नावीन्यपूर्ण वास्तुकलेच्या नजराण्यातून साऱ्या जगावर अधिराज्य गाजवणारा फ्रेंच वास्तुविशारद ‘ला कार्बुझिए’ म्हणजे असामान्य प्रतिभेचं देणं लाभलेला प्रतिभावान वास्तुशास्त्रतज्ज्ञ होता. त्याच्या जन्माला अलीकडेच १२५ वर्षे झाली. त्याच्या अलौकिक, कलंदर जीवन प्रवासाचा हा धावता आढावा…
सुमारे साठ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तुशास्त्र क्षेत्राला ऐतिहासिक कलाटणी देणाऱ्या ‘ला कार्बुझिए’ची कामगिरी म्हणजे माणसाला प्रसन्न आणि आल्हाददायक जीवन जगण्यासाठी दृष्टी देणारी अशी कलाकृती आहे. माणसाचं शारीरिक-मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी कार्बुझिएने उभारलेल्या वास्तूंना भव्यतेसह आधुनिक चेहरा असला तरी सभोवतालच्या हवामानासह निसर्गाचाही त्याने अभ्यास केला होता.
नावीन्यपूर्ण वास्तुकलेच्या नजराण्यातून साऱ्या जगावर अधिराज्य गाजवणारा फ्रेंच वास्तुविशारद ‘कार्बुझिए’ म्हणजे असामान्य प्रतिमेचं देणं घेऊन आलेला एक प्रतिभावान वास्तुविशारद होता.
६ ऑक्टोबर १८८७ रोजी ला-ओ-द-फॉ या स्वित्र्झलडमधील नगरीत कार्बुझिएचा जन्म झाला. आपल्या वास्तुशिल्पक्षेत्रात प्रगती साधताना त्याने ‘ला कार्बुझिए’ हे टोपणनाव धारण केलं. याच नावाने त्याला सारं जग ओळखतं. वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत आपल्या जन्मगावी स्कूल ऑफ फाइन आर्टमध्ये कलाशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच तेथे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतून इटली, जर्मनीसह, ग्रीक, रुमानिया या देशांत मुशाफिरी करताना तेथील वास्तुविशारदांशी संवाद साधत त्यांनी निर्मिलेल्या कलाकृतीचा बारकाईने अभ्यास केला आणि या प्रवासातच भविष्यात आपल्याला काय काम करायचं आहे, याची दिशाही त्याने निश्चित केली.
वास्तुकलेचा ध्यास घेतलेल्या कार्बुझिएने १९१० मध्ये बर्लिनमधील प्रख्यात वास्तुविशारद पीटर बेरेन्स यांच्याकडे वास्तुशास्त्राचे प्राथमिक धडे घेतले. कार्बुझिएसारख्या स्वयंभू माणसाला फार काळ उमेदवारी करण्यात स्वारस्य नव्हते. अखेर १९१७ मध्ये अनुभावाची बेगमी गाठीशी घेऊन फ्रान्सला परतल्यावर त्याने स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली. पॅरिस शहरातील कार्बुझिएचा स्टुडिओ म्हणजे वास्तुविशारदाच्या नवनवीन कल्पनेचे उगमस्थान ठरते.
कार्बुझिएने फ्रान्समध्ये उभारलेले रोशा चर्च म्हणजेच उपयुक्तता, प्रमाणबद्धता आणि मुक्त कल्पनाविलास यांचा नेत्रसुखद मिलाफ आहे.
फ्रान्समध्ये स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात करून नंतर अखेपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. वास्तुशिल्प उभारण्यात व्रतस्थपणे काम करताना आपल्या ७८ वर्षांच्या आयुष्यात कार्बुझिएने प्रस्तापित वास्तुशास्त्र शैलीत परिवर्तन घडवून आणलं. ज्या काळात कार्बुझिए वास्तुशास्त्रात प्रयोग करण्यात गुंतला होता तेव्हा युरोप-आशिया खंडात चित्रकला, शिल्पकला क्षेत्रात लोकोत्तर माणसांनी आपल्या अंगच्या कर्तृत्वाने जगावर प्रभाव टाकून गारुड घातलं. या लोकोत्तर माणसांच्या मांदियाळीत कार्बुझिएची कामगिरी निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. वैशिष्टय़ असे की, कार्बुझिएने खास असं कमान कलेचं शिक्षण घेतलं नव्हतं. मात्र अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या या वास्तुविशारदाने कमानकलेकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली.
कार्बुझिएच्या घराविषयीच्या कल्पना
- घर ही वास्तू यंत्रवत कार्यक्षम असावी, त्याची थोडीशीही जागा वाया जाता कामा नये, तसेच त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चही फार नसावा.
- मानवी व्यक्तिमत्त्व आणि माणसाच्या जीवन शैलीवर घर ही वास्तू परिणामकारक ठरते. त्यामुळे वास्तुविशारदकांनी नियोजित वास्तूचा आराखडा तयार करताना त्यात आपल्या कौशल्यासह स्वत:ची मानसिक गुंतवणूक करायला हवी
- माणसाचा भावनिक विकास आणि सृजनात्मक काम करण्याची प्रेरणा त्याला त्याच्या निवास वास्तूतूनच मिळत असते.
घराच्या उभारणीत प्रमाणबद्धता येण्यासाठी कार्बुझिएने नियमावलीच तयार केली. कार्बुझिए घराची तुलना यंत्राबरोबर करतो. ‘घर ही वास्तू यंत्रवत कार्यक्षम असावी, त्याची थोडीशीही जागा वाया जाता कामा नये, तसेच त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चही फार नसावा’ असे तो आग्रहाने सांगतो. त्याचप्रमाणे ‘‘मानवी व्यक्तिमत्त्व आणि माणसाच्या जीवन शैलीवर घर ही वास्तू परिणामकारक ठरते. त्यामुळे वास्तुविशारदकांनी नियोजित वास्तूचा आराखडा तयार करताना त्यात आपल्या कौशल्यासह स्वत:ची मानसिक गुंतवणूक करायला हवी’’ या विधानाला पुस्ती देताना कार्बुझिए म्हणतो की, ‘‘माणसाचा भावनिक विकास आणि सृजनात्मक काम करण्याची प्रेरणा त्याला त्याच्या निवास वास्तूतूनच मिळत असते.’’
..‘‘घर हे माणसाकरता असल्याने आपल्या गरजेपुरते, आवश्यक तेवढेच सामान घरात हवे, घरात नेत्रसुखद प्रकाश हवा.’’ इमारतीच्या गच्चीवरील बाग ही कल्पना तर कार्बुझिएची. मात्र जागा आहे म्हणून झाडांची वारेमाप गर्दी करू नये असेही त्याला वाटते. गच्चीवरील बाग ही कल्पना कार्बुझिएच्या आधी कुणाच्याच वास्तुकलाकृतीत आढळत नाही.
आज अनेक गृहसंकुलांतील, तसेच खाजगी इमारतींच्या तळमजल्यावरील वाहनतळाची (ढअफङकठॅ) व्यवस्था ही कल्पनासुद्धा कार्बुझिएची आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आणल्यास जागेचा अपव्यय होणार, असे म्हणत लोकांनी त्याच्यावर टीका केली. मात्र भविष्यात माणसांपेक्षा वाहनेच जास्त होणार हे ओळखण्याचं द्रष्टेपण कार्बुझिएकडे होतं. आपल्या बांधकामासाठी वापरलेल्या साधनसामुग्रीच्या मूळ सौंदर्याच्या आविष्कारावर कार्बुझिए ठाम होता. वास्तु बांधकामाला रंगरंगोटी करायला त्याचा विरोध होता. वास्तुविशारद म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या या माणसाला नगररचना, शिल्पकला, साहित्य, सौंदर्यशास्त्र या विषयांत गती होती. कार्बुझिए कुठेही गेला तरी प्रवासातील आवडलेल्या इमारतींची रेखाचित्रे काढण्याची त्याची सवय होती. साऱ्या जगाचं आकर्षण ठरलेली अमेरिकेतील सयुक्त राष्ट्र संघटनेची इमारत कार्बुझिएच्या कल्पनेतूनच साकारली आहे. फ्रान्समधील ‘रोशा’ येथील चर्चची वास्तू म्हणजे नुसतेच कार्बुझिएच्या कर्तृत्वाचे प्रतीक नसून, जगभरातील असंख्य कलाकार, वास्तुविशारदकांना एक आदर्श आणि प्रेरणादायी आहे.
कार्बुझिएची ग्रंथसंपदासुद्धा जगभरच्या कलाकार, वास्तुकलाकृती अभ्यासकांना मार्गदर्शक आहे. १९२६ मध्ये त्यांनी ‘फाइव्ह पॉइन्टस् ऑफ मॉडर्न आर्किटेक्ट’ तर १९४६ साली ‘कन्सर्निग टाऊन प्लॅनिंग’ या ग्रंथांची निर्मिती करून नव वास्तुशास्त्राची संकल्पनाच स्पष्ट केलीय.
आपल्या भारत भूमीवरही कार्बुझिएच्या कलाकृतीच्या पाऊलखुणा उमटल्यात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूंनी आधुनिक भारतासाठी जी स्वप्नं बघितली त्यात नकाशा शास्त्राचा विकास साधण्यासाठी ‘सव्र्हे ऑफ इंडिया’ची स्थापना केली. तसेच पंजाब-हरियाणाची राजधानी चंदिगड ही आदर्श आधुनिक नगरी उभारण्याचे आव्हानात्मक काम त्यांनी कार्बुझिएकडे सोपवले. कार्बुझिएने ‘सालोह’ (आर. सी. सी.) काँक्रिट माध्यमातून चंदिगढ नगरी उभारून आपल्या कामाची कायमस्वरूपी छाप त्यावर पाडली आहे. आजही चंदिगढची सौंदर्यशाली वसाहत म्हणजे आधुनिक वास्तुशास्त्राचा आदर्श वास्तुपाठ आहे. येथील सचिवालय, उच्च न्यायालय, सभागृह यांसारख्या देखण्या, भव्य इमारती उभारताना कार्बुझिएने आपली प्रतिभा आणि कौशल्य तर पणाला लावलंच, पण येथील बांधकाम करताना भारतीय हवामान, पर्यावरणाचाही विचार केला आहे.
चंदिगढप्रमाणे अहमदाबाद येथील ‘व्हिला शोधन’, कापड गिरणी मालक संघटना कार्यालय, मनोरमा साराभाई निवास आणि सांस्कृतिक केंद्र इत्यादी इमारतींच्या उभारणीतून कार्बुझिएने या औद्योगिक नगरीचं सौंदर्य खुलवलं आहे.
निसर्गाचं मोठेपण मान्य केलेल्या या माणसाला निसर्गाच्या सहवासातच मृत्यू आला. फ्रान्समधील ‘कॅपमारतॅ’ येथे पोहण्याचा आनंद घेत असताना हृदयक्रिया बंद पडून कार्बुझिएची जीवन यात्रा संपली. तो दिवस होता २७ ऑगस्ट १९६५..