वास्तुकलेचा तांत्रिक अभ्यास व कलेची जोड असलेला आर्किटेक्ट आपल्या गृहबांधणीसाठी विविध बाजूंचा विचार करून आपल्या जीवनशैलीशी सुसंगत अशा रचनेची मांडणी करतो.
आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ती वास्तू आपल्या आवडीनिवडी, सोयीसुविधा व आपल्या जीवनशैलीशी मिळतीजुळती असावी, अशी प्रत्येकाची इच्छा व अपेक्षा असते. अशा वेळेस, आपल्या इच्छाआकांक्षा समजून घेऊन, वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करून व बांधकाम तंत्रज्ञान व कलेचा संगम घडवून त्याचे सुंदर वास्तुकृतीत रूपांतर करण्याकरिता प्रोफेशनल मदत प्रत्येकजण शोधत असतो. अशा इच्छाअपेक्षा साकार करणारी व आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करणारी एक जाणकार संवेदनशील व्यक्ती असते, एक ‘आर्किटेक्ट’. वास्तुकलेचा तांत्रिक अभ्यास व कलेची जोड असलेला आर्किटेक्ट आपल्या गृहबांधणीसाठी विविध बाजूंचा विचार करून आपल्या जीवनशैलीशी सुसंगत अशा रचनेची मांडणी करतो. परंतु, बहुतांश लोक स्वत: घर बांधत नाहीत व एखाद्या बिल्डर डेव्हलपरकडून तयार बंगला किंवा फ्लॅट विकत घेतात. अशा गृहप्रकल्पांच्या आर्किटेक्टशी घर घेणाऱ्या व्यक्तीची ओळखसुद्धा होत नाही व आपल्या घराची निवड स्वत:ला करावी लागते. अशा वेळी काय पाहावं?
आपण जेव्हा घर घेतो, बंगला बांधतो, रो-हाऊस बांधतो किंवा अनेक मजली इमारतीत छोटासा फ्लॅट घेतो, तेव्हा प्रथम विचार केला जातो तो आसपासच्या परिसराचा- लोकॅलिटीचा! नक्की घर कुठं असावं हे ठरवताना आपला धर्म, शिक्षण, संस्कृती, कामाच्या ठिकाणापासूनचे अंतर, शेजार-पाजार याचा विचार असतोच. आजच्या जागतिकीकरणामुळे तर घर कुठं असावं, आपल्या देशात की परदेशात, मोठय़ा गजबजलेल्या शहरात की छोटय़ा निवांत गावात, उंच इमारतीत की बैठय़ा घरात, इथपासून विचार सुरू होतो- तो दररोजच्या जीवनाशी निगडित गरजांपर्यंत (शाळा, शॉपिंग, हॉस्पिटल, खेळण्यासाठी जागा, क्लब इ.) येऊन पोहोचतो.
अर्थात, सर्व बाबींपेक्षाही महत्त्वाचा घटक असतो तो आपल्या आर्थिक कुवतीचा. आपल्याला परवडणाऱ्या किमतीचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो. घराच्या किमतीच्या किती प्रमाणात कर्ज मिळते, व्याजदर, पैसे परत करण्यासाठी मिळणारा वेळ-कालावधी सर्वच बाबींचा समतोल विचार करणं आवश्यक असतं व ते व्यक्तीनुसार बदलत जाणारं गणित असतं. आपल्याला एखादं घर खूप आवडतं, त्या घरात आनंद मिळतो. थोडक्यात, तिथं ‘घरपणा’चा अनुभव येतो. त्या उलट एखाद्या घरात आपण रिलॅक्स होऊ शकत नाही, सर्व सुखसोयी असल्या तरी आपल्याला तिथं छान वाटत नाही. असं का घडतं? एक आर्किटेक्ट या नात्यानं मला वाटतं, एखाद्या घराला घरपण देण्यासाठी, नुसती वास्तू न राहता- घराचा ओलावा, माया, सुरक्षितता आपल्याला जाणवते ती आपल्या पंचेंद्रियांमुळे.
१) दृष्टी (डोळे)- घराच्या बाहेरील-आतील रचना जर आपल्या डोळय़ांना सुखावह होत असतील तर तिथली रंगसंगती, रचना, प्रसन्न वातावरण प्रथम जाणवतं ‘दृष्टी’ला.
२) कान- आजूबाजूच्या परिसरातून येणारे आवाज-वाहतुकीचे, रहदारीचे, गोंगाटाचे आहेत की येणाऱ्या वाऱ्याचे, पक्ष्यांचे, पाण्याचे आहेत यावरूनही आपलं मत बनतं.
३) नाक- एखाद्या वातावरणात एखादा वास असतो. त्याची कधीकधी आपल्याला विशेष जाणीव नसते. पण ‘वास’ हा एक महत्त्वाचा घटक असतो, फुलांचा, मातीचा, स्वच्छ हवेचा सुगंध आपल्या वृत्ती प्रफुल्लित करतो, तर कचरा, प्रदूषण, गटारे, अस्वच्छता इ.मुळे एखाद्या वातावरणात नकोसे वाटते.
४) स्पर्श- गुळगुळीत भिंती, थंडगार जमिनी, मऊ गाद्या, लाकूड, लोखंडाचं फर्निचर प्रत्येकाच्या स्पर्शाची एक जादू असते. गुळगुळीत भिंती, विटांच्या भिंती, खरखरीत दिसणाऱ्या वाळूच्या भिंती, ओबडधोबड दगडांच्या भिंती- प्रत्येकाला स्पर्श झाला नाही, तरी आपल्यावर त्यांचा खूप प्रभाव पडतो.
५) चव (test)- अगदी शब्दार्थानुसार गेल्यास हा शब्द चुकीचाच वाटेल. पण मथितार्थ पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीची टेस्ट-आवडनिवड ही वेगळी असते.
वरील विवेचनावरून लक्षात येईल, की ज्या घरात आपल्या ज्ञानेंद्रिय/ पंचेंद्रियांचे आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार समाधान होते ते घर आपल्याला घरपणाचा अनुभव देते.
‘पंचेंद्रियांचं समाधान’ हा मुद्दा आपण वर पाहिला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बांधलेल्या घराचा उद्देश काय? त्याची अपेक्षित कार्ये कोणती? आपण घर आपल्या आनंदासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुखसोयीसाठी बांधतो आहोत की आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी इ.वर आपले इम्प्रेशन/ प्रभाव पडावा म्हणून त्याप्रमाणे रचना करतो आहोत? याचा प्रत्येक व्यक्तीचा हेतू वेगवेगळा असू शकतो. तुमच्या गरजा, हेतू या आर्किटेक्टला समजल्यावर संपूर्ण घराची रचना, रंगसंगती, घरातील खासगी वापरासाठीचा भाग व घराबाहेरील व्यक्तींनी वावरण्यासाठीचा भाग, घरात येणाऱ्या-जाणाऱ्यांचे मार्गाचे नियोजन वेगळय़ा पद्धतीनं केलं जावं. घरातील खासगी वापरासाठीचे भाग (उदा., स्वयंपाकघर, बेडरूम, धुण्याभांडय़ासाठी लागणारी छोटी जागा, बाल्कनी, व्हरांडा, वेगळय़ा पद्धतीनं, वापरणाऱ्या व्यक्तींच्या जीवनशैलीनुसार घडवले, सजवले जातात. आर्किटेक्ट्सचा अनुभव असा आहे की बराच जास्त पैसा- इंटिरिअर करण्यात, लोकांवर इम्प्रेशन मारण्यासाठीच वापरला जातो. कधीतरी येणाऱ्या पाहुण्यांसमोर मिरविण्यासाठी खर्च करण्यापेक्षा, दररोज आपल्या बरोबर राहणाऱ्या, वावरणाऱ्या कुटुंबीयांसाठी, त्यांच्या सोयीसाठी जास्त पैसा खर्च झाला तर घराला घरपण येणं सहज शक्य होतं. ते ‘आपलं घर’ होतं.
स्वत: मी आर्किटेक्ट म्हणून विचार करतो, तेव्हा मला पुढे दिलेले प्रश्न महत्त्वाचे वाटतात. त्याची उत्तरं जर ‘हो’ आली तर तुम्हाला हवं असणारं प्रेम, जिव्हाळा, ओलावा देणारं ‘घर’ तुमचं असावं.
१) दिवसभर काम करून थकून भागून आलेल्या व्यक्तीला चार निवांत क्षण घरात मिळतील अशी घराची रचना आहे का?
२) माझ्या जीवनशैलीनुसार मला सहज वावरता येईल असं हे घर आहे का?
३) माझ्या घराबाबत स्वप्नांची, इच्छांची पूर्तता बहुतांशी होते असं हे घर आहे का?
४) घरातील लहान मुलं, वृद्ध, वयस्कर व्यक्ती आणि मी स्वत: आम्हाला या घरात सुरक्षित वाटतं का?
५) हे घर ‘माझं’ आहे, असं सांगताना तुम्हाला अभिमान वाटतो का?
अर्थात, आपल्या वास्तूला घरपण हवं असेल तर कवयित्री विमल लिमये यांनी म्हटल्याप्रमाणे असावं,
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम, जिव्हाळा, नकोत नुसती नाती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा