गृहसजावट किंवा इंटिरिअर डेकोरेशन या संज्ञा अधिकच प्रचलित झाल्यामुळे इंटिरिअर डिझाइनिंग किंवा अंतर्गत संरचना या संबंधीच्या बाबी, त्यांची मूलतत्त्वे फारशी लक्षात घेतली जात नाहीत. वास्तविक या दोन्हीही संज्ञा विभिन्न असून रेल्वे रुळाप्रमाणे एकमेकांशी समांतर आहेत. इंटिरिअर डेकोरेशन ही एक कला असून इंटिरिअर डिझाइनिंग हे शास्त्र आहे. यापैकी डेकोरेशन हा घराचा एकप्रकारे केलेला मेक-अप असतो, तर डिझाइनिंग हे घरातील लहान मोठय़ा मालमत्तांचं शास्त्रीय व्यवस्थापन असतं.
गृहसजावट किंवा इंटिरिअर डेकोरेशन म्हणजे सर्वसाधारण व्यक्तीच्या खिशाला न परवडणारा महागडा प्रकार अशी समजूत असते. अनेक घरातील महागडं, भपकेबाज फर्निचर आणि उंची वस्तू या समाजाला बळकटी देत असतात. पण खरं तर घर म्हणजे काही, लोकांना बघण्यासाठी केलेली शोरूम नाही. त्यामुळेच खूप पैसा खर्च करून अत्याधुनिक फॅशनचं साहित्य आणून बघणाऱ्यांचे डोळे दिपून जातील, असं काम करणं म्हणजे काही गृहसजावट होत नसते.
घर म्हणजे आपलं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारा आरसाच असतो. आपलं घर, सर्व कुटुंबीय, त्यांचे व्यक्तिमत्त्व, जीवनशैली, राहणीमान, आवडी-निवडी, गरजा, शरीरसौष्ठव एवढंच नव्हे तर आपल्या दृष्टिकोनातून सामाजिक व सांस्कृतिक गरजा, आर्थिक मर्यादा या सर्व गोष्टींना अंतर्गत संरचनेच्या कामात महत्त्व असायला हवं, किंबहुना तोच तर या विषयाचा मूळ गाभा आहे. केवळ याचसाठी इंटिरिअर डिझाइनिंग करताना ती घरातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाशी सुसंगती राखणारी, घरातील प्रत्येकाची कार्यक्षमता वाढविणारी आणि सौंदर्यदृष्टीची साक्ष पटवणारी, घरातील प्रत्येकाच्या उणिवा दूर करणारी, जाणिवा जपणारी आणि त्यांना नेणिवेपर्यंत घेऊन जाणारी हवी. हे सर्व शक्य करणारी आणि घराला घरपण देणारी माणसं आपल्याला भेटली तर आपलं घर हे केवळ चार भिंतींचं राहणार नाही, त्याला प्राप्त होणारं जाज्वल्य सतत जाणवत राहील, किंबहुना तशी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असा साक्षत्कार घडविणारा, आपल्या घराचं अंतरंग खुलवणारा, आपल्या घराशीच आपलं नातं निर्माण करून देणारा, आपल्या घराबरोबर आपला सुसंवाद घडवून आणणारा हा आपल्या कुटुंबाचा सदस्य कधी होऊन जातो ते कळतही नाही. आणि आपल्या अंतरंगाचा मागोवा घेत आपल्या घराचं अंतरंग रंगीबेरंगी करून टाकतो.
असा हा अंतर्गत संरचनाकार आपल्या घराच्या इंटिरिअर डिझाइनिंगसाठी सल्लागार म्हणून काम करताना आपल्या व्यक्तिमत्त्वातील अस्तित्वाचे वेगळेपण सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या नेहमीच्या ओरल तसेच रिटन कम्युनिकेशन्सच्या सवयीमुळे त्याच्या ग्राफिकल कम्युनिकेशनची भाषा सुरुवातीला समजायला जड जाते. त्याने सुरुवातीला तयार केलेल्या चित्रकृतीच्या माध्यमातून आपलं घरच त्याच्या अगोदर बोल लागतं.
त्याच्याशी आपली व्यक्तिगत ओळख असण्यापेक्षाही केवळ अंतर्गत संरचनाकार सल्लागार अशा दृष्टिकोनातून ओळख करून घेणं, त्याविषयीचा परिचय करून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
अमक्याने हे हे असं केलं म्हणून आम्हीही आमच्या घरात इंटिरिअर करताना तसंच करणार आहोत ही पद्धत केवळ धोकादायकच नाही तर अंतर्गत संरचनेच्या मूळ संकल्पनेला बाधा आणणारी ठरू शकते. अनेकदा आपल्या स्वत:च्या अशा विचारांपेक्षा इंटिरिअर डिझाइनरचा सल्ला मोलाचा ठरतो.
इंटिरिअर डिझाइनिंग हे खरं तर स्पेस मॅनेजमेंटचं शास्त्र आहे. आपल्या घरातील उपलब्ध जागेचा किती व कसा नीट-नेटकेपणानं वापर तसेच नेमकेपणानं करता येऊ शकतो हे केवळ इंटिरिअर डिझाइनरच योग्य प्रकारे ठरवू व सांगू शकतो. साधारणत: १९ व्या शतकात आपलं स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी ही शाखा पुढे पुढे अधिकच पॉप्युलर होत गेली. आणि  त्याचमुळे ती शाखाही हळूहळू विकसित होत गेली, आणि अजूनही ती विकसित होत आहे.
इंटिरिअर डिझाइनरची निवड करताना त्याचं शिक्षण, सर्व तऱ्हेच्या कामाचा अनुभव तसेच सखोल ज्ञान यासर्व बाबींचा विचार करणं आवश्यक ठरते. काही वेळा केवळ फसव्या जाहिरातींना बळी पडून एखाद्या व्यक्तीची आपल्या इंटिरिअरच्या कामासाठी निवड करायची ठरविली तरीही त्या व्यक्तीचे शिक्षण, अनुभव, ज्ञान, कसब त्या व्यक्तीने आजवर केलेली तत्सम स्वरूपाची कामं या सर्वच गोष्टी सुरुवातीलाच नीटपणे माहिती करून घेतल्या पाहिजेत. यामुळे कोणत्याही प्रलोभनांना, फसवेगिरीला बळी पडण्याची वेळ येणार नाही. अनेकदा आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीच्या ओळखीतून इंटिरिअरच्या कामासाठी डिझाइनर कन्सल्टंटची भेट झालेली असेल तर फारच उत्तम. जेणे करून या डिझाइनरच्या संबंधित आवश्यक ती माहिती आपण त्यांच्यावर आपले काम सोपविण्यापूर्वी मिळवू शकतो.
आपल्या कामाची जबाबदारी ज्या डिझाइनरवर आपण टाकण्याचा विचार करत असतो त्या डिझाइनरकडून मिळणाऱ्या सर्व सव्र्हिसेस अगोदरच समजून घ्यायला हव्यात. त्या डिझाइनरने आपलं काम सुरू करण्याअगोदरपासून त्याची कार्ये, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, त्याची काम करण्याची पद्धत, त्या डिझाइनरने तयार केलेले लेआऊट्स इतर सर्व ड्रॉईंग्ज, कामाचं एकंदरीत एस्टिमेट, त्याचे प्रोफेशनल, कन्सल्टींग चार्जेस व देण्याची पद्धत अशा अनेक बाबींचा विचार काम देण्याचे निश्चित करण्यापूर्वी परस्पर चर्चेतून ठरविणे आवश्यक असते. अनेकदा निर्माण होणारे वाद हे आर्थिक कारणावरून सुरू होतात. तेव्हा आपलं बजेट आणि डिझाइनरचं एस्टिमेट यांचा मेळ जुळून आला पाहिजे. या बाबतीत डिझाइनरला जबाबदार धरणे योग्य नसते कारण एकदा प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर कामासंबंधीच्या आपल्या मागण्या, अपेक्षा वाढत जातात आणि त्यामुळे सुरुवातीला ठरविलेल्या कामाच्या बजेटपेक्षा प्रत्यक्ष कामाचा खर्च फारच जास्त होतो. त्यामुळे डिझाइनरप्रमाणेच आपलीसुद्धा ठरलेल्या कामात फेरफार, वाढ, बदल होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची जबाबदारी असते हे विसरून कदापीही चालणार नाही.
इंटिरिअर डिझाइनर : काळाची गरज
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या घरांच्या किमती, वाढत जाणाऱ्या गरजा, कमी कमी होत जाणारे घरांचे आकारमान, वाढती स्पर्धा, आधुनिकीकरण, अनुकरणप्रियतेचा मूळ नैसर्गिक स्वभाव, बदलत जाणारे जीवनमान, राहणीमान अशा कारणांमुळे इंटिरिअर डिझाइनर ही काळाची गरज झाली आहे.
उपलब्ध जागेचा प्रत्येक इंच न् इंच भाग उपयोगात आणायचं हे काम स्पेस मॅनेजमेंट्च, स्पेस  डिझाइनरचं अर्थात इंटिरिअर डिझाइनरचं असतं. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त, घरातील मालमत्ता बसवण्याचं कसब त्याच्याकडं असतं. आपल्या अनेक महत्त्वाकांक्षापैकी सर्वात मोठी तसेच महत्त्वाची महत्त्वाकांक्षा म्हणजे ‘आपले स्वत:ते एखादे घरकुल असावे’ ही असते. हे घरकुल मिळविण्यासाठी आणि नंतर खुलविण्यासाठी येणारे विविध अनुभव हे साहजिकच अविस्मरणीय असतात. सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयांच्या या प्रयत्नास साथ असते ती प्रामुख्याने कुटुंबीयांची. कुटुंबातील प्रत्येकजण आपापल्या परीने घरासाठी सदैव धडपड करीत असतो. नोकरी व्यवसायातून साठविलेली जमापुंजी अपुरी पडल्यास घेतलेली कर्जाऊ रक्कम ही मंडळी आपापल्या येणाऱ्या मेहेनतान्यातून फेडत असतात. आपल्या सुखी संसारासाठी आर्थिकदृष्टय़ा टेकू लावायचा म्हणून सतत झटत असतात. या सर्व गोष्टींचा मेळ बसवून आपल्या इंटिरिअर डिझाइनिंगच्या दृष्टीने आवश्यक गरजांची तेदेखील आपलं बजेट सांभाळून काम करून देणाऱ्या इंटिरिअर डिझाइनरची खऱ्या अर्थाने गरज असते.
इंटिरिअर डिझाइनरच्या कामाचं स्वरूप : आपण जेव्हा घर विकत घेतो तेव्हा अनेकदा ते घर नसतंच, तर ते असतं घरासाठी केलेलं निव्वळ बांधकाम, त्याला घराचं स्वरूप देण्यासाठी इंटिरिअर, फर्निचर वगैरे सर्व करावंच लागतं आणि ते केल्याशिवाय त्या वास्तूत घरपण येत नाही. हे घरपण आणण्यासाठी गरज असते इंटिरिअर डिझाइनरची, त्याच्याशी सल्लामसलत करून केलेल्या कामाची. घराला घरपण देणाऱ्या माणसाच्या कामाचं स्वरूप या अगोदर समजून घेणं आवश्यक असतं. काम सुरू करण्याच्या अगोदरपासून ते काम संपेपर्यंत इंटिरिअर डिझाइनरकडून मिळणाऱ्या सर्व सव्र्हिसेस सुरुवातीलाच नीट लक्षात घेतल्या, तसेच त्याला द्यावी लागणारी प्रोफेशनल फी व फीच्या सर्व स्टेजेस आपापसातील चर्चेत ठरविणे आवश्यक असते.
आपल्या जागेची प्रत्यक्ष मोजमापं घेऊन त्यानुसार तो प्रथम टू द स्केल स्केच ले-आऊट्स दोन-तीन प्रकारे तयार करून दाखवितो. ते करण्यासाठी आपण आपल्या गरजा, आवडी-निवडी बजेट इत्यादी सर्व सविस्तरपणे इंटिरिअर डिझाइनरला सांगणे गरजेचे असते. एकूणच मिळालेल्या माहितीच्या व मोजमापाच्या आधारे पुढील काम करणे त्याला सोईचे ठरते. या व्यतिरिक्त त्याच्या निरीक्षणातून, अभ्यासातून तसेच अनुभवातून तर काही वेळा प्रत्यक्ष चर्चा करून आवश्यकतेनुसार अधिक माहिती तो मिळवतो. याद्वारे तयार होणाऱ्या ले-आऊटमध्ये काही बदल अपेक्षित असल्यास तो केल्यानंतर त्याचा प्लान फायनल करून त्याचे एस्टिमेट तयार करणे त्याला शक्य होते. या नंतर संपूर्ण घरातील सर्व फर्निचर तसेच इतर इंटिरिअर आयटम यावर त्याला डिझाईनिंगचे काम करावे लागते. आपण यासाठी त्याला पुरेसा वेळ देणे आवश्यक असते. एकीकडे कामाचं पुढील नियोजन त्याला करावं लागतं तर दुसरीकडे सर्व डीटेल्ड वर्किंग ड्रॉईंग्ज तयार करायची असतात. या दरम्यान त्याला त्या कामासंबंधीत सर्व मटेरिअल्स व एजन्सीजची निवड करायची असते.
कामाचा एक आराखडा तयार करून त्याप्रमाणे प्रत्यक्षरीत्या कामे स्वत:च्या देखरेखीखाली पूर्ण करायची असतात. ते करत असताना त्याला वेळेचं आणि बजेटचं भान ठेवावं लागत असतं. काय योग्य किंवा अयोग्य हेसुद्धा त्यांनी आपल्याला जबाबदारीनं सांगायचं असतं. काही वेळा आपली पसंती आणि त्याची निवड यात विरोधाभास असू शकतो. तरीही सारासार विचार करून स्वत:चा विश्वसनीय सल्ला आपल्याला त्यानी देणे आवश्यक असते. गरज कशाची, कोणाला, का, किती असे अनेक प्रश्न लक्षात घेऊन निर्णय घेण्याची जबाबदारी इंटिरिअर डिझाइन करण्याच्या दृष्टिकोनातू घ्यावे लागत असतात, याचं भान आपणही राखलं पाहिजे. यासाठी त्याचा सल्ला अधिक मोलाचा ठरत असतो.
इंटिरिअर डिझाइनरचा मोबदला :
घरासाठी विकत घेतलेल्या जागेच्या किमतीच्या तुलनेत इंटिरिअर डिझाइनरला दिला जाणारा आर्थिक मोबदला खरं तर फारच थोडा असतो. वास्तविक घराचं घरपण त्याच्यामुळे निर्माण होत असलं तरीही अनेकदा इंटिरिअर डिझाइनरची खास नेमणूक करून त्याच्या करवी काम करवून घेण्याचा विचार क्वचितच होताना दिसतो. यासाठी आपल्या तयार होणाऱ्या घरापेक्षाही आपलं मन मोठं व्हायला हवं. परत विचार मनाचाच, मनानीच, मनासाठीच, मनापासूनच आणि तोही अगदी मनातल्यामनातच करायला हवा. कारण तयार होणाऱ्या घराच्या सौंदर्याची अनुभूती केवळ आपल्या मनालाच कळणारी असणार आहे.

Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Nagpur Improvement Trust does not have funds for the road promised by Gadkari
गडकरींच्या वचननाम्यातील रस्त्यासाठी नासुप्रकडे निधी नाही?
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
MLA Jorgewar organized BJP workers meeting and guardian minister felicitation program here.
पालकमंत्र्यांच्या सत्कारासाठी सभागृह देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार; मनाई असतानाही आमदार किशोर जोरगेवार यांनी…
maharashtra navnirman sena demand to use marathi language in bank of maharashtra
महाबँकेत मराठी भाषेचा वापर करा, का केली मनसेने ही मागणी ?
badlapur biogas project in controversy again after bjp corporator allegations
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
Story img Loader