हे घर कौलारू होते. घराच्या आत शिरताच शांत व थंड वाटले. पहिली मोठीच्या मोठी ओसरी होती. तेथे झोपाळा होता. आजूबाजूला बसायला बऱ्याच लाकडी खुर्च्या मांडलेल्या होत्या. आम्हा २० जणांना तिथे सहज बसायला मिळाले. काही जणांनी झोपाळ्याचाही आनंद घेतला. ओसरीनंतर माजघर होते. येथे घरातील कार्यक्रम होतात. गणपती बसवला जातो. माजघर चांगले मोठे होते. त्याच्या एका बाजूला प्रशस्त किचन होते. भला मोठा ओटा होता. माजघरातून आत गेल्यावर, एका खोलीत एक मोठी चूल होती. त्यावर भला मोठा हंडा होता. त्याचा वापर पूर्वी पाणी तापवण्यासाठी करायचे. आता सोलरचा उपयोग केला जातो. हे घर १०० वर्षांपूर्वी बांधले आहे,

म्ही मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील सेवानिवृत्त झालेल्या सहकाऱ्यांनी एकमेकांच्या अधूनमधून भेटीगाठी व्हाव्यात यासाठी ‘आनंदयात्री’ हा ग्रुप स्थापन केला. त्यासाठी साधारण दर एक ते दोन महिन्यांनी आम्ही या ग्रुपची पिकनिक आयोजित करतो, त्यानिमित्ताने सर्वांची भेट होते.

अशीच आमच्या ग्रुपची पिकनिक कोकणात गेली होती. कोकणात कणकवलीला एका मैत्रिणीचे घर बघितले व वायरीला दुसऱ्या मैत्रिणीकडे पाच दिवस राहिलो. मधल्या कालावधीत आणखी एका सहकाऱ्याचे घर बघितले. तिन्ही घरे अतिशय सुंदर होती. एक दिवस आम्ही त्याच कणकवलीच्या मैत्रिणीच्या आग्रहास्तव कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोंदा येथील त्यांचे मूळ घर बघायला गेलो.

गावातील वेतोबा आणि सातेरी देवीचे दर्शन करून आम्ही तिच्या घरी गेलो. घरासमोर आल्यावरच, कवी अनिल भारती यांचे ‘आज अचानक एकाएकी, मानस लागे तेथे विहरू, खेड्यामधले घर कौलारू’ हे गाणे मनात रुंजी घालायला लागले. घर कौलारू होते. घराच्या आत शिरताच शांत व थंड वाटले. पहिली मोठीच्या मोठी ओसरी होती. तेथे झोपाळा होता. आजूबाजूला बसायला बऱ्याच लाकडी खुर्च्या मांडलेल्या होत्या. आम्हा २० जणांना तिथे सहज बसायला मिळाले. काही जणांनी झोपाळ्याचाही आनंद घेतला. ओसरीनंतर माजघर होते. येथे घरातील कार्यक्रम होतात. गणपती बसवला जातो. माजघर चांगले मोठे होते. त्याच्या एका बाजूला प्रशस्त किचन होते. भला मोठा ओटा होता. माजघराच्या डाव्या बाजूला तीन खोल्या होत्या. त्यात बेडरूम व दोन खोल्या तसेच माजघराच्या उजव्या बाजूला तीन खोल्या होत्या. तेथील दाराला सुंदर तोरण लावले होते. तेथेही बेडरूम व दोन खोल्या होत्या. ओसरीच्या उजव्या बाजूला दोन टॉयलेट व बाथरूम होते. माजघरातून आत गेल्यावर, एका खोलीत एक मोठी चूल होती. त्यावर भला मोठा हंडा होता. त्याचा वापर पूर्वी पाणी तापवण्यासाठी करायचे. आता सोलरचा उपयोग केला जातो. हे घर १०० वर्षांपूर्वी बांधले आहे, असे सांगण्यात आले. घराचे मोठे मोठे ताशीव खांब व वासे हे सागाच्या लाकडाचे असल्यामुळे घराला अजूनही मजबुती व टिकाऊपणा आहे.

त्यानंतर आम्ही घराच्या आजूबाजूचा परिसर पाहायला जवळजवळ धावतच निघालो. घराच्या मागे मोठी वाडी होती. नारळाची झाडेच झाडे होती. फिरताना सगळीकडे भरपूर नारळ पडलेले दिसले. झाडांवर माकडे होती. मध्येच नारळ सोलण्याचे यंत्र ठेवलेले होते. बरेच चालल्यानंतर आम्हाला मासेमारीसाठी दोन फिशपॉण्ड तयार केलेले दिसले. जवळच्या खाडीतून पंपाने पाणी आणून ते तयार केलेले आहेत. आणि नंतर दिसली ती लांबच्या लांब शेती. त्यामध्ये मका, भुईमूग, मिरी, वालीच्या शेंगा, मिरच्या, सुरण इत्यादी सगळ्या प्रकारची पिके दिसली. वाडीत आंब्याची, चिकूची, जांभळाची झाडे फळांनी भरलेली होती. फळे मोठी होती. पेरूचे व फणसाचे झाड दिसले. एका सहकाऱ्याने मग झाडावर चढून चिकू काढले. झाडे असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षीही होते. कोकिळेचा गोड ओरडण्याचा आवाज सारखा येत होता. ही सर्व निसर्गाची संपत्ती पाहून आम्ही दमूनभागून घरात आलो. मग आम्हाला सर्वांना शहाळ्याचे गोड पाणी देऊन तृप्त करण्यात आले. शहाळ्याचे मऊसूत कोवळे खोबरेही खायला मिळाले. छान पिकलेली जांभळे वाटण्यात आली. घरात एका बाजूला, एका भल्या मोठ्या भांडयात नारळाचे भरपूर तेल काढून ठेवलेले होते. ते खराब होऊ नये म्हणून त्यात गुळाची ढेप ठेवली होती. मग काय सर्वांनी रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये नारळाचे शुद्ध तेल घरी न्यायला घेतले. थोड्या वेळाने चहा करण्यात आला. जेवायलाच यायचे होते असे आग्रहाने सांगण्यात आले. सगळ्यांचे प्रेमाने आदरातिथ्य करण्यात आले. कोकणी माणसांचा तो स्वभावच असतो.

घरातून निघताना कोणाचाच पाय निघत नव्हता. मैत्रिणीच्या आमंत्रणावरून, परत येऊ तेव्हा राहायलाच येऊ, असे सर्वांनी तिला सांगितले. मी घराचे नाव काय आहे हे बघायला मान वरती केली असे कळल्यावर, इथे बऱ्याच घरांना नाव नसते, घर आडनावावरून ओळखले जाते, असे मला मिस्टरांनी सांगितले. अशा आरोंद्यातील माझ्या मैत्रिणीच्या, संध्या परबच्या सुंदर घरातून आम्ही निघालो तेव्हा प्रेमाची आठवण म्हणून दिलेल्या आंबे, चिकू, मिरच्या, वालीच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे यांनी आमच्या पिशव्या भरल्या होत्या. कोणी घरी लावायला नारळाची, मिरीची, कढीपत्त्याची, सुरणाची रोपे आवर्जून घेतली होती.

अशा या निसर्गसंपन्न, सुंदर घरातून निघताना मला कवी ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेतील, या घराला साजेशा खालील ओळी आठवल्या-

आठवणींच्या आधी जाते, तिथे मनाचे निळे पाखरू,

खेड्यामधले घर कौलारू,

हिरवी श्यामल भवती शेती, पाउलवाटा अंगणी मिळती…

madhurisathe1312 @gmail.com