दहाएक वर्षांपूर्वी फ्लॅट सिस्टीममध्ये ‘लिव्हिंग रूम’ ही किचन आणि डायनिंग रूमपासून वेगळी असायची. पण अलीकडच्या बऱ्याच फ्लॅट सिस्टीमचं वैशिष्टय़ म्हणजे या तिन्ही रूम्सचं सलग असणं. काही फ्लॅट्समध्ये लाकडी पॅनेल्स, शोकेस या रूम्सच्या मध्ये ठेवून त्यांचं वेगळेपण जपलं जातं. परंतु याऐवजी घरात वाढणारी झाडं किंवा अ‍ॅक्वेरियम ठेवले तर निसर्गातला जिवंतपणा, चैतन्य, उत्साह तर जाणवेलच, पण झाडांचा हिरवा रंग डोळय़ांना थंडावा देईल आणि मनही सतत उल्हसित राहील. अ‍ॅक्वेरियमचा पर्याय थोडा खर्चिक आणि त्याची देखभाल रोजच्या धकाधकीच्या कामात करणं बऱ्याच गृहिणींना जमेल असं नाही. पण घरात वाढू शकणारी कुंडीतली झाडं एकदा लावली, की त्याची निगराणी राखणं सोयीचं होईल. नेहमीपेक्षा थोडी उंच वाढणारी, दाट आणि रुंद पानांच्या झाडांची निवड केली तर लिव्हिंग आणि किचन, डायनिंग रूम्सची विभागणी तर होईलच, पण त्याचबरोबर त्याचं वेगळेपण वैशिष्टय़पूर्ण राहील.
‘शेफलेरा’ म्हणजेच ‘अंब्रेला ट्री’ हे घरात कुंडीत वाढणारं झाड ‘रूम डिव्हायडर’साठी एक योग्य झाड आहे. शिवाय एकदा व्यवस्थित वाढलं, की त्याची फारशी देखभाल करावी लागत नाही. ‘शेफलेरा’चं वैशिष्टय़ म्हणजे त्यांची लांब, रुंद पानं! एकेका देठावर आठ ते दहा पानं येतात. त्यांची रचना म्हणजे छोटय़ा उघडलेल्या छत्रीसारखी दिसते. झाडाच्या खोडावर अशा प्रकारची बरीच पानं येत असल्यामुळे झाड दाट वाढल्यासारखं वाटतं. शेफलेराच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी ‘शेफलेरा अ‍ॅक्टिनोफायला’ ही जात जास्त प्रचलित आहे. त्याची पानं हिरवी, तुकतुकीत असतात, तर ‘शेफलेरा आरबोरिकोला’ या जातीतल्या पानांवर पिवळटपांढरे चट्टे असल्यामुळे या जातीच्या पानांची शोभा वेगळीच दिसते. लिव्हिंग रूमचं वेगळेपण ‘शेफलेरा गोल्ड कॅपेला’ या जातीमुळे नक्कीच जाणवेल. सोनेरी हिरव्या पानांमुळे लिव्हिंग रूमचं सौंदर्य वेगळंच भासेल. या सर्वच जातींना स्वच्छ उजेड लागतो, पण प्रखर किंवा कोवळय़ा उन्हातही याची पानं कोमेजतात. या झाडाला फारसं पाणी लागत नाही. कुंडीतली वरची माती कोरडी झाल्यावर नंतरच पुन्हा पाणी घालावं, नाहीतर अति पाणी घातलं गेलं तर झाड मुळाच्या बाजूनं कुजायला लागतं. यासाठी कुंडीतलं पाणी योग्य तऱ्हेनं बाहेर झिरपलं गेलं पाहिजे. पाणी जास्त झालं तर पानं काळी पडतात. पण पानांची टोकं गुंडाळली गेली, सुरकुतली तर झाडाला पाणी घालावं लागतं. ‘शेफलेरा अल्पाईन’ ही जात वेलासारखी ‘मॉस स्टीक’ वर वाढवता येते. याच्याही एकेका देठावर सात ते आठ पानं येतात. याच्या दोन पेरांमधलं अंतर कमी असल्यामुळे पानांचा दाट झुबका दिसतो. शेफलेराच्या सगळय़ाच जाती योग्य पाणी आणि कमी आर्द्रतेमध्ये वाढू शकतात. काही वेळेस पेराच्या भागातून छोटी मुळं फुटतात. शेफलेराची कुंडी वर्षांतून एकदा बदलली तर झाड बरेच र्वष चांगलं वाढतं. महिन्या-दोन महिन्यांतून द्रव शेणखत दिलं तर पानांची वाढ जोमानं आणि दाट होते. शेफलेरा ‘रूम डिव्हायडर’ म्हणून अगदी योग्य झाड आहे. जरी त्याची काळजी फारशी घ्यावी लागत नसली तरी कोळी आणि माईट्समुळे झाडाला इजा होऊ शकते, त्याची वाढ थांबते आणि पानं खालच्या बाजूनं काळी पडायला लागतात. त्यासाठी साबणाच्या पाण्याचा फवारा १५-२० दिवसांतून मारल्यास माईट्सचा त्रास होणार नाही. शेफलेरा जरी देखणं असलं तरी त्याच्या पानात असलेल्या कॅल्शियम ऑक्झलेटमुळे झाडाला हात लावल्यानंतर साबण लावून पाण्यानं हात स्वच्छ धुवावेत. अन्यथा त्याचा वाईट परिणाम सर्व शरीरावर आणि शरीरातल्या आतल्या भागातही होतो, एवढंच नव्हे तर फीटही येऊ शकते, असं असलं तरी शेफलेराच्या पानांच्या रचनेमुळे योग्य ती काळजी घेऊन ‘रूम डिव्हायडर’ म्हणून अवश्य लावावं.
‘फॅन पाम’ हे जपानी पंख्यासारखं आणि चुण्याचुण्यांची पानं असलेलं झाड ‘रूम डिव्हायडर’ म्हणून कुंडीत, घरात लावता येईल. पण याची पानं खूप रुंद असल्यामुळे लिव्हिंग रूम मोठी असेल तर ‘फॅन पाम’ जरूर लावावं. याची नवीन, कोवळी पानं अतिशय सुंदर दिसतात, पण जसजसा पानाचा आकार वाढत जातो तसतसं त्याचं सौंदर्य कमी होत जातं. या झाडाची वाढ अतिशय हळू होते. याची पानं खूप मोठी असल्यामुळे उंचीपेक्षा झाडाचा पसारा जास्त, पण चांगला दिसतो. पानांची टोकं काळपट तपकिरी झाली तर टोकं कापून टाकावीत, यामुळे पानांचा डौल वेगळा दिसतो, पण झाडांची वाढ थांबते. फॅन पामलासुद्धा स्वच्छ उजेड लागतो, पण प्रखर सूर्यप्रकाशात याची पानं वाळतात. पिवळी पडतात. याला पाणी भरपूर लागतं, पण कुंडीत पाणी साठलं तर झाड कुजतं आणि पाणी कमी पडलं तर झाड मरतं.
रुंद आणि दाट पानांचा शेफलेरा आणि फॅन पाम लिव्हिंग रूमची शोभा वाढवतातच, पण ‘रूम डिव्हायडर’ म्हणून ती जास्त योग्य आहेत.   

Story img Loader