विश्वासराव सकपाळ
क्लटर मॅनेजमेंट किंवा घर अडगळमुक्ती करणे हा कळीचा मुद्दा आहे. या बाबतीत अनेकदा नंतर करू म्हणून चालढकल केली जाते. बहुतांश घरात अजिबात उपयोगी न पडणाऱ्या व अडगळ ठरलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू व सामानाचा भरपूर साठा असतो.
घरातील अडगळ म्हणजे हौसेखातर जमा केलेल्या व प्रचलित काळातील उपयुक्त असणाऱ्या विविध वस्तू व पुढे-मागे उपयोगी ठरतील म्हणून खरेदी केलेल्या परंतु न वापरता तशाच ठेवलेल्या वस्तू. कुठली अडगळ हवी याचे भान मात्र त्या त्या घरांतील लोकांना असणे तितकेच महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे ‘अडगळ’ हा शब्द नको असलेल्या वस्तूंसाठी वापरतात. नवनवीन वस्तू जमा करणे हा मुळातच मानवी स्वभाव आहे. घर सजावटीच्या आवडीखातर आपण किती तरी वस्तू / सामान खरेदी करतो. शिवाय घरात जितकी माणसं तेवढी त्यांची आवड निवड वेगळी. त्यामुळे हल्ली बऱ्याच घरांमध्ये गरजेच्या नावाखाली विविध प्रकारच्या अँटिक वस्तू, शोभेच्या वस्तू, मूर्ती, आकर्षक तसबिरी, कृत्रिम फुलांच्या वेली, झाडे, फर्निचर इत्यादी. कालांतराने या सर्व हौसेने विकत घेतलेल्या वस्तू ‘भंगार’ ठरतात आणि त्या वस्तूंची / सामानाची रवानगी अडगळीच्या खोलीत, माळय़ावर किंवा हल्लीच्या इमारतीत ड्राय-एरियात होते.
(ब) अडगळीच्या वस्तूंची / सामानाची खोलीनिहाय यादी :—
(१) बैठकीची खोली- शोभेच्या वस्तू, फ्लॉवर पॉट्स, जुने टी. व्ही. रिमोट्स, इअर फोन्स, विविध मासिके, वृत्तपत्रे, जुन्या चप्पल्स, बूट्स, लाइट व दूरध्वनी देयके, गृहनिर्माण संस्थेची मासिक देयके व सूचना / परिपत्रके, जुने बॉल पेन्स.
(२) स्वयंपाकघर – रिकामे तेलाचे डबे / बाटल्या, बरण्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या व कान तुटलेले कप्स, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू, जुनी / दबलेली भांडी, इत्यादी.
(३) शयनगृह- कालबा सौन्दर्यप्रसाधने, औषधाच्या रिकाम्या बाटल्या / खोके, जुने कपडे, जुनी पुस्तके, फाइल्स, संगणकाचे सुटे भाग, हेड फोन्स, कॅसेट्स, सी.डी. प्लेअर, इत्यादी.
(४) शौचालय / न्हाणीघर- जुनी / फाटकी पायपुसणी, जुने दात घासायचे ब्रश, साफसफाईकरिता लागणारे ब्रश, रिकाम्या फिनाईल, डेटॉल, हार्पिक व लायझॉलच्या बाटल्या.
(क) अन्य अडगळीच्या वस्तू / सामानाची यादी- बंद पडलेल्या / खराब अथवा नादुरुस्त झालेल्या वस्तू-उदाहरणार्थ बंद पडलेले घडय़ाळ, इलेक्ट्रिक उपकरणे व त्यांचे सुटे भाग, प्लॅस्टिकच्या वस्तू, खुर्च्या व खेळणी, देवदेवतांचे खंडित / खराब झालेले फोटो किंवा मूर्ती, काच, आरसा, जुने फोटो, फर्निचर, पलंग, जुन्या पर्सेस, जुने कपडे, जुनी पत्रे व पत्र व्यवहाराच्या फाइल्स आणि कागदपत्रांच्या अनावश्यक छायांकित प्रती.
क्लटर मॅनेजमेंट किंवा घर अडगळमुक्ती करणे हा कळीचा मुद्दा आहे. या बाबतीत अनेकदा नंतर करू म्हणून चालढकल केली जाते. बहुतांश घरात अजिबात उपयोगी न पडणाऱ्या व अडगळ ठरलेल्या अनेक प्रकारच्या वस्तू व सामानाचा भरपूर साठा असतो. परंतु त्यावरून घरातील जेष्ठ लोकांशी तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या समाधानास्तव सदरहू वस्तू ठेवल्या जातात. आयुष्यभर अपार कष्ट व मेहनत करून संसार उभा केलेल्या लोकांना या सर्व वस्तू / सामान भंगारात देणे कसे सहन होईल. त्यांच्यासाठी ही अडगळ नसून त्यांनी काडी काडी जमवून केलेल्या संसारातील भावनिक आठवणींचा व अडचणींचा एक अविभाज्य भाग असतो; आणि त्यासाठीच त्या अडगळीतल्या वस्तूत व सामानात त्यांचा जीव गुंतलेला असतो. बरेचदा लोक ऐन दिवाळी व दसऱ्यासारख्या सणांच्या व लग्न समारंभ आदी कौटुंबिक सोहळय़ाच्या आधी आपल्या घराची साफसफाई व रंगकाम करून घेतात. हे करत असताना घराची साफसफाई निश्चित होते. परंतु घरातील अडगळ एका ठिकाणाहून न दिसेल अशा दुसऱ्या ठिकाणी ठेवली जाते, त्यामुळे विशेष फरक पडत नाही. या उलट एखादी व्यक्ती घरातील अडगळीची विल्हेवाट लावू म्हणून थांबत नाही तर ती व्यक्ती त्वरित जवळपास असलेल्या भंगार विक्रेत्याला प्रत्यक्ष बोलावून सर्व प्रकारची अडगळ त्याला विकून टाकते. अशा वेळी भंगारवाला त्या अडगळीतील वस्तूंचे / सामानाचे किती मोल देईल याला महत्त्व न देता घर अडगळमुक्त झाले यातच समाधान मानते. त्यामुळे घरात अधिक जागा मोकळी होते. भरपूर सूर्यप्रकाश व मोकळी हवा मिळते. आपण आपले घर जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून गरजेची वस्तू घ्या, वस्तूची गरज निर्माण करू नका. vish26rao@yahoo.co.in