घर खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी..
निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेच्या किमती पाहायच्या झाल्या तर मुंबईचे नाव नेहमीच आघाडीवर असते. गेल्या काही वर्षांमध्ये मालमत्तेच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे, जी जगातील काही महागडय़ा शहरांमधील मालमत्तांच्या किमतींशी स्पर्धा करते आहे. पण तरीही मुंबईत स्वत:चे घर असावे हे स्वप्न पाहणे काही सुटत नाही.
मालमत्ता खरेदी करणे ही एक मोठी गुंतवणूक असते आणि त्याकरिता पुरेसा वेळ देऊन जिथे मालमत्ता खरेदी करायची आहे त्या प्रकल्पाबद्दलची माहिती जमवणे आणि हे करताना रिअल इस्टेट बाजारातील चढ-उतार समजून घेणे गरजेचे असते.
घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या खरेदीदाराने लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी:
अंदाजपत्रक – अंदाजपत्रक म्हणजे फक्त मालमत्तेची किंमत नव्हे. त्यात वकिलाचे शुल्क, स्टँप डय़ूटी, रजिस्ट्रेशन फीज, गृह विम्याचे प्रीमियम्स आणि मालमत्ता कर अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाचाही समावेश असतो. विमा, ईएमआय, विविध सुविधांवरील खर्च, देखभाल आणि मालमत्ता कर अशा मासिक खर्चाचा हिशेब ठेवणे देखील गरजेचे असते. कोणताही व्यवहार पूर्णत्वाला नेण्याआधी घराच्या मूळ किमतीबरोबरच एक्स्टर्नल डेव्हलपमेंट चार्जेस (ईडीसी), प्रीफरेन्शियल लोकेशन चार्जेस (पीएलसी) यांसारखे खर्च लक्षात घेतले पाहिजेत. तुम्ही नवे घर खरेदी करत असाल तर तुम्हाला नवे फíनचर, फिटिंग्ज आणि उपकरणांची गरज लागणार आहे. त्या खर्चाचाही आधीच विचार करून ठेवायला हवा. तसेच, तुम्ही जुने घर घेत असाल तर नुतनीकरणाचा खर्च ध्यानात घ्यायला हवा. आपण किती खर्च करू शकू हे कळल्यावर आपला शोध मर्यादित होतो.
कोणताही व्यवहार करण्याआधी पशाची व्यवस्था करा. अटी आणि शर्ती असलेल्या कागदपत्रांच्या प्रती मिळवा आणि त्या काळजीपूर्वक पूर्ण वाचा.
घर असलेल्या ठिकाणाचे मूल्यांकन : जिथे मालमत्ता खरेदी करणार आहात तो प्रदेश किंवा स्थळ कालांतराने तुमचे मूल कोणत्या शाळेत जाईल, तुम्ही कोणत्या क्लबचे सदस्य व्हाल इत्यादी गोष्टी ठरवत असते. हे लक्षात ठेवून मालमत्तेभोवतालच्या जागेचे काळजीपूर्वक अवलोकन करणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेताना तिथे पोहोचण्याकरिता लागणारा वेळ, कार्यालयापर्यंत पोहोचण्याकरिता उपलब्ध असलेले परिवहन पर्याय या घटकांचाही विचार व्हायला हवा.
सखोल संशोधन आणि मूल्यांकन – खरेदी प्रक्रिया सुरू करण्याआधी पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना दिली जाते, ती म्हणजे डेव्हलपर्स आणि त्यांचे प्रकल्प, वित्त पर्याय, सुविधांवरील भर इत्यादी बाबींवर सखोल संशोधन करण्याची. डेव्हलपर्सचे आधीचे प्रकल्प, त्यांनी मालमत्तेचा ताबा वेळीच दिला की नाही इत्यादींचा तपास करणे हितावह ठरते. आता रिअल इस्टेट एजण्ट्स तसेच वेबसाइट्स व ब्लॉग साइट्सच्या माध्यमातून प्रकल्प आणि डेव्हलपर यांची माहिती मिळवता येणे शक्य झाले आहे.
सदनिकेच्या चटई/उभारणी क्षेत्राबद्दलची सुस्पष्टता – मालमत्तेत गुंतवणूक करण्याआधी डेव्हलपरकडून चटई क्षेत्र, उभारणी यांविषयीची सुस्पष्ट माहिती घेणे गरजेचे आहे. यामुळे तुमची सदनिका नेमकी किती ऐसपस किंवा लहान दिसणार आहे, याचा अंदाज येईल. चटईक्षेत्र जितके मोठे तितकी तुमची सदनिका प्रशस्त असते.
सुविधा आणि सेवांची खात्री – घर खरेदी करण्याच्या वेळी विविध प्रकारचे विक्री करार आणि ब्रोशर्समधून संभाव्य ग्राहकाला विविध सेवा आणि सुविधांची हमी दिली जाते. मालमत्तेच्या एकूण किमतीत या घटकांचाही सहभाग असतो. तुम्हाला ज्या गोष्टींचे आश्वासन दिले गेले आहे, त्या कितपत पूर्णत्वास पोहोचल्या आहेत याबद्दल नियमित तत्त्वावर चौकशी करत राहिल्याने अंतिम परिणाम काय असणार आहे, याची कल्पना खरेदीदाराला येण्यास मदत होते.
जमिनीसंबंधीची तसेच इतर कागदपत्रे – सदनिकेचा ताबा मिळण्यात विलंब होऊ नये म्हणून जमिनीसंबंधीची कागदपत्रे आणि ताब्याची प्रमाणपत्रे सरकार तसेच इतर अधिकृत संस्थांकडून दिली गेली आहेत, याची खात्री करून घेतली पाहिजे.
बांधकाम सुरू असणारा प्रकल्प – प्रकल्पाचे बांधकाम सुरू असेल तर निश्चित केलेली रक्कम आणि बांधकामाचे वेळापत्रक, गृह योजना, घर ताब्यात देण्याची तारीख आणि बांधकाम पूर्ण होण्यास विलंब झाल्यास किंवा सदनिकेचा ताबा घेतल्यावर काही समस्या उद्भवल्यास बिल्डरचे काय कर्तव्य बनते याचा समावेश असलेले अलॉटमेंट लेटर आणि विकास करार यांची मागणी केली पाहिजे.
बांधकाम पूर्ण झालेली मालमत्ता – बांधकाम पूर्ण झालेले असल्यास विक्रेत्याकडे मालमत्तेचे टायटल व पझेशन आहे आणि हस्तांतरणाचे अधिकार आहेत, याची खात्री करून घ्या. मालमत्ता कर, सोसायटी, पाणी आणि विजेची बिले इत्यादी भरली गेली आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या. सर्व संबंधित कागदपत्रे आणि मूळ अलॉटमेंट लेटर, कम्प्लीशन प्रमाणपत्र, ऑक्युपेशन प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे मूळ बिल्डरकडून मिळवल्याची खात्री करून घ्या.
घर खरेदी करण्याआधी तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये व्यवहारासंबंधी सर्व अटी व शर्ती आणि महत्त्वपूर्ण माहिती यांचा समावेश असलेला विक्री करार, किंमत योग्य आहे की नाही आणि तुमच्या अंदाजपत्रकात बसते की नाही, हे ठरवणारे सेल्स डीड यांचा समावेश आहे. तुमच्याकडे संबधित कागदपत्रे असणे हे दीर्घकाळाकरिता हितकारक ठरते.
अति घाई नको- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी करू इच्छीत असलेल्या मालमत्तेला वारंवार भेट देणे. तुमच्या आयुष्यातील पुढील काही वष्रे तुम्ही तिथे राहाणार आहात, त्यामुळे त्या जागेला किमान २-३ वेळा वेगवेगळ्या वेळी भेट द्या. तुम्हाला त्या जागेत काय अनुभव येतो आहे ते पाहा.
तुम्ही त्या जागेला आपले घर म्हणू शकता का? यावर आधारित वेगवेगळ्या मालमत्तांची एक प्राधान्य यादी बनवा. जागेची पाहणी करण्यास वेळ मिळाला नाही किंवा कोणाकडून दबाव येत असेल तर मालमत्ता खरेदी करण्याची घाई करू नका.
या सूचनांचे पालन केल्यास तुमच्या गरसोयींचा पूर्ण विचार होऊन तुमच्या पसंतीचे घर घेण्यास मदत मिळेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे रिअल इस्टेट डेव्हलपर्सचा दर्जा आणि पारदर्शकतेवर असलेला भर वाढतो आहे. तरीही घर खरेदी करताना वर निर्देशित सर्व घटकांचा विचार करून योग्य आणि प्रतिष्ठित ब्रँडची निवड करा. कारण प्रतिष्ठित डेव्हलपरचा आश्वासन-पूर्तीमधील ट्रक रेकॉर्डही तितकाच सातत्यपूर्ण असेल आणि प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने आश्वासनांची पूर्तता करणे, हे त्यांच्याकरिता अत्यावश्यक असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा