संस्थेमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी वेगळे टॉयलेट आहे. गेली ११ वर्षे सभासदांचे ड्रायव्हर सदर टॉयलेट वापरत आहेत व ते इमारतीखाली असणाऱ्या बाकांवर बसतात, म्हणून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना टॉयलेट वापरण्यास बंदी केली आहे. तसेच बाकांवर ते बसू नयेत म्हणून बाकडीदेखील उचलण्यात आली आहेत, हे पदाधिकाऱ्यांचे वागणे बरोबर आहे काय?
– शरद भाटे, नौपाडा, ठाणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर हा प्रश्न कायदेशीर नसून तो पूर्णपणे संस्थेच्या अखत्यारीमधील प्रश्न आहे. आपल्या गृहनिर्माण संस्थेतील बहुसंख्य सदस्यांना सदर टॉयलेट ही ड्रायव्हरना वापरायला दिली तर चालणार असतील, तसेच सदर बाकांचा उपयोग त्या ड्रायव्हरनी करावा असे जर बहुसंख्य सदस्यांना वाटत असेल, तर असे वाटणाऱ्या सदस्यांनी याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी निवेदन द्यावे व याबाबत बदल करण्याची विनंती करावी. ही विनंतीही पदाधिकाऱ्यांनी फेटाळली तर वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यासाठी हा विषयसूचीवर आणावा व बहुमताने आपल्याला हवा तसा ठराव मंजूर करून घ्यावा. कारण संस्थेच्या बाबतीत वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्वोच्च अधिकार असतात. मात्र हे करताना पुढील गोष्टी पाहाव्यात.
१) बहुसंख्य सदस्यांचे काय मत आहे? २) बहुसंख्य सदस्यांनी या मागणीवर सह्या केल्या आहेत ना? ३) सभासदांच्या मागणीवरूनच ही कारवाई पदाधिकाऱ्यांनी केलेली नाही ना?
नाही तर आपला ठराव फेटाळला जायचा. गृहनिर्माण संस्थेत वैयक्तिक मतापेक्षा बहुमताचा आदर करावा.

भाडेकरूंनी इमारतीचा पुनर्विकास कसा करावा?
– अशोक परब, ठाणे.

भाडेकरूंना खरे तर इमारतीचा पुनर्विकास करण्यासंबंधी काही हक्क पोचत नाही. इमारत मालकाने जर आपल्या इमारतीचा पुनर्विकास करायचा ठरवले तर त्यावेळी भाडेकरूंचा संबंध त्या ठिकाणी येतो. किंवा म्हाडातर्फे उपकर लागू असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वेळी भाडेकरूंना आपले वास्तव्य सिद्ध करावे लागते. त्यामुळे त्यांनी इमारतीचा पुनर्विकास कसा करावा, हा प्रश्नच उद्भवत नाही.

इमारतीच्या पुनर्विकासासाठी किती सभासदांची परवानगी मिळणे आवश्यक असते?
– अशोक परब, ठाणे.

या ठिकाणी मालकीतत्त्वावरील गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करायचा आहे, हे गृहीत धरल्यास किमान ३/४ सभासदांची परवानगी मिळणे आवश्यक असते.

इमारतीला पार्किंगच्या बाबतीत काय नियम आहेत?
– अशोक परब, ठाणे.

आपली इमारत कशी आहे? किती जुनी आहे? त्यात किती मोकळी जागा उपलब्ध आहे, यावरून आपल्या इमारतीला पार्किंगचे कोणते नियम लागू होतील हे ठरवता येईल. नवीन इमारतीमध्ये मात्र आवश्यक तेवढी पार्किंग स्पेस ठेवणे गरजेचे असते, तसेच व्हिजिटरनासुद्धा पार्किंग ठेवणे आवश्यक आहे. ते सारे नियम या ठिकाणी देणे शक्य नाही.
घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स
०२२-२५४१६३३६, २५४००६५९

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing real estate housing societies guidance