रामप्रहरी अंगणात किंवा घराच्या खिडकीत बसून कावळा ओरडला की पाहुणे येणार असं म्हणतात. बहुधा ही समजूत ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे’मुळे दृढ झाली असावी. अर्थात, ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला पाहुणा म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. तो आला तर तुला वाटी भरून दूध देईन अशी ते कावळय़ाला लालूच देखील दाखवतात.
‘दुधे भरूनी वाटी लावीन तुझे ओठी
सत्य सांगे गोठी, विठो येईल कायी..’
शहरीकरण झाल्यानंतर अनेक जुन्या गोष्टी हरपल्या. कावळा अजून शिल्लक आहे. जुना वाडा आणि वाडय़ातलं झाड असो किंवा सोसायटीतली सदनिका असो, कावळे विपुल आढळतात. सकाळी स्वयंपाक करताना अनेक गृहिणी किचनच्या खिडकीबाहेरील चौकटीवर त्यांच्यासाठी घास ठेवतात आणि स्वयंपाकाची वेळ अचूक साधून तो घास उचलायला कावळे हमखास येतात.
आजही कावळा सकाळच्या प्रहरी खिडकीच्या ग्रीलवर किंवा बाल्कनीच्या कठडय़ावर बसून काऽव काऽऽव करू लागला की गृहिणी ‘हात रे मेल्या, आता कोण पाहुणा आणतोस घरी,’ म्हणून करवादतात नि त्याला हातवारे करून कृतक कोपाने उडवून लावतात.
पूर्वीच्या शांतगती आयुष्यात तोचतोचपणाचा लोकांना कंटाळा येत असावा की काय! आपली गरसोय झाली तरी चालेल, रोजचं वेळापत्रक कोलमडलं तरी चालेल, पण पाहुणे यावेत. त्यांनी घर गजबजून जावं असं प्रत्येक यजमानाला, गृहिणीला मनापासून वाटे. चातुर्मासात स्त्रिया पारायण करतात, त्या कहाण्या पहा. कितीतरी कहाण्यांत देव पाहुण्याचं रूप घेऊन येतो नि व्रताची सांगता होते अशा आशयाची वर्णनं सापडतील. राज कपूरचा एक नायक आपल्या संस्कृतीचं वर्णन करताना म्हणतो,
‘मेहमान जो हमारा होता है, वह जान से प्यारा होता है
ज्यादह की नहीं लालच हमको थोडे में गुजारा होता है.’
आज जीवन गतिमान झालं तरीही भाषेचे जुने संस्कार पुसले जात नाहीत. जेवायला बसलेलं असताना अचानक दाराची बेल वाजली आणि अजिबात न कळवता कोणी ‘अ-तिथी’ आला तरी चटकन आपल्या तोंडून शब्द उमटतो,
‘या जेवायला..’
पाहुण्यांची गजबज असली की घर मनापासून हसत असतं. पाहुण्यांचा राबता नसलेलं घर केविलवाणं, एकाकी वाटतं. खलील जिब्रान यानं म्हटलं आहे, की ‘पाहुणे नसलेलं घर दफनभूमीसारखं वैराण असतं.’ पोर्तुगीज भाषेत पाहुण्यांवर मजेदार म्हण आहे, ‘पाहुण्यांमुळे नेहमीच आनंद होतो, कधी ते आल्यामुळे तर कधी ते गेल्यामुळे.’
घरात पाहुण्याचं स्थान नेहमी मानाचं असतं. शहरात मोठी सदनिका असेल तर त्यातली एक स्वयंपूर्ण बेडरूम पाहुण्यासाठी मोकळी ठेवली जाते. यात श्रीमंतीचा भाग कमी आणि मनाच्या औदार्याचा भाग अधिक आहे. पूर्वी वाडे होते तेव्हाही आलेल्या पाहुण्याला त्याच्या जवळिकीनुसार ओसरीवर किंवा आतल्या खोलीत स्थान दिलं जाई. पण अगदी अनोळखी पाहुणादेखील ओसरीवर मुक्काम करून जात असे. रोजच्या जेवणाला असलेला पै-पाहुणा हे यजमानाच्या ऐश्वर्याचं प्रतीक मानलं जाई. वारीच्या वेळी पायी येणाऱ्या भाविकांचं आगतस्वागत करण्यामागे जशी देवावरची श्रद्धा असते तसंच यजमानधर्माचं देखील भान असणार. संत तुकारामांनी तेच सांगितलंय,
‘साधु-संत येती घरा,
तोचि दिवाळी दसरा.’
जुन्या काळची एक गोष्ट लोभस वाटते. धनाढय़ माणसं आपलं सारंच धन धार्मिक कार्यार्थ खर्ची घालत नव्हती. अनेक घरांत होतकरू गरिबांची मुलं वारावर जेवायला येत. काही घरांत अशी मुलं शिक्षण संपेतोवर वर्षांनुर्वष आनंदानं ठेवून घेतली जात. आश्रित असली तरी त्यांना दर्जा पाहुण्याचा मिळे. आश्रय निरपेक्ष असे. यजमान आणि ही मुलं एकाच पंगतीला बसत. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांच्या ‘त्रैराशिक’ कथेत या स्नेहबंधांचं अतिशय सुंदर वर्णन वाचायला मिळतं. गतिमान आयुष्य आणि महागाईच्या रेटय़ाखाली हे सारं आता दुर्लभ आणि न परवडणारं झालं आहे, खरं!
पाश्चात्त्य देशातही पाहुण्याचा पाहुणचार व्हावा नि त्याचं खासगीपण जपलं जावं म्हणून गेस्ट रूम किंवा आऊट हाऊस राखून ठेवलेलं असतं. पाहुणा या संकल्पनेवर त्यांचादेखील अपार जीव. एक आंग्ल कवी म्हणतो, की मानवजात दोनच गटांत विभागली जावी. यजमान आणि पाहुणे. लोकांनी एकमेकांकडे यावं-जावं. नातीगोती दृढ व्हावीत, हा त्याचा आशय. ‘इलियड’ आणि ‘ओदिसी’ या ग्रीक महाकाव्यांचा जनक होमर म्हणतो,
It is equally offensive to speed a guest who would like to stay and to detain one who is anxious to leave.
ज्या पाहुण्याला अधिक वेळ थांबायची इच्छा आहे त्याला घाईघाईनं कटवणं काय नि ज्याला निघायची घाई आहे त्याला बळे थांबवून घेणं काय- दोन्ही चूकच.
होमरच्या अवतरणाची आठवण झाली ती सोनाली कुलकर्णी यांच्या लेखांमुळे. त्यांच्या मते आतिथ्य ही एक कला आहे. कुणी जेवायला येणार असेल तर गृहिणीनं-गृहस्थानं थोडी वेळापत्रकाची दक्षता घेतली तर पाहुणचार सुकर होतो. पाहुण्याला बाहेरच्या खोलीत बसवून गृहिणीनं किचनमध्ये गायब होणं योग्य नाही. पाहुणा येण्याआधी सारी तयारी हवीच. मुख्य म्हणजे पाहुणा तृप्त होऊन गेल्यावर आपल्यालादेखील तृप्ती वाटायला हवी. पाहुणचारामुळे थकवा जाणवला तर कुठंतरी काहीतरी चुकलंय खास. पाहुण्यांनी देखील शहरी जीवनाची धकाधक लक्षात घेऊन सामंजस्य दाखवायला हवंच. यजमान आणि पाहुणा यांच्यात कुठलीच औपचारिकता नसेल, त्या घरातला पाहुणचार स्वर्गवत. सोकुलच्याच भाषेत सांगायचं तर ‘माझ्याकडे बाई येणार आहे स्वयंपाकाला, पोळय़ा करून आणू?’, ‘मी पिठलं आणते, तू प्लीज भाताचं बघ नं?’ असा मोकळेपणा किती आनंद देतो. जेवायला येताना उपचार म्हणून उगाच फुलांचा अवाढव्य गुच्छ किंवा तुपकट मिठाईचा बॉक्स आणण्याऐवजी घरी केलेला एखादा मोजका पदार्थ आणणारे किंवा मनापासून कौतुकाचे दोन शब्द बोलणारे स्नेही-पाहुणे निघून गेले तरी आपल्या मनात कायम घर करून राहतात. एक मोठीच प्रसिद्ध लेखिका आमच्या शेजारी राहायची. एखाद्या शनिवारी ती फोन करायची. संध्याकाळी दोघे लवकरच आमच्या घरी येत किंवा आम्ही त्यांच्याकडे. वाटेत दोघींसाठी दोन टपोऱ्या गजऱ्यांची खरेदी. मग दोघी निवांत गप्पा मारीत स्वयंपाकाला लागणार. बाहेरच्या खोलीत मेंदीच्या पानावर किंवा पुलंची ध्वनिफीत किंवा असंच काही मोठय़ा आवाजात लावून आम्ही दोघे. पाहुणे आणि यजमानांच्या भूमिका अशा एकमेकीत छान विरघळून गेलेल्या. आता ती खूपच लांब राहायला गेली.
आणि तारुण्यसुलभ ओढीतून प्रियजनाची वाट पाहणारं घर, त्याचं काय सांगावं? त्या घराची तर रीतच न्यारी. विरह किंवा दुराव्याच्या प्रसंगी उर्दू कवी दाग म्हणतो तसं,
‘वह जमाना नजर नहीं आता कुछ ठिकाना नजर नहीं आता
जान जाती दिखायी देती है उनका आना नजर नहीं आता.’
त्याचं किंवा तिचं विरहात व्याकूळ-बेकरार झालेलं घर गदिमांच्या शब्दांत सांगत असतं –
‘आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे
जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे.’
कविता मोकाशीच्या ओळीतली आईबाबांच्या धाकातली तरुणी आईचा डोळा चुकवून रुक्मिणी होऊ बघते-
‘ढगाआड बदलूनी कूस निजते हळू आईची दुपार
कवडसा पाऊल माझे थिरकते मग अंगणात फार
पानाआडचा सोनचाफा तशी मृगजळ त्याची हाक
सोनसुगंध ओलांडे उंबरा नको नको रे आईचा धाक’
तेव्हा तिचा साजण संदीप खरेच्या कवितेतून बजावतो,
‘लगबग लगबग दार उघडशील आता अधीरशा ओढीने
जरा पाणीया डोळय़ांनी अन् जरा हासऱ्या चेहऱ्याने.’
तेव्हा तिला दिसते,
‘चेहऱ्यावरती क्षमस्व घेऊन दारी उभा मी थकलेला
आणि तुझा चेहरा जणू की चंद्र घनातून लपलेला..’
हा साजण साधासुधा पाहुणा नसतो. रुक्मिणीहरण करणाऱ्या कृष्णासारखी त्याची उत्कट प्रीती असते. पी. सावळाराम यांनी आक्रमक शब्दांत त्याची आडदांड रीतभात वर्णिली आहे-
‘पाहुणा म्हणून आला, जरा घरात थारा दिला
दांडगाई करून गं बाई, चार दिसात घरधनी झाला.’
हीच लाडिक तक्रार ‘उडम्न खटोला’ मधली नायिका शकील बदायुनींच्या हळुवार शब्दांत कशी करते, पहा-
‘घर आया मेहमान कोई जान न पहचान
बने बालमा, हो बडा जालमा.’
बालमा होऊ बघणारा हा प्रियकर थेट घरात येत नाही-
‘पहले नैनों में, फिर मन में आया
चांदनी मेरे जीवन में लाया..’
असा पाहुणा किंवा पाहुणी घरात किंवा आयुष्यात येतात, तेव्हा त्या वास्तूला चत्रपालवी फुटते. दोघं एकमेकांना अनुरूप असणं, छत्तीस गुण जुळून येणं, पाहुण्यानं-पाहुणीनं थेट घरधनी किंवा गृहिणी होऊन जाणं, घराच्या दर्शनी दारावर आंब्याचं तोरण लागणं आणि उंबऱ्यावरचं माप लवंडून स्वयंपाकघरात येऊन किणकिणलेला ताजा हिरवा चुडा कायम या घराचा होऊन घरातल्या वस्तूवस्तूवरून गृहिणीचा हात फिरत राहणं, या नशिबाच्या गोष्टी.. ज्यांना लाभल्या ते प्रियकर आणि प्रेयसी भाग्यवान.

buffaloes dies due to lightning strike in dam
पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Golden Jackal
Golden Jackal : विक्रोळीत लांडग्यांची दहशत? वनअधिकारी म्हणतात, “तो लांडगा नव्हे तर…”
Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
Wardha, state government schemes,ladki bahin yojana, utensil distribution, construction workers, political pressure, Hinganghat taluka, Deoli taluka, Sena Thackeray group, chaos, administration,
वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी