नारायण धारपांच्या गूढकथांचे गारूड अजूनही मराठी वाचकांच्या मनावर आहे.  त्यांचा जन्म आणि मृत्यू ऑगस्ट महिन्यातलाच. त्यांच्या स्मरणार्थ  त्यांनी लिहिलेल्या कथेतील गूढ, भयचकित करणाऱ्या घरांविषयी..
नारायण धारप यांनी १९५१ मध्ये लेखनाला सुरुवात केली. ५० वर्षांहून अधिक काळ ते लिहीत राहिले. सुरुवातीच्या त्यांच्या भयकथा, विज्ञानकथा यांची जरी उपेक्षा झाली तरी पुढे त्यांच्या लेखनाचा असा वाचकवर्ग तयार झाला. भयकथाकार म्हणून तर त्यांनी जनमानसावर गारूड केले आहे.
कधी खंडहर तर कधी चिरेबंदी वाडे, त्यांचे पोटमाळे, तळघरं, बळदा, निसर्गातील भयप्रद स्थळे, अंधाऱ्या गुहा आणि त्यात वावरणारे ‘काहीतरी’ नकोसे! अतिप्राचीन अघोरी शक्ती, नकळतपणे वा लालसेने त्यांची केलेली उपासना, त्या दैवतांना हवा असणारा त्यांचा अंतहीन नैवेद्य! यांनी  नारायण धारप यांची कथासृष्टी गजबजलेली आहे.
नोकरी करणारे, सर्वसाधारण मध्यमवर्गीय, त्यांचा कोमट दिनक्रम, मध्यम शहरं, बस-ट्रेनचा प्रवास असं सर्व सुरळीत चालू असतानाच भीतीने चुरगाळून टाकणारे अनुभव अकल्पितपणे पुढे ठाकतात. वाचक त्यामुळे अधिकच दचकतो.
त्यांच्या ‘मध्यस्थ’ या कथेत असाच एक वाडा. त्या दिशेने पत्ता शोधत जाणारा मिलिंद आणि गावातल्या प्रत्येकाची नजर चमत्कारिक! ही शहरी माणसं शिकलेली असली तरी या बाबतीत किती ‘अनभिज्ञ’ असतात असा भाव असलेली घरं, वस्ती मागे पडते. डॉक्टरचा दवाखाना, चावडी, पिंपळाचा पारही ओलांडला जातो आणि दिसतो वाडा! भल्यामोठय़ा बंद दरवाजाला खिळे लावलेले आहेत. दार ठोकतो. आतून अडसर काढल्याचा आवाज. दार उघडतं. खालची फरशी ओबडधोबड, डावीकडे विहीर, ओसरणारा प्रकाश आणि सभोवतालची झुलणारी झाडं वातावरणात अधिकच गूढता आणणारी. दार उघडणाऱ्या जमदग्नींच्या हातात पिवळट प्रकाश ओकणारा काजळी धरलेला कंदील आणि त्यांच्यामागे त्यांची पत्नी उमा! गरोदर असावी. डोळे विस्फारलेले, त्यात व्याकूळ अगतिकता आणि र्सवकष भीती. चेहरा, देहाचे स्नायू ताणलेले. कोण आलं असेल? पण मिलिंदला पाहिल्यावर सुटकेचा श्वास! मिलिंदसारखाच आपल्यालाही विचार पडतो कसलं भय? कोणता ताण? जमदग्नी त्याला त्याची खोली दाखवतात. आठ-नऊ खणी ओसरीच्या टोकाला जिना. वरच्या मजल्यावर डावीकडे ३ व उजवीकडे ३ अशा खोल्या. सारवलेली जमीन, भिंतीला चुना, जागा रिकामी आणि स्वच्छ, खोलीच्या खिडक्या पश्चिमेला म्हणजे हवा- उजेड छान असणार, पण आता काळोख भरू लागलेला. खिडकीतून खालचा आड, तिथे ठेवलेलं पाण्याचं पिंप वगैरे दिसतं. पाणी मचूळ आहे, पण आजारातून उठलेल्या मिलिंदला फक्त शांती आणि आराम हवा आहे. म्हणून तर अशा या आडगावी मुक्काम! पण रात्री मुसमुसून तोंड बंद करून बारीक रडण्याचा सूर ऐकू येतो. ते साधं रडू नव्हतं; त्यात असहायता- विफलता होती. असह्य़ यातना, घायाळ करणाऱ्या दु:खाचं मूर्त रूप होतं. ही मनाची लसलसती जखम होती. मनपृष्ठांखाली कोणकोणत्या सुप्त इच्छा, आकांक्षा किंवा कोणते छुपे भयानक आकार वावरत असतात याची माणसाला कल्पनाही नसते. नाही.. नाही कोणालाही असं रडावं लागू नये. मग हलके हलके रहस्य उलगडू लागतं. शकूने आपल्या वडिलांना परक्या बाईबरोबर नको त्या प्रसंगात पाहणं, सख्ख्या आईने वडिलांना धडा शिकविण्यासाठी त्यांच्याच प्रेमाच्या शकूचा छळ मांडणं, तिने बंद दारावर मारलेल्या थापांकडे दुर्लक्ष करणं, तिचं बाळमुठींनी दार ठोकत राहणं, पण आईने तरीही तिला दूर ठेवणं. आईने जवळ घ्यावं म्हणून शकूचं आसुसणं, अपेक्षेने बंद दाराकडे पाहत रडणं. माडीचा उजवा भाग ओलांडून डावीकडच्या खोलीत जाणं. मागे घडलेल्या या घटनांचंच चक्र पुन:पुन्हा त्याला दिसत होतं. त्या देखाव्याने त्याच्या मनाची सालपटं निघत होती. पुढे पुढे तर ती मिलिंदला जिन्यात, तर कधी बागेत, तर कधी अंगणात दिसे. तिथे मात्र ती सुखात असावी असं वाटे. एरवी यातनांचं वैराण वाळवंट. सरतेशेवटी शकूचा पिंपात बुडून मृत्यू. पण या गेलेल्या जिवाला आस लागून राहिली आहे. मृत्यूनंतरही तो चिमुकला जीव ती पूर्ण करण्याच्या आकांताने प्रयत्न करतो आहे आणि मिलिंदमुळेच या जिवाची छळातून मुक्तता झाली आहे. उमा-जमदग्नीही ताणातून मोकळे होतात.
राहत्या नांदत्या वास्तूमध्येही काय काय दडलेले असतं! कसकसल्या भावनांचे उद्रेक होत असतात. पण ही वास्तू मात्र नांदती तर नाहीच; मोडक्या-तोडक्या भिंती, कोणे काळी इथे घर असावं, अशी शंका येणारी भग्न वास्तू! पण इथेही साधारण असाच प्रसंग. एक लहान, ८/१० वर्षांचा मुलगा व्याकूळपणे साद घालताना अनेकांना दिसतो. ‘दार उघड ना गं आई’ या शब्दांतून त्याची अतृप्त आशा, युगानुयुगांची तृष्णा आणि जहरी प्रतीक्षा जाणवते. वर्षांमागून वर्षे आणि मग एका वेगळ्याच काळातल्या आईने साऱ्या दुनियेचे प्रेम एकवटून त्याला पोटाशी घेतल्यावर त्याचं सांत्वन होतं. पुढे कोणालाही ना ते शब्द ऐकू येत, ना तो मुलगा दिसत.
कधी एखाद्याच्या मनाचा तोल घालविण्यासाठी वास्तूचा एकच भागही पुरेसा ठरतो. ‘दरवाजे’ या कथेतले प्रा. देशमुख थोडे एकलकोंडे, एरवी प्रकृतीने उत्तम. त्यांना महाडिक नावाच्या तरुण प्राध्यापकांची छान सोबत लाभते. त्यांच्यात एक सकारात्मक बदल होऊ लागतो. ते थोडे हसू-बोलू लागतात. बुद्धिबळाच्या खेळात त्याला मातही देतात, पण कुठलाही दरवाजा उघडला की अचानक जे एखाद्या जीवघेण्या प्रसंगात सापडतात. ‘दरवाजा’ म्हणजे जणू त्यांच्या मनाचीही कवाडं उघडण्याचा संकेत आहे. ही क्रिया एखाद्या ट्रिगरसारखी काम करीत असावी. कुठल्या तरी अप्रिय घटनेशी दरवाजा उघडणं निगडित असावं. ते कधी पुराच्या पाण्यात सापडतात, कधी अंगावर चाल करून येणाऱ्या माणसांच्या झुंडीत. पण जो जो अनुभव येतो तो प्रखर-अगदी खऱ्यासारखा. पाण्याचा ओलावा जाणवणं, स्पर्श कळणं, झुंडीचा कोलाहल कानात भरून राहणं, झुंडीच्या अंगाचा म्हणून येणारा दर्प जाणवणं, भीतीने सारं शरीर वादळात सापडलेल्या रोपाप्रमाणे हेलपाटून जाणं, त्यांची भीती, थरकापणं, तीव्रपणे पोहोचत राहतं. ते जाणीव-नेणिवेच्या पिंजऱ्यात कोंडले गेले आहेत. जे दार उघडलं की सुखद आसरा मिळावा, जे दार उघडलं की बाहेरचं जग खुलं व्हावं, तेच दार त्यांच्यासाठी संकटाचं आमंत्रण ठरतं.
आता ही आणखी एक वास्तू अगदी नवी कोरी! देखणा बंगला, हिरवीगार बाग, छानदार कुंपण, चारचाकी वाहन आरामात जाईल असे फाटक. बंगल्याला कोरेपणाचा, रंगाचा, सिमेंटचा रेंगाळणारा गंध, दणक्यात केलेली वास्तुशांत. खोली-खोलीतून केलेल्या आधुनिक सोयी आणि आलेल्या मंडळींना त्या दाखवण्यात आनंद मानणारे रंगराव, त्यांची पत्नी आणि मुलगी चंदा! खाण्यापिण्याची रेलचेल. नातलगांना वाटणाऱ्या आनंदात थोडी असूयेची मिसळलेली छटा. सेवेला नोकरचाकर, आनंदाला उधाण आलेलं. पण तरीही हळूहळू चंदाची तब्येत का खालावतेय? तिला दु:स्वप्नं का पडतात? मुळात ती आनंदी. आणि आनंदी राहण्याचा प्रयत्नही करतेय. पण का अशी उदासी तिला घेरून टाकते? रंगरावांची ती जगात सर्वाधिक लाडकी. सगळं घरच उदासवाणं होतं. तिच्या स्वप्नात बंगला यायचा, पण उदास, काळवंडलेला. कधी तिला बंगला दिसायचा, तो वरून खाली पाहतो आहोत असा आपण उंच झोक्यावर बसलोत आणि खोली खाली आहे. स्वयंपाक खोली, शयनगृह ओळखीचं वाटायचं. पण कधी त्याला ओटा नसायचा किंवा खिडक्या रिकाम्या डोळ्यांच्या खोबणींनी आपल्याकडे पाहताहेत असं वाटायचं, भिंतींना फक्त लाल विटा, जमीन फरशाविरहित. सगळं काम अर्धवट असलेलं. ही स्वप्नं ऐकून रंगरावाला त्यांचा संदर्भ लगेच लागला. देशपांडय़ांचंच अस्तित्व आपल्या मुलीला त्रास देत असणार हे त्यांनी ओळखलं. या नव्या वास्तूलाही इतिहास होता तो जीवघेणा. मध्यमवर्गीय, कायम ओढग्रस्त असणारे देशपांडे रंगरावांच्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. त्यांना निवृत्तीनंतर घर बांधायचे आहे. थोडा जास्त खर्च झाला तर ‘प्रॉव्हिडंट फंड, पॉलिसीचा आधार घेऊ’ असा विचार केला आहे, पण सगळेच अंदाज चुकतात. पाया खूप खोल घ्यावा लागतो. प्लॅन पास होणं, कनेक्शन मिळणं, सिमेंट गायब होणं अशा अडचणींची मालिकाच लागली. पैशाचे गणित पार कोसळले. उधारीवर रंगराव कॉन्ट्रॅक्टर काम करीना. काम ठप्प झालं. वास्तू अर्धवट पडून राहिली. करारातल्या कलमांचा आधार घेऊन रंगरावाने ताबा घेतला. कोर्ट-कचेरीसाठी देशपांडय़ांकडे पैसा नव्हताच. मग प्लॅस्टर नसलेल्या बेडरूममध्ये छताच्या लोखंडी हुकला दोरी लावून ज्या वास्तूत निवृत्तीनंतर निवांत राहायचं, त्याच वास्तूत त्यांनी जीवन संपवून टाकलं. त्यांचं झुलणारं प्रेत रंगरावांना आताही झुलत आहे असं वाटत होतं. झालेल्या खर्चाचे पैसे १० हप्त्यांत द्यायचं मान्य करूनही आपण २-३च हप्ते दिले. नंतर सोयीस्करपणे ते विसरलो.
