आपल्या घरांच्या, बांधकामांच्या िभती आरस्पानी झाल्या तर? आपल्या वास्तू आसपासच्या पर्यावरणाचा भाग होताना बेमालूमपणे मिसळून गेल्या तर? जागतिक पर्यावरणदिनाच्या (५ जून) निमित्ताने ग्रीन बििल्डग किंवा पर्यावरण अनुकूल इमारती बांधण्याच्या विविध प्रयोगांविषयी..
ए खादी इमारत किंवा बांधकाम कसं असावं याचे आपले काही आडाखे असतात. वर्षांनुर्वष आपण पाहात असलेल्या वास्तूंचे संस्कार आपल्या मनावर होत असतात आणि त्यातूनच आपली ही वास्तू-अभिरुची घडत जाते. गेल्या काही दशकांपासून मात्र बहुआयामी विचार करण्याच्या पद्धतीतून अनेक नव्या पद्धतींच्या इमारती दिसू लागल्या आहेत.
कोणतंही बांधकाम – राहती घरं असोत किंवा कार्यालयांच्या इमारती, कारखाने किंवा वाहतूक सुलभ करणारे पूल, हे त्याच्या भवतालाच्या आणि त्या बांधकामाचा वापर करणाऱ्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम करत असतात. त्यासाठीच प्रत्येक इमारत बांधताना अनेक बाजूंनी विचार केला जातो. ती इमारत कुठे आहे? इमारत कशासाठी वापरात येणार आहे? ती इमारत कोण वापरणार आहे? इमारतीसाठी योग्य असं कोणतं बांधकाम तंत्र वापरता येईल? काही विशेष, स्थानिक किंवा पारंपरिक मटेरिअल्स वापरून इमारतीला अधिक टिकाऊ, अधिक पर्यावरण संतुलित करता येईल का? एक ना अनेक अंगांनी विचार करून बांधलेली ही इमारत देखणी तर होतेच, मात्र ती तिच्या परिसरात मिसळून जाते. आणि त्या इमारतीच्या वापरकर्त्यांना ती अधिक आल्हाददायक आणि उपयुक्त वाटते.
मुंग्यांचं वारूळ ते संवर्धन प्रशिक्षण केंद्र
मी शाळेत असताना गोरेगावच्या फिल्मसिटीच्या जवळ वसलेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पर्यावरण संवर्धन प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती. हे केंद्र सोसायटीच्या ३३ एकर जंगल जमिनीवर वसलेलं आहे. मात्र, तेव्हा या केंद्राचं बांधकाम सुरू होतं. जुन्या गढीसारखी दिसणारी, विटकरी रंगाची केंद्राची इमारत उभी राहात होती. जंगलात बेमालूमपणे मिसळून गेलेली ही इमारत खास आहे. प्रख्यात वास्तुविशारद उल्हास राणे यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनातून तयार झालेल्या या इमारतीत अनेक वैशिष्टय़ं दडलेली आहेत, हे पुढे अनेक वर्षांनी मी स्वत: त्या इमारतीत काम करायला लागल्यावर अधिक प्रकर्षांने कळलं. सगळ्यात महत्त्वाची कमाल म्हणजे या जंगलात दिसणाऱ्या एका मुंगीच्या प्रजातीच्या वारुळावरून प्रेरणा घेऊन या इमारतीचा संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे. साहजिकच या वारुळात असणारी अधिकांश वैशिष्टय़े या इमारतीत दिसतात.
