दिवाळी सण मोठा आनंदा नाही तोटा. आनंद घेऊन येणारी दिवाळी आणि आपलं मन प्रफुल्लित करणारं वातावरण ज्याची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत असतो. नवीन कपडे, वस्तू, दागिने, वाहन हे सर्वकाही दिवाळीच्या सणाचं औचित्य साधून घेण्यावर आपण भर देत असतो. खाण्यापिण्याची तर या दिवसांत रेलचेलच असते. सबंध वर्षांतल्या सणाला जे केलं नाही, घेतलं नाही, अनुभवलं नाही ते सारं काही या दिवाळीच्या निमित्ताने आपण मिळवू पाहात असतो.
आपण आपल्या मनात योजलेलं की जे आपल्याला हवं आहे ते सर्व काही या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. दिवाळी हा एकच सण असा आहे, की जो सर्वजण आनंदाने साजरा करत असतात आणि हा साजरा होण्याची महत्त्वाची जागा म्हणजे आपलं स्वत:चं घर. जसं महत्त्व घरातल्या दिवाळीला दिलं जातं तसंच किंबहुना थोडं जास्त महत्त्व दिवाळीतल्या घराला दिलं तर घरातलं वातावरण अधिकच आनंददायी होऊ शकेल. तसं पूर्वीप्रमाणे नवीन वस्तूंची खरेदी केवळ दिवाळीला असं आता फारसं राहिलं नाही. वर्षभरात आपल्याला हवं ते जमेल तेव्हा खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. असं जरी असलं तरी आपल्या घराच्या वातावरणात दिवाळीसाठी म्हणून काही खास वस्तू सजावटीच्या दृष्टिकोनातून वापरल्या गेल्या तर आपला आनंद द्विगुणितच होईल.
आपल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक, धार्मिक, सामाजिक तसेच व्यावसायिक अशा विविध पातळींवर विचार करायला लावणारा दिवाळी हा सण आपल्या घराच्या सजावटीच्या माध्यमातून सर्व बाबींची पूर्तता करणारा ठरू शकतो. अंतर्गत संरचना आणि सजावट करत असताना आपल्यासाठी तसेच आपल्या घरासाठी गरजेच्या वस्तूंची निवड खास दिवाळीचा सण साजरा करताना वातावरणनिर्मिती करण्याच्या हेतूने करणं निश्चितच उपयुक्त ठरतं. या वातावरणनिर्मितीचा थेट परिणाम आपल्या मानसिकतेवर चांगल्याप्रकारे होऊन मनोमन आनंद मिळू शकतो.
दिवाळीसाठी आपल्या घराच्या दरवाजाबाहेरील जागेपासून अगदी घरातल्या प्रत्येक दालनासाठी सजावटीच्या खास वस्तूंची निवड करता यावी यासाठी बाजारपेठही सज्ज झालेली असते. काही निवडक वस्तूंची खरेदी करून आपण स्वत: आणि ती शिवाय कोणाचीही मदत न घेता आपल्या घराची सजावट करू शकतो. अशा निवडक वस्तू ठेवण्यासाठी अथवा त्यांचा संचय करण्यासाठी घरातल्या एखाद्या कोपऱ्यात अथवा रिकाम्या जागी एखादे छोटेखानी कपाटही बनवून घेऊ शकतो.
रांगोळी : आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मध्यभागी, भिंतीलगत अवा एखाद्या कोपऱ्यात निरनिराळय़ा रंगांची आणि विविध वस्तूंचा वापर करून काढलेली रांगोळी दिवाळीप्रीत्यर्थ आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करत असते. यासाठी रांगोळी, रांगोळीचे निरनिराळे रंग, फुले, विविध प्रकारच्या पानांचे लहान लहान आकारांत कापलेले तुकडे, घरातल्या रद्दी पेपर्सचे लहानमोठे तुकडे, जुन्या कापडाचे अथवा कपडय़ांचे तुकडे, फुटलेल्या काचा अथवा आरशाचे तुकडे, थर्माकोलचे तुकडे, थर्माकोलचे गोलाकृती लहानमोठय़ा आकारांतले तुकडे अशा अनेक वस्तूंच्या साहाय्याने या रांगोळीचं रेखाटन करता येऊ शकतं. तयार केल्या जाणाऱ्या रांगोळीमध्ये तेवत राहणाऱ्या पणत्या ठेवल्या तर त्या एकूणच वातावरणावर वेगळाच प्रकाश टाकतात. यामध्ये आपल्या संपूर्ण संस्कृतीचं, कुटुंबाचं दर्शन एखादं कोलाज साकारून घडवून जाणता येतं.
