प्रत्येक वनस्पती ही कुठल्यातरी एक अंगाने औषधी असतेच. तिच्या औषधी गुणधर्माचा योग्य पद्धतीने वापर करून रुग्णावर उपचार करणाऱ्या प्रशिक्षित व्यक्तीस वैद्य म्हणतात. आपल्या घरातसुद्धा आजी, आजोबा, जेष्ठ व्यक्ती यांना काही वनस्पतींच्या औषधी गुणधर्माची बऱ्यापकी माहिती असते. आजीबाईंचा बटवा हा घरगुती औषधप्रणालीमधूनच ऐकेकाळी ग्रामीण भागात खूप लोकप्रिय होता. आता ही संकल्पना बाद झालेली असली तरी या बटव्यातील काही वनस्पती अजूनही आपल्या गृहसंकुलात उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांना बाल्कनीमधील हसऱ्या बागेचा एक कोपरा सन्मानाने देणेही सहज शक्य आहे. घरातील अथवा शेजाऱ्याकडील एखाद्या व्यक्तीस झालेल्या लहानशा आजारावर अथवा घरगुती अपघातावर उपचार करण्यासाठी दिलेल्या हाकेस त्वरित प्रतिसाद देणारे हे वनस्पतीरूपी वैद्य म्हणजे तुळस, कोरफड, गवती चहा, पानओवा आणि आपल्या सर्वाचा आवडता गुलाब.
तुळशीची दोन-तीन ताजी पाने स्वच्छ धुऊन खाल्ली असता सर्दी, खोकला यावर प्रभावी ठरू शकतात. मनावरील ताण-तणाव तुळशीच्या सहवासात कमी होतो, चेहऱ्यावरील तारुण्यपिटिका, कातडीवरील डाग, खाज यावर तुळशीचे पान रगडले असता त्वरित फरक पडतो. कोरफड ही कुंडीमध्ये मांसल पानांच्या रूपात वाढणारी बहुगुणी वनस्पती आहे. तिच्या परिपक्व पानांमधील गर पोटाचे विकार, भाजणे यावर लगेचच्या घरगुती उपायांसाठी उत्तम, त्याचबरोबर केशवृद्धीसाठीसुद्धा छान.
गवती चहाची कुंडी ही चहाबाज लोकांना आव्हानच आहे. सकाळच्या पहिल्या वाफाळलेल्या चहात गवती चहाची दोन ताजी पाने चहाचा स्वाद तर वाढवतातच पण त्याचबरोबर सर्दी, खोकला यांनासुध्दा पळवून लावतात. चहा प्यायल्यानंतरची मनाची तरतरी आणि शारीरिक उत्साह कसा असतो हे अनुभवण्यासाठी गवती चहाचा स्वयंपाकघरात प्रवेश हा हवाच.
पानओवा ही अशीच पानांनी भरलेली कुंडी. पाने जाड, मांसल, पटकन तुटणारी आणि ओव्याचा सुगंध देणारी. अन्न पचनास प्रोत्साहन देणारा, अजीर्ण दूर करणारे औषधी गुणधर्म पान ओव्याच्या पानात दडलेले असतात आणि शेवटी आपला लाडका गुलाब. गॅलरीत भरपूर सूर्यप्रकाश असेल तर गुलाब फुलणारच. गुलाबाच्या कुंडीची काळजी घेताना त्यांच्या फांद्या नियमित कापणे गरजेचे असते, पण या फांद्यांना टाकून द्यावे का? मुळीच नाही. या ताज्या कापलेल्या फांद्यांचे लहान तुकडे करून त्याबरोबर थोडी मिरी, आल्याचे तुकडे आणि तुळशीची ताजी पाने यांना एकत्र पाच मिनिटे उकळले असता त्याचा उत्तम काढा तयार होतो. सर्दीमुळे होणाऱ्या डोकेदुखीवर हा हमखास उपाय आहे. या काढय़ात चवीला थोडी साखर टाकली असता ऊर्जा आणि उत्साह देणारे पेय तयार होते. चिनी लोक हे उत्साहवर्धक पेय कायम आपल्याजवळ ठेवतात. गुलाबांच्या पाकळ्यांपासूनचा गुलकंद आणि त्याबरोबर त्यांचा घरगुती फेसपॅकमधील वापर उन्हाळ्यात शरीरास थंडावा तर देतोच, त्याचबरोबर चेहऱ्यास सौदर्यसुद्धा.
बाल्कनीमधील बागेतील या औषधी वनस्पती कुठल्याही रोपवाटिकेत सहज उपलब्ध होऊ शकतात. तुळशीचा अपवाद वगळता इतर सर्व बहुवर्षीय असल्यामुळे लावल्यावर ३-४ वष्रे पाहण्याची गरज नाही. त्यांना पाणीही कमी लागते. मात्र कुंडीमध्ये त्या शोभून दिसाव्यात याकडे लक्ष हवे. गॅलरीमध्ये अर्थात कीटकनाशके आणि रासायनिक खतांना बंदी हवी. या वनस्पतीवर सहसा कीड पडत नाही आणि औषधप्रणालीमध्ये फक्त ताज्या पानांचा वापर असल्यामुळे ती काढल्यावरही त्यांची वाढही जोमाने होते.   
प्रदूषित हवा आणि वातावरणातील बदलामुळे होणारी सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, कापणे, खरचटणे, भाजणे सोबत अवेळचे जेवण, बाहेरचे खाणे त्यामुळे होणारे अपचन, आद्र्रतेमुळे येणारा घाम, जंतुसंसर्ग हे विविध रोगास आमंत्रणच असते त्यामुळे कुटुंबासाठी केलेल्या मासिक वैद्यकीय तरतुदीमध्ये बचत होण्यापेक्षा वाढीचीच शक्यता जास्त असते. म्हणूनच गृहसंकुलाबाहेर असलेल्या दवाखान्याची पायरी चढण्यापूर्वी आपण आपल्या बाल्कनीमधील या वैद्य मंडळीशी जरूर संवाद साधावा. मात्र त्यासाठी तुमच्याजवळ श्रद्धा, विश्वास आणि वनस्पतींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. गॅलरीमधील छोटीशी औषधी बाग ही फक्त वनस्पती संवर्धनाची पहिली पायरी नसून त्याचे आपल्या वास्तूमध्ये असणे हेसुद्धा तुमच्या कुटुंबाच्या सुदृढ आरोग्याचे दर्शक आहे, हे कसे नाकारणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा