रस्त्यानं मनसोक्त पायी भटकताना घरं ंन्याहाळणं हा एक चांगला आणि निरुपद्रवी छंद आहे. घरांचे अनेक प्रकार, आकार, रंग, रूप पाहताना घरं आपल्याशी बोलतात, असं वाटतं. घराकडं पाहून त्यात राहणाऱ्या माणसांची एकूणच रुची कशी आहे, राहणीमानाचा दर्जा कसा आहे इत्यादींविषयीही आपण काही ठोकताळे बांधू शकतो. हे सगळे आपले, आपल्यासाठी, आपल्यापुरते असले तरीही त्यात एक प्रकारची गंमत असते. विरंगुळा असतो.
पहाटे फिरायला जाते तेव्हा एका सुंदर नेटक्या बंगलीपाशी माझी दृष्टी नेहमीच खिळते. पहाटेच्या केशरी किरणांच्या पाश्र्वभूमीवर चमकणारं ते घर अत्यंत गजबजलेलं असतं. पहाटेच कुकरच्या शिट्टय़ांचा आवाज तिथे घुमतो. सोबतच रेडिओवरची सुमधुर भक्तिगीतं कानावर पडतात. कसलासा गोड सुगंध आसपास दरवळत असतो. बाहेरून फारसे काही दिसत नसले तरी आतली हालचाल मला जाणवत राहते. कुतूहल वाटते, कसे असेल हे घर आतून? कधी कधी वाटतं, कशाला ती नसती उत्सुकता? उगाच कशाला नसती उठाठेव?
पण माणसाचं मन असतं रसिक. कितीही ठरवंल तरी आपला कल्पनाविलास रस्र्ीू४’ं३्रल्ल चालूच राहतं. घर बाहेरून आपण पाहतो, तेव्हा आपण पाहतो त्या घराचं अंदाजे वय, त्याची बांधकामाची शैली, घराचा रंग. घराच्या आसपासचे काही संदर्भ आपल्या नजरेतून सुटत नाहीत. म्हणजे घराचे नाव, दारावरची नावाची पाटी, बाहेर पार्क केलेल्या गाडय़ा, वाळत घातलेले कपडे इत्यादी इत्यादी. शिवाय आपण पाहतो बाहेरची बाग, कुंडय़ा आणि त्यावरील पानंफु लं. आपल्याला दिसतात त्या घरातून बाहेर पडणारी किंवा बाहेरून घरात जाणारी माणसं.. असे सगळे पाहून आपण ठरवतो की हे घर अमुक अमुक जीवनशैली जोपासणारे असावे.
माझ्या नेहमीच्या पाहण्यातले एक घर नेहमीच मला उदास भासायचे. घराला ना रंग, ना रूप. काही ठिकाणी पडझड झालेली होती. सिमेंट उखडलेले.. जुनेपणा सर्वत्र पसरलेला जाणवायचा. घरावर कुणा जबाबदार व्यक्तीचा मायेचा हात फिरला नाहीय अनेक वर्षांत, हे जाणवत होते त्यावरून. घराबाहेरच्या जागेत पूर्वी लावलेले वृक्ष आहेत पण अन्यत्र मात्र नुसते माजलेलं गवत आणि भंगारमालाचे ढीग! घरात फारशी जाग नसायची. क्वचित दुपारी कुणी तरी हाती छोटी पिशवी घेऊन दार किलकिले करून आत जायचे नि लगेचच बाहेर पडायचे. आत कोण कोण राहते, ते काय करतात, याचा मुळीच अंदाज बांधता येत नव्हता. काहीतरी गूढ वाटायचे त्या घराकडे बघून. एके दिवशी एका परिचित व्यक्तीकडून समजले, त्या घरात एक म्हाताऱ्या बाई एकटय़ाच राहतात. मी त्यांना भेटायला गेले. त्यांची विचारपूस केली. तेव्हा समजले त्यांचा मुलगा परदेशी राहतो आणि मुलगी परगावी. त्यांना जेवणाचा डबा द्यायला दुपारी कोणी तरी येते. तेवढीच त्या घरात जाग असते. माझ्या अंदाज खरा ठरला. ते घर मला उदास का भासायचे याचे स्पष्टीकरण मला मिळाले. माझ्याप्रमाणेच अनेक समविचारी लोकांना मी त्या घराविषयी सांगितले, तेव्हा त्यांनाही ते घर उदासच भासले. माणसं असतील आणि त्या माणसांना परस्परांविषयी प्रेम असेल तर घराला शोभा येते, घरपण लाभतं. मग ते छोटे घरकुल असो की पर्णकुटी.
