व्यंकटेश माडगूळकरांच्या बाबतीत असं आहे की, ते कल्पित आणि वास्तव यांची सरमिसळ करतात. वास्तवाचा भक्कम पाया आणि सदृश व्यक्तींची उभारणी. मग कधी विमलाची कमला होते. आणि माधववाडीतील खोली ‘चित्रकथी’मध्ये आणि ‘लेखकाचा प्रवास’ या आत्मचरित्रात्मक लेखनात आढळते. ‘मुंगीचे महाभारत’ या गंगाधर गाडगीळांच्या आत्मचरित्रात तिला वास्तविक रूप लाभते. हा असा अद्भुत गोफ ते विणतात आणि आपण जेव्हा त्यांचे इतरही लेखन वाचतो तेव्हा ही वीण कळायला लागते. ही सीमारेषा धूसर आहे. तळ्यात-मळ्यातप्रमाणे कधी पाय पलीकडच्या प्रदेशात जातो, तर कधी अलीकडच्या.
लग्नाची गुप्त गोष्ट उघड होताच मामा गावी गेले आणि या दोघांनी त्या उजाड खोलीत संसार थाटला. त्यांच्या त्या अजस्र चाळीला वारूळ म्हटलंय. सकाळी बाहेर पडणारे कामकरी म्हणजे वाळवीची रांग आणि गलेलठ्ठ राणी म्हणजे चाळीचा भय्या! जवळ पैसे नाहीत म्हटलं तरी अगदी आवश्यक गोष्टी आणाव्याच लागणार होत्या. झाडू, माठ, रेशन, कोळसे इ. लेखक मग साप्ताहिकाकडून उसने पैसे आणून बसायला सतरंजी आणि वही, पेन्सिल आणतात. आणि अशा या खोलीत बैठक मारून कथा लिहून ते पसे फेडतातही. या चाळीचा जिना कधीही रिकामा नसे. सतत रहदारी, त्यातच काही गुंडाळलेली अंथरूणं, तर कधी वेगवेगळ्या पाळ्या करून आलेली झोपलेली माणसं, त्यांच्या पथाऱ्या! सतत दरवळणारे कसले कसले दर्प. शौचालयाच्या फुटलेल्या टाक्या, चोरून लावलेल्या दारूच्या भट्टय़ा, तुंबलेली घाण, एकुलती एक खिडकी, पण तिच्यातून समोरच्या इमारतीची रंग उडालेली भिंतच दिसणार. त्याच खिडकीतून सर्वानी खाली टाकलेला कचरा. त्यामुळे दोन बिल्िंडगच्या मधल्या चिंचोळ्या जागेचं गटारात रूपांतर. खरकटी भांडी, शिळं अन्न, तळणाचे वास अशा सगळ्या माहोलात कलावंताचा आत्मा कोमेजणारच, पण यांचा कोमेजलेला दिसत नाही. ते तिथेही लिहितात.
चाळीतल्या त्या बकाल खोलीला विमलाबाईंनी घरपण प्राप्त करून दिलं होतं. शिक्षण नाही, पैसा नाही, नोकरी नाही, जागेचा डळमळीतपणा, खंद्या वीराप्रमाणे सदैव पाठीशी उभ्या राहणाऱ्या भावाला हे लग्न मंजूर नसल्यामुळे त्याने काढून घेतलेला आधार. पण रेशनिंगमधली तात्पुरती नोकरी करून घरी आलं की प्रसन्न, हसतमुख चेहऱ्यानं व्यंकटेश आणि त्यांच्या मित्रांना चहापाणी देणं, त्यामुळे त्यांच्या घरी येणाऱ्या सर्वच लेखक मंडळींना त्यांच्याबद्दल आंतरिक जिव्हाळा वाटे. शिवाय ज्या मध्यमवर्गीय लेखकांना खूप अडचणी होत्या त्यांना आपली परिस्थिती यापेक्षा चांगली आहे असं वाटायला लागलं. इथे सदानंद रेगे, गंगाधर गाडगीळ गप्पा करायला येत.
श्री. पु. भागवत आदी अनेक मंडळी त्यांच्या संसाराची घडी नीट बसवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मन:पूर्वक प्रयत्न करतात, ही विशेष गोष्ट कळते. पहिला पगार होताच विमलाबाई सर्वप्रथम लाकडी खुर्ची आणि १।। ७ २।। चं टेबल ही मोठी खरेदी करतात १५ रुपयांत.
