विश्वासराव सकपाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाच्या स्वप्नातले व मनातले घर म्हणजे त्याच्या अंतर्मनातला आनंद फुलविण्याची जागा. प्रत्येकाला असे स्वत:चे स्वप्नातले घर मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने भाडय़ाच्या घरात आसरा घ्यावा लागतो.

घर म्हणजेच हक्काचे अवकाश, हक्काचे छप्पर. घर कसे असावे या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे व आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. हे जरी खरे असले तरी प्रत्येकाच्या स्वप्नातले व मनातले घर म्हणजे त्याच्या अंतर्मनातला आनंद फुलविण्याची जागा. प्रत्येकाला असे स्वत:चे स्वप्नातले घर मिळतेच असे नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने भाडय़ाच्या घरात आसरा घ्यावा लागतो.

भाडय़ाने घर घेण्यामागची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे :-

*   निश्चलनीकरणानंतर बांधकाम व्यवसाय मंदीच्या सावटाखालून पूर्णपणे बाहेर येऊ शकलेला नाही. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपले प्रकल्प लांबणीवर टाकले आहेत. निश्चलनीकरणाचा फटका आणि स्थावर जंगम मालमत्ता कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे घरांच्या किंमती कोसळतील असा अंदाज होता. परंतु त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. तरी अशी तयार घरे दीर्घकाळ ताब्यात ठेवण्याची क्षमता आजही विकासकांकडे आहे. परिणामी घरांच्या किंमती परवडत नसल्यामुळे अनेक इच्छुक ग्राहकांनी भाडय़ाच्या घरात राहणे पसंत केले आहे. भाडय़ाच्या घरात राहणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी होणारी लक्षणीय वाढ व मासिक भाडय़ाचे वाढते दर यावरून स्पष्ट चित्र समोर येते. आगामी  वर्षांत हे प्रमाण आणखी वाढेल असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

*   सध्याच्या काळात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. साहजिकच अशा क्षेत्रामध्ये रोजगार करणाऱ्यामध्ये नवोदित तरुण / तरुणींचा भरणा अधिक आहे. त्यात त्यांना पगारही बऱ्यापैकी मिळत आहे. असे असले तरी एकटय़ाच्या पगारात मोठय़ा शहरात स्वत:चे घर घेणे, त्याची अंतर्गत सजावट करणे व देखभाल करणे अशक्य झाले आहे.

*   मोठय़ा शहरात नव्याने नोकरीच्या शोधात येऊन नोकरी मिळाल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी मग ते स्वतंत्रपणे किंवा आणखीन काही मित्र मिळून भाडय़ाचे घर घेऊन राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

*   तसेच अलीकडच्या काळात नोकरीनिमित्त छोटय़ा गावातून व परप्रांतातून मोठय़ा शहरात येणाऱ्या तरुणींची संख्या वाढत आहे. त्या देखील सुरक्षिततेच्या कारणास्तव दोन ते तीन मत्रिणी मिळून भाडय़ाचे घर घेऊन राहतात.

*   अन्य राज्यांतून शहरी भागात व्यापार-धंद्यानिमित्त येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा लोकांना नवीन घरासाठी मोठी रक्कम मोजणे परवडणारे नसते. त्याऐवजी ते तेवढाच पसा व्यापारात / व्यवसायात गुंतवितात व स्वत: मात्र भाडय़ाच्या घरात राहातात.

*   काही तरुण मंडळींच्या लग्नास घरच्यांचा विरोध असतो तर काही प्रकरणात लग्नानंतर प्रायव्हसीच्या निमित्ताने स्वतंत्रपणे राहण्यासाठी भाडय़ाच्या घरांचा आसरा घेतात. त्यामुळे भाडय़ाने घर घेऊन स्वतंत्रपणे राहण्याचे प्रमाण वाढत आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी असलेल्या अधिनियम, नियम व उपविधी यांच्या तरतुदींनुसार सभासदाचे हक्क वापरण्यास व सदनिकेचा वापर करण्यास सभासद पात्र असतो. परंतु काही कारणास्तव सभासदाला त्याच्या मालकीच्या सदनिकेत राहणे शक्य नसते आणि त्यामुळे त्याला घर भाडय़ाने देण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. भाडय़ाने घर देण्यामागची काही प्रमुख कारणे  :-

*   नोकरीच्या अटीमुळे किंवा व्यवसायाच्या स्थलांतरामुळे संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर जावे लागत असल्यामुळे.

*   संस्थेच्या कार्यक्षेत्रात मुलांच्या शिक्षणासाठी सोयी उपलब्ध नसणे.

*   दीर्घ आजारामुळे उपचारांसाठी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर जावे लागल्यामुळे.

*   केवळ गुंतवणूक म्हणून घेण्यात आलेले घर.

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाला त्याची सदनिका जर पोटभाडय़ाने द्यावयाची असेल तर त्याला उपविधीच्या अधीन राहून निश्चित पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक आहे.

सदनिका पोटभाडय़ाने देणे –

उपविधी क्र. ४३ (अ ) व (ब )

अ ) सदस्य, संस्थेला आपली सदनिका पोटभाडय़ाने व संमती-नि-परवाना पद्धतीने किंवा काळजीवाहक तत्त्वावर किंवा कोणत्याही अन्य प्रकारे पेईंगगेस्ट तत्त्वावर दिल्याचे लेखी कळवील. तथापि, सदस्य संमती-नि-परवानगी कराराची व संस्थेस दिलेल्या लेखी पत्राची प्रत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सादर करील.

ब ) सदनिका / दुकान पोटभाडय़ाने देण्यासाठी संस्थेच्या परवानगीची गरज नाही. तथापि ते पोटभाडय़ाने देण्यापूर्वी ८ दिवस अगोदर संस्थेला तशा प्रकारची सूचना देण्यात यावी.

भाडेकरार करताना

*   मालमत्ता कोणत्या नियम व अटींखाली भाडय़ाने दिली जात आहे, त्याचा समावेश भाडेकरारामध्ये असणे.

*   करार किती काळासाठी केला आहे, भाडे किती असेल, अनामत रक्कम किती घ्यायची याचा स्पष्ट उल्लेख भाडेकरारामध्ये असणे.

*   दर महिन्याच्या किती तारखेला भाडे दिले जाणे अपेक्षित आहे, हेही करारामध्ये असणे आवश्यक आहे.

*   कालांतराने भाडे वाढवायचे असेल, तर त्यासंबंधीची अट भाडेकरार करताना घरमालकाने घातलेली असावी.

*   वीज बिल, वाहनतळ सुविधा व अन्य शुल्क कोणी भरायचे तेही करारामध्ये नमूद केलेले असावे.

*   भाडेकरूला घर सोडायचे असल्यास किती काळ आधी नोटीस द्यावी लागेल याचा उल्लेख असावा.

*   सदनिका मालक आणि भाडेकरू यांच्यात केला जाणारा भाडेकरार नोंदणी व मुद्रांक शुल्क भरून उप-निबंधक कार्यालयात नोंदणी करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. (आता भाडेकराराची ऑनलाइन नोंदणी कमी दरात उपलब्ध करण्यात आली आहे.)

*   मुद्रांक शुल्क विभागाकडून भाडेकरारासाठी घर भाडय़ाच्या आणि अनामत रकमेच्या केवळ ०.२५ टक्के रक्कम आकारली जाते.

*   महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ च्या कलम ५५ नुसार भाडेकरारनामा नोंदणी होणे आवश्यक आहे अन्यथा दंड व शिक्षा होऊ शकते.

vish26rao@yahoo.co.in

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House rent vasturang abn