पण बऱ्याचदा आपले निरीक्षण आणि वास्तव यात जमीन-आस्मानाचा फरक पडतो. आपले अंदाज साफ खोटे ठरतात आणि आपल्याला अपेक्षाभंगाचा धक्का पचवावा लागतो.
पुण्यातील एका हमरस्त्यावरील एका टोलेजंग इमारतीविषयी- एका अपार्टमेंटविषयी- मला खूपच कुतूहल वाटत होते. ‘ग्रेट पॅलेस’ असं तिचं नाव तिला शोभून दिसत होते. प्रशस्त जागेत असलेल्या त्या इमारतीची अत्यंत प्रसन्न रंगसंगती आणि पुढे असणारी प्रशस्त दुकानं यामुळे ती वास्तू भारीच दिसत होती. मला खूप कुतूहल वाटतं असलं तरी त्या इमारतीत जाण्याचं काही कारणच सापडत नव्हतं. पण एके दिवशी तो योग जुळून आला. त्याच इमारतीत राहणाऱ्या एका मित्राकडे जाण्याचा प्रसंग आला. मला छान वाटत होते. त्या मित्राची जीवनशैली पाहता त्याचं घरही मस्त असणार असा माझा प्राथमिक अंदाज होता. मी त्या इमारतीत प्रवेश केला खरा, पण माझा काहीसा भ्रमनिरासच झाला. कारण बाहेरून दिसत होती तशी ती इमारत आतून मुळीच नव्हती. बाहेरचा डौल आत काही नव्हता. जिना अगदी अरुंद आणि कोंदट. दरुगधीमुळे जिन्यातून जाणे ही शिक्षाच होती. शिवाय तो जिना मुखरसानं असा काही रंगला होता की त्यावरून इमारतीत राहणाऱ्या किंवा तिथं वावरणाऱ्या लोकांची अभिरुची लक्षात यावी. जिन्यात विजेच्या तारांचे भेंडोळे पदोपदी लोंबकळत होते. त्यातून सुरक्षितपणे वाट काढत जाण्याशिवाय तरणोपाय नव्हता. जिना चढत असताना अन्य लोकांची घरं मी न्याहाळत होते. काही नेटकी तर काही अजागळ होती. सर्वात लक्षवेधी ठरली ती तिथल्या रहिवाशांची चाललेली शिवराळ भांडणं..! ‘कारे भुललासी वरलिया रंगा..’ या संत चोखा मेळ्याच्या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय मला त्या ‘ग्रेट पॅलेस’मध्ये त्या वेळी आला.
एक विलक्षण गोष्ट घडली आणखी एका वस्तीतल्या घरात. एका वस्तीतल्या महिलांसाठी माझा काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम झाल्यावर एका महिलेच्या घरी चहापानास मला नेण्यात आले. एका अरुंद गल्लीतून जाताना नाकाला रूमाल लावावा लागला. उघडी गटारं आणि सार्वजनिक संडास यामुळे वातावरण भारलं होतं. सार्वजनिक कार्यक्रमामुळे मला अशा वातावरणाचा अनुभव होता. भगिनी खूपच संकोचत म्हणाली, ‘आमच्या छोटय़ा घरात तुम्ही आलात. खूप बरे वाटले.’ पण आश्चर्य म्हणजे तिचे घर छोटे वगैरे नव्हते. बऱ्यापैकी प्रशस्त होते. खूप नेटके आणि व्यवस्थित होते.
घरात उंची फर्निचर होते. एका गुबगुबीत सोफ्यावर बसून तिचा मुलगा लॅपटॉपवर ‘मेलामेली’ करत होता. बाहेरुन कल्पनाही येणार नाही, असे वेगळेच काहीबाही त्या घरात दिसत होते. एक प्रकारची मध्यमवर्गीय अभिरुची सर्वत्र नांदत होती. बाईंनी चहापान आणि नाष्टाही बनवला अगदी फक्कड. एकूणच ते घर खूपच सुंदर होते आणि त्यामुळे त्या घरातली माणसंही सुंदर भासत होती. ‘दिसते तसे नसते, म्हणून जग फसते’ दुसरे काय?
घर बाहेरून दिसते वेगळे आणि आतून ते वेगळेच असते, असू शकते. आपली नजर मात्र शोधक रसिकाची हवी.
बाहेरून दिसणारं आणि आतलं घर
रस्त्यानं मनसोक्त पायी भटकताना घरं ंन्याहाळणं हा एक चांगला आणि निरुपद्रवी छंद आहे. घरांचे अनेक प्रकार, आकार, रंग, रूप पाहताना घरं आपल्याशी बोलतात, असं वाटतं.
First published on: 01-03-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House inside and outside