त्यानंतर पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या ‘मोहन तारा’ मधल्या २।। खोल्या म्हणजे चैनच! तिथे खिडकीजवळ बसून ‘वावटळ’, ‘बनगरवाडी’ लिहिली गेली. इथे खिडकीतून आंब्याची झाडं, हिरवळ, हनुमान टेकडीचं दृष्य म्हणजे नयनसुख! इथलं मित्रमंडळ म्हणजे ग. रा. कामत, स. शि. भावे, शरदचंद्र चिरमुले. पुढे पुणे-मुंबई रोडवरही अडीच खोल्या असल्या तरी चांगल्या ऐसपैस होत्या. एकीकडे रेल्वेलाइन पण पलीकडे शेतकी कॉलेजचा मोकळा विस्तार! त्यांनी सतराव्या वर्षी लिहायला सुरुवात केली ‘देवा सटवा महार’ माडगूळच्या घरी जमिनीवर कागद ठेवून अवतरला तर काही ‘माणदेशी माणसं’ माधववाडीच्या खोलीत सतरंजीवर आली. आणि आता ‘तू वेडा कुंभार’, ‘सकाळची पाहुणी’, ‘जांभळाचे दिवस’ स्फुरायला लागले.
ही सर्व घरं जशी आली तशी स्वीकारली. त्यात आवडी-निवडीपेक्षा सोय महत्त्वाची होती. पण ‘पुढचं पाऊल’साठी ज्या दोन कथा घेतल्या त्यापोटी प्रथमच चार आकडी रकमेचा चेक मिळाला. आणि ‘पुस्तकं घ्यावी भरपूर -अगदी छताला टेकेपर्यंत’ असा विचार आला. पण बायकोच्या व्यवहार ज्ञानानं शेवटी कुरघोडी केली, ‘आपण जमिनीचा तुकडा घेऊन तर ठेवू नंतर जमेल तसं घर बांधू’ ह्य़ा घरात मात्र मनातल्या कल्पनांना पूर्ण स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला गेला.
मग पक्षी जसा विचार करतील तसा केला. शांत जागा जवळपास मोठमोठय़ा वृक्षांचं रान, जवळ भरपूर वाहतं पाणी हवंच, सकाळचं ऊन आणि चंद्रप्रकाशही हवा. मनासारखी फळझाडं, फुलझाडं लावता यावीत. तसाच मनासारखा प्लॉट मिळाला. तिथे जाऊन नुसतं बसता बसता खूप कल्पना केल्या. ‘वृक्षवल्लींचा शेजार, नीरव शांतता, वाहत्या पाण्याचा गारवा, फुलांचे गंध आणि ‘मी’ चित्र काढतोय, लिहितोय..’ असं घर बांधायचं तर ‘माधव आचवल’ या कवीमनाच्या आर्किटेक्टशिवाय कुणाचं नाव सुचणार? घर चौसोपी वाडय़ासारखं प्रशस्त हवं, मुलांना गुप्त जागा असावी म्हणून माळा हवा, अंगण-परसू तर हवंच. कोठीची खोली, देवघर, तुळशी-वृंदावन हेही हवंच. पण नटसम्राटमधल्या बेलवलकरांना ‘थिएटर’ हवं तसं लेखकालाही घरापासून वेगळं होता येईल अशी माझी म्हणून एक खोली हवी आहे.
दोन कलावंतांच्या कल्पनेतून घर उभं राहू लागलं. पण त्या कल्पनांना बंध होते पैशाचे आणि बांधकाम करणाऱ्या व्यवहारचतुर कुलकण्र्याचा! त्यामुळे मध्येच घर बघायला आलेल्या आचवलांना भिंतीची रुंदी बघून ‘शनिवार वाडा’ आठवला. कुलकर्णी म्हणाले, की पुढे मुलाबाळांना मजला चढवावासा वाटला तर..
आणि आचवलांना वाटत होतं की, ‘आपण आपल्या आयुष्याचा विचार करावा, आपल्या कल्पनांनी बनवलेलं घर मुलांनीही गोड मानलंच पाहिजे असं नाही. ते नवं घर बांधतील.’ असे वेगळे विचार असले तरी हिरव्यागार रानाच्या पाश्र्वभूमीवरचं ते टुमदार घर आगळंवेगळं उठून दिसे. तशा मधेमधे अडचणीही आल्या. पैशामुळे बांधकाम बंद पडलं तेव्हा व्यंकटेश माडगूळकरांनी पुस्तकाचे हक्क देऊ केले पण ‘तुमच्या अडचणीच्या वेळी असे हक्क घेणे नैतिकृष्टय़ा योग्य वाटत नाही. तुमची गरज सांगा मी पाहतो.’ असे म्हणून विष्णुपंत भागवतांनी रॉयल्टीपोटी रक्कम दिली तर अनंतराव कुलकर्णीनींही रॉयल्टीपोटी भरघोस रक्कम आगाऊ देऊन काम सुरू करण्याची प्रेरणा दिली. आणि ‘लिखाणावर वर्षभरात पैसे फेडशील, सुरुवात तर कर’ असं म्हटलं आणि हे घर उभं राह्य़लं अशा सुंदर भावबंधांवर.
‘मराठी लेखकाचं इतकं सुंदर घर मी पहिल्यांदाच पाहतोय.’ ही खास टिप्पणी होती एन. एस. डी.च्या अल्काझींची. वहाता अवकाश, घरातही ऊन, वारा, पाऊस आला पाहिजे. वातावरण आपला भाग, आपण वातावरणाचा भाग असलं पाहिजे. या आचवलांच्या म्हणण्याचा अर्थ अल्काझींना छानच कळला होता.
चित्र रंगवायला मनमोकळा प्रकाश हवा म्हणून तिन्ही बाजूला प्रशस्त खिडक्या, त्यामुळे उजळलेले कोपरे हवेत, हवा खेळकर वारा सदैवच. विविध पाखरांची किलबील, चाफा, प्राजक्त, आंबा, रामफळ अशा झाडांची गच्च दाटी खिडकीतून दिसायला हवी, आतमध्ये भिंतभर लाकडी शेल्फमधून देशोदेशीचे लेखक आणि विषय गुण्यागोविंदाने नांदताहेत या सर्व कल्पना प्रत्यक्षात आल्या. शिवाय शिसवी टेबलावर नक्षीदार जाडजूड तांब्याचं उभं फुलपात्र त्यात लेखण्या वगैरे, सोनेरी टोपणाचं वजनदार पेन, एक लायब्ररी ट्रे अशी ही लेखकाची खोली कधी स्टुडिओचं रूप धारण करते. मग तिथे कॅनव्हास बोर्ड लागतो, खोली टर्पेटाइनच्या वासानं दरवळू लागते आणि जिवलग मित्र जमले की याच खोलीत मैफल जमते. अशा या घराचं नाव ‘अक्षर’ ठेवलं. अक्षरांवर वास्तू उभी राहिली म्हणून. घर १९६२ मध्ये बांधलं गेलं. आचवलांचा खर्चाचा
अंदाज २४ हजार होता तो ५२ हजार झाला. पण वास्तूच्या उभारणीला जसे हे दोन खंदे कलावंत होते तसेच याची वास्तुशांती गदिमा आणि विद्यावहिनींच्या हातून झाली. इथेच जयदेवचा जन्म झाला आणि ज्ञानदाचा विवाह समारंभही! या विवाहानिमित्त चित्रपट, नाटय़, आकाशवाणी, लेखन या क्षेत्रातली नामवंत मंडळी आलीच. पण साहित्य संमेलनाचे ५ अध्यक्षही यावेळी उपस्थित होते. अण्णांनी पंचक्रोशी ओलांडली नसती तर आपण सर्वच भावंडं प्राथमिक, शिक्षक, पोष्टमन, किराणा दुकानदार यापैकी काही झालो असतो. पण त्यांच्यामुळेच हे सुदैव आपल्याला लाभले याची त्यांना मनोमन जाणीव आहे.
आता आजूबाजूचा परिसर बदलला, रिकाम्या जागेवर भराभरा घरं उभी राहिली. अनेक वृक्ष तोडले गेले. टुमदार घरं जाऊन टॉवर्स उभे राहिले. पायवाटा मोठय़ा रस्त्यांमध्ये बदलल्या. रहदारी इतकी वाढली की घरातल्या लोकांचे आवाज उंचावले. दाराशीच विद्यापीठ, मंडईला जाणाऱ्या बसचा स्टॉप आला. त्यांची गजबज, ठरावीक प्रश्नोत्तरांचा जाच सुरू झाला.
पंचवीस वर्षांमागं याच ठिकाणी मित्रमंडळींनी यावं म्हणून त्यांनी त्यांची विनवणी केली होती. पण शहर सोडून कुठे रानावनात जायचं म्हणून सर्वानीच नकार दिला होता. पण आता शहरानेच तिथे ठिय्या मांडलाय. आता घर अगदी वस्तीच्या ऐन मध्यावर आलंय.
लेखकाला तर रानाची हाक ऐकू येते. म्हणून मग पुण्यापासून १२ कि. मीटरवर टेकडीच्या पायथ्याशी पुन: एक एकर जमीन घेतली जून १९८३ मध्ये, जरा महागच. पण त्यांच्या मनातच भरली. पाण्याचा वाहता पाट असणारी, वस्त्राला काठ असावेत तशी बांधावर डेरेदार आंब्याची झाडं, पेरूराया, डािळब, सीताफळ, पपई, शेवगा, जांभूळ अशा झाडांनी हिरवीकंच झालेली जमीन, निवाऱ्याला छोटीशी झोपडी. ही झाडी वाढवावी, शेतात काम करावं. आता दोघा पती-पत्नींना पुन: वाटतं छान छोटय़ाशा दोनच खोल्या बांधाव्यात आणि सर्व जबाबदाऱ्या संपल्या की इथेच रहावं. शांत! निवांत! अजूनतरी इथे शहर आलं नाही, रान रानच आहे. ल्ल
ेील्लंॠ४१्नं१1945@ॠें्र’.ूे
संदर्भ : ‘चित्रकथी’ ‘कोवळे दिवस’, प्रवास एका लेखकाचा
‘गावाकडच्या गोष्टी’
रानातलं घर
याला घर म्हणायचं का? खरं तर नाहीच! कोल्हापुरातील नदीच्या काठची पुराण्या वस्तीतली एक लांबलचक अडगळीची खोली. सोफ्यालाच आडोसा करून अध्र्या भागाची केलेली. पण इथे एक कलावंत घडत होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-08-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House in forest