सदनिकेचा सज्जा, बंगल्यावरची गच्ची अथवा प्रशस्त दिवाणखाना आणि तेथे ठेवलेल्या आकर्षक कुंडय़ा, हे चित्र कुणास नको असणार. सगळ्यांना जरी हे हवेहवेसे वाटत असले तरी त्यांचे असणे आणि नसणे हे प्रत्येकाच्या आíथक गणितावर अवलंबून आहे. मनात असूनही अशा लहान बागेची हौस पूर्ण करता आली नाही, तरी या सर्वाची एकमेव प्रतिनिधी म्हणून तुळस ही जवळपास सर्वाच्याच घरी असते. माहेर असो अथवा सासर, घरातील स्त्री वर्गाची अतिशय आवडती म्हणजे तुळस.
वास्तू आणि तुळस यांचा संबंध पुराणकाळापासून आहे. पूर्वी ग्रामीण भागात मातीची बठी घरे असत. घरातच गाईचा गोठा, बाहेर प्रशस्त अंगण आणि तेथे असलेले तुळशी वंृदावन सर्वाचे लक्ष वेधून घेत असे. वंृदावनातील डेरेदार तुळस ही घरातील गोकुळाचे प्रतिनिधित्वच करत असे. सकाळचा सडा-रांगोळी आणि सायंकाळचे निरांजन व शुभंकरोती हे घरोघरीचे चित्र होते. काळ बदलला, मातीच्या जागी विटा आणि सिमेंट आले, अंगण हरवले आणि सोबत तेथील तुळशी वृन्दावनही. पर्यावरण ऱ्हासाचे चटके आज आपण सर्वजण अनुभवत आहोत.
तुळस ही लहान गटात मोडणारी वनस्पती म्हणूनच ती कुंडीत छान दिसते. तिचे आयुष्य जेमतेम दोन र्वष असले तरी एक वर्षांपर्यंत ती छान फुलून भरपूर मंजिऱ्या देते. गॅलरीत अथवा स्वयंपाकघरालगतच्या सज्जात कुंडीत विसावलेली तुळस बंगलेवाल्यांच्या घरासमोर मोकळ्या सिमेंटच्या जागेत वृंदावनरूपात आढळते. अनेक लोक म्हणतात ‘तुळस आमच्याकडे वाढतच नाही.’ मात्र असे काही नाही. थोडी काळजी आणि प्रेम दिले तर ती अंगणात नसली तरी तुमच्या वास्तूमध्ये सुरेख डेरेदार होऊ शकते.
तुळशीचे रोप कुठेही उपलब्ध असते. मात्र, लावण्यापूर्वी ते लहान आणि निरोगी असावे. कुंडी उभी आणि मध्यम आकाराची असावी. आतील मातीमध्ये एक ओंजळ शेणखत मिसळावे. कुंडी काठोकाठ भरू नये. तुळशीचे रोप मुळांच्या मातीसह कुंडीच्या मध्यावर खोलगा करून लावावे. मातीवर व्यवस्थित दाब देऊन रोप उभे राहील याची काळजी घ्यावी व नंतर हलके पाणी दिल्यावर तुळस दोन दिवसांत स्थिरावते. तुळशीची वाढ तीन महिन्यांत पूर्ण होते त्यावेळी उंची अंदाजे दोन फूट असते. तिची वाढ सुरू असताना खालची मोठी पाने हलक्या हाताने नियमितपणे काढून खोडास थोडे मोकळे करावे. दर दोन आठवडय़ांनी वरचे एक-दोन शेंडे खुडल्यास त्याच्या खालून फांद्या फुटून तुळस डेरेदार होते. तुळशीची मंजिरी खालून वर उमलत जाते. पूर्ण उमल्यानंतर ती हळूच काढावी. तुळशीवर मंजिऱ्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास तिचे आयुष्य वाढते. एक-दोन मंजिरीमध्ये बिया तयार होऊ द्याव्यात. या बिया त्याच कुडीत खाली पडून त्यांची रोपे तयार होतात. मातृतुळस आणि तिची ही छान छान बाळे पाहणे हे एक विलोभनीय दृष्य असते. ही रोपे चार पानांची झाल्यावर कार्यक्रमाच्या रूपाने इतरांना वाटावी अथवा गृहसंकुलात लावावी. त्यांना उपटून फेकून देऊ नये. तुळशीस पाणी नियमित हवे, मात्र जेमतेम अर्धा पेला. दूधमिश्रित पाणी शक्यतो टाळावे. पाणी घालताना ते पानावर िशपडून नंतर कुंडीत घालावे. पाण्याची धार मोठी असल्यास मुळे उघडी पडतात. तुळशीस खताची गरज नसते आणि तिच्यावर कीडसुद्धा पडत नाही. पाणी दिल्यानंतर कुंडीमध्ये लाकडाच्या भुशाचा थर दिल्यास आपण तुळशीस घरी एकटे ठेऊन दोन-तीन दिवस गावीसुद्धा जाऊ शकता.
तुळस ही सुदृढ पर्यावरण आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तिच्या सहवासात ताणतणाव कमी होतो, मनाची एकाग्रता वाढते आणि मुलांचा अभ्यासही छान होतो, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. म्हणूनच अनेक आदर्श शाळांमधे तुळस बागेची कल्पना रूढ होताना दिसत आहे. हा प्रयोग मी आदिवासी भागात यशस्वीपणे राबवलासुद्धा आहे.
तुळस ही स्त्रीचे ऊर्जास्तोत्र आहे. ‘स्त्री आनंदी तर घर आनंदी’ म्हणूनच भारतीय संस्कृतीत तुळसभरल्या घराचे प्रतीक समजतात. या प्रतीकरूपी देवतेस प्रत्येक घरात सन्मानाचे स्थान मिळणे ही खरी पर्यावरण आणि निसर्गाची पूजा आहे. आणि अशा पूजेसाठी तुमच्या वास्तूपेक्षा दुसरे वेगळे देवालय ते कोणते असणार!
मैत्र हिरवाईचे : अंगणी तुळस डेरेदार
सदनिकेचा सज्जा, बंगल्यावरची गच्ची अथवा प्रशस्त दिवाणखाना आणि तेथे ठेवलेल्या आकर्षक कुंडय़ा, हे चित्र कुणास नको असणार. सगळ्यांना जरी हे हवेहवेसे वाटत असले तरी त्यांचे असणे आणि नसणे हे प्रत्येकाच्या आíथक गणितावर अवलंबून आहे.
आणखी वाचा
First published on: 08-06-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of basil