आपण आपला ९० टक्के वेळ घरात व्यतीत करतो. परंतु बाह्य प्रदूषणापेक्षा घरातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऊर्जा हा घरातील प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. घरातील प्रदूषणाविषयी वेळीच जागरूक राहिलो नाही, तर आपले आरोग्य धोक्यात येईल. उद्याच्या (७ एप्रिल) जागतिक आरोग्यदिनानिमित्त खास लेख-
घर म्हणजे आपल्यासाठी सर्वात सुरक्षित जागा; जिथे आपण स्वच्छ आणि मोकळा श्वास घेऊ शकतो. पण थांबा! तुमच्या या गृहीतकाला छेद देणारा एक अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार, घराच्या अंतर्गत भागातील तसेच इमारतींमधील हवा बाहेरील हवेच्या तुलनेने अधिक प्रदूषित असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. बाहेरील प्रदूषणापेक्षा घरातील हवेचे प्रदूषण सर्वाधिक असून लोक जास्तीत जास्त वेळ घरात घालवत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी घरातील हे प्रदूषण धोकादायक आहे.
सध्या प्रदूषण हा शब्द वारंवार कानावर आल्याने अतिपरिचित झाला आहे. कोणत्याही बऱ्या-वाईट घटनांची परिणती ही वाढत्या प्रदूषणात होते. प्रदूषण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर वाहतुकीने भरगच्च वाहणारे रस्ते, कारखाने आदी चित्र उभे राहते. पण या सर्वाबरोबरच घराच्या अंतर्गत भागातील प्रदूषणामुळेही आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो याची मात्र आपल्याला फारशी कल्पना नसते. घराच्या अंतर्गत भागात होणाऱ्या प्रदूषणाचेही अनेक प्रकार आहेत. धुळीमुळे, झुरळासारख्या कीटकांमुळे, घरातील आद्र्रता पातळी वाढल्याने, तसेच हवेतील विविध वायूंच्या कमी-अधिक प्रमाणामुळे अशा प्रकारचे प्रदूषण आढळून येते.
ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानुसार काही ठिकाणी स्वयंपाकघरात स्टोव्ह वापरला गेल्यास प्रदूषणाची पातळी अधिक दिसून येते. युनिव्हर्सटिी ऑफ शेफिल्ड फॅकल्टी ऑफ इंजिनीअरिंगमधील संशोधकांनी तीन निवासी इमारतींच्या आतील आणि बाहेरील बाजूचा हवेचा दर्जा तपासला असता नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ2)ची पातळी अधिक असल्याचे आढळून आले. स्वयंपाकाकरता गॅसचा वापर होत असल्यास तेथील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण बाहेरच्या तुलनेत तीनपटींनी अधिक आढळून आले. या संबंधीचे निष्कर्ष जर्नल ऑफ इण्डोर आणि बिल्ट एन्व्हायर्न्मेंटमध्ये प्रकाशित करण्यात आले असून अनेक घरांमध्ये बाहेरील प्रदूषणापेक्षा हे अंतर्गत प्रदूषण अधिक प्रमाणात असल्याचे लक्षात आले आहे.
आपण आपला ९० टक्के वेळ घरात व्यतीत करतो आणि आपले घर उबदार, सुरक्षित आणि आरामदायी व्हावे याकरता कष्ट उपसतो. पण आपण श्वसनावाटे किती प्रमाणात प्रदूषित हवा घेतो याचा विचार करत नाही. ऊर्जा हा घरातील प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. घरातील प्रदूषणाची पातळी हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूंमध्ये अधिक प्रमाणात वाढलेली दिसून येते. कारण या दोन्ही ऋतूंमध्ये आपण उकाडा कमी करण्यासाठी किंवा ऊब वाढवण्यासाठी घरे बंदिस्त करतो आणि यातूनच घरातील प्रदूषणाची पातळी वाढीला लागते; ज्याचे संभाव्य परिणाम आपल्या आरोग्यावर होतात, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हवेमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी व्हेंटिलेशन वाढवणे हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण श्वसनाशी संबंधित आजार हे हवेतील प्रदूषणामुळे बळावतात. बाहेरची शक्य तितकी हवा आत येऊ दिल्यामुळे तसेच सूर्यप्रकाशामुळे घराच्या आतील भागात तयार झालेले प्रदूषित घटक नष्ट होतात. घरातील हवा बाहेर जाते आणि बाहेरील ताजी, स्वच्छ हवा आत येते. यातून स्वच्छ हवा खेळती रहाते.
हवेतील प्रदूषणाबरोबरच धूळ, आद्र्रता तसेच कीटक यांमुळे होणारे प्रदूषणही घातक आहे. घर स्वच्छ करण्याकरता रसायनेमिश्रित साबण अथवा कीटकनाशकांचा स्प्रे याचा उपयोग आत्यंतिक गरज पडल्याखेरीज करू नये. सुरक्षित ठिकाणी किंवा गॅरेजमध्ये ते साठवून ठेवावे. मात्र यातून मोठय़ा प्रमाणावर रसायने बाहेर पडत असल्यामुळे याचा वापर वरचेवर करू नये. अशा स्प्रेचा मानवी त्वचा आणि फुप्फुसे यांवर विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारचे रासायनिक स्प्रे अथवा कीटकनाशके वापरायची असल्यास काळजीपूर्वक वापरावीत आणि वापर झाल्यावर तात्काळ नीट बंद करून फेकून द्यावीत.
ज्या घरात आद्र्रतेचे प्रमाण अतिरिक्त असते तेथे दमा आणि अन्य सांसíगक रोग अधिक प्रमाणात आढळून येतात. यामुळेच घरात मोकळी हवा राहू द्यावी. आद्र्रतेवर नियंत्रण ठेवावे. आद्र्रतेकडे लोक गांभिर्याने पाहात नाहीत. परंतु आद्र्रतेचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक झाले, तर अशा वातावरणात जंतू वाढण्याची प्रक्रिया जलद होते. अशा प्रकारची आद्र्रता आणि त्यातून झुरळांसारखे कीटक वाढल्याने लहान मुलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. जर स्वयंपाकघर तसेच बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन असतील तर त्याचा वापर आद्र्रता कमी करण्यासाठी करा. माणसे असोत किंवा पाळीव प्राणी सर्वजण हवेतील आद्र्रतेत दिवसभरात भरच टाकतात त्यामुळेच तुम्ही जर नवीन जागा घेत असाल तर बांधकाम व्यावसायिकाला अधिकाधिक मोकळी हवा आत येईल अशा प्रकारे रचना करण्यास सांगा. जेणेकरून आद्र्रतेचा प्रश्न सुटू शकेल.
घरातील धूळ स्वच्छ करताना आपण जी रसायने किंवा कीटकनाशके वापरतो ती हवेत मिसळत नाहीत ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा घर स्वच्छ करताना आपण घरातील लोकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम घडवून आणत आहोत, हेही लक्षात येत नाही. याकरता प्रामुख्याने प्रतिबंधात्मक स्वच्छता राखावी. यामध्ये काही सोप्या बाबी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. जसे चपला घराबाहेर काढणे. यामुळे घरात धूळ येणार नाही. काही घरांजवळ वाहता रस्ता असल्यामुळे धुळीचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी चपला बाहेर काढणे अथवा दरवाजात धूळ खेचून घेणाऱ्या मॅट ठेवणे, ज्या स्वच्छ करता येतात हे खूपच फायदेशीर ठरते. परिणामकारकतेने केलेली स्वच्छता आणि काप्रेट व्हॅक्यूिमग वरचेवर केल्याने निश्चितच धुळीला पर्यायाने प्रदूषणाला आळा बसू शकतो.
घराबाहेरील प्रदूषणाला नियंत्रणात आणताना घरातील प्रदूषण नियंत्रणात रहावे याकरीता गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत. घरातील प्रदूषणाने जर धोक्याची पातळी ओलांडली तर आपले जीवन नक्कीच असह्य बनेल, तसेच विविध रोगांना आमंत्रणही मिळेल.
घर: एक प्रदूषित वास्तू
आपण आपला ९० टक्के वेळ घरात व्यतीत करतो. परंतु बाह्य प्रदूषणापेक्षा घरातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ऊर्जा हा घरातील प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे. घरातील प्रदूषणाविषयी वेळीच जागरूक राहिलो नाही, तर आपले आरोग्य धोक्यात येईल.
First published on: 06-04-2013 at 01:13 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home a polluted place