गर्द जंगलात झाडांची जशी उंच उंच जाण्याची स्पर्धा लागलेली असते, तशीच हल्ली शहरांची एफएसआय वाढवत नेत टोलेजंग इमारती बांधण्याची चढाओढ लागलेली दिसते. लोक दाम दुप्पट किंमत देऊन वर वरच्या मजल्यावरचे घर घेण्यास उत्सुक असतात. साहजिकच आहे ते. बहुतांश सजीवांना उजेडाची आणि त्यात मानवांना उंचीचीही ओढ असतेच. युरोप अमेरिकेतल्या बऱ्याचशा शहरांमध्ये नाही का उंच मनोरा असतो, तिकीट लावून तुम्हाला सबंध गावाचे विहंगम दृश्य दाखवणारा.
मी शांघाईला ‘हाय राइझ बिल्डिंग्स’ वरील एका सेमिनारला गेले असताना ८४व्या मजल्यावर राहिले होते. खाली रस्त्यावरची वाहने मुंगळ्यांसारखी दिसत होती. कधी कधी वाऱ्यामुळे, इमारत आपल्याला जाणवेल इतकी हेलकावत होती. ४ दिवस राहायला मजा वाटली. मी विचार केला, कायमचे असे राहायला आवडेल का? काय बदल होतील आपल्या जीवनात, दिनचर्येत? आपल्याकडे १०० मजली नाही तरी ४०-५० मजली इमारती सर्रास दिसतात.
उंच इमारतीत सर्वात पहिला बदल म्हणजे आपण विजेच्या खांबांच्या, झाडांच्या आणि कावळ्यांच्या पातळीच्याही वर जातो. दृष्टीचा कोन बदलल्यामुळे जग वेगळे भासते, पण त्याचीही लगेच सवय होते. खोल्यांना वायुविजन चांगले असेल तर सुसाट वारा घरात शिरतो व भरपूर सूर्यप्रकाशही लाभतो. आकाश, ढग, सूर्योदय, सूर्यास्त, सगळे कसे छान दिसते! रस्त्यावरचा वाहनांचा आवाज, धूर, गोंगाट कमी होतो. पण ओल्या मातीचा सुगंध आणि फांद्यांच्या सावलीचा थंडावाही लुप्त होतो. अर्थात पुनर्विकास झाल्यावर जमिनीच्या तुकड्याच्या मानाने इतकी माणसे त्यावर राहायला येतात की त्यांना लागणाऱ्या पाण्याच्या टाक्या, कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था, वाहनतळ, विजेचे मीटर, देखभाल-खोल्या इत्यादींच्या भाऊगर्दीत झाडे कुठच्या कुठे अदृश्य होतात. खालच्या मजल्यांना सूर्यप्रकाशही दुरावतो.
दुसरा बदल, कामाची मंडळी बाहेर गेली की दिवसभर घरात राहणाऱ्या वयस्कर मंडळींच्या मानसिक अवस्थेत होऊ शकतो. जेव्हा शहराबाहेर उंच इमारतींचा मोठा गृहप्रकल्प निर्माण केला जातो, तेव्हा तिथे क्लब, धावपट्टी, बगीचे, तरणतलाव, मुले व ज्येष्ठ मंडळींसाठी भरपूर सुविधा केल्या जातात. ज्यांना त्याची किंमत झेपेल, सोयीचे असेल तेच तिथे राहायला जातात. पण एकेकटी बैठी घरे जेव्हा पुनर्विकास होऊन उंच इमारतीत परिवर्तित होतात, तेव्हा असल्या कुठल्याही सोयी-सुविधांसाठी तिथे जागाच नसते. इमारतीतून बाहेर पडली की व्यक्ती रस्त्यावरच येते. अशा इमारतीत ज्येष्ठांना एकटे वाटू शकते. दोन-तीन मजली घरे असताना, बाल्कनीत उभे राहून इमारतीत येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चौकश्या करणे, रस्त्यावरचे विक्रेते, बागडणारी मुले बघणे, बागेतली फुले, कडिपत्ता खुडून आणणे, यात त्यांचा जीव छान रमत असे. दार उघडे ठेवले तरी अश्वासक जाग असायची.
उंच इमारतीत मात्र कबुतरे आत येऊ नयेत म्हणून सर्व बालकन्यांना जाळी लावून घ्यायला लागते. बैठ्या इमारतीत झाडांमुळे मिळणारा आडोसा वरच्या मजल्यांवर नाहीसा होतो. दिवसा खूप ऊन-वारा येतो म्हणून व रात्री दिवे लागणीला एकमेकांच्या घरातले आरपार दिसते म्हणून पडदे सतत लावायला लागतात, म्हणजे एकाकीपणाची पूर्ण रेसिपी.
तिसरा बदल तो यंत्रांचा आपल्या दिनक्रमात अनिवार्य शिरकाव. उदाहरणार्थ, इमारतीतून बाहेर पडायला लागणारा वेळ. पटकन दोन जिने उतरून बाहेर गेलो, असे होत नाही. वरच्या मजल्यांवर असाल तर आधी लिफ्टसाठी थांबावे लागते. लिफ्टच्या गतीने खाली आल्यावर गाडीने जाणार असाल तर गाडी त्या मेकॅनिकल पार्किंगमधून बाहेर येईपर्यंत परत थांबावे लागते. या सोपस्कारात, १०-१५ मिनिटे अगदी सहज जातात. हा काळ पूर्णपणे त्या दोन्ही यांत्रिक प्रणालींच्या तब्येतीवर आधारित असतो आणि मेकॅनिकल पार्किंगची तब्येत महिन्यातून एकदा तरी बिघडतेच. जर महत्त्वाच्या कामासाठी किंवा प्रवासाला जाणार असू तर आदल्या दिवशीच गाडी बाहेर काढून ठेवण्यात शहाणपण असते.
चौथा बदल जो जाचक ठरू शकतो, तो आपल्या घराच्या देखभालीचा खर्च. त्यात कमीत कमी ४ ते ५ पट वाढ होते. कारण प्रत्येक सुविधेसाठी आपल्याला ऊर्जा वापरावी लागते. माणसांप्रमाणेच पाणीही इतक्या उंचीपर्यंत पोचवावे लागते. त्याला सध्या दोन पर्याय आहेत. एक म्हणजे दिवसातून एकदा पंपाने जमिनीवरच्या टाकीचे पाणी इमारतीच्या डोक्यावरच्या टाकीत भरणे, जे मग गुरुत्वाकर्षणाने प्रत्येक घरात गरजेप्रमाणे पोचते. दुसरा पर्याय आहे वायवीय प्रणालीचा- ज्यात गच्चीवर टाकी नसते. कुठल्याही घरात नळ उघडला की खालचा कंप्रेसर पाणी वर ढकलतो व नळाला पाणी येते. या दुसऱ्या प्रकारात, देखभालीचा खर्च खूप जास्त असतो, त्यामुळे पहिला पर्यायच बारा वाटतो.
आणखीन एक अमूर्त बदल होतो तो त्या परिसराच्या सभ्यतेत. पुनर्विकसित उंच इमारतीतल्या महागड्या सदनिका व खर्चीक राहणे तेथील मूळ रहिवाशांना परवडेनासे होते. तिथे बाहेरील नवखे, आर्थिकदृष्ट्या सबळ, पण वेगळ्या सभ्यतेचे लोक वाढतात आणि लोकसंख्येची रचनाच बदलून जाते. जुने स्थानिक रहिवासी लांब फेकले जातात. इतकेच नव्हे तर संकुलाच्या फाटकाशी पहारेकरी बसवल्याने छोटे विक्रेते, विविध अल्प-स्वल्प सेवा पुरवणारे, कला प्रस्तुत करून रोजी रोटी कमावणारे, आपल्या अनौपचारिक बाजारपेठेपासून दुरावतात, बेरोजगार होतात. परिसराचा नूर पालटतो,
माणसांच्या, त्यांच्या गरजांच्या, गाड्यांच्या व पाण्याच्या वाहतुकीसाठी लागणारी ऊर्जा व संसाधने ही उंचीची किंमत तर आहेच. उंच इमारतीत घर घेणाऱ्या प्रत्येकाला ती द्यावी लागते. पण जमिनीशी-झाडांशी नाळ तुटणे, एकाकीपणा वाढीस लागणे, सामुदायिक जीवनपद्धतीचा ऱ्हास होणे अशी किंमत, एकंदरीत नागरी समाजालाही मोजावी लागते. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक जागा-सुविधांची कमतरता असतेच, त्यामुळे पुनर्विकासाच्या वेळी आपल्या इमारतीत, खर्च कमी करण्यासाठी, विकासकाला, सामूहिक सुविधांना फाटा देऊ न देणे, यात आपले हित आणि शहरात सार्वजनिक मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, बगीचे, नाट्यगृहे यांची हक्काने मागणी करणे- जी आहेत त्यांची राखण करणे हे आपले कर्तव्य.
(नगर नियोजन तज्ज्ञ व वास्तुविशारद)