गौरी प्रधान
इमारतीची अग्नी सुरक्षा ही बाब सुरक्षा क्रमातील सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणून गणली जाते. म्हणूनच आग लागल्यावर काय काय खबरदारी घ्यावी हे सांगतानाच अनेक इमारतींमध्ये हल्ली आग लागल्यावर लोक कसे प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मॉक ड्रिलदेखील केले जाते, ज्यात आग लागल्याचा खोटा सायरन वाजवला जातो. ज्यामुळे लोकांच्या प्रतिक्रियेसोबतच ज्या अग्नीविरोधी यंत्रणा बसवल्या जातात त्यांचेदेखील परीक्षण होऊन जाते. परंतु या मॉक ड्रिलमध्ये आणि प्रत्यक्ष आग लागल्यावर उद्भवणाऱ्या परिस्थितीत खरे तर बराच फरक असतो.
म्हणूनच मुळात आग न लागू देणे हाच खरे तर आगीपासून बचावाचा खरा उपाय असू शकतो. आग लागण्याची जी काही कारणे असतील त्यातील सगळय़ात महत्त्वाचे कारण शॉर्ट सर्किट हे असते, त्यामुळेच शॉर्ट सर्किट जर टाळता आले तर आग लागण्याच्या बऱ्याच घटनांना आळा बसेल. शॉर्ट सर्किट होण्याचे मूळ कारण हे सदोष वायिरगमध्ये असते. बरेच वेळा इंटेरियरचे काम काढले की क्लाएंट सगळे खर्च मान्य करतो, पण इलेक्ट्रिकच्या कामात मात्र काटछाट करताना दिसतो, कारण ते काम कुठे फारसे दिसणार असते? किंवा काही वेळा पैसे वाचवण्याच्या नादात कामच चुकीच्या माणसाला दिले जाते आणि सगळा गोंधळ होऊन बसतो. त्यामुळे आपल्याला जर भविष्यात घडणाऱ्या आगीच्या घटना टाळायच्या असतील तर सगळय़ात आधी इंटेरियर करताना इलेक्ट्रिकच्या कामासाठी स्वतंत्र रकमेची तजवीज करून ठेवणे गरजेचे आहे. बरं, फक्त आपण खूप पैसे खर्च केले म्हणजे आपले काम व्यवस्थित होते का? तर त्यासाठी योग्य व्यक्तीच्या हातात काम आहे ना? ती व्यक्ती कोणते सामान वापरत आहे? या बाबींवरदेखील आपण स्वत: किंवा आपल्या इंटिरियर डिझायनरने लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वाचे!
जर आपण इंटिरियर डिझायनर नेमलेला नसेल आणि आपण स्वत:च कामावर देखरेख करणार असू तर काही मुद्दे आपल्याला माहीत असावेत.
१) आपल्या लाइटच्या मीटरपासून ते घरातील DB अर्थात डिस्ट्रिब्युशन बॉक्सपर्यंत मुख्य केबलद्वारे वीज पोहोचवली जाते, पुढे ती आपल्या घरात फिरवली जाते. ही केबल अखंड असावी आणि चांगल्या दर्जाची देखील.
२) MCB अर्थात मिनिएचर सर्किट ब्रेकर ही एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असून, सगळय़ात जास्त धोक्यांपासून हीच आपल्याला वाचवू शकते. MCB च्या वापराने घरातील टीव्ही, फ्रिज, एअर कंडिशनर तसेच वॉशिंग मशीन इत्यादी वस्तू विजेच्या वर-खाली होणाऱ्या दाबापासून वाचतात. त्याचप्रमाणे मोठी आग लागली असता सर्किट ब्रेक होऊन पुढील वीजपुरवठा खंडित होत असल्याने पुढील अनर्थ टळतो.
३) इंटिरिअर करत असताना इलेक्ट्रिक कामाला प्राधान्य देऊन त्या कामासाठी एक वेगळी रक्कम योजून ठेवावी, वायिरग करताना फक्त चांगल्या दर्जाच्या वायर घेऊन उपयोग नाही तर त्यांचा वापरदेखील योग्य प्रकारे व्हायला हवा. उदा. वायिरग करताना शक्यतो ते संपूर्णपणे बदलावे, अर्धे जुने वायिरग आणि मग थोडे नवीन आणि त्यातून दिलेले जोड अतिशय धोकादायक ठरू शकतात. नव्या-जुन्या वायिरगची सांगडच घालायची झाल्यास, प्रत्येक जोडावर जंक्शन बॉक्स देणे क्रमप्राप्त ठरेल.
४) काही वेळा इंटिरिअर करताना अगदी शेवटच्या क्षणी काही पॉइंट्स रद्द करावे लागतात किंवा नंतर वापरू असा हिशेब केला जातो, पण त्याचे वायिरग तर झालेले असते, मग बरेचदा अशा वायर्सना फॉल्स सीलिंगमध्ये किंवा पॅनिलगमागे लपवले जाते. काही वेळा इलेक्ट्रीशियन तरबेज नसेल तर त्या चालू वायिरग वर टेप गुंडळतो आणि टाकतो झाकून, पण हे धोकादायक ठरू शकते, म्हणूनच प्रत्येक न वापरला गेलेला पॉइंट मुख्य डिस्ट्रीब्युटर (distributer) पासून तोडला गेला पाहिजे.
याव्यतिरिक्त घरातून बाहेर पडताना विजेचे मुख्य स्वीच बंद करणे, गॅसची जोडणी बंद करणे इत्यादी गोष्टी आहेतच. गेल्याच आठवडय़ात बातमी होती उंदराने दिव्याची वात पळवली आणि घराला आग लागली, तरी अशा गोष्टींचीदेखील दखल रोजच्या आयुष्यात घेतलीच पाहिजे.
अपघात झाल्यावर त्यापासून बचावाच्या नक्की किती संधी आपल्याला मिळतील हे सांगू शकत नाही, पण अपघात घडूच नयेत यासाठी मात्र वरील लहान-सहान, पण महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे बऱ्यापैकी सोपे आहे की नाही?
(इंटिरिअर डिझायनर)
gouripradhan01@gmail.com
आगीपासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी..
इमारतीची अग्नी सुरक्षा ही बाब सुरक्षा क्रमातील सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणून गणली जाते.
Written by गौरी प्रधान
First published on: 07-05-2022 at 01:16 IST
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House safe fire fire safety mock drill situation test amy