हेमा वेलणकर
लाइट आले होते आमच्याकडे तो अगदीच बेभरवशाचा कारभार असल्याने चुलीच्या मागे चिमण्या, भुत्ये कधीही लागले तर पटकन हाताशी असावेत म्हणून कायम घासूनपुसून ठेवलेले असत. एका कोपऱ्यात एक मोठा ओटा होता आणि त्यावर सोवळ्यातल्या पाण्याचे हंडे कळशा भरून ठेवलेल्या असत आणि खाली चुलीसाठी लागणारी लाकडं रचून ठेवलेली असत.
कोणत्याही घराचं स्वयंपाकघर हा त्या घराचा आत्मा असतो. आमचं कोकणातलं घरही याला अपवाद नाही. चला, आज आपण तिथली सर करू या.
मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा आमच्या कोकणातल्या घरी गेले तेव्हा आमच्याकडे चुली होत्या. स्टोसुद्धा होता, पण तो फक्त इमर्जन्सी साठीच ठेवलेला असे. चुली जिथे होत्या तिथे वर धूर जाण्यासाठी दोन कौलांची धुरांडी होती. आता त्याचा उपयोग नाही चूल नसल्यामुळे, पण ती धुरांडी अजूनही आहेत तशीच. चुलीच्या जवळ एक मोठं फडताळ होतं आणि स्वयंपाकासाठी रोज लागणाऱ्या वस्तू, पातेली वैगेरे तिथे ठेवत असत. लाइट आले होते आमच्याकडे तो अगदीच बेभरवशाचा कारभार असल्याने चुलीच्या मागे चिमण्या, भुत्ये कधीही लागले तर पटकन हाताशी असावेत म्हणून कायम घासूनपुसून ठेवलेले असत. एका कोपऱ्यात एक मोठा ओटा होता आणि त्यावर सोवळ्यातल्या पाण्याचे हंडे कळशा भरून ठेवलेल्या असत आणि खाली चुलीसाठी लागणारी लाकडं रचून ठेवलेली असत. चुलीचा धूर खाऊन खाऊन कौलांच्या खालच्या काळपट झालेल्या लाकडी पट्टय़ा अजूनही तशाच आहेत. स्वयंपाकघरात कपडे वाळत घालायच्या तीन-चार दांडय़ा होत्या आणि त्यावर स्त्रियांची सोवळ्यातली लुगडी, मुकटे, हात पुसायची सोवळ्यातली फडकी वैगेरे वाळत घातलेली असत. एका बाजूच्या भिंतीत दूध तापवायचं थारळं होतं. आमचं स्वयंपाकघर खूप मोठं आहे, त्यामुळे छपराला आधार मिळावा म्हणून एक खांब आहे. स्वयंपाकघरात तोच ताकमेढीसाठी वापरात येत असे. त्या काळी जेवणं तर पाटावर बसूनच होत असत, पण अगदी चहाही आम्ही सगळेच पाटावर बसून घेत असू. त्यामुळे एका कोपऱ्यात चांगले पंधरा-वीस पाट उभे करून ठेवलेले असत. त्यातले काही पितळेच्या फुल्या ठोकलेलेही होते. आमच्या स्वयंपाकघराची जमीन मात्र तेव्हाही मातीची किंवा सारवणाची नव्हती. सिमेंटचा कोबा घातलेला होता. आता काळानुसार अनेक बदल होऊन अगदी आधुनिक स्वयंपाकघरात असतात तशा पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत.
स्वयंपाकघराला पश्चिमेकडे एकच खिडकी आहे, तरी काचेच्या कौलांमुळे उजेड कमी नाही आणि मोठं असल्याने हवेशीरही वाटतं स्वयंपाकघर. त्या खिडकीशी रुक्मिणची आठवण कायमची जोडली गेली आहे. रुक्मिण म्हणजे रुक्मिणी म्हणजे आमची बुरडीण- जी आम्हाला बांबूच्या टोपल्या, वेचण्या, सुपं, रोवळ्या, परडय़ा अशा वस्तू पुरवत असे. तेव्हा प्लास्टिक नसल्याने या वस्तू लागतही खूप असत. दर महिना दोन महिन्यांनी सकाळीच ती ऑर्डरच्या वस्तू खळ्यात आणून टाकी आणि ओटीवरून पशाचा हिशेब झाला की आमच्या या स्वयंपाकघराच्या खिडकीत येऊन उभी राही. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे ती घरात कधी आली नाही. बाहेरूनच सगळ्यांची चौकशी करत असे. ती बाहेर आणि आम्ही स्वयंपाकघरात अशा गप्पा रंगत. आम्ही मुंबईच्या कोणी आल्याचंही तिला माहीत असे. ‘माका ठावं हाय मुंबई वाली ईलय ते. बोलाव तिका,’ म्हणून आमच्याशीही ती गप्पा मारीत असे. जाताना मग चहा, न्येरी, जुने कपडे कधी लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं आणि थोडे पैसे असं सगळं घेऊनच जाई घरी.
पहाटे चहाच्या आधणात घातलेल्या आल्याच्या नाहीतर गवती चहाच्या वासाने स्वयंपाकघर जागं होई. आजकाल शहरात जनरली घरात एकच बाई असते. जास्तीत जास्त दोन. पण आमच्या घरी कोकणात कायम तिथे राहाणाऱ्या सहा जणी; पण स्वयंपाकघर मात्र एकच. सगळं कसं अगदी शिस्तीत आणि मजेत चाललेलं असतं. आगरात पिकून तयार असलेल्या भाज्या, मुलांच्या फर्माईशी, सणवार आणि इतर समारंभ, वाढदिवस, जेष्ठांचं पथ्यपाणी हे विचारात घेऊन काय स्वयंपाक करायचा हे सगळ्या जणी मिळून आदल्या दिवशी रात्रीच ठरवतात. प्रत्येकीची कामं साधारण ठरलेली असली तरी त्याचा फार अट्टहास धरला जात नाही. एखादीला तिचं काम करायला नाही जमलं तर त्याचा इश्यू न करता दुसरी कोणीतरी ते काम करूनही टाकते. मला वाटतं, आमच्या यशस्वी एकत्र कुटुंबाचं सगळं श्रेय स्वयंपाकघरातील या समंजसपणाला आहे. चहा, न्येरी, मुलांचे डबे, पोळ्या, इतर स्वयंपाक या आघाडय़ांवर प्रत्येक जण आपापलं काम करत असते आणि जोडीला गप्पा, विनोद हेही असतंच. सकाळच्या वेळी स्वयंपाकघर म्हणजे सर्वात हॅपिनग जागा असते घरातील. जेवायची वेळ झालीय आणि स्वयंपाक तयार नाही असं कधीही होत नाही आमच्याकडे. शेवटी आम्ही पडलो कोब्रा. आमची वेळेची बांधिलकी म्हणजे विचारू नका. घडय़ाळात साडेबाराचे टोले पडले की पहिली पंगत बसलीच म्हणून समजा. अगदी घडय़ाळ लावून घ्यावं.
दुपारचं आवरलं की सगळ्याजणी जरा आराम करतात, पण स्वयंपाकघराला मात्र तेव्हाही आराम नाही मिळत. कारण घरातल्या एका मुलाला स्वयंपाकाची खूप आवड आहे. त्याची शाळा सकाळची असते आणि तसंही सकाळच्या घाईत त्याला कोणी एन्ट्री देत नाही स्वयंपाकघरात. त्यामुळे दुपारच्या वेळी त्याची सत्ता असते स्वयंपाकघरावर. आहे त्या साधनात आणि उपकरणात त्याचे रोज नवनवीन प्रयोग सुरू असतात. कधी नाचणीच्या कुकीज्, कधी पॅन केक, कधी भजी, कधी चहा, कधी पेरूचं सरबत असं काहीतरी रोज सरप्राइज असते आम्हाला. भविष्यात जर हा कोणी मोठा प्रसिद्ध शेफ झाला तर त्याचं सगळं श्रेय आमच्या या स्वयंपाकघराला जाईल.
कधीतरी मुलांच्या फर्माइशीनुसार बटाटेवडे, पाणीपुरी, इडल्या असा काहीतरी चमचमीत बेत ठरतो. संध्याकाळी त्या खमंग वासाने स्वयंपाकघरपण ताजंतवानं होतं. आज कितीतरी वर्ष झाली, पण आमच्या घरची एक अनोखी पद्धत म्हणजे रात्री आम्ही सगळ्या बायका पहिल्यांदा जेवतो आणि घरचे सगळे पुरुष आमच्या नंतर जेवतात. रात्री साडेनऊ दहाच्या मानाने सगळं आवरलं जातं, दिवा घालवला जातो आणि स्वयंपाकघर शांत होत, पण बिचारं स्वयंपाकघर.. रात्री मांजरं कडमडत असतात स्वयंपाकघरात कधी पातेली वैगेरे, पण पाडवतात आणि स्वयंपाकघराला नाहीच विश्रांती मिळत.
घरात काही कार्य असेल तर मात्र स्वयंपाकघराला जरा आराम मिळतो. कारण अशा वेळी मागच्या अंगणात चुली मांडून अन्न रांधलं जातं आणि स्वयंपाकघरात फक्त कोणाचा बिनसाखरेचा चहा किंवा लहान बाळाचा गुरगुटय़ा भात असे लिंबू-टिंबू पदार्थच शिजतात.
कोकणातल्या आमच्या घराला कुलूप कधी लागतच नाही. देवाला रोज नवेद्यही दाखवला जातोच. त्यामुळे चूल थंड असा एकही दिवस जात नाही. कोकणातली घरं राहायला माणसं नाहीत म्हणून बंद पडतायत; पण आज शंभर-सवाशे वर्षे झाली, इतकी स्थित्यंतरं पचवली स्वयंपाकघराने, पण या आमच्या घरातली चूल मात्र पेटती आहे, घरातल्या सर्वाना जेवू खाऊ घालण्याचा घेतलेला वसा तिने इतकी वर्षे संभाळलाय ही अन्नपूर्णा देवीची कृपाच..
velankarhema@gmail.com