भाग पत्र / भाग दाखला हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाचा अधिकृत व सर्वमान्य सभासदत्वाचा ग्राह्य पुरावा आहे.
अलीकडच्या काळात जन्म दाखला, मृत्यू दाखलाइतकाच महत्त्वाचा आहे सदनिकेचा भाग दाखला. म्हणजेच भाग पत्र, भाग प्रमाणपत्र किंवा शेअर सर्टििफकेट. भाग पत्र / भाग दाखला हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाचा अधिकृत व सर्वमान्य सभासदत्वाचा ग्राह्य पुरावा आहे. सदनिका खरेदी, गृह कर्ज, गहाण / तारण व हस्तांतरणासाठी अत्यंत आवश्यक अशा भाग पत्र / भाग दाखल्याची आदान-प्रदान पद्धत, सुरक्षितता व गहाळ झाल्यास प्रतिलिपी प्रत (डय़ुप्लिकेट) मिळण्यासाठी अनुसरावयाची वैधानिक कार्यपद्धती सर्वाना माहीत असणे गरजेचे आहे. राज्यातील गृहनिर्माण संस्थांसहित अन्य सर्व सहकारी संस्थांचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ नुसार चालतो. सहकार खात्यातर्फे सन २००९ – २०१० मध्ये नवीन आदर्श उपविधी प्रसिद्ध करण्यात आले. वास्तविक पाहता, या आदर्श उपविधीमध्ये व अधिनियम १९६० व नियम १९६१ मध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व मुद्दय़ांबाबत कार्यपद्धतीचे व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा काही महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत अधिक स्पष्टीकरण देणे राहून गेले आहे. त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाग पत्र (शेअर सर्टििफकेट) व त्याची प्रतिलिपी प्रत (डय़ुप्लिकेट) मिळण्यासाठी अनुसरावयाची वैधानिक कार्यपद्धती. त्याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊ :–
० भाग (शेअर) – व्याख्या व मिळणाऱ्या सवलती –
भागाची व्याख्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ तसेच आदर्श उपविधीमध्ये कोठेही देण्यात आलेली नाही. परंतु कंपनी कायदा, १९५६ यातील कलम २ (४६) मध्ये त्याची व्याख्या देण्यात आली आहे. भाग म्हणजे संस्थेच्या भांडवलातील हिस्सा, जो सभासदांनी धारण केलेला असतो. त्याला भाग (शेअर) असे म्हणतात. जेथे इतर मालमत्ता (स्टॉक) व भाग (शेअर) यात फरक सुचविलेला नसेल, तेथे भाग या शब्दात इतर मालमत्तेचाही अंतर्भाव होतो. कंपनी कायदा १९५६ च्या कलम ८२ प्रमाणे भाग किंवा कंपनी असलेल्या सभासदांच्या इतर संबंधांस जंगम मिळकत समजण्यात येते. त्यामुळे सक्तीच्या नोंदणीत हे बसत नाही. हाच नियम सहकारी संस्थांच्या भागांना लागू असल्यामुळे संस्थेचे भाग व ऋणपत्रे यासंबंधीच्या लेखांना सक्तीच्या नोंदणीतून वगळण्यात आले आहे.
सहकारी संस्थांना ज्या काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत, त्यापकी सक्तीच्या नोंदणीपासून माफी ही महत्त्वाची सवलत आहे. दुसरी सवलत म्हणजे भाग किंवा हितसंबंध जप्तीस पात्र नसणे.
काटकसरीस उत्तेजन देणे हे सहकारी चळवळीचे मूलभूत तत्त्व आहे. या तत्त्वास अनुसरून सहकारी संस्थेच्या भाग भांडवलात गुंतवलेल्या बचतीस, न्यायालयाच्या जप्ती हुकुमापासून सूट देण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाच्या जप्ती हुकुमाची सूट ही सभासद जोपर्यंत अस्तित्वात असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचा विद्यमान सभासद असतो, तोपर्यंत उपलब्ध असते.
० संस्थेच्या सभासदत्वासाठी व्यक्तींनी पूर्ण करावयाच्या अटी (उपविधी नियम क्र. १९ (अ)) – सभासद होण्यास पात्र असलेल्या व विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करणाऱ्या कोणाही व्यक्तीने (अट क्र. १) अर्जासोबत कमीत कमी १० भागांची रक्कम पूर्णपणे भरली पाहिजे.
० संस्थेचे सभासद होऊ इच्छिणाऱ्या कॉर्पोरेट बॉडीजनी पूर्ण करावयाच्या अटी-
(उपविधी नियम क्र. १९ (ब)) – (अट क्र. २) त्यांनी सभासदत्वासाठीच्या अर्जासोबत किमान २० भागांची संपूर्ण रक्कम भरली पाहिजे.
टीप : अशा रीतीने सर्व अटींची पूर्तता केल्यावर संस्थेने भाग पत्र न दिल्यास निबंधकाकडे अर्ज करून कलम ७९ (२) नुसारची कार्यवाही निबंधकास करण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
० संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध वारसदारास अथवा कायदेशीर प्रतिनिधीस किंवा अन्य व्यक्तींच्या नावे हस्तांतरण करताना अन्य कागदपत्रांबरोबरच भाग पत्र जोडणे अत्यंत आवश्यक असते.
टीप : १) सभासदत्वासाठी अगर संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरणासाठी आलेला कोणताही अर्ज अधिनियम, नियमावली किंवा संस्थेचे उपविधी किंवा शासनाने आपल्या कायदेशीर अधिकारात केलेला अन्य कोणताही कायदा किंवा काढलेल्या आदेशात नमूद केलेल्या तरतुदींची पूर्तता व अन्य सर्व कागदपत्रे तपासून कार्यकारी समिती योग्य ती कार्यवाही करील व त्यानंतरच सभासदत्व / हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करील.
२) संस्थेची कार्यकारी समिती- ज्यांना सभासदत्व बहाल करण्यात आले आहे किंवा हस्तांतरण करण्यात आले आहे त्यांची नावे नोंदणी पुस्तकात व भागांच्या नोंदणी पुस्तकात नोंद करील. अधिनियमाच्या कलम ३८ अन्वये प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने एक नोंद वही ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सदस्यांची यादी नमुना जे व सदस्यांचे नोंदणी पुस्तक यात फरक आहे. सदस्य नोंदणी पुस्तक हे ‘आय’ नमुन्यात ठेवण्यात येते. या नोंदणी पुस्तकात सदस्यांचे नाव, त्याचा पत्ता व व्यवसाय तसेच त्याने भागभांडवल धारण केले असल्यास त्याची संख्या इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
३) नियम ६५ प्रमाणे प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेने भागांचे नोंदणी पुस्तक (शेअर रजिस्टर) ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
४) त्यानंतरच संस्थेची कार्यकारी समिती सभासदत्व प्राप्त झालेल्या / हस्तांतरण झालेल्या व्यक्तींच्या गाळा / सदनिका / दुकान यांच्या भागपत्रावर आवश्यक त्या नोंदी व फेरफार करून तसेच पदाधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यासहित प्रमाणित करून भागपत्र देण्याची व्यवस्था करील.
० भाग पत्र – भाग पत्र हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्वाचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हा साधारणत: जाड पेपरवर छापलेला असतो. त्यावर संस्थेचे संपूर्ण नाव, नोंदणी क्रमांक व दिनांक लिहिलेला असतो. वरच्या बाजूस भाग पत्र क्रमांक, सभासदाचा नोंदणी क्रमांक इत्यादी माहिती असते.
प्रत्येक सभासदाने अंशदान केलेल्या भागाचा दाखला संस्थेने त्याचे भाग मंजूर केल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्यास नोंदणी पुस्तकात व भागांचे नोंदणी पुस्तकात नोंदविण्यात आलेले भिन्न अनुक्रमांक (डििस्टकटिव नंबर्स), सभासदाचे संपूर्ण नाव, त्याने घेतलेल्या भागांची संख्या व त्यापोटी भरलेली रक्कम दर्शविणारे भागपत्र संस्थेच्या मंजूर उपविधीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देण्यात येईल.
प्रत्येक भाग पत्रावर संस्थेच्या नावाचा शिक्का (सील) उठविण्यात येईल व त्यावर संस्थेचा अध्यक्ष, सचिव आणि समितीने रीतसर अधिकार दिलेला कोणीही एक समिती सदस्य, यांच्या त्यावर सह्या व भाग पत्र दिल्याची तारीख असेल. संस्थेच्या सचिवाकडून सभासदास भाग पत्र देण्यात येईल व स्थळप्रतीवर सही घेण्यात येईल.
० सुरक्षितता – भाग पत्र दीर्घकाळपर्यंत सुस्थितीत राहण्यासाठी काही सभासद लॅमिनेशन करून घेतात. परंतु ते गरसोयीचे आहे. कारण हस्तांतरण प्रक्रियेच्या वेळी भाग पत्राच्या मागील बाजूस नवीन नावे, अनुक्रमांक इत्यादी लिहून पदाधिकाऱ्यांच्या सह्या करावयाच्या असतात. त्यामुळे, भाग पत्र प्लास्टिकच्या कव्हर्समध्ये ठेवणे फायदेशीर ठरेल. भाग पत्र आपल्या वैयक्तिक महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत कपाटात अथवा लॉकरमध्ये ठेवल्यास सुरक्षित राहील.
० मूळ भाग पत्र गहाळ झाल्यास – (१) सभासदाने मूळ भाग पत्र गहाळ झाल्याबद्दलची लेखी तक्रार व त्याचबरोबर डय़ुप्लिकेट भाग पत्र देण्याची विनंती करणारा अर्ज संस्थेच्या सचिवाकडे द्यावा.
(२) सोबत रुपये २००/- च्या मुद्रांक पेपरवर हमीपत्र (इंडेम्निटी बॉन्ड) घ्यावे.
(३) सभासदाने मूळ भाग पत्र गहाळ झाल्याची लेखी तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवावी व तक्रार मिळाल्याबद्दलची पोहोचपावती / प्रमाणपत्र घ्यावे.
(४) सभासदाने मूळ भाग पत्राबाबत कोणा व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा हक्क दावे व आक्षेप
मागविण्यासाठी जास्त खपाच्या कमीत कमी दोन स्थानिक वर्तमानपत्रांत विहित नमुन्यात वकिलामार्फत जाहीर सूचना प्रदíशत करावी. तसेच त्याची एक छायांकित प्रत संस्थेच्या सूचना फलकावर प्रदíशत करावी.
(५) जाहीर सूचनेत प्रदíशत केल्याप्रमाणे जर दिलेल्या पुरेशा कालावधीत कोणा व्यक्ती किंवा व्यक्तींकडून कोणत्याही प्रकारचा हक्क दावे व आक्षेप न आल्यास जाहिरातीत नमूद केलेल्या सभासदास डय़ुप्लिकेट भाग पत्र देण्यास हरकत नसल्याचे समजण्यात येईल.
(६) जाहीर सूचनेत नमूद केल्याप्रमाणे दिलेल्या पुरेशा कालावधीत कोणा व्यक्ती किंवा व्यक्तींकडून हक्क दावे व आक्षेप न आल्यास सभासदाने संबंधित वकिलाकडून ना हक्क / हरकत प्रमाणपत्र घ्यावे.
टीप : ( बऱ्याच सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदाचे वर्तन, विश्वासार्हता, कौटुंबिक पाश्र्वभूमी व सत्यता पडताळून फक्त अर्ज व हमीपत्राच्या आधारे डय़ुप्लिकेट भाग पत्र देतात.
० संस्थेची अपेक्षित कार्यवाही :–
तक्रारदार सभासदाने संस्थेच्या सचिवाकडे मूळ भाग पत्र गहाळ झाल्याबद्दलची तक्रार व डय़ुप्लिकेट भाग पत्र मिळण्यासाठी केलेला लेखी विनंती अर्ज व हमीपत्र दिल्यानंतर पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेली मूळ भाग पत्र गहाळ झाल्याबद्दलच्या लेखी तक्रारीची पोहोचपावती / प्रमाणपत्र व वकिलाकडून प्राप्त झालेले ना हक्क / हरकत प्रमाणपत्र संस्थेच्या सचिवाकडे द्यावे. संस्थेचा सचिव, सभासदाकडून प्राप्त झालेला अर्ज व त्यासोबतची सर्व कागदपत्रे संस्थेच्या कार्यकारी समितीच्या पुढील बठकीत ठेवण्याची व्यवस्था करील. समिती सभेत सर्व कागदपत्रे पडताळून तक्रारदार सभासदाचे मूळ
भाग पत्र गहाळ झाल्यामुळे सदरहू डय़ुप्लिकेट भाग
पत्र देण्यात येत आहे. तसेच विद्यमान कार्यकारी समिती पदाधिकाऱ्यांना त्यावर सही व शिक्का
मारून प्रमाणित करून देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. याअर्थीचा ठराव मंजूर करील. त्यानंतर संस्थेच्या नोंदणी पुस्तकात व भागांचे नोंदणी पुस्तकात त्याबाबत रीतसर नोंद करण्याची खबरदारी
घेईल. त्यानंतरच तक्रारदार सभासदाला पदाधिकाऱ्यांच्या सही व शिक्यासहित डय़ुप्लिकेट भाग पत्र देण्यात येईल. सभासदाला डय़ुपप्लिकेट भाग पत्र देताना संस्थेचा सचिव खालीलप्रमाणे काळजी घेईल :–
(१) सभासदाला डय़ुप्लिकेट भागपत्र देताना डय़ुप्लिकेट हा शब्द भाग पत्राच्या वरच्या बाजूला ठळकपणे लिहावा.
(२) भाग पत्राच्या वरच्या बाजूस एका बाजूला हे डय़ुप्लिकेट भागपत्र मूळ भाग पत्र सभासदाच्या हातून गहाळ झाल्याच्या बदली देण्यात येत आहे, असे ठळकपणे नमूद करावे.
(३) डय़ुप्लिकेट भाग पत्र हे मूळ भाग पत्राची हुबेहूब नक्कल असावी व सर्व नोंदी त्याचप्रमाणे असाव्यात.
(४) संस्थेच्या भाग पत्र नोंदणी पुस्तिकेच्या स्थळप्रतीवरदेखील ़हे डय़ुप्लिकेट भाग पत्र मूळ भाग पत्र सभासदाच्या हातून गहाळ झाल्याच्या बदली देण्यात येत आहे, असे ठळकपणे नमूद करावे.
तसेच डय़ुप्लिकेट भाग पत्र मिळाल्याबद्दलची पोहोचपावती म्हणून स्थळप्रतीवर संबंधित सभासदाची सही घ्यावी.
विश्वासराव सकपाळ – vish26rao@yahoo.co.in
सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट
भाग पत्र / भाग दाखला हा सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदाचा अधिकृत व सर्वमान्य सभासदत्वाचा ग्राह्य पुरावा आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-07-2015 at 01:06 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Housing society share certificate