५० वर्षांपूर्वीचा काळ. मुंबईचे उपनगर चेंबूर. पूर्वी त्याला गार्डन सीटी म्हणत. त्यावेळेस चेंबूरला भरपूर झाडी होती. अशा वनराईच्या सान्निध्यात त्यावेळेस राज कपूर, अशोक कुमार, शोभना समर्थ, ललिता पवार इ. कलाकार राहात होते. तेथेच निसर्गाच्या सान्निध्यात चेंबूर नाक्याजवळ ‘जसवंत बाग’ म्हणून भाऊराव चेंबूरकरांची वाडी होती व त्या वाडीत एक गायक कलाकार ए. पी. नारायणगावकर व मी राहत होतो. आगगाडीच्या डब्यासारखं ओळीने तीन खोल्यांचं आमचं घर होतं. दारापुढे गुलाबाच्या फुलांची बाग होती. बाजूला पालेभाज्यांची शेती होती. वाडीत तीन विहिरी होत्या. शेतीला पाणी घालण्यासाठी विहिरीवर मोट चालायची, त्यावेळेस इलेक्ट्रिक पंप नव्हते. पावसाळ्यात विहीरी तुंडुंब भरायच्या. गावातील लोक पोहायला यायचे. त्यावेळेस चेंबूरला येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. ना बस, रिक्षा ना टॅक्सी. फक्त कुर्ला, मानखुर्द अशा १-१ तासांनी लोकलच्या फेऱ्या सुरू असायच्या. अशा परिस्थितीतदेखील आमच्याकडे छोटय़ा घरात सर्व गायक कलाकार चेंबूर स्टेशन ते नाक्यापर्यंत चालत यायचे. शांत वातावरण, निसर्ग वनराईमुळे कलाकारांचा चालण्याचा थकवा कुठल्या कुठे जायचा. आमच्या छोटय़ा घरात पाच दिवस गौरी, गणपती असायचे. त्यावेळेस सर्व छोटे, मोठे कलाकार गणपतीपुढे गाण्यासाठी हजेरी लावायला यायचे. विश्वनाथ बागूल, सुरेश हळदणकर, राम मराठे, बागूलचे हरी मेरो प्राण प्रिया, हळदणकरांचे- कमलाकांता तर राम मराठेची गौळण- परब्रह्म निष्काम इ.ही सर्व गाणी आजही माझ्या आठवणीत आहे. नारायणगावकरांना आलेल्या कलाकारांचे आदरातिथ्य करण्याची खूप आवड होती. पाहुण्यांना भरपूर खायला घालण्याची त्यांना भारी हौस. त्यामुळे माझा बराच वेळ पदार्थ करण्यातच जाई. माझ्या मोठय़ा मुलीच्या आसावरीच्या बारशाला जी. एन. जोशी गायला आले होते. प्रथम ख्याल झाल्यावर नदीकिनारी व अनिलांच्या (कवी) दोन कविता गायल्या होत्या. तसेच मुलाच्या दीपकच्या मुंजीत राम मराठे आले होते. जेवण वगैरे झाल्यावर म्हणाले, आज मी गाणार. झालं तयारीला सुरूवात. दारापुढील ओटा हेच स्टेज. पुढे मोकळ्या जागेत श्रोत्यांसाठी सतरंज्या टाकण्यात आल्या. तंबोरे झंकारायला लागले. हार्मोनियमवर गोविंदराव पटवर्धन तर तबल्यावर वसंत आचरेकर. पटवर्धनांनी हार्मोनियमवर भूप रागाची सुरावट वाजवता क्षणी श्रोत्यांमधून वाऽऽवा आली. नंतर त्यांनी चलत, चलत मथुरा ही द्रुत चीज म्हटली, ती अजून माझ्या लक्षात आहे. अशा मैफली आमच्या छोटय़ा घरात व्हायच्या. तर कधी कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, भीमसेन जोशीदेखील आमच्या छोटय़ा घरात येऊन गेले. त्यांच्या संगीतावरच्या गप्पा, चर्चा व बरोबर फराळाचा कार्यक्रम असायचा. अशा या वास्तूने सर्व कलाकारांना पाहिले-ऐकले आहे.
नारायणगावकर एच.एम.व्ही.मध्ये होते. तेव्हा दिवाळीसाठी रेकॉर्ड काढायची असे रुपजी वजोशी यांनी सांगितले. तयारीला लागा. झालं नारायणगावकरांनी शांताबाई शेळकेंना विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. दिवाळीसाठी गाणी करायची कुठे बसू या? लगेच त्या म्हणाल्या, तुमच्या चेंबूरच्या घरी येते ना. आमच्या या छोटय़ा वास्तूत त्या आल्या. नारायणगावकर त्यांना चाल सांगायचे व त्या लगेच त्यावर शब्द सांगायचे, ती दोन गाणी म्हणजे ‘लाख दिवे लखलखती’ आणि ‘आला ग भाऊ राया.’ अशा कितीतरी आठवणी या आमच्या छोटय़ा वास्तूत आहेत. गायकाच्या सूरांनी, तबल्याच्या साथीने भारावलेले हे आमचे छोटे घर होते.
कुणाची आलापी, कुणाची तानबाजी तर कुणाची रागावरील चर्चा या वास्तूने ऐकल्या आहेत. मान, अपमान त्या ठिकाणी नव्हता. बिदागीची (मानधन) अपेक्षा नव्हती. या काळी कलाकाराला जास्त पैसा मिळत नव्हता. पण माणुसकी, प्रेम हे त्यांच्याजवळ होते.
या वास्तूत अखंड तंबोरे झंकारत असत, पेटीचे सूर वाजत असत, क्लासेस चालू, मैफली चालू घरात व बाहेर पक्षाचे गाणे चालू अशी होती आमची वास्तू. आता ती वास्तू नेस्तनाबूत झाली. ते सर्व कलाकारही पडद्याआड गेले. सूरांच्या मैफली करणारा गायकही (नारायणगावकर) पडद्याआड गेला आहे. अशी पाखरे येती अन् स्मृती ठेवूनी जाती, याप्रमाणे माझ्या जीवनातून या आठवणी कधी ही पुसल्या जाणार नाही.
सुरांनी पावन झालेली वास्तू
५० वर्षांपूर्वीचा काळ. मुंबईचे उपनगर चेंबूर. पूर्वी त्याला गार्डन सीटी म्हणत. त्यावेळेस चेंबूरला भरपूर झाडी होती. अशा वनराईच्या सान्निध्यात त्यावेळेस राज कपूर, अशोक कुमार, शोभना समर्थ, ललिता पवार इ. कलाकार राहात होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-04-2013 at 01:07 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House of narayangaonkar at chembur