श्रीनिवास भा. घैसास
मालमत्तेच्या वारसासंबंधी शंका उभी राहू नये, एखादा दस्त हरवल्यास त्याची पोलीस तक्रार करून वर म्हटल्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध केल्यास निश्चितपणाने प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीचा हेतू स्वच्छ होता हे निर्विवादपणे सिद्ध होईल आणि संबंधित मालमत्तेचे मालकी हक्क निर्धोक होण्यास निश्चितपणे मदत होईल. ही जाहिरात वकिलामार्फत प्रसिद्ध केल्यास अधिक चांगले असते व अशा जाहिरातीवर कोणत्याही हरकती आल्या नसल्याचा वकिलाचा दाखलादेखील घेऊन ठेवता येतो, तोदेखील खूप फायदेशीर ठरतो. एका छोट्या चुकीचा विपर्यास होण्याच्या अगोदरच अशा प्रकारे आपण जाहिरात दिली तर निश्चितपणाने आपणाला फायदा होईल असे वाटते.
आपण जेव्हा जेव्हा वृत्तपत्रे चाळतो किंवा पेपर वाचत असतो त्या वेळेला आपल्या असे लक्षात येते की, त्यामध्ये अनेक प्रकारच्या जाहीर नोटिशी प्रसिद्ध झालेल्या असतात. आपण नोटिशीचे पान हे फारसे न चाळता पुढील पाने वाचण्यास घेतो, मग कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो की या नोटिशींचा उपयोग काय? आणि म्हणूनच सामान्य माणसाच्या मनातून याबद्दलच्या शंका काढून टाकण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न!
वृत्तपत्रात अनेक प्रकारच्या नोटिसा प्रसिद्ध होतात. त्यामध्ये विविध ठिकाणी असणाऱ्या नोकर भरतीच्या नोटिसा असतात, अनेक सार्वजनिक कामांच्या बांधकाम निविदा प्रसिद्ध केलेल्या असतात, तसेच अनेक कंपन्यांचे बँकांचे वार्षिक अहवाल, वार्षिक ताळेबंद हेदेखील प्रसिद्ध केलेले असतात. अर्थात तसे करणे हे कायद्याने बंधनकारक असते, त्यामुळे आपण त्या नोटिशींचा विचार या ठिकाणी करणार नसून, आपण या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला ज्या नोटिसा द्याव्या लागतात त्यांचा विचार करणार आहोत.
हेही वाचा >>> आपल्या अग्निसुरक्षेची जबाबदारी आपलीच!
आपण ज्या नोटिसांचा विचार करणार आहोत त्या प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाने दिलेल्या नोटिसा आहेत. त्या नोटिसा व त्याचे उद्देश याबद्दलची माहिती आपण समजावून घेणार आहोत. कित्येक वेळा अनेक प्रकारच्या न्यायालयांच्या नोटिसादेखील वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. या नोटिसांमधून एखाद्या पक्षकाराचा पत्ता मिळत नसेल तर त्याला समजण्यासाठी, एखाद्या मालमत्तेचा लिलाव असेल तर त्याची माहिती देण्यासाठी… अशा प्रकारच्या नोटिसा प्रसिद्ध होत असतात. याशिवाय नावात बदल, धर्मात बदल, अशा अर्थाच्यासुद्धा नोटिसा प्रसिद्ध होत असतात. अर्थात या सर्व नोटिसा कायद्याने प्रसिद्ध करणे बंधनकारक असते आणि म्हणूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात आता त्या संबंधित लोकांपर्यंत पोहोचतात किंवा नाही किंवा त्याची दखल घेतली जाते किंवा नाही हा एक वादाचा विषय होऊ शकतो; परंतु तो आपल्या लेखाचा विषय नाही त्यामुळे आपण या ठिकाणी त्यावर चर्चा करणे उचित नाही.
सर्वसामान्य माणसावर नोटीस प्रसिद्ध करण्यासाठी ज्या वेळा येतात त्या पुढील प्रमाणे :-
१) एखादी व्यक्ती हरवली असेल तर
२) एखाद्या व्यक्तीचा पत्ता सापडत नसेल तर
३) एखादी मालमत्ता विकत घ्यायची असेल व त्यामध्ये अन्य कोणाचे हितसंबंध आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर
४) एखाद्या व्यक्तीला त्याने जाहीर केलेल्या वारसा व्यतिरिक्त अन्य कोणी वारस नसेल तर
५) एखाद्या मालमत्तेचे दस्तऐवज हरवले असले तर
६) एखाद्या गृहनिर्माण संस्थेचे भाग प्रमाणपत्र हरवले असले तर
७) एखाद्या मालमत्तेसंबंधी असणारी कागदपत्रे आगीमध्ये जळून खाक झाली असतील अथवा पुरामध्ये वाहून गेली असतील तर
८) एखाद्या व्यक्तीशी संबंध तोडले असले तर
९) एखाद्या मालमत्तेवर कागदोपत्री नोंद झालेला काही हक्क निर्माण झाला असेल तर
१०) एखाद्या मालमत्तेत आपला हक्क आहे, आपल्याला विचारल्याशिवाय त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे तमाम जनतेला कळवायचे असेल तर… या व अशा अनेक छोट्या-मोठ्या कारणांसाठी सामान्य माणसालादेखील जाहीर नोटिसा द्याव्या लागतात, त्याबद्दल काही हरकती असल्यास त्या मागवण्यासाठी वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागतात.
आता अशा प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध केल्यानंतर देखील अनेक वेळेला वादविवाद निर्माण होतात, अनेक जण एखाद्या मालमत्तेवर ताबा सांगतात, अनेक जण आपण यांचे वारस असल्याचा दावा करतात, अनेक जण या मालमत्तेत आपली सहमालकी असल्याचा दावा करतात, अशा प्रकारच्या नोटिसा प्रसिद्ध करून झालेल्या व्यवहारांना देखील नंतर हरकत घेतली जाते. मग असे सारे होत असताना या पेपरला जाहीर नोटीस प्रसिद्ध करून काय फायदा होतो? असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे साहजिक आहे. परंतु हा फायदा जरी दृश्य स्वरूपात दिसत नसला तरीसुद्धा निश्चित स्वरूपात असतो त्याचे कारण म्हणजे जेव्हा जेव्हा एखाद्या पक्षकाराकडून अशा प्रकारची जाहीर नोटीस एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते, त्या वेळेला एक गोष्ट निश्चितपणाने सिद्ध होते की ज्या पक्षकाराने ही नोटीस प्रसिद्ध केली आहे त्याचा हेतू स्वच्छ आहे की त्याला कुणाला फसवायचे नाही. किंबहुना तो करत असलेला व्यवहार अथवा त्याने स्वत: केलेले कथन हे तो स्वत:हून प्रसिद्ध करत असतो व त्याला कुणाच्या हरकती आहेत का त्या मागवत असतो. यावरून त्याचा प्रामाणिकपणा निश्चितपणाने सिद्ध होतो किंवा त्याचा हेतू स्पष्ट आहे हेदेखील त्याला सिद्ध करणे सोपे होते आणि त्यामुळे त्या पक्षकाराला याबाबत न्यायालयीन खटला दाखल झाला तर त्याची बाजू त्याला भक्कमपणे मांडता येते आणि त्यासाठी ही वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली नोटीस कामी येते. त्याचा फायदा कसा होतो हे आपण काही उदाहरणे घेऊन पाहूया.
समजा एखाद्या व्यक्तीला एखादी मालमत्ता विकत घ्यायची आहे. त्याने त्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा शोध घेतला व त्याला ती निर्धोक अशी आढळली. असे असले तरीसुद्धा समजा ती जमीन असेल तर त्याच्यावर बेदखल कुळाचा हक्क असू शकतो. किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याचा वहिवाटीचा रस्ता त्या जमिनीतून जात असतो. अशा प्रकारचे हक्क मालकी हक्काचा शोध घेताना दिसून येत नाहीत, मग असे हक्क आहेत का यासाठी ज्या ठिकाणी सदर मालमत्ता असेल त्या भागात ज्याला जिल्हा वृत्तपत्र अशी मान्यता असेल व ते स्थानिक भाषेत प्रसिद्ध होत असेल, ज्याचा विशिष्ट खप असेल अशा वृत्तपत्रात त्याने जाहिरात दिली व त्याला कोणताही प्रतिसाद आला नाही, कोणीही व्यक्तीने असा हक्क असल्याचा दावा केला नाही व त्यानंतर सदर व्यक्तीने तो व्यवहार पूर्ण केला. ती मालमत्ता विकत घेतली. त्यानंतर जर कोणी अशा प्रकारचा हक्क असल्याचा दावा करू लागला तर त्या वेळी कोर्टामध्ये विकत घेणाऱ्या पक्षकाराची बाजू ही निश्चितपणाने भक्कम होते. जी गोष्ट एखाद्या मालमत्तेवरील हक्कासंबंधी असते, तर एखाद्या मालमत्तेला ती जर वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर त्याला वारस किती याची खात्री करून घेण्यासाठीदेखील ज्ञात असणारे वारस वगळता अन्य कोणी वारस आहेत का याची माहिती करून घेण्यासाठी देखील वृत्तपत्रात जाहिरात दिली जाते. जेणेकरून जाहिरात देणाऱ्या पक्षकाराचा हेतू स्पष्ट होतो व त्याची बाजू भक्कम होते. कित्येक वेळा आपण एखादी मालमत्ता ज्यामध्ये जमीन, दुकान, गाळा, सदनिका आदीचा समावेश होतो. अशा प्रकारे खरेदी केलेल्या व त्यावेळी बनवलेले दस्तऐवज किंवा एखाद्या गृहनिर्माण संस्थेने आपल्या नावाने दिलेले भागप्रमाणपत्र ज्याला आपण इंग्रजीमध्ये शेअर सर्टिफिकेट असे म्हणतो असे हे भागप्रमाणपत्र कित्येक वेळा नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ, आग लागणे, पूर येणे, यामध्ये नष्ट होतात अशा नष्ट झालेल्या दस्तऐवजांमधील जे दस्तऐवज नोंदणीकृत असतील त्यांची सत्यप्रत आपणाला संबंधित निबंधक कार्यालयाकडून प्राप्त करून घेता येते. परंतु या ठिकाणी एक संशयाला जागा उरतेच की, अशा प्रकारचे दस्त किंवा भाग प्रमाणपत्र हे एखाद्या वित्त संस्थेकडे गहाण टाकून त्यावर कर्ज काढून सदर दस्त किंवा भाग प्रमाणपत्र हे हरवले आहे गहाळ झाले आहे, पुरामध्ये वाहून गेले आहे, आगीमध्ये नष्ट झाले आहे अशा प्रकारचा दावा संबंधित पक्षकारांकडून केला जातो व त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते. अशावेळी सावधगिरी म्हणून सदर मालमत्ता विकत घेणारा पक्षकार अशा प्रकारची जाहिरात देऊन याबद्दल खात्री करून घेऊ शकतो. तसेच यासाठी अशी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून त्यावर कोणत्याही हरकती प्राप्त झाल्या नाहीत अशा प्रकारचे सर्टिफिकेट अथवा दाखलादेखील संबंधित वकिलाकडून पक्षकार घेऊन ठेवू शकतो. याचा फायदा संबंधित पक्षकाराला जर या व्यवहारासंबंधी एखाद्या न्यायालयात खटला दाखल झाला तर या जाहिरातीचा निश्चितपणे फायदा होतो. एखाद्या गृहनिर्माण संस्थेबद्दल बोलायचं झाल्यास एखाद्या सदस्याने संस्थेकडे अशा प्रकारे दुय्यम प्रतीतील भाग प्रमाणपत्राची मागणी केली तर संस्था देखील अशा प्रकारची जाहिरात देऊन त्यावरील हरकती मागवू शकते. अर्थात याचा खर्च संबंधित पक्षकाराला करणे आवश्यक असते. अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जर वर्णन केलेले दस्तऐवज अथवा भागप्रमाणपत्र हे हरवले असतील तर संबंधित पोलीस ठाण्यात त्यासंबंधी तक्रार दाखल करून त्याचा नंबरदेखील वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये नमूद करणे इष्ट ठरते. अशा प्रकारे एखाद्या संबंधित स्थानिक भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्रात जर अशा प्रकारची जाहिरात दिली, त्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये केलेल्या तक्रारीचा क्रमांक नमूद केला व जाहिरात देणाऱ्या वकिलांकडून त्यावर कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्याचा दाखला घेतला तर निश्चितपणे संबंधित पक्षकाराची बाजू भक्कम होते. त्याचा यामागील हेतू शुद्ध होता- ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटेंशन असे म्हणतो ते साफ होते हे या जाहिरातीमुळे निश्चितपणे सिद्ध होते.
कित्येक वेळा वडिलोपार्जित मालमत्तेतील सर्व वारसांची माहिती उघड केली जात नाही. काही मुलींची लग्नं पुष्कळ पूर्वी झालेली असतात. काही जण त्या ठिकाणी राहत नसतात, मग अशावेळी संबंधित मालमत्तेला निश्चितपणे किती वारस आहेत हे ठरवणे कठीण असते. त्यासाठी खरं तर वारस दाखला घेणे आवश्यक असते. परंतु हे काम खूपच खर्चीक असते. प्रत्येकाला ते परवडतदेखील नाहीत. मग त्यावेळी आपण दिलेली माहिती सत्य आहे हे जाहीर करण्याकरतादेखील अशा प्रकारे जाहिरात दिली जाते. पुष्कळ वेळा बँका अथवा वित्तीय संस्था देखील एखाद्या मालमत्तेवर कर्ज देताना अशा प्रकारची जाहिरात देतात व त्यासंबंधी कोणाच्याही लेखी हरकती अथवा दावे प्राप्त न झाल्यास संबंधितांना कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण करतात. या ठिकाणी देखील ही जाहिरात देण्यामागे संबंधित बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा हेतू स्वच्छ आहे हे सिद्ध करण्यास ही जाहिरात साहाय्यभूत ठरते.
कित्येक वेळा संबंधित पक्षकार अशी जाहिरात ही स्थानिक वृत्तपत्रात तर देतातच त्याशिवाय त्या भागातून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्रजी वृत्तपत्रातसुद्धा देतात. अशा प्रकारे एकाहून अनेक वृत्तपत्रात जाहिरात दिली तरी काही बिघडत नाही. झाला तर उलटा फायदाच होतो, परंतु कायद्याने स्थानिक भाषेमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात देणे हे इष्ट ठरते. तसे ते कायद्याने बंधनकारकदेखील आहे. कित्येक वेळेला एखाद्या मालमत्तेच्या मालकी हक्काचा शोध घेताना देखील काही कागदपत्रे उपलब्ध नसली अथवा गहाळ झाली असली तर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध करून त्या मालमत्तेच्या हक्कासंबंधी शोध घेतला जातो.
म्हणूनच ज्या ठिकाणी एखादा दस्तऐवज उपलब्ध नसेल, एखादा दस्तऐवज हरवला असेल, एखादा दस्तऐवज नैसर्गिक कारणामुळे नष्ट झाला असेल, तर त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अशा प्रकारे जाहिरात दिल्यास संबंधित पक्षकार आपली बाजू भक्कम करू शकतात. त्यांच्यावर फसवणूक केल्याचा किंवा फसवणूक करण्याचा इरादा असल्याचा आरोप करता येत नाही हा या वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा मुख्य फायदा आहे. आता सर्वसाधारणपणे कोणत्या वृत्तपत्रात अशी जाहिरात प्रसिद्ध करावी याबाबत काही मापदंड ठरवण्यात आले आहेत ते असे-
१) हे वृत्तपत्र स्थानिक भाषेत प्रसिद्ध होणारे असावे.
२) हे वृत्तपत्र नोंदणीकृत असावे. या वृत्तपत्राला किमान जिल्हा वृत्तपत्राचा तरी दर्जा असावा.
३) त्या वृत्तपत्राचा संबंधित भागात बऱ्यापैकी खप असावा.
४) इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात द्यावयाची असल्यास ते वृत्तपत्रदेखील संबंधित एरियामध्ये वितरित होणारे असावे.
अशाप्रकारे एखाद्या मालमत्तेच्या वारसासंबंधी शंका उभी राहू नये, एखादा दस्त हरवल्यास त्याची पोलीस तक्रार करून वर म्हटल्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्ध केल्यास निश्चितपणाने प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीचा हेतू स्वच्छ होता हे निर्विवादपणे सिद्ध होईल आणि संबंधित मालमत्तेचे मालकी हक्क निर्धोक होण्यास निश्चितपणे मदत होईल. ही जाहिरात वकिलामार्फत प्रसिद्ध केल्यास अधिक चांगले असते व अशा जाहिरातीवर कोणत्याही हरकती आल्या नसल्याचा वकिलाचा दाखलादेखील घेऊन ठेवता येतो, तोदेखील खूप फायदेशीर ठरतो. एखाद्या छोट्याशा चुकीचा विपर्यास होण्याच्या अगोदरच अशा प्रकारे आपण जाहिरात दिली तर निश्चितपणाने आपणाला फायदा होईल असे वाटते.
(वकील, उच्च न्यायालय आणि नोटरी भारत सरकार)
● ghaisas2009@gmail.com