दिव्यांची सजावट : दिवाळीत दिव्यांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. या दिव्यांची सजावट घराच्या आतबाहेर सर्वत्रच करून मनमोहक वातावरण निर्माण करता येऊ शकते. यासाठी बाजारात मिळणाऱ्या निरनिराळय़ा प्रकारच्या रंगीबेरंगी नक्षीकाम, कोरीवकाम तसेच जाळीकाम केलेल्या पणत्यांची, लहानमोठय़ा आकारांतल्या टेराकोटामध्ये बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंची आपण निवड करू शकतो. अनेक प्रकारच्या आणि विविध आकारांतल्या दिव्यांच्या सजावटीच्या वस्तू या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होतात. जाळीकाम केलेल्या अशा स्वरूपाच्या मोठय़ा आकाराच्या टेराकोटा पॉटची निवड करून आपल्या घराच्या एखादा रिकाम्या कोपऱ्यात अथवा बाल्कनीमध्ये, आतमध्ये तेलाचा दिवा तेवत ठेवून केलेली सजावट अधिकच मंगलमयी आणि आल्हाददायक वातावरणाची निर्मिती करण्याकामी येऊ शकते. अशा पॉटच्या सभोवताली फुलांच्या साहाय्याने काढलेली रांगोळी सुंदर दिसते.
दिव्यांच्या माळा आणि कंदील : ज्याप्रमाणे दाराबाहेर आणि घराच्या आत तेवत राहणाऱ्या पणत्या दिवाळीत हव्याच. त्याचप्रमाणे दिव्यांच्या विजेच्या माळा आणि कंदील यांच्या माध्यमातून सजावट केली नाहीतर दिवाळीच्या वातावरणाचं समाधान आपल्याला लाभत नाही. हस्तकलेच्या अनेकविध प्रकारच्या कंदिलाच्या माध्यमातून आणि विजेच्या माळांचा वापर करून आपल्या घराच्या खिडक्या, बाल्कनी, मुख्य प्रकाशमान राहावं असं प्रवेशद्वार अशा ठिकाणी सजावट करता येते. या दोन्ही वस्तूंमध्ये असंख्य प्रकार आणि विविध पर्याय सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. याप्रकारे केलेल्या सजावटीमुळे नवचैतन्याची, अंधकाराकडून प्रकाशाकडे आल्याची अनुभूती प्राप्त होऊ शकते. याद्वारे एकप्रकारे मानसिक परिवर्तनास वाव मिळतो.
डोअर मॅट : दिवाळीप्रीत्यर्थ आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डोअर मॅट स्वागतासाठी सज्ज असलं पाहिजे. अनेकदा संपूर्ण घराच्या अंतर्गत सजावटीच्या कामामध्ये डोअर मॅटसारख्या वस्तू दुर्लक्षित राहतात आणि त्यांची निवड खूप उशिराने केली जाते. ही निवड करण्यासाठी आपण दिवाळीचं औचित्य साधून पूर्तता करू शकतो. विविध प्रकारच्या वस्तूंच्या तसेच निरनिराळय़ा रंगांचा उपयोग करून बनवलेले असंख्य पर्याय डोअर मॅटच्या निवडीसाठी उपलब्ध आहेत. यावर लिहिलेले केवळ दोन-चार शब्ददेखील पाहुण्यांविषयींच्या आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे ठरतात.
कलापूर्ण खास पडदे : केवळ सणासुदीसाठी खास पडदे निवडून तसेच आकर्षक पद्धतीने त्यांची शिलाई करवून घेऊन बैठक व्यवस्था आणि शयनगृह या दोन्ही ठिकाणी एकूणच निराळय़ाच, मनाला भुरळ घालतील, अशा वातावरणाची निर्मिती करण्यास उपयुक्त ठरतात. विशेषत: पडद्यामागून दिसणारी दिवाळीची रोषणाई आकर्षणाचा विषय बनून जाते. यामध्ये निराळेपण आणण्यासाठी दोन रेषेतले पडदे की ज्यासाठी दोन भिन्न प्रकारच्या आणि विभिन्न रंगांचा वापर करून तसेच मागील पडदा एका सरळ रेषेत राहणारा तर पुढील पडद्याच्या सजावट करण्यासाठी वापरलेला असेल. पडद्यांची शिलाईदेखील निरनिराळय़ा प्रकारे करवून घेता येऊ शकते. या दिवसांमध्ये घरामध्ये काढल्या जाणाऱ्या फोटोंसाठी पडद्याची सजावट फारच उपयुक्त ठरते.
बेड स्प्रेड : आपल्या घरातल्या शयनगृहामधील बेडवर नेहमी आणि रोजच्या वापरातल्या बेडशीटवर आच्छादन म्हणून अंथरण्यासाठी खास मुलायम सॅटीनच्या अथवा वेलवेटच्या कापडापासून बनवलेल्या आणि रंगीबेरंगी तसेच नक्षीकाम केलेल्या बेड स्प्रेडचा वापर खास दिवाळीसाठी आकर्षक सजावटीच्या दृष्टिकोनातून करता येऊ शकतो. शयनगृहाला खऱ्या अर्थानं राजेशाही थाटात सजवता येतं. विशेषत: लाल, नारिंगी, आकाशी, गुलाबी अशा निरनिराळय़ा रंगांमध्ये ही बेड स्प्रेड्स बाजारात उपलब्ध असतात. विशिष्ट स्वरूपाच्या रंगसंगतीचा उपयोग करून तयार केलेलीही बेड स्प्रेड्स खूपच सुंदर दिसतात.
फुलांची सजावट : घरातल्या बैठकीच्या खोलीतल्या सेंटर टेबलवर, डायनिंग टेबलवर, स्वयंपाकघरातल्या ओटय़ावरील कोपऱ्यात, शयनगृहातल्या बेडसाईड टेबलवर फुलांची सजावट सिरॅमिक, टेराकोटा अथवा काच यांच्या वापरातून बनवलेल्या फ्लॉवर पॉटचा उपयोग करून करता येते. याशिवाय अख्खी फुलं अथवा फुलांच्या पाकळय़ांचा वापर करूनदेखील केलेली सजावट अथवा घंगाळं, खोलगट मोठय़ा आकाराचं पात्र घेऊन त्यात पाणी भरून त्यावर नुसत्या टाकलेल्या फुलांच्या पाकळय़ादेखील दिवाळीच्या सजावटीमध्ये भर टाकतात.
बाथ टॉवेल : दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून असलेलं अभ्यंगस्नानाचं महत्त्व आणि सुगंधी तेल, उटणं लावून थंडगार हवामानात गरम पाण्यानं केलेलं स्नान हा एक सुखद अनुभव असतो. तेल आणि उटण्याचा दरवळणारा सुगंध तसेच गुलाबी पहाटेची थंडी यासाठी मऊ, उबदार स्पर्शाची गरज असते. अशा वेळी वापरल्या जाणाऱ्या टॉवेलची निवडही महत्त्वाची ठरते. विशेषत: टर्किश टॉवेलची पसंती योग्य ठरते. गृहसजावटीमध्ये आपण आपल्या स्वत:साठी तसेच घरासाठी सजावटीच्या दृष्टिकोनातून निवडलेली प्रत्येक वस्तू नावीन्यपूर्ण असेल तर आपल्या घराची सजावटदेखील सौंदर्यपूर्ण ठरू शकते. बाथ टॉवेल त्यापैकीच एक.
वॉल क्लॉक : अगदी छोटय़ा छोटय़ा वस्तूंची निवड करत असताना एकूणच वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन घरातल्या प्रत्येक दालनात त्या त्या ठिकाणाला साजेसं असं भिंतीवरील घडय़ाळ तरी दुर्लक्षित राहून कसं चालेल. घडय़ाळातल्या आकडे, काटे, त्याची संरचना, आकार, प्रकार या सर्व बाबींचा विचार करून नवीन, निरनिराळे, अगदी हटके असे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात किंवा बनवून घेता येतात आणि निश्चितच आपल्या घरातल्या भिंतीवरील घडय़ाळ आकर्षणाचा विषय बनू शकतं. एकूणच घराच्या सौंदर्यात भर पाडू शकतं.
डायनिंग टेबलवरील सजावट : दिवाळीच्या सकाळचं मन प्रफुल्लित करणारं वातावरण आणि डायनिंग टेबलवर ठेवलेले खास दिवाळीसाठी बनवलेले फराळाचे पदार्थ आणि तेदेखील सजवलेल्या डायनिंग टेबलवर ग्रहण करण्याचा आनंद मिळाला तर तो निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरेल. बाजारात विविध प्रकारचे टेबल मॅट्स, डिनर सेट्स, ग्लासेस, डिशेस, बाऊल्स, टेबल नॅपकिन्स, काटे-चमचे उपलब्ध असतात. खास दिवाळीसाठी यामधून निवडक वस्तूंना पसंती देऊन या विशेष दिवसांसाठी आपण वापरू शकतो. अर्थातच अशा प्रत्येक वस्तूची निवड करताना आपला कस लागत असतो. पसंत केलेल्या आपण निवडलेल्या प्रत्येक वस्तूची टेबलवरील मांडणीदेखील सजावटीच्या संरचनात्मकदृष्टय़ा होणं अधिक महत्त्वाचं असतं.
फोटो फ्रेम्स : सणासुदीच्या निमित्ताने आणि एकूणच आनंदी वातावरणाचे प्रत्येक क्षण कॅमेऱ्याच्या साहाय्यानं टिपणं हे तर हल्ली प्रत्येकाला हवं असतं. तशी सोय हल्ली अनेकांच्या मोबाइलमध्ये असते. स्वतंत्र कॅमेऱ्याचा वापर करूनदेखील फोटो काढण्याचं नियोजन आपण आपल्या घरातच काही वेळा करत असतो. अशा फोटोंसाठी आकर्षक नक्षीकाम केलेल्या सौंदर्यपूर्ण फोटो फ्रेम्स बाजारात उपलब्ध असतात आणि निश्चितच या फोटो फ्रेम्सही आपल्या गृहसजावटीमध्ये मानाचं स्थान मिळवून मोलाची भूमिका बजावत असतात. आपल्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी अशा अनेक तऱ्हेच्या लहानसहान वस्तूंची निवड या दिवाळीसाठी खास आकर्षणाचा विषय ठरू शकेल. रोषणाईच्या झगमगाटात आपलं घर तर उजळून निघेलच, पण त्याहीपेक्षा आपल्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, ईष्र्या, उन्नती, संपन्नता यांची पूर्तता होण्यासाठी दिवाळीतल्या दिव्यांच्या प्रकाशाचा प्रत्येक किरण आपल्याला नवनवीन दिशा, नवनवीन मार्ग दाखवत राहील, यात शंका नाही.
वास्तुसौंदर्य : दीपावलीची खास गृहसजावट
दिवाळी सण मोठा आनंदा नाही तोटा. आनंद घेऊन येणारी दिवाळी आणि आपलं मन प्रफुल्लित करणारं वातावरण ज्याची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत असतो. नवीन कपडे, वस्तू, दागिने, वाहन हे...
आणखी वाचा
First published on: 02-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interior design for diwali festival