Untitled-11पूर्वी घरात सर्रास वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू आज आधुनिकतेच्या रेटय़ात कालबा झाल्या आहेत. एकेकाळी या वस्तूंना घरात आणि घरातल्या मंडळींच्या मनातही जिव्हाळ्याचं स्थान होतं. कालौघात या वस्तू केवळ स्मरणस्मृतींमध्ये राहिल्या आहेत. मात्र आजही या वस्तूंची हटकून आठवण येते. अशा वस्तूंविषयीचं सदर.

या सुट्टीत आम्ही सहकुटुंब एका गावी गेलो होतो. गाव म्हणण्यापेक्षा खेडेगाव म्हटल्यास योग्य ठरेल. दुपारी एका कुटुंबात जेवायला जायचा योग आला. त्या घरातल्या गृहिणीने जेवायला काय करू म्हणून प्रश्न केला. मी म्हटलं, आम्ही खेडय़ात आलो आहोत तर मुंबईसारखे जेवण नको. काही तरी वेगळे म्हणजे खास ग्रामीण पद्धतीचे जेवण केलेत तर आम्हाला सर्वाना आवडेल. माझ्या सुनेने लगेच होकारार्थी मान डोलावली. त्या माऊलीने आमच्यासाठी खास ज्वारीची भाकरी, चण्याच्या पिठाचा झुणका, भात, गरम मसाल्याची आमटी असा खास ग्रामीण बेत पानात सादर केला. तोंडी लावायला डाव्या बाजूला लसणीच्या तिखटाचा छोटा गोळा वाढला. आमच्या मुलाने आणि सुनेने त्या चटणीचा लहान घास घेतला, मात्र अगदी आ.. हा करून जोराने मिटकीच मारली. सुनेने त्या काकूंना विचारले, ‘‘काकू लसणीची चटणी काय भारी झाल्ये हो, कशी बनवलीत?’’

Shrimant Dagdusheth Halwai Ganpati temple
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य आणि १ लाख २५ हजार दिव्यांची आरास, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
Archaeologists discover a 4000-year-old coffin inside another coffin of Egyptian priestess
Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?

मला आणि माझ्या पत्नीला त्या चवीमागचं इंगित लगेच कळून आलं होतं. ती चटणी मिक्सरमध्ये केली नव्हती, खलबत्त्यात कुटून केलेली होती, त्यामुळे तिची लज्जत अशी फर्मास झालेली होती.

स्वयंपाक करताना तो अधिक चविष्ट आणि पोषक व्हावा  म्हणून खाद्यपदार्थावर वेगवेगळे संस्कार करावे लागत. उदा. आसडणे, भाजणे, परतणे, पीठ करणे, कुटणे किंवा वाटणे इत्यादी. त्यातील कुटणे ह्य संस्कारासाठी खलबत्त्याचा वापर स्वयंपाकघरात, मिक्सर येण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी केला जात होता. पूर्वी वाटण्यासाठी पाटा-वरवंटा आणि कुटण्यासाठी खलबत्ता वापरत असत, आता मात्र दोन्हींसाठी आधुनिक मिक्सर वापरला जातो. वेळ व श्रम वाचविण्याच्या दृष्टीने मिक्सर वापरणे क्रमप्राप्त आहेच. शिवाय आता कुठल्याही कृतीसाठी सुटसुटीतपणादेखील महत्त्वाचा मानावा लागतो. त्या दृष्टीने मिक्सर वापरल्यास पाटा-वरवंटा आणि खलबत्त्याला तो सोयीस्कर पर्याय ठरतो. त्यामुळे आता आधुनिक राहणीमानाच्या कल्पनेतील स्वयंपाकघरात पाटा-वरवंटा आणि खलबत्ता  या दोन्ही गोष्टी आता जवळजवळ बाद झाल्यात जमा आहेत.

खलबत्त्यातील खल म्हणजे लोखंडाचे कडा नसलेले एक लहान आकाराचे पातेले. आणि त्यासोबत एक चांगला वजनदार आपल्या मुठीत पकडता येईल असा साधारण फूटभर लांब असा दंडगोलाकृती लोखंडी दस्ता म्हणजे बत्ता. त्याची एक बाजू पहारीच्या टोकासारखी पण अणकुचीदार नव्हे, अशी दोन्ही बाजूंनी निमुळती पण बोथट केलेली असते. या बाजूकडून गुळाची ढेप सहज फोडता येत असे, या बाजूचा म्हणावा इतका उपयोग अन्य कामासाठी होत नसावा. दुसरी बाजू पसरट पण चारही अंगांनी किंचित बाहेर आलेली अशी असते. खलाचा तळ हा चांगला जाडजूड असतो. दोन्ही वस्तूंच्या एकंदर वर्णावरून त्यांच्या वजनाची कल्पना आलीच असेल. या वस्तू काही दिवस वापरात नसल्यास याला हमखास गंज चढतो, पण अशा वेळी घरातील गृहिणी खोबरेल तेलाचा हात फिरवून त्याला पुनश्च काळा कुळकुळीत करून टाकत असे. कुटुंबातील तरुण त्यातल्यात त्यात लग्नाचे होतकरू, आपल्या दंडातील बेटकुळ्या अधिक घाटदार करण्यासाठी घरातल्या घरात जो व्यायाम करीत असत, त्या वेळी बत्त्याचा उपयोग त्यांना डम्बेल्ससारखा करता येत असे. हा त्याचा अजून एक न दिसणारा उपयोग. तसेच पूर्वी चाळीच्या वस्तीत खालच्या मजल्यावरील आणि वरच्या मजल्यावरील बिऱ्हाड करून भांडणासाठीदेखील हा कारणीभूत ठरत असे. कारण वरच्या मजल्यावर खलबत्त्यात काही कुटायला सुरुवात झाली, की खालच्या मजल्यावरील बाईची झोप तरी बिघडायची किंवा खालच्या बिऱ्हाडात स्वयंपाक सुरू असेल किंवा मंडळी जेवायला बसलेली असेल तर छताची माती त्या दणक्यांनी खाली अन्नात पडायची. त्या दोन संबंधित कुटुंबांचे संबंध कशा प्रकारचे आहेत, त्यावर वरच्या गृहिणीचे बत्त्याचे दणके कमी-जास्त होत असत. खलबत्त्यातला, खल, पालथा घालून त्याच्या बुडावर वाकलेले खिळे हातोडीने ठोकून सरळ करता येत. थोडक्यात, घरच्या घरी काही बारीकसारीक दुरुस्ती करायची झाल्यास, खाली भक्कम आधाराची गरज असल्यास पालथा घातलेला खल उपयोगात येत असे.

आर्थिकदृष्टय़ा संपन्न कुटुंबात घरात वापराव्या लागणाऱ्या वस्तूदेखील तशा किमती वापरल्या जातात. खलबत्ता त्याला अपवाद कसा असेल, अशा संपन्न घरात खलबत्ता पितळेचा आणि चांगला घाटदार आकाराचा रोजच्या वापरात असे. पण असा एखादा अपवाद सोडला तर बहुतेक घरात रोजच्या वापरात लोखंडी भरभक्कम खलबत्ताच पाहायला मिळत असे.

शेंगदाण्याचे कूट खलबत्त्यात करून पदार्थात घातल्यावर त्याची चव काही और लागते. लसणाची चटणी खलबत्त्यात कुटून केलेली आणि मिक्सरमध्ये फिरवून केलेली दोन्हींतला फरक खवैयाला लगेच कळून येतो. मिक्सरमधली लसणाची चटणी भरभरीत लागते आणि खलबत्त्यात केलेली लसणाची चटणी तेलकट गोळीबंद होते. सर्व प्रकारचा ताजा, कोरडा  मसाला हा पूर्वी घरीच करायची पद्धत होती. त्यामुळे त्या मसाल्यासाठी लागणारे सर्व जिन्नस उदा. धने, जिरे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, इत्यादी या खलबत्त्यात कुटून घ्यावे लागत. असा मसाला घालून केलेली भाजी-आमटीची चव आणि स्वाद आजूबाजूच्या घराघरांत पोचल्याशिवाय राहत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत सर्व प्रकारचे पापड घालून वाळवणे हा प्रत्येक घरातील एक जंगी आणि सामाईक कुटुंबांचा कार्यक्रम ठरलेलाच असे, त्यासाठी त्याचे पीठ किंवा डांगर तयार करण्यासाठी पाटा-वरवंटा आणि खलबत्ता  ही उपकरणे असावीच लागायची. खलबत्ता आणि पाटा-वरवंटय़ाऐवजी वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी आता एकच  मिक्सर वापरता येतो. मिक्सरमध्ये टाकलेला पदार्थ ठेचला न जाता त्याची पावडर तयार होते, पावडर तयार होताना जी ऊर्जा तयार होते त्यामुळे उष्णता वाढते आणि पदार्थाच्या चवीत बराच फरक पडतो. परंतु खलबत्त्यात पदार्थ कुटल्यावर तो पदार्थ थोडा थोडा ठेचला जाऊन त्या पदार्थाचा पार चेंदामेंदा होतो आणि त्यातील तेल किंवा ओलसरपणा पदार्थाची मूळ चव आणि स्वाद न घालवता बाहेर पडते आणि पदार्थ अस्सल चविष्ट होतो. खलबत्त्यात फक्त कोरडे पदार्थच कुटता येतात, ही एक उणीव मात्र त्या उपकरणात आहे. लहान प्रमाणात वस्तू कुटण्यासाठी लहान आकाराचे स्टेनलेस स्टीलचे खलबत्ते बाजारात आजही उपलब्ध आहेत. काही घरांत त्याचा वेलची वगैरे कुटण्यासाठी वापर होतो, पण ते सर्व नाजूकसाजूक प्रकार. खलबत्ता म्हटले म्हणजे डोळ्यांसमोर येतो तो पूर्वी प्रत्येक कुटुंबात स्वयंपाकघरात हमखास आढळणारा काळ्या रंगाचा दणकट शरीरयष्टीचा, पाटा-वरवंटा याचा जिगरी दोस्त लोखंडी खलबत्ता.

आता वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी आधुनिक यंत्रांचा वापर घराघरांत होऊ  लागल्यावर स्वयंपाकघरातील पूर्वी नेहमी वापरात असणारे पाटा-वरवंटा आणि खलबत्ता ह्य वस्तू आता कालबा ठरू लागल्या आहेत. आता आधुनिक शहरी कुटुंबांतून त्या हद्दपार झाल्याच आहेत, पण खेडेगावातूनही  फार क्वचित घरातून त्या रोजच्या वापरात आहेत. अजून काही वर्षांनी त्या फक्त ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयात किंवा नाटक सिनेमाला प्रॉपर्टी पुरविणाऱ्या दुकानातच पाहायला मिळतील.

gadrekaka@gmail.com