मुंग्यांच्या वारुळाप्रमाणेच संपूर्ण इमारत नसíगक उतारावर असल्याने अनेक पातळ्यांवर विभागलेली आहे. जमिनीचा उतार न बदलता, जमीन सपाट न करता ही इमारत बनवली गेलेली आहे. साहजिकच या इमारतीचं प्रत्येक दालन वेगवेगळ्या पातळीवर आहे. छोटय़ा दारातून आत शिरताच स्वागत कक्ष, त्यामागे पायऱ्या उतरून गेलं की इमारतीत येण्याचा मुख्य दरवाजा आणि त्याला लागून असलेला मोठ्ठा हॉल. या हॉलला लागूनच चहू बाजूंनी विविध दालनं आणि खोल्या. या साऱ्यांमधून पर्यावरणाशी संबंधित प्रदर्शनं मांडलेली आहेत. काम करायला लागल्यावर कळलं, या इमारतीत प्रामुख्याने येणाऱ्या साऱ्या लहान मुलांना, शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण इमारत फिरताना, पायऱ्यांवरून वरखाली करताना मजा वाटते. एकाच सपाट पातळीवरून विविध प्रदर्शनं पाहात फिरण्यापेक्षा, एका दालनातून दुसऱ्या दालनात जाताना मधल्या पॅसेजमध्ये त्यांना चर्चा करायला, धावायला, खेळायला वेळ मिळतो.
या इमारतीच्या बांधकामात त्या जागेवर असलेली झाडं सामावून घेतली गेलेली आहेत, त्यामुळे इमारतीत मधोमध तीन-चार मोठे वृक्ष दिसतात आणि त्याभोवती इमारतीचा पसारा आहे. या वृक्षांची सावली इमारत थंड ठेवण्यासाठी मदत करतेच, शिवाय या वृक्षांवर येणारे पक्षी, कीटक अगदी इमारतीत बसून दिसतात. या इमारतीला लागूनच बाहेरच्या बाजूला पायवाटेची व्यवस्था केलेली आहे. ही पायवाट अगदी छोटी मुलं आणि वृद्ध यांना मनापासून आवडते. कारण फार न चालता, कुठेही दूर न जाता त्यांना इमारतीला नुसता वळसा घालून जंगलातल्या अनेक आश्चर्याची सर करता येते. संवर्धन केंद्राच्या इमारतीला असलेल्या अनेक दरवाजांपाशी पायऱ्यांची आणि चौथऱ्यांची अशी रचना केलेली आहे की या प्रत्येक ठिकाणी एक छोटं ओपन एअर थिएटर तयार झालेलं आहे. या ठिकाणी आमची छोटी चर्चासत्रं, प्रेझेंटेशन्स किंवा मोठय़ा समूहांचं कार्यक्रम संपल्यावरचं ग्रुप फोटोसेशन आनंदाने होतं. इथल्या दारं-खिडक्यांची रचना अशी आहे की, प्रत्येक तावदानातून सभोवतालच्या जंगलावर नजर ठेवता यावी. मोठय़ा खिडक्या-दारांतून उत्तम प्रकाश आणि हवा यांची गरज भागवली गेल्याने दिवसभर या इमारतीच्या बहुतांश भागात उत्तम सूर्यप्रकाश येतो आणि हवा खेळती राहते.
वाडा ते विद्यासंकुल
दुसरी अशीच मनात ठसलेली इमारत म्हणजे भारती विद्यापीठाच्या पर्यावरण प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राची. या केंद्राच्या माध्यमातून शिकवल्या जाणाऱ्या अनेक अभ्यासक्रमांचा आणि मूल्यांचा एक उत्तम नमुना म्हणूनच १६,०००चौरस मीटरवर उभ्या असलेल्या या इमारतीकडे पाहिलं पाहिजे. विविध सोयींनी सुसज्ज या वास्तूची प्रेरणा-मध्यवर्ती खुलं अंगण आणि त्याभोवती विविध दालनांची रचना –  अशा अस्सल महाराष्ट्रातील वाडा बांधकामाच्या संस्कृतीत दडलेली आहे.
या इमारतीच्या संकुलाचं बांधकाम करण्याआधी परिसरातल्या वाऱ्याच्या दिशेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला आणि अनुकूल पद्धतीने बांधकामाचे आराखडे तयार केले गेले, जेणेकरून प्रत्येक इमारतीत हवा खेळती रहावी आणि वायुविजनामुळे इमारतीच्या आतल्या भागातलं तापमान कमी राहावं. शिवाय मुघलकालीन बागांच्या धर्तीवर संपूर्ण संकुलात पाण्याच्या टाक्या, कालवे आणि  कारंजे यांच्या एका सुसूत्र साखळीद्वारे पाणी फिरवलेलं आहे. यायोगे हवेतील आद्र्रता वाढून एक शीतल थंडावा इमारतींना मिळतो. या पाण्याच्या अभिसरण यंत्रांना सौर ऊर्जेच्या वापरातून वीज मिळते. इमारत नसíगकपणे थंड ठेवण्यासाठी पांढरा गोकाक आणि वीट यांच्या संमिश्र वापरातून साऱ्या बाह्य िभतींचं बांधकाम केलेलं आहे. पांढऱ्या रंगाच्या या इमारतींवर सोडलेल्या मनमोहक हिरव्या वेली या विद्यासंकुलाच्या दिमाखदार दिसण्यात सौंदर्य आणि शालीनता यांचा अनोखा मिलाफ घडवून आणतात.
अर्थ मॅटर्स
कन्साई नेरोलॅक यांनी अलीकडेच वसुंधरादिनाचं औचित्य साधून आपल्या ‘अर्थ मॅटर्स’ या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन केलं. शिसेविरहीत आणि VOC -मुक्त रंगांची श्रेणी सर्वप्रथम नेरोलॅक कंपनीने भारतीय बाजारपेठेत आणली. त्यानंतर नेहमीच लक्षवेधक पर्यावरण अनुकूल उत्पादनं, त्यावरील चर्चासत्र या माध्यमांतून कंपनीने आपले विचार सामान्य लोकांसोबतच बांधकाम क्षेत्रातली विविध व्यावसायिकांपर्यंत पोहोचवले. याच प्रयत्नांचा एक भाग असलेल्या, ‘अर्थ मॅटर्स’ या मालिकेद्वारे दोन वर्षांपासून सातत्याने ४१ शहरांत आयोजित व्याख्यानमालांच्या माध्यमांतून पर्यावरण अनुकूल उपायांची चर्चा कंपनीने देशभरातल्या वास्तुविशारद आणि अंतर्गत सजावट करणाऱ्या डिझाइनर्समध्ये घडवून आणली आहे. हा उपक्रम आता या कॉफी टेबल पुस्तकाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील २९ अनुकरणीय पर्यावरण अनुकूल, शाश्वत बांधकाम प्रकल्पांची माहिती आपल्यासमोर आणण्यात यशस्वी झाला आहे.
बियॉण्ड रिसॉर्ट, नासिक- पर्यावरण-अनुकूल म्हटलं म्हणजे आपल्या मनात पारंपरिक, आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, नसíगक अशाच गोष्टी येतात. नासिक परिसरात उभं राहिलेलं ‘बियॉण्ड रिसॉर्ट’ हे आपल्या मनातल्या अशा अनेक पारंपरिक समजुतींना छेद देतं.
बियॉण्ड रिसॉर्टची रचना एका बागेत वसलेल्या इमारतीसारखी करण्यात आलेली आहे. हे रिसॉर्ट उभारताना स्थानिक परिसंस्थेला आणि रमणीय अशा भूप्रदेशाला अजिबात धक्का पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आलेली आहे. अधिकाधिक ऊर्जा कार्यक्षम असण्याकडे या रिसॉर्टच्या रचनाकर्त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. सहाजिकच संपूर्ण आराखडय़ावर बारकाईने काम केलेलं आहे. रिसॉर्टच्या रचनेत जमिनीच्या उतारांना सपाट न करता बांधकाम केलेलं आहे. दक्षिण-उत्तर असणाऱ्या स्थानिक उताराला अनुसरून बांधकामाचा आराखडा ठरवल्याने पाण्याचा निचरा होण्याच्या प्रणालीचं नियोजन अधिक सुलभ आणि ऊर्जा कार्यक्षम झालं. हे रिसॉर्ट एका साखळी-रचना असलेल्या युनिट्सच्या मालिकेसारखं बांधण्यात आलेलं आहे. साहजिकच या रिसॉर्टच्या प्रत्येक युनिटमधून संपूर्ण परिसराचं रमणीय दृश्य दिसतंच. शिवाय, हवा आणि सूर्यप्रकाशही प्रत्येकास मुबलक मिळतो. एकसारख्या रचनेमुळे बांधकामाच्या बाबतीतही सुटसुटीतपणा आला आणि बांधकाम जलदगती पूर्ण होऊ शकलं. दीड एकरावर पसरलेल्या या रिसॉर्टच्या वैशिष्टय़पूर्ण आराखडय़ामुळेच सौंदर्य आणि परिसंस्था दोन्हींचा विचार करून अंतर्गत रस्त्यांची लांबी कमीत कमी ठेवण्यात रचनाकारांना यश आलेलं आहे.
बियॉण्ड रिसॉर्टमध्ये बारकाईने नियोजन केलेल्या खुल्या जागा, अंतर्गत अंगणांची वैशिष्टय़पूर्ण अनोखी रचना आणि पाण्याचा विविध प्रकारे केलेला कलात्मक वापर यामुळे एकाच वेळी पर्यावरण आणि सौंदर्य संपन्नतेत भर पडते यात शंकाच नाही.
नशा आणि व्यसनमुक्ती केंद्र, पुणे- नशा आणि व्यसनमुक्ती केंद्रांच्या संरचनेत काही विशेष विचार केल्यास किती बहुआयामी फायदा मिळतो, हेच या केंद्राच्या देखण्या इमारतीने दाखवून दिलं आहे. पारदर्शकता, खुलेपणा आणि जागेचा बहुउद्देशीय वापर या त्रिसूत्रीवर ही इमारत उभी आहे. या त्रिसूत्रीमुळेच नशा आणि व्यसनमुक्ती केंद्रातल्या शिस्त आणि मोकळेपणा या तत्त्वांचा सुरेख संगम या इमारतीतही झालेला पाहायला मिळतो.
नशा आणि व्यसनमुक्तीच्या एकूणच प्रक्रियेत शिस्त, खुलेपणा आणि सामाजिक देवाणघेवाण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे लक्षात घेऊनच या इमारतीची रचना केलेली आहे. संपूर्ण दगडी अशी ही इमारत भारदस्त आहे, मात्र त्यात योजना करण्यात आलेल्या खास अशा अंतर्गत बठकीच्या जागांमुळे आणि सभोवताली तयार केलेल्या हिरव्या बागांमुळे ती सौम्य वाटते. या बठकीच्या जागांवर इथली व्यसनमुक्त होऊ पाहणारी माणसं विचारांची, कलांची देवाणघेवाण करू शकतात आणि इमारतीच्या अंतर्गत आणि सभोवतालच्या बागांमुळे इथल्या माणसांची निसर्गाशी असलेली नाळ तुटत नाही. इमारतीच्या मध्यभागी असणारं छोटं अ‍ॅम्फिथिएटर इमारतीत नसíगक प्रकाश खेळता ठेवतंच. शिवाय इथे राहणाऱ्यांना एकमेकांशी संवादासाठी एक मंच उपलब्ध करून देतं. या जागेसोबतच एक बहुउद्देशीय मोठं सभागृह अनेक कारणांसाठी वापरात आणलं जातं. चर्चासत्रांपासून प्रदर्शनांपर्यंत आणि नव्याने आलेल्यांसाठी ओळख करून घेण्यापासून  ते व्यायामशाळा म्हणून.
नशा आणि व्यसनमुक्ती केंद्राची ही इमारत म्हणजे स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचाच नव्हे तर त्याद्वारे प्रतििबबित होणाऱ्या सामाजिक भान असण्याचाही एक उत्कृष्ट नमुना ठरते आहे यात नवल नाही.
या आणि अशा अनेक इमारती आपल्या जाणिवांना अधिक नवे आयाम देत आहेत. नुसतंच स्थापत्य, बांधकाम आणि उपयुक्तता यापर्यंत न थांबता या इमारती सामाजिक भान, पर्यावरणाचा विचार आणि या इमारतींची निसर्गासोबत होणारी देवाणघेवाण याविषयी एक नवा विचार घेऊन जन्माला येत आहेत. त्यांच्या असण्यातून हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज अशा इमारती प्रातिनिधिक स्वरूपात असतील कदाचित. मात्र, आपल्या मनातल्या बांधकामांविषयीच्या उद्याच्या विचारांना या आरस्पानी इमारती एक नवा आकार देत आहेत यात तिळमात्र शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा