‘‘किती छान अंगणासारखी मोकळी जागा आहे हो तुमच्याइथे. बच्चे कंपनीही मस्त मातीत खेळण्यात रमलीय. खूप दिवसांनी असं चित्र बघायला मिळतंय.’’ आमच्या घरी येणाऱ्या जवळपास प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया असते. त्यातून चित्राची चौकट रेखाटली गेल्यावर त्यात रंग भरण्याचा मोह मला आवरता येईना!
भूतकाळाची दारं उघडत अर्धशतकाचा उंबरठा ओलांडल्यावर बैठय़ा चाळ संस्कृतीने डोकं वर काढलं. आपल्या पुढय़ात अंगण घेऊन दारं सताड उघडी टाकत चाळी नांदत होत्या. अंगण हे सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दिवसभर ते लाड-कौतुकात न्हाऊन निघायचं. तांबडं फुटायच्या आधीच हे अंगण डोळे चोळत जागं व्हायचं ते सडासंमार्जनाने. शुभ्र रांगोळीच्या रेघेने हे सडे सजवले जायचे आणि न्हाऊमाखू घालून तीट-काजळ लावलेल्या तान्ह्य़ा बाळाप्रमाणे अंगण गोजिरवाणं वाटू लागायचं. मृद्गंधाने लपेटलं जायचं आणि मांगल्याने सजायचं. सूर्यदेव डोंगरामधून वर यायचे आणि कोवळ्या सोनसळी रंगाने अंगण चमकू लागायचं. घरात काम सुचू न देणारी बालगोपाळ मंडळी आजी-आजोबांचं बोट धरून किंवा हट्टाने कडेवर बसून अंगणात पाऊल टाकायची. जसजसा दिवस वरती येऊ लागायचा, तसतसं अंगण या शैशवाला अंगाखांद्यावर खेळण्यात मग्न होऊन जायचं, चैतन्याने भरून जायचं. रुसवेफुगवे, रडणं, भांडणं, चिडवाचिडवी, मारामारी अशी छोटी छोटी अस्त्रं बाहेर यायची. ‘आवाज की दुनिया’ तिथे रंगायची. सूर्य डोक्यावर आला की चटके बसल्यामुळे सगळी पावलं घरात वळायची. उद्योग-व्यवसाय, शाळा-कॉलेज या निमित्ताने गडबडीत असलेले अंगणाकडे डोळेझाक करत जा-ये करत राहायचे. अंगण शांतपणे पहुडायचं, विश्रांती घेत चिडीचूप व्हायचं. कोणीही नाही असं बघून कडेला अंग चोरून उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्यांचा आपापसातला खेळ वाऱ्याच्या लुडबुडीने मग चालू व्हायचा. माध्यान्हीचा हुरहुर लावणारा काळ सरला की, अंगणात पुन्हा जान यायची. लहानथोरांचे खेळ सगळं अंगण व्यापून टाकायचे. क्रिकेटच्या धावा वाढत जायच्या. कधी चेंडू अंगणाची लक्ष्मणरेषा ओलांडून उघडय़ा दारातून आत घुसायचा. ‘फोर’ किंवा ‘सिक्सर’ने धावसंख्या फुगायची, पण घरात महाभारत घडायचं. ‘घर’ सेना खेळणाऱ्यांच्या अंगावर चाल करून यायची आणि शाब्दिक युद्ध पेटायचं. खेळण्यावर त्या दिवसापुरती बंदी आणण्याचा व दुसऱ्या दिवशी बंदी उठवण्याचा तह व्हायचा. तेवढय़ापुरता ‘राग’रंग वेगळा असायचा. ठिक्कर, दोरीच्या उडय़ा, दगड की माती, डबा ऐसपैस, लपाछपी, सायकलिंग हे अहिंसक खेळ खेळत वेगवेगळे गट आपल्या अंगणातल्या हक्काविषयी जागृत राहायचे. ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचे ते कार्टे’ या म्हणीला न्याय देण्यासाठी काही जागरूक माता गप्पांचे नाटक करत एक डोळा आपल्या बाब्यावर ठेवून असायच्या. ‘मातीत खेळू नकोस’ असं भलतंच सांगितलेलं न जुमानता चिल्लीपिल्ली मातीशी चांगलीच गट्टी करायची. आपल्याच नाही तर आपल्या सवंगडय़ाच्या डोक्यात ही माती घातली जायची. मग पाठीत धम्मक लाडू व चापट पोळीचा खुराक मिळायचा आणि बेसूर वाजंत्री लावत ‘फ्रेश’ व्हायला खाशा स्वाऱ्या घराकडे वळायच्या. सगळी वानरसेना अंगणात यथेच्छ बागडायची.
दिवेलागण झाली की मात्र दमूनभागून सगळी पावलं गुपचूप घराकडे वळायचीच. ‘सातच्या आत घरात’ येण्याच्या कायद्याचे अगदी कसून पालन केले जायचे. अंगण एकदम शांत, ध्यानस्थ वाटायला लागायचे. घराघरातून ऐकू येणाऱ्या ‘शाब्दिक’ चळवळीकडे जणू ते त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहात राहायचे. सगळे दिवे मालवले गेल्यावर अंगण चंद्रप्रकाशात गुडूप व्हायचे सकाळची वाट बघत. उंदीर, घुशी, भटकी कुत्री यांचं राज्य चालू व्हायचं.
हा झाला अंगणाचा सर्वसाधारण दिनक्रम. परंतु उन्हाळा आला की अंगणाचा भाव एकदम वाढायचा. परीक्षा आटोपल्यावर शाळांना सुट्टय़ा लागायच्या. वानरसेनेच्या रूपात सगळी वानरसेना हाताशी असायची. ‘नुरल्या सगळ्या त्या साठवणी’ हा सूर घरातून वज्र्य असायचा. अंगणात दिवसभर मुक्कामाला येणाऱ्या चकचकीत, कडक उन्हाकडे गृहिणीचे डोळे लागलेले असायचे. वाळवण साठवण करण्याचे तिचे आवडते दिवस हजेरी लावायचे. नवीन धान्य बाजारात आलेलं असायचं. खास पैशाची तरतूदही असायची. यावर्षी काय जास्त आणायचं, काय कमी आणायचं याचं गणित घरातल्या ज्येष्ठ अनुभवी स्त्रीच्या सल्ल्यानं सुटलेलं असायचं. गहू, चणाडाळ, तूरडाळ, कडधान्य घरात हजर व्हायचं. तांदळाला ऊन सोसत नसल्यामुळे अंगणात लोळायची त्याची इच्छा अपुरीच राहायची. बोरीक पावडर नाहीतर दिवेल अंगाला फासून दिवाळीनंतर लगेचच ते डब्यात जाऊन बसायचे.
अंगण स्वच्छ झाडून रंगीबेरंगी नऊवारी लुगडी अंथरली जायची. गहू, पिवळी धमक चणाडाळ, तूरडाळ, हिरवे मूग, तपकिरी मटकी, हिरवट तपकिरी कडवे वाल शेजारी शेजारी शेकायला बसायचे. त्या रंगांच्या उधळणीने अंगण सजायचं. रोज सकाळी सगळ्या धान्यांच्या गाठोडय़ांना ते अंगण कवेत घ्यायचं. मनसोक्त ऊन खाऊ घालायचं. अंधार पडायच्या आधी तृप्त मनाने गाठोडी घरात शिरली की अंगणाला कृतकृत्य वाटायचं. मग साबुदाण्याच्या चिकोडय़ा नंबर लावायच्या. आपला स्थूलपणा, ओघळणारी काया कमी करण्यासाठी ‘अंगण’ ब्युटिपार्लरमध्ये त्या सोलर एनर्जीची ट्रीटमेंट घ्यायचं. लेकीसुना, पोरीबाळी सगळ्यांचे हात त्यासाठी पुढे यायचे. ठराविक जाडीच्या, आकाराच्या, ठराविक अंतर राखून घातलेल्या चिकोडय़ांचे डिझाइन अंगावर मिरवायला अंगणाला फार आवडायचे. चिकोडय़ांमध्ये चांगलाच बदल घडून यायचा आणि पारदर्शी व्यक्तिमत्त्व तयार व्हायचं. बटाटय़ाचा कीस मात्र चिकटपणाने किसणीला चिकटून बसत नाराजी व्यक्त करायचा. रागाने बारीक होत कडकपणाकडे झुकायचा. अंगणाने ऐकवलेल्या समजुतीच्या चार गोष्टींकडे दुर्लक्ष करून, हाताळणाऱ्या हातांना हुळहुळणारी वेदना देत शेवटी डब्यात जाऊन बसायचा. कुरडय़ा मात्र पटापट सोऱ्यातून सुटका करून घेत उन्हात बसकण मारायच्या. ओळखता येणार नाही अशी ‘झिरो फिगर’ दाखवायच्या. ‘तळ्यात की मळ्यात’ असं म्हणत खाणाऱ्यांच्या तोंडातून सुटका झाली तर डब्यात बसायच्या. कोहाळ्याचे सांडगे आले की अंगणाला विशेष अप्रूप वाटायचे. भरलेल्या मिरच्यांच्या तिखटपणावर मात्र अंगणाची काहीच मात्रा चालायची नाही. लाल मिरच्या आणि फोडलेल्या हळकुंडांचे ‘हळद-कुंकू’ लावून घेतले की अंगण धन्य व्हायचे. सर्वात शेवटी पापडांचा नंबर लागायचा. गोल गोल पापडांचा हलका-फुलका तागा अंथरला की अंगण अगदी चवदार व्हायचे. सगळे सभासद घरात मुक्कामाला गेले की मगच अंगण शिकेकाईला प्रवेश द्यायचे. इतकं ऊन दाखवायचे की कुरकुरीत होऊन त्या ‘नको नको आता पुरे’ करत कुरकुरत राहायच्या. येणारे जाणारे शिंकत राहायचे, अंगण आपली मजा बघत राहायचे. या सगळ्या धामधुमीत घरातली बच्चे कंपनीची फौज, ‘तळे राखेल तो पाणी चाखेल’ या अटीवर अंगण सुरक्षेसाठी तैनात व्हायची. मग अर्धवट वाळलेल्या, ओल्या कुरडय़ा, सांडगे, कीस, पापड यांनी त्यांची तोंडं हलत राहायची. आपलं वैभव न्याहाळत अंगण खूश व्हायचं. आटोपशीर पातेल्यात तोंडाला फडकं बांधून छुंदा येऊन बसला की शेवट गोड झालेला बघून अंगण विश्रांत व्हायचं. मग काय गाद्या, उशा लोळायला हजर.
नंतर मात्र अंगण अगदी उघडं पडायचं. उन्हाच्या तीव्रतेने त्याची काहिली व्हायची. वाराही पडलेलाच असायचा. पावसाच्या सरींची वाट पाहणं चालू व्हायचं. अचानक काळे ढग आकाशात गोळा व्हायचे. वाऱ्याची धांदल उडायची. तो सैरावैरा धावत सुटायचा. अंगणातली माती वाऱ्याबरोबर उडायची. गोल फिरायची. अंगणाची दयनीय अवस्था व्हायची. पण सुखद गारव्याला बिलगून चार थेंब पडायचे. त्याच्यापाठोपाठ सरी धावत येऊन भेटायच्या. मृद्गंध वातावरणात उधळला जायचा. सगळे लहानथोर अंगणातल्या पहिल्या पावसाचं कौतुक करायला बाहेर यायचे. छोटी कंपनी तर ‘आई मला पावसात जाऊ दे’ म्हणत अंगणात नाचायची. ओलेत्या अंगणाचं रूप डोळ्यात भरायचं. पावसाचा जोर वाढायचा. उखडलेल्या अंगणात छोटी छोटी तळी निर्माण व्हायची. मग काय होडय़ांचा गृहोद्योग तेजीत चालायचा. पाण्यात होडी सोडून तिच्या मागोमाग थबकथबक करत जाण्यात बालगोपाळ दंग व्हायचे. अंगण चैतन्याने न्हाऊन निघायचे. वरून झरझर पडणाऱ्या पांढऱ्या गोजिऱ्या पागोळ्या खाली येऊन वरती उसळायच्या. छोटंसं कारंज उडायचं आणि साचलेल्या पाण्यात विरत जाणारे तरंग उमटायचे. अंगणातलं हे विलोभनीय दृश्य बघायला गॅलरीतल्या कठडय़ावर रेलून कोणीतरी सतत उभंच राहायचं. अंगणात कडेला असलेली झाडं आपल्या पानांवरचा मोत्यांचा साज अंगणात रिता करायची. अंगणातला पाऊस पायऱ्यांवर बसून बघताना मनामनात शिरायचा.
पावसाने अंगणाची अगदी दुर्दशा व्हायची. मग सामुदायिक श्रमदान करून अंगण ठाकठीक केलं जायचं. मातीत खेळण्याची ही संधी कोणीही चुकवायचे नाहीत. शेणाचा सडा शिंपला जायचा. अंगण पूर्वस्थितीला यायचं. नवरात्रातील नऊ दिवस भोंडला बघण्यासाठी सज्ज व्हायचं. मधोमध हत्ती काढलेला पाट, धरलेला फेर, म्हटलेली गाणी, खिरापतीचा जल्लोष याने अंगण शोभायमान दिसायचं. सगळ्यांना कोजागिरीचे वेध लागायचे. नीटनेटक्या अंगणात घराघरातून सतरंज्या, चटया आणून अंथरल्या जायच्या. हौशी कलाकारांच्या सुश्राव्य गायनाने शरदाचे चांदणे सुरेल व्हायचे. गप्पांमध्ये रात्र सरून जायची. अंगणातल्या निळ्याभोर आकाशातल्या चांदण्या पांघरून झोपण्याचा मोह कितीजणांना आवरायचा नाही.
सोनपावलांनी दिवाळी यायची. अंगणाचं भाग्य उजळून निघायचं. लहान मुलांची किल्ला करण्याची गडबड सुरू व्हायची. अंगणातला कोपरा सर्वाचे लक्ष वेधून घ्यायचा. इतिहास जिवंत व्हायचा. प्रत्येकाच्या दारापुढे गेरूचे चौकोन आखले जायचे. मुलीबाळी अगदी माना मोडून ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरायच्या. पणत्यांच्या ओळीने अंगणाला सोनेरी किनार लाभायची. आकाशकंदिलातील रंगछटा अंगणात उतरायची. त्या रंगलेल्या, सजलेल्या अंगणाचं रूपडं मनात भरायचं. फटाक्यांच्या आवाजाने ते थरारून जायचं, तर भुईचक्र, अनार त्याला रिझवायचे. अंगणातल्या प्रकाशोत्सवात चाळ लखलखायची.
शिशिरातल्या पानगळीने अंगण वाळक्या पानांनी भरून जायचं. उघडंबोडकं होत सतत कुरकुरायचं. फाल्गुनात अंगणात होळी पेटली की सगळा कचरा तिच्यात विसर्जित व्हायचा. स्वच्छ झालेलं अंगण वसंत स्पर्शासाठी आतूर व्हायचं. एखाद्या घरात लग्न, मुंज असं धार्मिक काय असेल तर अंगणभर मांडव टाकला जायचा. ताशे-वाजंत्री वाजत राहायचे. माणसांनी अंगण फुलून यायचं. कधी आवळी भोजनाची अंगतपंगत बसायची. घरातल्या कोणत्याही पिढीला कंटाळा आला, वेळ जात नाही, असा प्रश्न पडायचाच नाही. ती जबाबदारी अंगणानं आपल्या शिरावर घेतलेली असायची.
या सगळ्या आनंदाला एखाद्या ‘मृत्यू’ने मात्र गालबोट लागायचं. सगळे सोपस्कार अंगणाच्या साक्षीने पार पडायचे. वातावरण शोकमग्न व्हायचं. अंगण त्या दिवशी चिडीचूप असायचं. कोणीही बाहेर फिरकायचं नाही. हळूहळू गाडी रुळावर यायची. अंगण चैतन्याने नेहमीप्रमाणे भरून जायचं.
एखाद्या स्वतंत्र बंगल्याभोवतालचं अंगण असेल तर दुधात साखरच. कुशल माळ्याच्या देखरेखीखाली फळाफुलांनी ते बहरून यायचं. घरामागील अंगण ‘परसू’ म्हणून ओळखलं जायचं.
वैज्ञानिक प्रगती झाली, तशी चाळी नामशेष होऊ लागल्या. बंद दारांची ब्लॉक सिस्टीम उदयाला आली आणि अंगण वाळून जाऊ लागलं. कुठे असलं तरी पायाला माती लागू नये म्हणून सिमेंट किंवा दगडी फरश्या टाकण्यात आल्या. सगळी जागा पार्किंगने व्यापून टाकली. औषधाला म्हणून एखाद्या ठिकाणी अस्तित्वात असले तर दृक्श्राव्य माध्यमासाठी आवर्जून त्याचा उपयोग होऊ लागला. सर्वसाधारणपणे ‘अंगण संस्कृती’ कालौघात नामशेष झाल्यामुळे ‘अंगणी माझ्या घराच्या’ हे शब्द ओठावर येईनासे झाले, हे मात्र खरं!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा