सुमारे साठ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तुशास्त्र क्षेत्राला ऐतिहासिक कलाटणी देणाऱ्या ‘ला कार्बुझिए’ची कामगिरी म्हणजे माणसाला प्रसन्न आणि आल्हाददायक जीवन जगण्यासाठी दृष्टी देणारी अशी कलाकृती आहे. माणसाचं शारीरिक-मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी कार्बुझिएने उभारलेल्या वास्तूंना भव्यतेसह आधुनिक चेहरा असला तरी सभोवतालच्या हवामानासह निसर्गाचाही त्याने अभ्यास केला होता.
नावीन्यपूर्ण वास्तुकलेच्या नजराण्यातून साऱ्या जगावर अधिराज्य गाजवणारा फ्रेंच वास्तुविशारद ‘कार्बुझिए’ म्हणजे असामान्य प्रतिमेचं देणं घेऊन आलेला एक प्रतिभावान वास्तुविशारद होता.
६ ऑक्टोबर १८८७ रोजी ला-ओ-द-फॉ या स्वित्र्झलडमधील नगरीत कार्बुझिएचा जन्म झाला. आपल्या वास्तुशिल्पक्षेत्रात प्रगती साधताना त्याने ‘ला कार्बुझिए’ हे टोपणनाव धारण केलं. याच नावाने त्याला सारं जग ओळखतं. वयाच्या १८व्या वर्षांपर्यंत आपल्या जन्मगावी स्कूल ऑफ फाइन आर्टमध्ये कलाशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच तेथे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीतून इटली, जर्मनीसह, ग्रीक, रुमानिया या देशांत मुशाफिरी करताना तेथील वास्तुविशारदांशी संवाद साधत त्यांनी निर्मिलेल्या कलाकृतीचा बारकाईने अभ्यास केला आणि या प्रवासातच भविष्यात आपल्याला काय काम करायचं आहे, याची दिशाही त्याने निश्चित केली.
वास्तुकलेचा ध्यास घेतलेल्या कार्बुझिएने १९१० मध्ये बर्लिनमधील प्रख्यात वास्तुविशारद पीटर बेरेन्स यांच्याकडे वास्तुशास्त्राचे प्राथमिक धडे घेतले. कार्बुझिएसारख्या स्वयंभू माणसाला फार काळ उमेदवारी करण्यात स्वारस्य नव्हते. अखेर १९१७ मध्ये अनुभावाची बेगमी गाठीशी घेऊन फ्रान्सला परतल्यावर त्याने स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली. पॅरिस शहरातील कार्बुझिएचा स्टुडिओ म्हणजे वास्तुविशारदाच्या नवनवीन कल्पनेचे उगमस्थान ठरते.
कार्बुझिएने फ्रान्समध्ये उभारलेले रोशा चर्च म्हणजेच उपयुक्तता, प्रमाणबद्धता आणि मुक्त कल्पनाविलास यांचा नेत्रसुखद मिलाफ आहे.
फ्रान्समध्ये स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात करून नंतर अखेपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. वास्तुशिल्प उभारण्यात व्रतस्थपणे काम करताना आपल्या ७८ वर्षांच्या आयुष्यात कार्बुझिएने प्रस्तापित वास्तुशास्त्र शैलीत परिवर्तन घडवून आणलं. ज्या काळात कार्बुझिए वास्तुशास्त्रात प्रयोग करण्यात गुंतला होता तेव्हा युरोप-आशिया खंडात चित्रकला, शिल्पकला क्षेत्रात लोकोत्तर माणसांनी आपल्या अंगच्या कर्तृत्वाने जगावर प्रभाव टाकून गारुड घातलं. या लोकोत्तर माणसांच्या मांदियाळीत कार्बुझिएची कामगिरी निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. वैशिष्टय़ असे की, कार्बुझिएने खास असं कमान कलेचं शिक्षण घेतलं नव्हतं. मात्र अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेल्या या वास्तुविशारदाने कमानकलेकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा