाडव्याला ती ऐतिहासिक पठणीच नेसायची असा ‘इकड’चा हट्ट असायचा म्हणे! म्हणून त्या सालाबादप्रमाणे पठणी नेसल्या, तर त्यांचा चेहरा लाल झाला. सर्वागाला खाज सुटली. मग त्यांनी गुढीवर लावण्यासाठीचा खास खण काढला, तर त्यांना मळमळायला लागले. कसेबसे उठत-बसत कुळाचार पार पडला. दुपारपासून त्यांना ताप चढू लागला आणि संध्याकाळी त्या तापात बडबडू लागल्या..
डॉक्टरने सांगितले की चंद्रभागाबाईंना पठणीची आणि एकूणच धूळ-जळमटांची अॅलर्जी आहे. ‘इकड’चा हट्ट असला तरी त्यांनी ती वर्षांनुर्वष न धुतलेली, रेशमी किडय़ांपासून बनवलेली पठणी नेसता कामा नये, असा निष्कर्ष निघाला. त्याच्या दुसऱ्या वर्षी पाडव्यादिवशी चंद्रभागाबाईंनी डॉक्टरचे म्हणणे मानले आणि कुणाचाही कोप न झाल्याने त्या ठणठणीत राहिल्या! पहिल्यांदाच उत्साहात पाडवा साजरा झाला. प्रत्येक सणाच्या अशा काही आठवणी असतात. त्यादिवशी त्या हमखास मनात डोकावून जातात.
सोनेरी आभा फाकत पाडव्याचा दिवस उजाडला. भारतीय नववर्षांचा पहिला दिवस-चत्र शुद्ध प्रतिपदा! त्याच्या स्वागताला रातराणीचा सडा अंगणात पडला होता. मोगऱ्याची झुळुक आलीच सोनचाफ्यासोबत. अंगण झाडले. सडा टाकला. मुख्य दाराला नवे तोरण बांधले, हार घातला. आईची आठवण आली. सणावाराला तिचा उत्साह असाच ओसंडून वाहायचा. गुढीची तयारी करताना मन असे भूतकाळातच रमते. ‘‘गाठी किती महाग झाल्यात यंदा..!’’ चिरंजीव म्हणाला आणि मी वर्तमानात आले. ‘सण-परंपरांचे बाजारीकरण’ हा कटू आणि अप्रिय विषय मनात आलाच. पण त्याने वातावरण गंभीर होईल, म्हणून शांत बसले. कडुिनबाचा पाला, नवे वस्त्र, हार, फुले, कलश, रांगोळी असे सारे यथासांग झाले. कलशावर ॐ काढताना बाबांची आठवण आली. ते अनामिकेने (करंगळीशेजारील बोट) अत्यंत सुबकपणे कलशावर नक्षीदार गंधलेपन करत. मीही अनामिकेने कलशावर ॐ रेखाटला. अखेर साग्रसंगीत गुढी उंच उभारली गेली. तिला ओवाळताना शब्द मनात अलगद उतरून आले,
‘‘शुद्ध प्रतिपदा चत्रामधली बहर लेवुनी आली
ऋतुराजाच्या आगमनाने फुलली झाडे-वेली..
    नववर्षांचे पाउल पडले अंगणात सोन्याचे
    नव्या नवेल्या संकल्पांना रूप मिळे सत्याचे
गुढय़ा-तोरणे घराघरांवर उत्साहाने सजली
शुद्ध प्रतिपदा चत्रामधली बहर लेवुनी आली..’’
आपण उत्सवप्रिय माणसं प्रतीकांना किती सजवत राहतो, नाही? कृषी संस्कृतीतून आलेला हा सण. सुगीचा आनंद साजरा करणारा. या सणाला रामायण-महाभारतीय कथांचाही संदर्भ. शिवाय कालिदासादी संस्कृत कवींनी वर्णन केलेल्या वसंतऋतूच्या स्वागताचे औचित्य. एरवी प्रेमभाव उघडपणे व्यक्त करायला का-कू करणारी आपली संस्कृती. वसंतऋतूला मात्र प्रेमाचा ऋतू म्हणते, हे विशेष. सोबत कोकीळकूजन प्रेमीजनांना साद घालणारे. हे सगळंच सुंदर आहे. पण प्रतिकांचीही प्रतीकं होताना आपण पाहतो, तेव्हा थोडी गंमत वाटते. हल्ली बाजारात तयार सुशोभित छोटीशी गुढीच विकत मिळू लागलीये. हे प्रतीकाच्या प्रतीकाचे बाजारीकरण असलं तरी त्या रसिकतेला दाद द्यायला हवी. नव्या काळाची ती गरज असावी. फक्त या प्रतीकांच्या गोंधळात सणाचा मूळ गाभा विसरला जाऊ नये म्हणून हे पसायदान-
‘‘माणुसकीची सुगी पिकतसे मनोमनी अंगणी
हिरवी स्वप्ने पाहत हसली सस्यश्यामला धरणी
सुखसमृद्धी येईल आता ज्याच्या त्याच्या भाळी
शुद्ध प्रतिपदा चत्रामधली बहर लेवुनी आली..’’
(टीप : लेखातील काव्यपंक्ती लेखिकेच्याच आहेत.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा