प्राचीन काळापासूनचा वास्तुवारसा लाभलेला महाराष्ट्र पर्यटकांना भुरळ पाडण्यात म्हणावा तसा पुढाकार घेत नाही. म्हणूनच पर्यटकांना आकर्षित करून घेण्यात तो अपयशी ठरलेला दिसतो. १८ एप्रिल या ‘जागतिक वारसादिना’निमित्त महाराष्ट्राच्या या उदासीनतेवर टाकलेला प्रकाश..
आपण पर्यटन म्हटलं की, सिमला, कुलू मनाली, जम्मू काश्मीर, राजस्थान किंवा दक्षिण भारतातल्या पर्यटन स्थळांचा विचार करतो. पण काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली स्थिती आहे. कारण मध्य प्रदेशसारखं राज्यसुद्धा ‘एमपी गजब है’सारख्या जाहिराती टीव्ही वाहिन्यांवरून सतत दाखवून आपल्या वास्तू आणि इतर पर्यटनस्थळांची जाहिरात केवळ बोटांच्या सावल्यांच्या हालचालींच्या माध्यमातून साकारून पर्यटक आकर्षति करतात. पुरातन काळापासूनचा वास्तुवारसा लाभलेला आमचा महाराष्ट्र मात्र पर्यटकांना भुरळ पाडण्यात म्हणावा तसा पुढाकार घेत नाही आणि म्हणूनच अपयशी ठरलेला दिसतो. हल्ली रस्ते, बसथांबे यावर जागोजागी महाराष्ट्र टुरिझमचे जाहिरात फलक दिसू लागले आहेत. पण या जाहिराती अधिक संख्येने आणि अधिक आकर्षक करायची गरज आहे. पर्यटनस्थळांमध्ये केवळ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंचा जरी विचार करायचा झाला, तरी आपला वास्तुवारसा खूपच समृद्ध आहे. त्याचं कारणही तसंच आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून आपल्या या भूभागावर सतत आक्रमणं होत राहिलीत; राजसत्ता बदलत गेल्यात आणि सततची अशांतता राहिली. पण वाईटातून चांगलं म्हणतात, त्याप्रमाणे या गोष्टींचा फायदा आपला वास्तुवारसा समृद्ध होण्यासाठी झाला. कारण विविध राजवटींमध्ये वास्तुशैली बदलत गेल्या, त्याबरोबरच विविध वास्तुशैलींचा खजिना आपल्या राज्यात निर्माण झाला.
प्राचीन काळी आपल्या या राज्याचा भूभाग दंडकारण्य म्हणून ओळखला जाई. दिवसाही अंधार दाटेल अशी किर्र झाडी. वर पाहिले तर आकाश दिसणार नाही, अशा प्रकारे एकमेकांत विळखा घातलेली झाडे. पशू, पक्षी आणि जनावरे असलेल्या या दंडकारण्यात राम वैदेहीसह वनवासाला आले. पर्णकुटी बांधून राहिले आणि आताच्या नाशिकजवळच्या त्या भागात पंचवटीचं पावन स्थान निर्माण झालं. रावणाने अपहरण करून नेलेल्या आपल्या पत्नीच्या म्हणजेच सीतेच्या शोधात अयोध्येहून लंकेकडे जाणारे प्रभुरामचंद्र मुंबईच्या किनाऱ्यालगत पोहोचल्यानंतर तिथे शिवशंकराची उपासना करायच्या हेतूने त्यांनी वाळूचे शिविलग तयार केले, तेच पुढे वाळुका ईश्वर म्हणजेच वाळकेश्वराची िपडी असलेले देऊळ म्हणून ओळखले जाऊ लागले. इथेच असताना तहानेने व्याकूळ झाल्यामुळे त्यांनी लक्ष्मणाला पाणी आणण्यासाठी सांगितले. तेव्हा या वाळकेश्वराच्या िपडीजवळच असलेल्या भूभागावर लक्ष्मणाने बाण मारून गंगेला आवाहन केले आणि जो तलाव निर्माण झाला, तोच बाणगंगा म्हणून प्रसिद्ध झाला, अशी आख्यायिका आहे. दंडकारण्यात असलेल्या अनेक राक्षसांचा रामरायाने विनाश केल्यानंतर येथे ऋषिमुनी आश्रम बांधून वास्तव्याला राहू लागले. त्यातून अरण्ये जाऊन तिथे गावे आली, हळूहळू त्याची नगरे होऊ लागली. पुढे प्रतिष्ठान म्हणजे आताचे पठण ही त्या वेळच्या महाराष्ट्राच्या भूभागाची राजधानी होती. या भागात आलेल्या बौद्ध भिक्कूंपासून ते युआंग च्वांगसारख्या चिनी प्रवाशापर्यंत अनेकांनी त्यांच्या दस्तऐवजांमध्ये महाराष्ट्राच्या या भूभागाचे वर्णन केलेले आढळते. इसवीसनपूर्व २०० मध्ये असलेल्या सम्राट शातवाहनांपासून ते इसवीसन १२७१ पर्यंत असलेल्या महादेवराय यादवांच्या राजवटीपर्यंत वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, आभीर, सेंद्रक, कदंब, शिलाहार अशा अनेक राजवटी महाराष्ट्रात येऊन गेल्या. या प्रत्येक राजवटीच्या काळात त्यांनी आपापल्या वास्तुशैलींचा वापर करून वाडे, देवळं, किल्ले आणि इतर वास्तू उभारल्या आहेत. इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकात बांधल्या गेलेल्या अजंठा लेण्यांबरोबरच नाशिक, काल्रे, कान्हेरी अशा विविध लेण्या या विविध राजवटींच्या साक्षीदार आहेत. औरंगाबादजवळच्या वेरुळची लेणी या बौद्ध, िहदू आणि जैन अशा तीन धर्मीयांनी बांधल्या असून पाचव्या ते अकराव्या शतकापर्यंतच्या काळात ही लेणी बांधली गेली आहेत. लेणी १ ते १० आणि २१ या राष्ट्रकूट राजवटीच्या आधी बांधली गेली आहेत.
लेण्यांप्रमाणेच महाराष्ट्राचं दुसरं आकर्षण म्हणजे इथली देवळं! दक्षिण काशी म्हणून नंतरच्या काळात ओळखलं गेलेलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे चालुक्य राजवटीतला राजा करणदेव यानं सातव्या शतकात बांधायला घेतलं. पुढे नवव्या शतकात शिलाहार राजवटीत त्याचं सुशोभीकरण झालं. अंबाबाईच्या या पुरातन मंदिरापासून ते अगदी तीनशे वर्षांपूर्वी चिपळूणजवळच्या परशुराम घाटात ब्रम्हेंद्रस्वामी यांनी बांधलेल्या परशुराम मंदिरापर्यंत अनेक देवळं ही पर्यटनस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत. वेरुळच्या लेण्यांमधले कैलासनाथाचं देऊळ, बारा ज्योतिìलगांपकी एक असलेलं भीमाशंकरचं शिवमंदिर, नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वराचं मंदिर, उस्मानाबाद जिल्ह्य़ातलं साडेतीन शक्तिपीठांपकी एक म्हणून ओळखलं जाणारं तुळजापूरच्या भवानीमातेचं मंदिर, पुण्याजवळच्या चिंचवड इथलं मोरया गोसावी यांचं मंदिर अशी लहानमोठी प्रख्यात किंवा फारशी प्रसिद्ध नसलेली, पण ऐतिहासिक-पौराणिक पाश्र्वभूमी असलेली अनेक देवळं आज महाराष्ट्राची पर्यटन स्थळं म्हणून धार्मिक पर्यटनाला चालना देऊ शकतात.
विविध राजवटींमधले राज्यातले सुमारे साडेतीनशे किल्ले हे महाराष्ट्राच्या वास्तुवैभवात अधिकच भर घालतात. यामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या तेरा किल्ल्यांबरोबरच इतरही अनेक किल्ले आणि दुर्ग यांचा समावेश आहे. १४९० मध्ये बांधलेला अहमदनगरचा किल्ला, साताऱ्याचा अजिंक्यतारा, वसईपासून ८ किलोमीटरवर असलेला अर्नाळा जलदुर्ग, तसंच गुजरातचा सुलतान बहादुर शाह याने बांधलेला वसईचा किल्ला, मराठे आणि इंग्रज यांच्यातल्या शेवटच्या युद्धाचा साक्षीदार असलेला पुण्याजवळच्या चाकणचा किल्ला, राष्ट्रकूट राजवटीतला राजा कृष्ण तिसरा याने बांधलेला नांदेड जिल्ह्य़ातला कंधारचा पाण्यातला किल्ला, चिखलदऱ्याजवळचा गाविलगड किल्ला असे अनेक सर्वसामान्यांना माहीत नसलेले, परंतु मुद्दाम पाहण्याजोगे असे अनेक किल्ले आपल्या राज्यात आहेत.
अशा अनेक प्राचीन, ऐतिहासिक आणि पौराणिक पाश्र्वभूमी असलेल्या वास्तूंचा वास्तुवारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. मात्र त्याचं जतन, संवर्धन आणि विकास म्हणावा तसा होताना दिसत नाही. केवळ कधीतरी कोकणात एखाद्या ‘कासव आणि डॉल्फिन महोत्सवा’चं उद्घाटन करून या व्यवसायाला अधिक चालना देण्याच्या घोषणा संबंधित मंत्र्यांनी केल्याची एखादी बातमी आली की, तिथेच आमचे पर्यटन सुधारण्यासाठीचे प्रयत्न संपतात. किंबहुना दुसऱ्या एखाद्या महत्त्वाच्या खात्याबरोबर पर्यटनखात्याचीही जबाबदारी मंत्र्यांवर सोपवली जाते आणि यासाठी अनेकदा स्वतंत्र मंत्री नेमला जात नाही, यातूनच या खात्याबाबत आणि एकूणच पर्यटनाबाबत सरकार किती गंभीर आहे, याची कल्पना येते. ‘नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा’ अशी जी आपली स्थिती आहे, ती बदलायची इच्छाशक्ती राज्य सरकारपाशी हवी. देशांतर्गत जी पर्यटन पॅकेजेस नेहमी दिली जातात, म्हणजे कोस्टल कर्नाटक, संपूर्ण दक्षिण भारत, केरळ, राजस्थान, जम्मू-काश्मीर.. या यादीत कोस्टल महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र, धार्मिक महाराष्ट्र, महाराष्ट्रातले किल्ले आणि दुर्ग अशा प्रकारची पर्यटन पॅकेजेस इतर राज्यांमधल्या किंवा देशांमधल्या पर्यटकांना किती प्रमाणात दिली जातात? आणि याचं प्रमाण वाढीला लावण्यासाठी राज्याचं पर्यटन खातं कोणते प्रयत्न करते? केवळ राज्यातले किंवा देशातलेच नव्हेत, तर परदेशी पर्यटकसुद्धा या सर्व वास्तूंकडे आकर्षति होऊ शकतात. तसं झालं, तर राज्य सरकारला फार मोठा महसूल आणि परदेशी चलन मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो. घराघरांमधून निवास व भोजनाची व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थाची विक्री, स्थानिक स्थळांबाबत मार्गदर्शक म्हणून काम करणे असे विविध रोजगार जर या छोटय़ाछोटय़ा गावांमधल्या तरुणांना उपलब्ध झाले, तर त्यांना मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसारखी जवळची शहरं पोट भरण्यासाठी गाठावी लागणार नाहीत. त्यामुळे या शहरांमधल्या पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी होऊ शकतो. तसंच मागास भागांचा विकासही यातून साधला जाऊ शकतो. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती जर या राज्याला लाभली, तर पुन्हा एकदा राज्याला निदान पर्यटन क्षेत्रात तरी देवगिरीच्या काळात होते, तसे सोन्याचे दिवस दिसतील.
महाराष्ट्राचा वास्तुवारसा
प्राचीन काळापासूनचा वास्तुवारसा लाभलेला महाराष्ट्र पर्यटकांना भुरळ पाडण्यात म्हणावा तसा पुढाकार घेत नाही. म्हणूनच पर्यटकांना आकर्षित करून घेण्यात तो अपयशी ठरलेला दिसतो. १८ एप्रिल या ‘जागतिक वारसादिना’निमित्त महाराष्ट्राच्या या उदासीनतेवर टाकलेला प्रकाश..
आणखी वाचा
First published on: 13-04-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heritage building of maharashtra