आयुष्याच्या वेगात जगायचं राहून जातं. वेळ मिळाल्यावर हे करू, पुढे सुट्टी घेऊन ते करूम्हणताना आत्ता जे करायचं ते राहून जातं. वेगाने निसटणाऱ्या आयुष्यातल्या छोटय़ा छोटय़ा सुंदर क्षणांना आसुसून जगायचं ठरवलं तर? अशाच कासवगतीने जिंकणाऱ्या घराविषयी..
मुंबईतून जाणीवपूर्वक पुण्याजवळच्या छोटय़ा गावात घर घेऊन राहायला आलो तेव्हा अनेक मित्र, नातेवाईकांच्या भुवया उंचावल्या. मुंबईतल्या एका उत्तम उपनगरातल्या सोयीसुविधा, प्रवासाची साधनं वगरे सोडून कुठे खेडेगावात राहायला जाता, असे प्रश्नही काही हितचिंतकांनी विचारले. मात्र इथे आल्यावर लक्षात आलं, मुंबईत राहूनही आपण कासवगतीनेच जगत होतो.
कासवगती म्हणजे नेमकं काय?
पाश्चिमात्य देशांमध्ये फास्ट फूडने असा काही शिरकाव केला की मागील काही दशकांमध्ये लोक घरी स्वयंपाक करता येतो हेच विसरले. घरच्या स्वयंपाकघरांमध्ये स्वयंपाक बनवण्यापेक्षा आयते जिन्नस आणून पदार्थाची जुळवाजुळव करणे किंवा आयता पदार्थच आणून घरी फक्त तो गरम करून खाणे म्हणजेच उत्तम जेवण ही संकल्पना बळावली. या संस्कृतीला छेद देण्याकरता, खाद्यविषयक स्तंभलेखक आणि डाव्या विचारसरणीचे कार्यकत्रे कार्लो पेट्रिनी यांनी १९८६ साली ‘स्लो फूड’ या चळवळीची सुरुवात केली. स्थानिक वातावरणात उपलब्ध होणाऱ्या जिन्नसांपासून ते जिन्नस स्वत: पिकवून त्यापासून स्थानिक चवीढवीचे पदार्थ तयार करून, ते चवीने खाण्यामुळे आरोग्य उत्तम राहील ही कल्पना या चळवळीचा मूळ गाभा आहे. ही चळवळ तिच्या या विचारसरणीमुळे जोमाने फोफावली. जगातल्या अनेक देशांमध्ये या चळवळीचे चाहते, निष्ठावान कार्यकत्रे निर्माण झाले.
या चळवळीच्या मूळ गाभ्यापासूनच प्रेरणा घेऊन इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेकांनी प्रयोग करायला सुरुवात केली. जीवनाची गती थोडीशी कमी करून आपण आयुष्यापासून अनेक गोष्टी मिळवू शकतो, ही गोष्ट लोकांना पटायला लागली. आपल्याकडचं एक उदाहरण देतो. वेडय़ासारखं काम, अनिश्चित कामाच्या वेळा यांपासून सुटका करून घेत अनेक माझ्या पिढीतले तरुण स्वत:ची वेगळी वाट चोखाळायचं धाडस दाखवताहेत. याचा फायदा असा की ते कुटुंबासोबत, आपल्या माणसांसोबत खूप अधिक वेळ घालवू शकतात. कदाचित त्यांना तुलनेने पसे कमी मिळतात, मात्र तरी ते आनंदी, समाधानी राहू शकतात. कारण पशाने विकत घेता येणार नाहीत असे अनेक आनंदाचे क्षण ते आपल्या रोजच्या आयुष्यात मनमुराद जगत असतात.
सुशेगाद, तब्येतीत आणि शांत
आजची आपली शहरी दिनचर्या पाहिली तर घडय़ाळाच्या काटय़ाला आपण बांधलेले असतो. अमुक वाजता उठायचं, तमुक वाजेपर्यंत पेपर वाचायचा आणि अमुक एका वेळेला घरातून निघून तमुक एका वेळेला कार्यालयात किंवा कचेरीत पोहोचायचं. तिथे कामाच्या वेळा असतात. त्यामुळे ठरावीक वेळेला जेवायचं आणि घरी आल्यावर एखाद्या मालिकेला आपण बांधून घेतलेलं असतं. त्यामुळे ती मालिका पाहत पाहत अन्न पोटात ढकलायचं. माझी एक जवळची मत्रिण मला म्हणाली, ‘‘आज आपली परिस्थिती एवढी बिकट झालेली आहे की मालिका पाहत, एकमेकांशी अवाक्षर न बोलता कुटुंबातली माणसं एकत्र जेवातात आणि ‘रोजचं एक जेवण तरी आम्ही एकत्रच घेतो’ हे अभिमानाने सांगतात! आपण खरंच या सगळ्या जीवनपद्धतीत एकत्र- स्वत:सोबत आणि आपल्या जवळच्या माणसांसोबत असतो का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.’’ तिच्या या टिप्पणीने मी विचारात पडलो.
आजच्या अनेक तरुण जोडप्यांप्रमाणे ती आणि तिचा नवरा दोघंही नोकरी करतात. त्यांच्या मुलाला दोन्हीकडचे आजी आजोबा आलटून पालटून सांभाळतात. तिच्या घराकडे पाहिलं आणि जाणवलं की खरंच तिच्या घरामध्ये काही गोष्टी वेगळ्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या घरी अनेक गोष्टी घरातच केल्या जातात. सगळ्या कुटुंबाने करायच्या या गोष्टी असतात. रोजचा स्वयंपाक ही एक सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट असते. मुलाने आजी-आजोबांसोबत शाळेतून घरी येताना भाजी, फळं किंवा दूध खरेदी करायचं हा त्यांच्या घरातला नियम आहे. सोबतच, त्याच्या वयाला निवडायला-सोलायला सोपी अशी भाजी त्यानेच निगुतीने ठेवायची. संध्याकाळच्या स्वयंपाकाकरता कोिशबिरीसारखा पदार्थ त्याने आईबाबांच्या मदतीने करायचा. पानं वाढून घ्यायची. तिच्या नवऱ्याने फळं, भाज्या यांची इतर मोठी कामं करायची- जसं की पालेभाज्या निवडणे, चिरणे इत्यादी. जेवण करताना त्यांच्याकडे निक्षून टीव्ही पाहत नाहीत. त्याऐवजी एकमेकांशी दिवसभरातल्या घडामोडींबद्दल बोलतात. त्याकरता त्यांच्या चिमुकल्या स्वयंपाकघरातच तिने जेवायच्या टेबलाची व्यवस्था केलेली आहे.
या सगळ्याचा फायदा काय? असं विचारल्यावर ती सहजपणे सांगते, ‘रोजचं जेवण ही एकच गोष्ट आणि यासारख्या इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टी आम्हा तिघांना बांधून ठेवतात. बाजारात भाजी आणण्याच्या सवयीमुळे त्याला व्यवहार, पशाचं महत्त्व कळतंच, मात्र प्रत्येक ऋतूमध्ये कोणती फळं, भाज्या मिळतात याचंही शिक्षण नकळत होतं. शिवाय, हल्ली तो न विसरता आईला हे आवडतं, बाबाला ते आवडतं असा विचार करून खरेदी करायला लागला आहे. ही शिकवण फारच मोलाची आहे असं मला वाटतं.’’
घरामध्ये सुखासमाधानाने जगायचं तर घराला आपला टच असायला हवा. माझ्या लहानपणापासून आईने ही गोष्ट माझ्या मनावर िबबवली हे नक्की. इतरही अनेक मुलांप्रमाणे मलाही शाळा, छंदवर्ग, स्पर्धा, वाचन, चित्रपट असे अनेक उद्योग होतेच, मात्र त्यातूनही तिने तिच्या परीने काही नव्या, इतर मुलांपेक्षा वेगळ्या गोष्टी मला शिकवल्या. ती स्वत: त्या करताना त्यात तिने मला सामील करून घेतलं.
ती स्वत: उत्तम रांगोळी काढते. सकाळी ऑफिसला जायच्या गडबडीतही मुंबईतल्या आमच्या पिटुकल्या घराच्या उंबऱ्यावर रोज स्वस्तिक, गोपद्म, कमळाचं फूल असं रेखलं जायचं. आपच्या घराचे पडदे, उश्यांचे अभ्रे, चादरी यांवर तिने केलेली पेंटिग्ज्, भरतकाम हमखास असायचं. थोडा मोठा झाल्यावर माझी चित्रकलेतली क्षमता लक्षात घेऊन तिने मला सोप्या, फुल्यांच्या टाक्यांच्या भरतकामाच्या गोष्टी करायला शिकवल्या. अभ्यास वगरे सांभाळून मी ते करायचा. आजही माझ्या घरी मी विणलेली मनीमाऊ टीव्हीच्या कव्हरवर दिसते. आपलं घर आपण उभं करायचं, सजवायचं आणि त्यासाठी झटायचं ही वृत्ती या छोटय़ा छोटय़ा संस्कारांतून रुजली.
आनंद कोष
पुण्यातलं माझ्या मित्राचं घर. हा मित्र आणि त्याची बायको अगदी उत्तम पगारावर काम करतात. मात्र त्यांच्या घराची सजावट पाहिली तर कोणीही चाट पडेल. ‘‘आम्ही दोघांनी अगदी कर्ज वगरे काढून, चारचौघांसारखंच हे घर घेतलं. मात्र त्यानंतर त्यात आम्ही आमच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. कामाच्या भन्नाट वेळा, घरी मिळणारा कमीत-कमी वेळ आणि सगळं आपल्या सोयीचं हवं ही अपेक्षा यामुळे आमच्या घराची सजावट थोडी वेगळी आहे. आम्हाला घर सांभाळायला कमीत कमी वेळ मिळतो तेव्हा आम्ही महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित केलं. सगळ्यात पहिली गोष्ट आम्ही कोणती केली तर ती म्हणजे आमच्या घराला ज्यूटचे पडदे शिवले. स्वस्त आणि मस्त. टिकाऊ. साफसफाईला सोपे,’’ मित्र सांगत होता.
त्यांच्या घरच्या या गोणपाटाच्या पडद्यांची चर्चा पार ऑफिसमध्येही होते हे माझ्या कानावर आलंच होतं. प्रत्यक्षात पाहिल्यावर, अनुभवल्यार त्याचे फायदे कळले. हे पडदे इतर कापडांच्या पडद्यांपेक्षा जाळीदार असल्याने हवा खेळती राहते, डासांना अटकाव होतो, शिवाय उन्हाळ्यात याच पडद्यांवर पाणी मारून नुसत्या पंख्यावर घर गारेगार ठेवता येतं. ‘‘दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे केलं त्यात सोय ही गोष्ट प्रथम पाहिली. काही कामं थोडी वेगळी करायची ठरवली. आमच्या घरी प्रत्येक खोलीत एक माठ आहे – सहज कुठेही पिण्याचं पाणी मिळतंच, शिवाय आठवडय़ातून एकदा वीकेण्डला तिन्ही माठ भरून ठेवले म्हणजे पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. फíनचर मोजकंच, मात्र सुटसुटीत ठेवलं आहे. घरी कचरा काढायला स्वयंचलित यंत्र आहे, त्यामुळे ते काम हातावेगळं झालेलं आहे. घराचा रोजचा व्याप असा आम्ही थोडा कमी केला आणि त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी, आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकरता थोडा अधिक वेळ मिळतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं स्वयंपाकघर. हे साधं, सोपं आणि सुटसुटीतच हवं होतं. मॉडय़ुलर वगरे सगळं झालंच रे, पण आमच्या घरी मंडईतून आणलेली, आठवडय़ाची भाजी साठवण्याकरता एकच फ्रीज आहे. त्यातच जेवणाची पूर्वतयारी केलेले जिन्नस असतात. शिजवलेला पदार्थ, साठवणीच्या काही गोष्टी त्यात ठेवत नाही आम्ही. रोज जेवढं लागेल तेवढंच, मोजकंच शिजवून खातो.’’
मित्राची बायको उत्साहात सांगत होती, ‘‘आम्हाला दोघांनाही घरी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे जेव्हा ज्याला वेळ असेल त्याने सकाळचा डबा आणि संध्याकाळचं जेवण, आणि दुसऱ्याने मागची कामं करायची, असं आमचं गणित आहे.’’ त्यांच्या या यांत्रिक जीवनातला माझा रस आटत असतानाच ती पुढे म्हणाली, ‘‘अरे, आम्ही दोघं या पद्धतीने, अगदी रोज एकत्र बसून जेवत नसलो तरी एकमेकांच्या जवळ येतो. एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळून एकमेकांना रोजच्या रोज सरप्राईज देतो.’’ त्यांच्या या कल्पनेची मी वाहवा करत असतानाच पुढचा धक्का आला. ‘‘आम्ही दोघांनी मिळून घरात टीव्ही घेतला, मात्र त्यावर कार्यक्रम पाहता येत नाहीत. आम्ही त्यावर वीकेण्डला चित्रपट पाहतो. मला वाचनाची आवड आहे, त्याला संगीताची. एकत्र असताना मी त्याला उत्तमोत्तम पुस्तकं वाचून दाखवते, तो मला त्याच्या आवडीची गाणी ऐकवतो.’’ त्यांच्या या रोमॅण्टिक सहजीवनाची, स्वतभोवती काळजीपूर्वक गुंफलेल्या घराची खूप मजा वाटली.
कासवगतीने जगायचं म्हणजे नेमकं काय हे या घरांकडे पाहिलं म्हणजे कळतं. आयुष्यात रूढार्थानेदेखील यशस्वी असलेली ही माणसं, काही निर्णय घेऊन ठामपणे वेगळी वाट चोखाळताना दिसताहेत. आयुष्यातल्या आपल्या प्राथमिकता काय आहेत, आपल्याला काय कमवायचं आहे याचा नेमकेपणाने विचार यांनी केला आहे हे त्यांच्या घरांवरून सहज कळून येतं. आयुष्यातल्या अनेक गोष्टी, ज्या अनेक सर्वसामान्य घरांतून नेमाने आणि काहीशा अर्थशून्यपणे घडत असतात त्या यांच्याकडे घडत नाहीत. काही वेगळं घडतं आहे, घडवलं जातं आहे. आपल्याला काय हवं आहे, आपल्या गरजा नेमकेपणाने काय आहेत हे ओळखत ‘जीवन यांना कळले हो’ या थाटात ही माणसं जगताहेत. आज आपल्या सर्वसामान्य घरांपेक्षा ही घर उणी वाटतील कदाचित, मात्र या घरांचं, त्यांतल्या माणसांच्या यशाचं आणि आयुष्याचं गमक त्यांनी जाणीवपूर्वक निवडलेल्या आयुष्याच्या कासवगतीत दडलेलं आहे हे आपण समजून घ्यायला हवं.
घर घडवताना..: कासवगतीने जिंकायचं
आयुष्याच्या वेगात जगायचं राहून जातं. वेळ मिळाल्यावर हे करू, पुढे सुट्टी घेऊन ते करूम्हणताना आत्ता जे करायचं ते राहून जातं.
First published on: 29-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home sweet home