अपुऱ्या इच्छा, भंगलेली स्वप्ने, चक्काचूर आशांचं शेवटचं विश्रांती स्थान आहे. सागरासारख्या मनाचा तळ! सर्व काही वरून खाली अविरतपणे येत असतं. माणूस या उत्पन्न झालेल्या कशाचाही नाश करू शकत नाही. निराशा, अपमान, लोभ, हेवा कशाचाही. ते खाली अंधारात साठतात. त्याचं रूप बदलतं. विलक्षण दाबाखाली ते विकृत होतात, सडतात, कुजतात, असा हा विकृत कल्पनांचा, राक्षसी महत्त्वाकांक्षेचा अर्क खाली साचतो. कणाकणाने, वर्षांमागून वर्षे हा गाळ साचत जातो. माणसाला वाटतं तो अमुक एक गोष्ट विसरला. पण तसं नाही होत आणि भूकंप-ज्वालामुखीमुळे जसा गाळ वर येतो तसाच एखाद्या गोष्टीमुळे हा अर्क अचानक पृष्ठावर येतो. कधी जिवंतपणी कधी मरणानंतरही.’
रंगरावांच्या भयाने वेडय़ा झालेल्या मेंदूत शेवटी सत्याचा प्रखर झोत शिरला. देशपांडय़ांच्या सर्वनाशाचं कारण असणारा रंगरावच जर त्या वास्तूत ऐषारामाने राहतो, तर त्यांचा आत्मा तळमळणारच. विकृत चेहऱ्याचे जीभ बाहेर आलेले देशपांडय़ांचे हे अस्तित्व स्वत:ची इच्छा पूर्ण करत होते. मरणानंतरही!
अशा या वेगळ्याच विश्वातल्या श्वास रोधून धरायला लावणाऱ्या कथा! वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता, कार्यकारणभावाची भक्कम शृखंला असल्यामुळे त्या सहज पटतात. व्यक्तिरेखांची जडणघडण, त्यांची मानसिकता, त्यांच्यातले ताण-तणाव, त्यांचे सत्त्व यांची मांडणीही बंदिस्त असते. त्यामुळे ‘कथा’ म्हणूनही त्यांचं मोल असतं. दृश्यचित्रात्मक प्रसंग उभे करतातच. पण गंध, नाद, वेग आणि स्पर्शाच्या अतितरल संवेदनेपासून अतितीव्रतेची खोल जाणीव ते घडवतात. ‘साध्या २-४ घडय़ांनी कागदात हवा कापण्याची शक्ती येते’ ‘सरकत्या गाठीने दोरीत गळ्याला फास लागण्याची शक्ती येते.’ ‘घडय़ा सरळ केल्या, गाठ उलगडली, स्प्रिंगच्या वेटोळ्या नाहीशा केल्या की कागद, दोरी, तार यांचे आकार निरुपद्रवी होतात.’
अशा विज्ञानावर आधारित, रोजच्या व्यवहारातील दृष्टान्त देत वीट वीट रचत तसूतसूने कथा-वास्तूची चिरेबंदी घडण ते करतात. साधना-उपासनांनी, मानवी शरीराचे सामथ्र्य अनेक पटींनी वाढवलेले ‘समर्थ’, ‘गोसावी’, ‘भगत’, ‘महाराज’ हे सैनिक अमंगलाला अशुभाला निष्प्रभ करायला उभे ठाकलेले असतात आणि सहसा मांगल्याचाच विजय होतो.(पूर्वार्ध )

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा