खरं तर त्या अतिशय नीटनेटक्या, अभिरुचीपूर्ण घरात एका मैत्रिणीबरोबर मी सहजच डोकावले आणि तिथल्या हसत्याखेळत्या व आपुलकीच्या वातावरणात पूर्ण दोन तास कशी गुंगून गेले ते माझं मलाही कळलं नाही.
येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला आनंदलहरी पुरवणारं हे घर आहे ठाण्याच्या ब्राह्मण सोसायटीतील अनमोल सोसायटीमध्ये राहणाऱ्या ‘मराठे’ कुटुंबीयांचं. ११०० स्क्वेअर फुटांच्या या घराला ५ खोल्या आहेत (३ बेडरूम्स, हॉल, किचन) आणि त्यात राहणाऱ्या माणसांची संख्याही पाचच. कुटुंबप्रमुख चिंतामणी मराठे, त्यांच्या सुविद्य पत्नी गीताताई, मुलगा मनोज, सून नेहा व नातू चिन्मय हे या घरातील ५ सदस्य. या घराचं वेगळेपण म्हणजे ते सुंदर बनवण्यात आजोबांपासून नातवापर्यंत सर्वाचा सहभाग आहे.
प्रवेशद्वाराशीच काचेत कोरलेली गणपतीची प्रतिमा आणि त्याखालील वक्रतुंड महाकाय.. हा श्लोक ‘इथे गणेशभक्त राहतात’ याची वर्दी देतात. त्याच्या बाजूलाच असलेल्या लाकडी कपाटावरील एका अ‍ॅन्टिक फ्लॉवरपॉटकडे माझं लक्ष गेलं. कुठून आणला, या प्रश्नावर गीताताईंचं उत्तर होतं, ‘अहो तो आहे घरातला पूर्वीपासूनचा फिरकीचा तांब्या, त्याचा असा उपयोग केला, झालं!’ त्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या, छोटय़ा घागरीच्या आकाराच्या पितळेच्या तांब्यावरून मला माझी नजर मोठय़ा कष्टाने दूर करावी लागली.
आत घरामध्ये तर देशविदेशातून वेचून वेचून आणलेल्या अशा ‘हटके’ वस्तूंचा जणू खजिनाच भरला होता. कोल्हापूरची घंटा, राजस्थानच्या कठपुतळ्या व रंगीबेरंगी कापडी चिमण्या, केरळचा शहाळ्याच्या काथ्याचा हत्ती, सिंगापूरची ऑर्किड, अ‍ॅमस्टरडॅमची टय़ूलिप.. अशा अनेक शोभिवंत वस्तू, येणाऱ्याजाणाऱ्यांचं सहज लक्ष जाईल अशा तऱ्हेने जागोजागी स्थानापन्न झाल्या होत्या. त्याबरोबरच नेहा मराठे हिने मणी, मोती, हॅण्डमेड पेपर, भरतकाम, वीणकाम इत्यादींचा वापर करून बनवलेल्या अनेक कलाकृतीही तिथं सुखाने नांदत होत्या. या कलाकारांच्या घरातील साध्या साध्या गोष्टींतील कल्पकताही दाद देण्याजोगी. उदा. तांब्याच्या छोटय़ा बंबाच्या नळाच्या तोटीत सुरनळी अडकवून त्याखाली तांब्याचा छोटा पेला ठेवलाय. लांबून पाहताना वाटतं की, चुकून नळ उघडा राहिला की काय? ही मंडळी एकमेकांच्या वाढदिवसाला कपडे, दागिने यापेक्षा कुठून कुठून शोधून नव्या नव्या भेटवस्तू आणतात आणि मग सगळे मिळून त्या वस्तूची घरातील जागा ठरवतात. जसं नेहाच्या वाढदिवसाला या वर्षी तिच्या नवऱ्याने, तिने वेळोवेळी बनवलेल्या सुंदर सुंदर भेटवस्तूंच्या फोटोंचं एक अप्रतिम ‘टेबल कॅलेंडर’ करून तिला भेट दिलं. आज हे आगळंवेगळं कॅलेंडर त्यांच्या दिवाणखान्याची शोभा वृद्धिंगत करतंय.
मराठे कुटुंब राहतंय ती ७ मजली अनमोल सोसायटी २००७ मध्ये आकाराला आली. आज ही इमारत शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे, पण १९५० मध्ये जेव्हा ‘चिंतामणी मराठे’ यांचे वडील ‘हरी दत्तात्रय मराठे’ यांनी या ठिकाणी बैठं घर उभारलं तेव्हा आजूबाजूला फक्त शेती होती. १९६० मध्ये या घरावर एक मजला चढला. पुढे ४०/४५ वर्षांनंतर जेव्हा घराच्या पुनर्बाधणीचे विचार मनात घोळू लागले तेव्हा चिंतामणी मराठे स्वत: आर्किटेक्ट असल्याने ‘माझ्या घराचा (ब्लॉकचा) आराखडा मीच करणार’ हा त्यांचा आग्रह होता आणि त्यांना हवी तशी स्वायत्तता देणारा बिल्डरही मिळाला. दीपक साने यांनी मराठय़ांचा प्लॅन तसाच ठेवून बाकी इमारतीचा आराखडा त्या अनुषंगाने तयार केला. या पहिल्यावहिल्या सुनियोजित कामाने साने यांनाही नाव मिळवून दिलं.
हवेशीर, भरपूर उजेड देणाऱ्या प्रशस्त खिडक्या हे या घराचं वैशिष्टय़. प्रत्येक खिडकी हिरवीगार. एवढंच नव्हे तर हॉलला लागून असलेल्या बाल्कनीत ग्रास टाइल्स लावलेल्या. लांबून पाहिलं तर गॅलरीत जणू लॉन लावलंय असा भास होतो आणि बाजूला झोके घेणारं सुगरणीचं घरटं. तिथं मांडलेल्या वेताच्या सुबक खुर्ची-टेबलावर आलेला पाहुणा चहा प्यायला बसला तर उठायचं नावही घेणार नाही.
हे नवं घर बांधून पूर्ण व्हायला दोन र्वष लागली. त्या काळात मराठे फॅमिलीने मुंबई-पुण्यातील होते नव्हते ते सर्व मॉल पिंजून काढले आणि या मंथनातून जे जे आवडलं ते ते टिपून नंतर आपल्या घरात प्रत्यक्षात उतरवलं. सोफा घेतानाही सहज पाठ टेकायला हवी, पायही अधांतरी राहता कामा नयेत, त्याचबरोबर स्पर्शही मुलायम हवा ही त्रिसूत्री लक्षात ठेवून अनेक सोफ्यांच्या परीक्षा घेतल्यावरच निर्णय झाला. स्वत:साठी चौथा मजला निवडण्याचं कारण सांगताना चिंतामणी मराठे म्हणाले, ‘याच उंचीवरून आजूबाजूची झाडं आपल्या आय-साइटच्या रेषेत येतात.’ खरंच! ते बोलत असताना मी बाहेर नजर टाकली तर नारळ, आंबा, वड, करंज.. असे कितीतरी डेरेदार वृक्ष, जे मला तिथून अनेकदा जाता येताना कधीच जाणवले नव्हते, ते एकदम डोळ्यांत भरले. दरवर्षी ७ दिवसांच्या मुक्कामाला येणाऱ्या गणपतीबाप्पासाठी पूर्व-पश्चिम दिशा हेरून राखलेली ‘परमनंट जागा’ आणि प्रतिवर्षी सर्वानी मिळून कल्पकतेने केलेली सजावट हे देखील या घराला लागलेले चार चाँद.
स्वयंपाकघर ऐसपैस हवं असा सासू-सून दोघींचाही आग्रह, त्यामुळे ही जागा अगदी मंगळागौरीचे खेळ खेळता येतील एवढी ऐसपैस ठेवलीय- लाल आणि करडा या रंगसंगतीने नटलेलं ते देखणं किचन पाहताना हरखून जायला होतं. गॅसचा टॉपही लालचुटूक आणि चेहरा दिसावा इतका नितळ. प्रत्येक वस्तूला स्वत:ची जागा आणि ती वस्तू त्याच जागेवर हे सूत्र इथं कटाक्षाने जपलंय. मुख्य म्हणजे इथं एकही डबा, बाटली उघडय़ावर दिसत  नाही. कांदे-बटाटे, तवा, पोळपाट.. सर्वाना आपापलं अढळपद दिलंय. अगदी मिसळणाचा डबा, तेल, तूप, मीठ अशा पावलोपावली लागणाऱ्या वस्तूदेखल ट्रॉलीच्या पहिल्या खणात हाताशी चटकन मिळतील अशा ठेवलेल्या दिसल्या. ट्रॉलीचे कप्पे बनवतानाही चमच्यांपासून कणकेच्या डब्यापर्यंत सगळ्यांची मापं घेऊन ऑर्डर दिल्यामुळे कोणताही खण उघडला तरी सगळं चित्राप्रमाणे मांडलेलं दिसतं.
खरकटी भांडी ठेवायला ट्रे किंवा टब बहुतेकांकडे असतो, पण त्या टबाच्या मापाची ‘चाकाची ट्रॉली’ करून घेतल्याने सिंकच्या खालची जागाही आरशासारखी चकचकीत. क्रोकरीच्या २ रांगा झाल्या तर मागच्या वस्तू कधीच काढल्या जात नाहीत. या अनुभवावरून त्या शोकेसची रुंदीही जेमतेम ९ इंच ठेवलीय. त्यामुळे सगळं काचसामान कसं एका लायनीत अटेंशनमध्ये बसलंय. या स्वयंपाकघरातील मला सगळ्यात आवडलेली रचना म्हणजे रस्त्याला समांतर असणाऱ्या खिडकीच्या खालची ग्रॅनाइटची लांबलचक बैठक. यावर मांडी ठोकून लाडू वळता वळता किंवा भाजी निवडता निवडता हवं तर घरातील माणसांशी गप्पा मारा किंवा शांतपणे बाहेरचा निसर्ग पाहा. अगदी पुस्तक वाचत ताणून दिलीत तरी चालेल. शिवाय या बैठकीखाली स्टोअरेजची व्यवस्था आहेच.
बेडरूममध्ये डबलबेडचं झाकण हायड्रॉलिक प्रेशरने उघडण्याची व्यवस्था केल्याने आतील इंच न् इंच जागेचा वापर सहजगत्या होतोय. झालंच तर हे पलंग खालच्या बाजूने किंचित निमुळते केल्याने बसल्यावर पायही आपटत नाहीत. याबरोबर डोक्याच्या पाठच्या जागेत उशांसाठी घर केल्याने त्यांचाही इकडे-तिकडे पसारा दिसत नाही.
१२ वर्षांच्या चिन्मयलाही सौंदर्यदृष्टीचं पिढीजात वरदान मिळालंय. त्यामुळे रंगाच्या निवडीपासून फर्निचरच्या खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्याचं स्वत:चं असं ठाम मत असतं. त्याच्या खोलीत एका कोपऱ्यात मांडलेलं त्याचं वृक्षसंवर्धनाविषयीचं प्रोजेक्ट, त्याच्या ग्रुपने बनवलेल्या रोबोटिक चपलेविषयी विविध वृत्तपत्रांत आलेल्या बातम्याचं लॅमिनेशन केलेलं कलेक्शन, आजोबांच्या पंचाहत्तरीनिमित्त वर्तमानपत्रांच्या कागदाच्या लगद्याला रंग देऊन त्याने बनवलेली ७५ आकडय़ाची फ्रेम.. अशी गौरवचिन्हं बघताना मी आपसूकच त्याच्या खोलीला पहिला नंबर देऊन टाकला.
सगळं घर पाहून मन भरलं आणि लोटपोट आग्रहाने पोटंही भरलं. अंमळशाने तिथून बाहेर पडले, पण त्या घराने आणि घराला घरपण देणाऱ्या तिथल्या माणसांनी माझ्या मनात कायमचं घर केलं, हे मात्र खरं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा