मैत्रेयी शिंदे

के काळी रिअल इस्टेट क्षेत्र हे खास पुरुषांचे म्हणून परिचित होते. परंतु गेल्या दहा वर्षांत या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी हे जुने चित्र पूर्णपणे बदलले आहे. गेल्या वर्षी क्रेडाईने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, जीडीपीत ६ टक्के वाटा असणाऱ्या भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल २३ टक्के महिला काम करतात. एके काळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रातील हा आकडा महिलांची सक्षमपणे काम करण्याचाच दाखला आहे. महिलांनी घेतलेली ही भरारी नक्कीच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल. इथे काम करताना महिलांनी खूप सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. महिलांची सक्षमपणे काम करण्याच्या पद्धती, आपुलकीने काम करण्याची मनोवृत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांनी या क्षेत्राला एक वेगळा आयाम दिला आहे असे जाणकार सांगतात. अर्थात त्यांना इथेही असमान वेतन, लिंगभेद यांसारख्या पारंपरिक अडचणींना सामोरे जावे लागत असतेच; तरीही त्या ठामपणे इथे पाय रोवून आहेत. हळूहळू याही समस्या हुशारीने हाताळण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. त्यातून हुशारीने मार्ग काढत आहेत.

रिअल इस्टेट क्षेत्रात ब्रोकर खूप महत्त्वाचा. अनेक ग्राहकांच्या गृह स्वप्नपूर्तीचे ते विश्वासाचे माध्यम. पूर्वी ब्रोकरचे काम फक्त पुरुषच करीत असत, परंतु गेल्या दहा वर्षांत अनेक महिला नेटाने इथे काम करीत आहेत. साधना या गेली अनेक वर्षे एक उत्तम ब्रोकर म्हणून काम करतात. त्या सांगतात, ‘‘सुरुवातीला काम करताना खूप अडचणी आल्या. ही बाई आपल्याला काय घर मिळवून देणार अशा साशंकतेनेच लोक माझ्याकडे पाहायचे. परंतु मी खचले नाही. हळूहळू या व्यवसायात जम बसवला. उलट माझ्या मध्यस्थीमुळे घर खरेदी करू शकलेली अनेक पुरुष मंडळी सांगतात की, ‘‘ताई, तुमच्यामुळे आम्हाला हवं तसं घर मिळालं.’’ मी ज्या लोकांना घरे मिळवून दिली आहेत ते अनेकांना माझंच नाव सुचवतात. हल्ली एकट्या राहणाऱ्या महिलांची संख्याही खूप आहे. माझ्या मध्यस्थीने घरे घेतलेली अनेक कुटुंबं त्यांच्या ओळखीतल्या महिलांना मोठ्या विश्वासाने माझं नाव सांगतात. मीही एक स्त्री असल्यानं अशा एकल महिलांना सुरक्षित घरं शोधून देते. कारण त्यांनी शहरात सुरक्षित राहावं ही मला माझी जबाबदारी असल्यासारखं वाटतं.

केवळ पुरुषच घर घेऊ शकतो हे गृहीतक आता पूर्णपणे बदललं आहे. घर खरेदी करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. एका अहवालानुसार, २०२० ते २३ या दरम्यान घर खरेदी करणाऱ्या महिलांमध्ये १६ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली. अगदी देशाच्या प्रमुख शहरांमध्ये महिला घर खरेदीदारांची संख्या वाढलेली दिसते. अर्थात यास महिला सक्षमीकरण, त्यांचा वाढलेला शैक्षणिक, आर्थिक स्तर, समाजाचा महिलांप्रति बदललेला दृष्टिकोन अशी अनेक कारणे आहेत. इतकंच काय तर या क्षेत्रात उद्याोजक महिलांची संख्याही वाढत आहे. एकूणच या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतो आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रात महिलांना कामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. यात एकट्या महिला गुंतवणूकदारांना घर खरेदी करण्यात मदत करण्यापासून ते अनुभवी व्यावसायिकांकडे वरिष्ठ पदावर काम करणे अशा अनेक कामांचा समावेश करता येईल. ग्राहकांना घर खरेदी करण्याची कारणे एखादी महिला ज्या आत्मीयतेने सांगू शकते त्याला तोड नाही असंही या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींचं म्हणणं आहे. परिणामी आगामी काळात या क्षेत्रात महिलांची संख्या वाढेल असेही जाणकार सांगतात. 

vasturang@expressindia.com

Story img Loader