श्रीनिवास डोंगरे
नवीन जागेकरता लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ४-५ लाख रूपये खर्च करून जागेचा नूरच बदलून टाक. तुला नवीन जागेत गेल्याचा फिलही येईल.अनेक वर्ष दादरला राहात असल्यामुळे दादर सोडायचे नव्हते. माझा मुलगा मला एक सारखं सांगत होता, ‘‘बाबा, आपण नवीन जागा घेऊया ना. २५-३० मजली टॉवर बघितल्यावर म्हणणं पटत होत की जागांचे भाव गगनाला का भिडले आहेत व मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर का आहेत? माझी दादर सोडून उपनगरात जायची इच्छा नव्हती आणि अंतस्थ हेतू होता की, आमच्या बिल्डिंगमधे रिडेव्हलपमेंटचे वारे वाहात होते, तेव्हा अनायासे नवीन मोठी जागा मिळेल, पण लगेच दुसरा विचार मनात येई की, किती वर्ष लागतील काय माहीत.
दोन महिन्यांनी मोठी मुलगी अमेरिकेहून काही दिवस राहायला येणार होती. मी आणि बायको एकंदरच सध्याच्या जुन्या जागेविषयी विचार करत होतो आणि योगायोग म्हणतात तो असा! माझा मित्र माधव अचानक घरी आला. तो वास्तुविशारद आहे, दादरला त्याच कामासाठीच्या सामाना करता मार्केटमधे आला होता. सहज बोलता बोलता जागेविषयी आमच्या दोघांच्या मनातली व मुलाची इच्छा त्याला सांगताना हेही बोललो, अरे, नीलिमाही दोन महिन्यांनी अमेरिकेहून येणार आहे. मग त्यालाच विचारलं, तू काय सुचवतोस याविषयी.’’
माधव म्हणाला, ‘‘हे बघ श्रीनिवास! तुझ्यापुढे ३ प्रश्न आहेत- १) मुलाला नवीन जागा हवी आहे, २) तुझी जागा लवकरच रिडेव्हलपमेंटला जाणार आहे आणि ३) दोन महिन्यांनी तुझी मुलगी आमेरिकेहून येणार आहे, तेव्हा एक आणि एकमेव उपाय- म्हणजे तू या जागेचा कायापालट करून टाक. नवीन जागेकरता लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा ४-५ लाख रूपये खर्च करून जागेचा नूरच बदलून टाक. तुला नवीन जागेत गेल्याचा फिलही येईल.
मी आणि बायकोनं एकदम आनंदात म्हटलं, ‘‘म्हणजे काय करू?’’
माधव म्हणाला, मला आजिबात वेळ नाही, पण तुला एक चांगला कॉन्ट्रॅक्टर देतो, तो विश्वासू आहे. मराठी आहे. मी सांगतो तसं जागेचं पूर्ण रिन्युएशनचं काम त्याला दे. मी त्यालाही समजावून सांगतो. आता एक कागद घे. मी तूला एक एक गोष्ट सांगतो ती लिहून घे आणि त्याप्रमाणे घराची कामं करून घे.’’
’ पावसामुळे तुमच्या भिंतींना ओल धरते म्हणून आर्धा इंचाची गॅप ठेवून सगळय़ा भिंतींना प्लाय मारून घे.
’ वॉल टू वॉल कार्पेट सर्व खोल्यांना बसवून घे.
’ हॉलची खिडकी वॉल टू वॉल रुंद करून स्लाइड काचा बसव व नवीन व्हेलवेटचे
पडदे कर.
’ कोचांना नवीन कापड शिवून घे, या सर्वाकरता मॅचिंग रंग निवडून घे.
’ हॉलमधल्या भिंतीवरचेही जुनी चित्र फ्रेम व शोकेसमधल्या वस्तू बदलून नवीन घे.
’ फ्रिज व गोदरेजचं कपाट यांना मॅचिंग कलरस्प्रे मारून घे.
’ डायिनग टेबलवर एम्ब्रॉयडरी कापड बॉर्डरचं मॅचिंग प्लॅस्टिक कापड टाक.
’ हॉलच्या दिव्यांच्या शेड, वॉशबेसिनवरचं कपाट, िभतीवरचं घडय़ाळ या वस्तू नवीन स्टाइलच्या आण.. या अशा वस्तू बदलणं, नवीन घेणं तुला खर्चीक किंवा उधळपट्टी वाटेल, पण जागेचा लूक बदलण्यासाठी जरुरी आहे, हे तुलाच काय सर्व कुटुंबाला नंतर कळेल. श्रीनिवास, तुला महत्त्वाचं व शक्य आहे म्हणून सांगतो, कोच, डायिनग टेबल, टीव्ही, बेड, थोडक्यात फर्निचरची नुसती जागा बदल्लीस तरी तुला घर नवीन वाटेल.
माधवचा सल्ला ऐकला आणि अक्षरश: दीड महिन्यात माझं घर नवीन झालं. मुलगा व अमेरिकेहून आलेली मुलगी बेहद खूष झाली. सध्यातरी नवीन जागा घेण्याचे डोक्यातून निघून गेलं आहे.