सीमा पुराणिक
घराची अंतर्गत रचना आणि त्यामागे दडलेल्या अंतर्गत रचनाशास्त्राची मांडणी विशद करणारे सदर.
मागील लेखात आपण वास्तू ही तेथे असलेल्या वस्तू आणि व्यक्ती यांच्यातील संवादमुळे, त्यांच्यात कसं नातं निर्माण करत असते हे पाहिलं. या संवादाचे सुसंवादात रूपांतर करण्यासाठी इंटिरियर डिझायनरने विचारात घेण्याचे तीन मुख्य मुद्देदेखील लक्षात घेतले.
अंतर्गत रचना करत असतानाच्या प्रक्रियेमधील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्लॅनिंग व डिझायनिंग- अर्थात योजना व सजावट. योजनेशिवाय कृती म्हणजे तलवारीला धार नसताना लढाईला उतरण्यासारखं आहे.
ज्या जागेसाठी- निवासी वा व्यावसायिक- अंतर्गत रचनाकार काम करत असतो, त्या जागेचा उपभोग घेणाऱ्या व्यक्तींना जाणून घेऊन संवादकौशल्याने योग्य त्या विषयावर त्या व्यक्तींना बोलतं करणं व त्यांच्या गरजा समजून घेणं हे इंटिरियर डिझायनरने सर्वात प्रथम केलं पाहिजे.
एखाद्या घराची अंतर्गत रचना करत असताना तेथे राहणाऱ्या कुटुंबाची रचना, कुटुंबपद्धती (एकत्र किंवा विभक्त), कुटुंबातील सर्व व्यक्तींची वयं, व्यक्तिमत्त्व, स्वभावविशेष, छंद, करिअरची पाश्र्वभूमी, करिअरमधील भविष्यातील गोल, कुटुंबातील वातावरण, इत्यादी अनेक गोष्टींचा विचार अंतर्गत रचनाकाराने केला पाहिजे. एखाद्या कला क्षेत्राशी संबंधित असलेल्या कुटुंबासाठी घराची अंतर्गत रचना करणे, एखाद्या क्रीडाक्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तीच्या घराची अंतर्गत रचना व एखाद्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कुटुंबाच्या घराची अंतर्गत रचना ही त्यांच्या व्यवसाय आणि व्यक्तिमत्त्वानुसार निश्चितपणे बदलतात. अगदी वॉर्डरोब डिझाइन करतानासुद्धा पुरुष आणि स्त्रियांच्या वॉर्डरोबचे मानक आकारमान वेगवेगळे असतात. परंतु याव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक गरजा, सवयी, कपडय़ांची वैयक्तिक आवड आणि व्यावसायिक ड्रेसकोड यानुसार विभागणी केली तर ते त्यांना खूपच सोयीचे होते.
वस्तुत: आपण जी सेवा पुरवत असतो, त्या सेवेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची झालेली सोय व त्या व्यक्तींना वाटणारे समाधान यावर त्या सेवेचे खरे मूल्य ठरत असते. अंतर्गत रचनाकारासाठी हे मूल्य सर्वात महत्त्वाचे असले पाहिजे. सेवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीची मानसिकता ओळखणे व ती जपणे अत्यंत महत्त्वाचे असते. आणि त्याचबरोबर रचना घटक (Design Elements) आणि रचनातत्वे (Design Principles) यांचा योग्य तो वापर करून रचनामूल्य ( Design value) देखील उन्नत ठेवणे ही खरोखरच तारेवरची कसरत असू शकते.. इतकी की, इंटिरिअर डिझायनर हा कायमस्वरूपी मानसशास्त्राचा विद्यार्थी असतो की काय असाच प्रश्न पडावा.
कौटुंबिक वातावरणाप्रमाणेच कुटुंबाची सामाजिक व राजकीय जडणघडण हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो. विशेषत: बठकीच्या खोलीचा विचार करताना हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कुटुंबातील व्यक्तींची त्यांच्या नातेसंबंधातील वीण जर फारच घट्ट असेल तर मुक्कामी राहणाऱ्या पाहुण्यांचा विचार नक्कीच व्हायला हवा ना! कारण, अतिथी हीच घराची खरी शोभा!
भोगोलिक स्थान अर्थात Geographical Location त्या-त्या प्रदेशानुसार तिथले वातावरण, हवामान, त्यानुसार बदलणारे राहणीमान, गरज, सवयी व त्यानुसार सोयी हे अनुषंगाने आलेच. जसे की, विषम हवामान असलेल्या प्रदेशात खिडक्यांना वाळ्याच्या पडद्यांची सोया करून ठेवणे रास्तच ठरते. किंवा अतिवृष्टीच्या प्रदेशात घराच्या नऋत्य भागातील खिडक्यांची सिल लेव्हल खूप कमी असेल तर पावसाची झड आतपर्यंत येण्याचा संभव असतो. या गोष्टी वास्तुतज्ज्ञ आणि अंतर्गत रचनाकार या दोघांनीही लक्षात घेणे गरजेचे असते.
प्रादेशिक राज्यात विभागणी झालेला आपला देश संस्कृती, सण-वार, धार्मिक कृती यातील विविधता दर्शवतो. अर्थातच जसा देश तसा वेश..
उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्या जागेच्या अंतर्गत रचनेचा आराखडा करताना, गुजराती कुटुंबासाठी काम करतानाचा दृष्टिकोन आणि दाक्षिणात्य कुटुंबासाठी काम करतानाचा दृष्टिकोन हा नक्कीच खूपच वेगळा असतो. अगदी सण-समारंभाचेच म्हणाल तर आपल्याकडे गौरी- गणपतीचेच घ्या ना.. वर्षांतून एकदाच जरी पाहुणे म्हणून येत असले तरी बाप्पांची निश्चित अशी उत्तम जागा बठकीच्या खोलीत असायलाच हवी ना? नवरात्रीत देवीचे घट बसवताना तिथल्या फुलांच्या माळा, फुलोरा, समई यांच्या जागेचे व्यवस्थित नियोजन केले तर दरवर्षी नऊ दिवसांच्या उत्सवाचा देखावा अधिकच आनंददायी होतो. समईतील ज्योतीच्या तेजाने केशरी फुलांच्या माळा आणखीनच उठून दिसतात आणि पुढय़ातली रांगोळीही देवीभोवती दिमाखदार रिंगण घालते.
परंपरांचा, सण-वारांचा विचार व्हायला हवा खरा, पण तद्वतच कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचारही साकल्याने करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कुटुंबातील वयस्कर व्यक्ती, लहान मुले यांच्या गरजा लक्षात घेऊन, त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे कुटुंबातील इतरही व्यक्तींच्या व्यायाम, संबंधित साधने, औषधे, आवश्यक कागदपत्रे ठेवण्याची जागा निश्चित असली पाहिजे. आरोग्याचा विचार आला की स्वच्छतेचा विचार मागोमाग येतोच. अर्थातच घरातील सर्व फर्निचर आणि सुखसोयी करताना ते स्वच्छता करण्याच्या दृष्टीने सोयीचे असणे गरजेचे असते.
अंतर्गत रचनाकार हा ग्राहकाच्या गरजा, जागेचे भौगोलिक स्थान, दिशा, सूर्यप्रकाशाचे स्रोत, इत्यादी अनेक विषयांचा विचार मूळ आराखडा करताना करत असतो. बबल डायग्राम बनवणे, स्केचिंग करणे यातून तो संकल्पना साकारायला सुरुवात करतो. योजना आखताना, आराखडा तयार करताना इंटिरिअर डिझायनरने कमीतकमी तीन ते चार पर्याय देणे व त्यातूनच चर्चा-उपचर्चा होऊन एक निश्चित आराखडा तयार करणे अपेक्षित असते. या सर्व गोष्टींचा विचार करताना आपण मागील लेखात उल्लेख केलेल्या जागेच्या वापराचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरतो.
जागेचा वापर याचा अर्थ कमीतकमी जागेत जास्तीत जास्त सोयी-सुविधा निर्माण करून देणे इतकाच मर्यादित नसून, त्याचा अर्थ वास्तूच्या क्षेत्रफळाप्रमाणे बदलतो. वन आरकेसाठी काम करताना विचार करण्याची पद्धत आणि आरामदायी चार बीएचके किंवा बंगला डिझाईन करताना विचार करण्याची पद्धत यात खूप तफावत असते. वन आरकेमधील बैठक व्यवस्था करताना जागेचा तंतोतंत वापर करून बरेचदा अनेक गोष्टींच्या वापरासाठी ती खोली सिद्ध करावी लागते. परंतु ५०० चौरस फुटाच्या लिव्हिंग रूमचा विचार करताना वस्तूंची सुयोग्य मांडणी ही त्या जागेचा दृश्यात्मक समतोल साधत असते. वापरातील भाग ( Functional Aspect), हालचाली Movement, प्रमाण Proportion यांचा विचार करताना, खोलीच्या कोणत्या भागातून, कोणत्या कोनातून, कोणता कोपरा कसा दिसेल हे सर्व बारकाईने विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि इथेच जागेचा वापर अर्थात Space Utilization ही संकल्पना वेगळया अर्थाने साकार होते. अशा मोठय़ा जागांच्या बाबतीत महागडे फर्निचर आणि उंची गालिचे यांमुळे प्रत्येक वेळेस जागेची व्यापकता वाढतेच असे नाही, तर पैसे- Project Cost मात्र वाढत जाते. अंतर्गत रचनाकाराने योजना आखतानाच खर्चाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यासाठी ग्राहकाशी चर्चा करून, त्यांची आर्थिक ताकद, खर्च करण्याची मानसिकता याचा अंदाज घेऊनच सल्ले दिले पाहिजेत.
अशा प्रकारे सारासारविचार करून तयार झालेला आराखडा कामाची पुढील वाटचाल निश्चितच सोपी करतो.
seemapuranik75@gmail.com
(सिव्हिल इंजिनीअर, इंटिरिअर डिझायनर)