गोट्या आणि चिंधी
नुकतंच घर बदलताना खूप जुन्या अडगळीत गेलेल्या गोष्टींची आवराआवरी झाली. समुद्रमंथनच जणू. कितीतरी मागे पडलेल्या गोष्टी, त्या अनुषंगाने येणाऱ्या आठवणी आणि प्रसंगांची उजळणी झाली. त्यातच सापडला आमचा गोटय़ा! साधासाच बाहुला. टप्पोरे डोळे, डोक्यावर टोपी, अंगात रुबाबदार पॅण्ट आणि वर बंडी. गुटगुटीत गोंडस असा हा गोटय़ा माझ्या लहानपणीचा आवडता सोबती. माझ्या मावसभावाकडून माझ्याकडे आलेला. माझ्याकडेदेखील दोन बाळांनी खेळलेला. कुणी पेनाने त्याचं नाव त्याच्या चड्डीवर लिहिलं, तर कुणी त्याच्या हातावर सुबक घडय़ाळ काढलेलं आहे. पिढीजात चालत आलेल्या देवांसारखाच तो आमच्या घरात आहे. पिढीजात जपलेलं, प्रेमाची ठेव असलेलं एक खेळणं खूप अनमोल झालेलं आहे.
चिऊच्या घरात या जुन्या गोष्टींना फारच महत्त्व असतं. जुनी दुपटी, कपडे, पुस्तकं, पाटी, पेन्सिल, पाण्याच्या बाटल्या, शाळेचे साहित्य एक ना अनेक गोष्टी एका हाती दुसऱ्याकडे जातात. माझ्याकडच्या आई-बाबा-पिलू हत्तीच्या खेळण्यांत किती लहानग्यांनी आपल्या घरांच्या प्रतिकृती कल्पिल्या आहेत, तर चौकोनी कुटुंबातल्या लहानग्यांना या त्रिकोणी कुटुंबातला चौथा कोन कुठे हरवला, हा प्रश्न पडलेला आहे. मी शाळेत असताना माझ्या आईने ती शाळेत असताना वापरलेली कम्पॉस बॉक्स मी वापरलेली आहे. माझ्या हातून ती हरवली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं, हेदेखील आठवतं.
खेळण्यांच्या अजबखान्यात आज बार्बी, गेमिंग कन्सोल्स, विजेवर चालणाऱ्या गाडय़ा, सॉफ्ट टॉइज आली आणि अस्सल एतद्देशी खेळणी मागे पडली. चिंधीच्या बाहुल्या, ठोकळ्यांचे बाहुले, भातुकली, लाकडी बलजोडी, नारळाच्या करवंटीचे कासव, पंतग, बांबूच्या कामटय़ांचे भिरभिरे, लोकरीचा चेंडू.. या सगळ्या खेळण्यांतून मूल म्हणून आम्ही खूप शिकलो. चिंधी आणि गोटय़ामुळे बार्बी आणी हिमॅनच्या कमनीय-पुष्ट बांध्याची आम्हाला सवय लागली नाही. भातुकलीत गूळ-पोह्याचा खाऊ वाटून खाताना एकटे असूनही वाटून घ्यायची, नात्यांची गोडी लागली. लाकडी बलजोडी, करवंटीची कासवं आणि कामटय़ांच्या भिरभिऱ्यांसोबत खेळताना निसर्गाशी जोडलेले राहिलो.
मी केलं, मी घडवलं
श्रावण सुरू झाला आहे. येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये विविध सणांनी घर आनंदाने उजळून जाईल. सगळ्यात आवडता सण म्हणजे गणपतीचा. माझ्या एका मित्राने त्याची मुलगी पाच-सहा वर्षांची झाल्यावर बाहेरून गणेशमूर्ती विकत आणणं बंद केलं. आई-बाबा आणि लेक असे तिघं मिळून एका मुलांसाठीच्या छंदवर्गात गेले, तिथं गणेशाची मूर्ती बनवायला शिकले आणि मग घरीच शाडूची, जशी जमेल तशी; ओबडधोबड मूर्ती बनवायला लागले. पूजेत असलेली, स्वत: घरी बनवलेली ती मूर्ती त्यांच्या चिमुकल्या मुलीवर खूप मोठे संस्कार करते आहे. आम्ही देव घरीच बनवतो. मातीचाच बनवतो. पाण्यात तो विरघळतो, त्यामुळे पाणी खराब होत नाही. आम्ही देवाला हळद-कुंकवानेच रंगवतो, पाना-फुलांनी सजवतो. विसर्जन केल्यावर आमच्या देवामुळे पाण्याचं प्रदूषण होत नाही, हे असं सगळं ती चिमुकली आपल्या गणपतीबद्दल अभिमानाने सांगते.
मी लहान असताना माझ्या आजोळी कटाक्षाने मातीच्याच दिव्यांनी दिवाळीची आरास मांडली जायची. पणत्या रंगवण्याचं काम माझ्याकडे द्यायला आजी विसरायची नाही. हळद, कुंकू, कात आणि कधी माझ्या हट्टाखातर केशराच्या रंगात रंगलेलं सुवासिक तेल अशी आमची दिवाळी सजायची. घरचा कंदील बनवण्याकरता माझे मामा माझ्या मदतीला यायचे. सुरेख नक्षी असलेले पाकळ्यांचे कंदील बनवले जायचे. नाजूक हाताने कागदावर आखलेल्या रेषांवर बरोब्बर कापत नक्षी कातरली जायची. कंदिलाला झिरमिळ्या लावल्या जायच्या. इतकंच काय, माझ्या हट्टाखातर आमच्या घरासमोरची बाल्कनी घरीच बनवलेल्या रंगीबेरंगी पताकांनी सजायची.
माझ्या मित्राच्या चिमुकलीच्या निमित्ताने एक अनुभव मित्राने शेअर केला, ‘‘श्रीपाद, अरे ती स्वत: मूर्ती बनवते तेव्हा तिला ‘मी केलं’ हा आनंद मिळतो. आत्मविश्वास मिळतो. मात्र त्यापेक्षा जास्त आनंद पालक म्हणून आम्हाला मिळतो, कारण तिच्यापर्यंत सणांचे खरे संस्कार पोहोचविण्यात आम्ही यशस्वी होतो. तिच्याकडे पाहताना ‘मी घडवलं’ हा आनंद आम्हा दोघांना मिळतो.’’
माझं घर, माझा निसर्ग
माझ्या लहानपणीचा एक संस्कार माझ्या निसर्गाशी जोडले राहण्यात फारच महत्त्वाचा ठरला, असे मला वाटते. आमचं घर, मुंबईच्या इतर अनेक मध्यमवर्गीय घरांसारखंच चिमुकलं होतं. मुलांना वेगळी स्वतंत्र खोली वगरे चन नव्हती. या घराची सजावट हा आई-बाबांसोबत माझ्याही अखत्यारितला विषय होता. भिंतींवर खडू, पेनाने लिहायला पूर्ण मुभा होती. कागद कापायला, त्यांपासून काही गोष्टी बनवायला आडकाठी नव्हती. थोडा मोठा झाल्यावर अर्थातच हे सगळं आवरायची जबाबदारीदेखील माझ्यावरच असायची. आईला शिवायची, विणायची, रंगवायची खूपच आवड. तिने एक गुलाबी रंगाच्या चादरीवर सुरेख फुलांची नक्षी केली होती. मी हट्ट केल्यावर तिने कापडावरच्या रंगांशी मला खेळायला दिलं आणि आम्ही दोघांनी मिळून एक चादर रंगवायला घेतली. सोप्या गोष्टी तिने मला शिकवल्या- रंगात बुडवलेला छोटा ब्रश चार दिशांना तोंड करून चादरीवर उमटवला म्हणजे छोटुकलं फूल तयार होत असे. त्याखाली करंजी कापायच्या आरीने छोटी रेघ काढली म्हणजे सुरेख नक्षीदार देठ तयार होत असे. एक ना अनेक प्रकारच्या अशा बुट्टय़ाच्या नक्षीने ही आम्ही केलेली चादर सजली. आईने ती अभिमानाने अनेक र्वष वापरली. आपलं घर, आपला भवताल आपण सुंदर करू शकतो हा आत्मविश्वास त्यामुळे आला. किंबहुना आपल्या भवतालाला सुंदर किंवा कुरूप करणं आपल्याच हातात असतं ही शिकवण मनात रुजली.
आपल्या घरातून संस्कार, आचार आणि विचार घेऊनच आपली चिमणी पाखरं जगात वावरणार. तेव्हा आपल्याला जसं सुरेख जग घडवायचं, तसंच सुरेख आपल्या चिमुकल्यांचं घर असायला हवं. कुसुमाग्रजांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे, ‘या घरटय़ातून पिलू उडावे दिव्य
घेऊनी शक्ती’ असं आपलं घर घडवायचं असेल तर घरातल्या लहानग्यांचं विश्व काळजीपूर्वक उभारायला हवं. खरं ना?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा