कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक, देवदुर्लभ चमत्कारच मानायला हवा. प्रत्यक्ष आलम दुनियेचा तारणहार सूर्यनारायणच भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचीती या अल्पकालीन किरणोत्सवप्रसंगी येते..
अनेक चेहऱ्यांचे खुद्द कोल्हापूर शहर आणि त्याच्या परिसरातील वेगवेगळी ठिकाणं म्हणजे पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांना नेहमीच मोहमयी वाटत आहेत. पर्यटनाच्या विविध शाखा आता विस्तारत आहेत. त्यातील पूर्वापारच्या धार्मिक पर्यटनासाठी हा सारा प्रदेश आकर्षित करणारा आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्रीमहालक्ष्मी मंदिर म्हणजे करवीर नगरीचा मानबिंदू अशी ओळखच झाली आहे.
भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराची बांधणी कधी झाली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र सापडलेल्या पाचव्या, सहाव्या शतकांतील शिलालेखात या मंदिराचा उल्लेख असल्याने त्या काळच्या राजवटीत या मंदिराची उभारणी झाल्याचा निष्कर्ष काढला जातो. विस्तीर्ण जागेतील ही मंदिर वास्तू पश्चिमाभिमुख असून त्याच्या बांधकामासाठी ‘रंकाळा’ खाणीतील दगडांचा वापर केला गेला आहे. साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास केल्याचे प्रत्ययाला येते. तसेच या भूप्रदेशाची भौगोलिक स्थिती ध्यानी घेऊन पर्यावरणाचा अभ्यासही त्या काळच्या अज्ञात स्थापत्य विशारदांनी केल्याचे जाणवते. पूर तसेच धरणीकंप अशा नैसर्गिक आपत्तींनी या मंदिर वास्तूवर परिणाम केल्याचे जाणवते. तसेच राजकीय स्थित्यंतरात आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात या मंदिराची पुनर्रचना झाली आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिगांपैकी पाच ज्योतिर्लिग जशी महाराष्ट्रात आहेत, तशीच देशातील ५१ शक्तिपीठांपैकी साडेतीन पीठांचा वारसा महाराष्ट्राला लाभलाय. त्यातील करवीरनगरीचे महालक्ष्मी मंदिर हे जागृत देवस्थान महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात तसेच उत्तर भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. शिलालेखासारख्या प्राचीन साधनाद्वारे या मंदिराच्या इतिहासावर जसा प्रकाश पडतोय तद्वत इजिप्शियन भूगोल अभ्यासक टॉलेमीच्या ग्रंथातही करवीर नगरीचा उल्लेख आहेच.
या महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम काळ्या-निळसर दगडाचे आहे. आणि त्याच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून, त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वारे असल्याने येथे येणे-जाणे सोयीचे आहे. त्यातील पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार तर उत्तर दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उर्वरित दरवाजे पूर्व तसेच दक्षिण दिशेला आहेत. कोणत्याही दरवाजाने प्रवेश केल्यावर मंदिर सभोवतालच्या चौफेर प्रांगणात आपण येतो. मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धपणासह सुबकता नजरेत भरते.
देशातील कोणत्याही पुरातन मंदिराला ‘हेमाडपंथी’ शैली म्हणण्याची पद्धत या मंदिराच्या बाबतीतही ऐकायला मिळते. मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणीनंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीनकाळचे आहेत. तसेच देवालयाची रचना तीन गाभाऱ्यांत विभागली आहे. सुमारे २६,००० चौ. फूट क्षेत्रावरील मंदिर जमिनीपासून तसे उंचावर आहे. सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आपल्या नजरेत भरणारा आहे. भक्कम, काळ्या, पाषाणांच्या अनेक शिळांवर शिल्पकाम, नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य बेमालूम खुलवले आहे.
महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामात जोडकाम करण्यासाठी उखळी सांधे तयार करून ते एकमेकांत अडकवून इमारतीचे सुरक्षित बांधकाम साधले आहे. या बांधकाम पद्धतीचा अवलंब करताना शिल्पकाराने निश्चितपणे भूमितीशास्त्राचा अभ्यास केल्याचे जाणवते. त्या काळी बांधकामात वापरात असलेला चुनाही या मंदिर बांधकामात आढळत नाही, हे विशेष. गेल्या अनेक शतकांमध्ये या महालक्ष्मी मंदिरात पाण्याची गळती तथा पाणी झिरपणे, साचणे, ओल येणे असला प्रकार झालेला नाही. यावरून त्या काळच्या स्थापत्यशास्त्राची कल्पना येते.
ही दोन मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच, परंतु संपूर्ण मंदिरावरती अनेक देखण्या मूर्तीची कलाकृती वाखाणण्यासारखी आहे. मंदिर बाह्य़ भिंतीवरील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सादर करताना शिल्पकारांनी सजावटीच्या कोंदणात उभारलेल्या स्त्रियांच्या विविध मूर्तीच्या भावमुद्रा खूपच सजीव व सहजसुंदर भासतात. पहिल्या-दुसऱ्या मजल्याच्या बाहेरील बाजूस आणि मंदिर शिखर शिल्पाचे कोरीव काम पाहताना पुन्हा एकदा भूमितीशास्त्राचा प्रत्यय येतो. मजल्यावरील दगडी महिरपी आणि त्याच्यावरील नक्षीकाम साधताना कमीत कमी जागेतील प्रमाणबद्धपणा निश्चितच जाणवतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह, विष्णू, तुळजाभवानी, विठ्ठल, राधाकृष्ण, हनुमंत यांच्या सुबक मूर्तीनी मंदिराची शान वाढवली आहे.
मंदिर शिखर कळसाची रचना मंदिराच्या भव्यतेला साजेशी आहे. त्यांची निर्मिती कोल्हापूर छत्रपतींच्या काळी झाली. दिवसाच्या प्रत्येक समयी येथे होणाऱ्या आरत्यांच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्यातील पहाटेच्या काकड आरतीसमयी जो काकडा शिखरावरील दर्शनी भागी ठेवला जातो त्यामुळे काकड आरतीची वेळ दर्शकांना समजते. महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची असून ती तीन फूट उंच आहे. चबुतऱ्यावरील ही देखणी मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हाती गदा तर डाव्या हाती ढोल, खालील उजव्या हातात म्हाळुंग (महालुंग) व डाव्या हातात मानपत्र आहे. देवीच्या मस्तकी उत्तराभिमुख लिंग असून पाश्र्वभागी नागफणा आहे. वर्षांनुवर्षे होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्तीच्या दगडाची झीज होत आहे, तर अभिषेकातील रासायनिक घटकांमुळे मूर्ती ठिसूळ होत चालली आहे.
किरणोत्सव :
वर्षभर महालक्ष्मी मंदिरात प्रवासी, पर्यटक, भाविकांची गर्दी असतेच. त्यातील नवरात्र उत्सवातील नऊ दिवस म्हणजे उत्साहपूर्ण जल्लोष असतो. तेव्हा साऱ्या महाराष्ट्रासह इतर प्रांतीय लोकांची ही गर्दी येथे उसळलेली असते. तेव्हाचे सारे वातावरण म्हणजे अभूतपूर्व असा महोत्सव असतो. भल्या पहाटेपासून येथे धार्मिक कार्यक्रमाबरोबर सांस्कृतिक व संगीताच्या कार्यक्रमाला ही गर्दी होते. येथील मंदिरावरची रोषणाई एका उत्साही वातावरणाचा कळस आहे.
पण वर्षभरातील ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा ‘किरणोत्सव’ म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक-देवदुर्लभ चमत्कारच मानायला हवा. वर्षभरातून फक्त सहा वेळा या अद्वितीय सोहळ्याचे अल्पकाळ दर्शन घडते. कार्तिक महिन्यात म्हणजेच ९, १०, ११ नोव्हेंबर आणि माघ महिन्यात ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी या ठरावीक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी अलोट गर्दी उसललेली असते. दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तसमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याची तेजस्वी सूर्यकिरणे क्रमाक्रमाने महालक्ष्मी देवीचे चरण, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि अखेरीस काही वेळात मुखमंडलासह महालक्ष्मी देवीचे सर्वागच उजळून टाकतो.
प्रत्यक्ष आलम दुनियेचा तारणहार सूर्यनारायणच भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचीती या अल्पवयीन किरणोत्सवप्रसंगी येते. महालक्ष्मी मंदिर शिल्पाकृतीसह हा अल्पकालीन, अद्भुत चमत्कार अनुभवताना प्रत्येकाच्या मनात विचार येत असणार. हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभासंपन्न होते. त्या अज्ञात कलाकारांना त्रिवार सलाम..
करवीरवासिनी महालक्ष्मी मंदिर
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक, देवदुर्लभ चमत्कारच मानायला हवा.
आणखी वाचा
First published on: 05-10-2013 at 01:09 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur mahalaxmi temple