संदीप धुरत
पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटमध्ये एक सुसूत्रता आहे, जी शाश्वत वाढीसाठी एकमेकांवर अवलंबून असते. जसजशी पायाभूत सुविधा सुधारतात, रिअल इस्टेटची मूल्ये वाढतात, आणि रिअल इस्टेट विकास जसजसा वाढत जातो, तसतसे सुधारित पायाभूत सुविधांची गरज अत्यावश्यक बनते. हे चक्र विशेषत: दुसऱ्या घरांच्या बाबतीत स्पष्ट झाले आहे.
गजबजलेले रस्ते आणि गगनचुंबी इमारती असलेले मुंबई शहर हे फार पूर्वीपासून प्रगती आणि विकासाचे प्रतीक आहे. मात्र, ही वाढ केवळ शहराच्या हद्दीपुरती मर्यादित नाही; त्याचा विस्तार संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश ( MMR) आणि त्यापलीकडे आहे. या विस्तारातील एक प्रमुख कारण म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये निरंतर होणारी वाढ- ज्याने केवळ दळणवळणच सुलभ केलं नाही, तर भरभराट होत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हा लेख एमएमआर आणि त्यामधील विविध पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रिअल इस्टेट विकासकांना चालना देण्यासाठी, विकासासाठी नवीन क्षेत्रे हस्तगत करण्यासाठी जमीन कशी उपलब्ध झाली आहे हे दाखवतो आणि या भागातील स्थावर मालमत्ता क्षेत्राच्या विकासाला आणखी चालना देण्यासाठी तयार होणाऱ्या आगामी प्रकल्पांची माहिती देतो.
ऐतिहासिक दृष्टिकोन
गेल्या काही वर्षांत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ईस्टर्न फ्रीवे आणि वांद्रे-वरळी सी लिंक यांसारख्या प्रकल्पांनी मुंबईचा प्रवास सुकर झाला आहे. या प्रकल्पांमुळे शहरी विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. विकासकांनीही हे प्रकल्प लक्षात घेऊन अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केले, लँडस्केप बदलले आणि वाढत्या लोकसंख्येसाठी गृहनिर्माणाचे पर्याय उपलब्ध करून दिले.
नवीन महत्त्वाकांक्षी प्रकल्प
मुंबई मेट्रो आणि प्रस्तावित कोस्टल रोड यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनी केवळ वाहतूक कोंडी कमी केली नाही तर रिअल इस्टेट विकासासाठी नवीन मार्गही खुले झाले आहेत. एकेकाळी दळणवळणाच्या दृष्टीने कमकुवत समजली जाणाऱ्या विभागांमध्ये दळणवळणाची उत्तम साधने निर्माण झाली आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण यांसारख्या चांगल्या प्रकारे जोडलेल्या उपनगरांच्या व्यवस्थेमुळे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे.
प्रकल्प आणि मालमत्ता विकास यांचा संबंध
पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटमध्ये एक सुसूत्रता आहे, जी शाश्वत वाढीसाठी एकमेकांवर अवलंबून असते. जसजशी पायाभूत सुविधा सुधारतात, रिअल इस्टेटची मूल्ये वाढतात, आणि रिअल इस्टेट विकास जसजसा वाढत जातो, तसतसे सुधारित पायाभूत सुविधांची गरज अत्यावश्यक बनते. हे चक्र विशेषत: दुसऱ्या घरांच्या बाबतीत स्पष्ट झाले आहे. महामार्ग, द्रुतगती मार्ग आणि सुधारित सार्वजनिक वाहतुकीच्या विकासामुळे वीकेंड गेटवे आणि सेकंड होम्स अधिक आकर्षक पर्याय बनले आहेत, ज्यामुळे अशा मालमत्तांच्या मागणीत वाढ झाली आहे.
भविष्यातील प्रकल्प
पुढे पाहता, मुंबई महानगर प्रदेश परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी सज्ज आहे- जे नि:संशयपणे रिअल इस्टेटच्या भविष्याला आकार देईल. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक आणि मेट्रो नेटवर्कच्या विस्तारामुळे शहरी आणि उपनगरीय जीवनातील रेषा आणखी अस्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. या घडामोडी केवळ कनेक्टिव्हिटी वाढवणार नाहीत तर नवीन विकास कॉरिडॉरदेखील तयार करतील, रिअल इस्टेट विकासकांना त्यांच्या प्रकल्पांसाठी नवीन पर्याय उपलब्ध करतील.
मुंबई आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशांच्या सतत विकसित होत असलेल्या दळणवळण पर्यायांमुळे पायाभूत सुविधांचा विकास आणि रिअल इस्टेट वाढ यांच्यातील परस्पर संबंध निर्विवाद आहे. एकाचे यश दुसऱ्याच्या प्रगतीवर खूप अवलंबून असते, ज्यामुळे संपूर्ण महानगर प्रदेशाला पुढे नेणारी एक उत्कृष्ट अशी इकोसिस्टम तयार होते. यामुळे विकासकांना नवे पर्याय उपलब्ध होतील आणि रहिवाशांना अधिक दर्जेदार सुविधा ते प्रदान करतील.
sdhurat@gmail.com
(लेखक स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विशारद आहेत.)